नजरा
नजरा


ताई, बाहेर जात आहेस? ठीक आहे जा. पण, जरा सांभाळून. बाहेर लांडगे तयार आहेत... नजरेने तुझ्या शरीराचे लचके तोडण्यासाठी. ताई, दाराबाहेर पाय ठेवताच, लहानपणी ज्याच्या अंगाखांद्यावर तू खेळलीस, तो शेजारचा 'काका' तुला दिसेल. तो तुला मादक नजरेने खालून वरपर्यंत न्याहाळून, कुत्सीतपणे हसेल. तू मात्र त्याच्या मुलीप्रमाणे वागून भोळेपणाने हसत हसत पुढे जा. ताई, थोडं पुढे गेल्यावर 'चौकात' काही टवाळखोर मुलं दिसतील. त्यात तुझा 'भाऊ'ही असेल, सडक्या सुपारीचा खर्रा चावत बापाची कमाई जुगारात लावत. तू स्कार्फमूळे ओळखू न आल्याने तो दुरूनच तुला, "ऐ आयटम, माल, मशीन, डाव" असे विशेषण देऊन संबोधणार. पण, रागावू नकोस. काहीही न बोलता चालत रहा. ताई! पुढे चालता चालता तुला रस्त्यात एखादे उद्यान लागेल. तेथे हास्य-योगा करायला आलेले, तुझ्या आजोबांच्या वयाचे म्हातारे तुला दिसतील. जे क्षणार्धात भिंगाच्या काचा वर करून, डोळे विस्फारून, उन्मादक नजरेने तुझ्या कपड्यामागील शरीराचा एक्स-रे काढतील आणि जिभल्या चाटतील. पण, तू संतापू नकोस.चालत रहा.ताई! तू तुझ्या आँफिसमध्ये पोहोचशील. आँफिसमधे जाता जाता कँटीनजवळ तुला तुझ्या सहकारी 'मित्रांचा' समूह दिसेल. त्यातील एकजण तुला म्हणेल, "मँडम आज फारच सुंदर दिसताय." पण, त्या काँम्प्लीमेंटने हुरळून जाऊ नकोस. कारण तो तुझ्या आकर्षक चेहऱ्याची नव्हे तर तुझ्या आकर्षक शरीराची प्रशंसा करत होता. तेही तुझ्या छातीकडे पाहात. पण, चिडू नकोस. तू आपले काम करत रहा. ताई! बाहेर जात आहेस? ठीक आहे जा. आणि मोज. किती लोकांनी दिवसभरात नजरेने तुझ्या शरीराचे लचके तोडले? शेजारचा काका, सोसायटीतली मुले, नकळतपणे तुझा भाऊ, बागेतले म्हातारे, दूधवाला, आँटोवाला, दुकानदार, वेटर, तुझे सहकारी अन् तुझा बाँस इत्यादी इत्यादी. तू थकशील मोजून, पण, पुरूषी अहंकाराने भरलेल्या 'नजरा' थकणार नाहीत. चेकाळू नकोस. शांत रहा. ताई! तू शरीर झाकायला कपडे कोणतेही घाल. साडी घाल, बुरखा घाल, पंजाबी ड्रेस घाल, जीन्स टाँप घाल. तू कितीही मोठी ओढणी घे. पण, जहरी 'नजरा' तू त्याच्या आत काय घातलय. कुठे काही दिसते का? हेच डोकावून पाहणार. कारण, पाँर्न मुव्हीज पाहून डिजीटल झालेल्या इंडियाला सर्वच्या-सर्व स्ञीया जणू पाँर्नस्टारच वाटू लागल्या आहेत.. त्यांच्या गलीच्छ नजरेची भूक भागवणा-या. ताई! तू घाबरू नकोस. चेकाळू नकोस. चिडू नकोस. रागावू नकोस. संतापू नकोस.आणि बोलू तर अजीबात नकोस. ताई! तू बाहेर जरूर जा. हरकत नाही, पण जातांना प्रत्येक लांडग्याच्या नजरेचे निरीक्षण कर. त्याची नजर तुझ्या ओढणीच्या पार आत डोकावू पाहण्याचा प्रयत्न करतेय, असे तुला आढळून येईल. आता मात्र तू थांब आणि मागे वळ. मागे वळून प्रत्येक वासनांध गिधाडाच्या नजरेला नजर भिडव. दाखव त्याला त्याची औकात आणि सांग तुझी जात "तू ह्या जगाची माय असल्याची."