Pravin Jawale

Others

4  

Pravin Jawale

Others

निघून जाण्याआधी...

निघून जाण्याआधी...

9 mins
16.1K


      सौरभशी बोलावसं वाटतं. पण त्याने अबोला धरला आहे. जेव्हा मी त्याच्याशी बोलायला जाते तेव्हा मात्र तो दुर्लक्ष करून माझ्यापासून दूर निघून जातो. त्याच्या अश्या वागण्याचा मला त्रास होतोय हे त्याला का जाणवत नाही? अगोदर तर मला भेटण्यासाठी नेहमी उत्सुक असायचा. माझ्यासोबत कॉलेज कॅन्टीनमध्ये मनभरून गप्पा मारत बसायचा. आम्ही अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर करायचो. खूप काही बोलायचो; पण आता त्याचं मला टाळणं, माझ्यापासून दूर जाणं, माझ्या मेसेजला रिप्लाय न देणं, कॉल अटेंड न करणं, या सगळ्याचा मला फार त्रास होतोय याची त्याला काहीच जाणीव नाही. हे असं का?

       मी त्याच्या वाढदिवसाला जे वागले ते बरोबर होतं का? हे माझं मलाच कळत नाहीये. माझ्या सान्निध्यात असलेल्या लोकांच्या भावना मला खरच कळतात का? मी त्यांना समजून घेऊ शकते का? हे प्रश्न आता माझं मन खात आहेत. कधी कधी फार अपराधी वाटतं मला.

         सौरभ माझा अत्यंत जिवलग मित्र. आमच्या दोघांच्या मैत्रीत कसलीच पोकळी राहीलेली नव्हती. विश्वासाने, समजूतदारपणाने आमच्या नात्यातली पोकळी भरून निघाली होती. तसेच त्याची मला प्रत्येक गोष्ट उमजत होती; तो मला उमजत होता अन् मीही त्याला उमजत होते. हो,उमजत होते. कारण आताचं त्याचं वागणं मला बिलकुल कळत नाहीये तो असा का वागतोय?

      'मरेपर्यंत आपली मैत्री अबाधित राहील, लाख संकटं आली तरी आपण एकत्र राहायचं.' असं बोलणारा सौरभ कुठे हरवलाय?

            याची सुरुवात झाली; ती म्हणजे त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी. त्याचा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी फार मोठा औत्सुक्याचा दिवस. सुजाता, स्वप्नील, जयेश, दिनेश, दिक्षा, मयुरेश आम्ही सर्वांनी मिळून सौरभचा वाढदिवस  साजरा करण्याचे ठरवले अन् सगळी तयारी केली. त्याला रात्री ठिक बारा वाजता कोण विश करेल याची आमच्यात स्पर्धा लागली होती. ही स्पर्धा मी जिंकावी म्हणून मी बारा वाजायला दोन मिनिटं कमी असताना सौरभला कॉल केला. दोन मिनिटं इकडच्या-तिकडच्या गप्पा मारत होते. माझी नजर घड्याळाकडेच होती. जेव्हा ठीक बारा वाजले तेव्हा त्याला मी विश केलं. आणि तेव्हा त्याला वाढदिवस आहे हे पण माहित नव्हतं. मी विश केल्यावर त्याच्या लक्षात आलं.

          कॉलेज कॅन्टीनमध्ये आम्ही सगळे सौरभची वाट पाहत बसलो होतो. दिनेश आणि जयेश केक घेऊन लपले होते. सौरभ आमच्यात येऊन बसल्यावर मयुरेशने अचानक सौरभचे डोळे झाकले. आणि त्याने डोळे झाकताच त्याच्यासमोर केक ठेवून आम्ही सर्वांनी एकासुरात 'हॅप्पी बर्थडे' म्हटलं. त्याला अतोनात आनंद झाला होता. प्रत्येकाच्या वाढदिवसाला आमच्यात वेगळेपण असतंच तसं सौरभच्या वाढदिवसालादेखील हे वेगळेपण होतं. केक फस्त करून आम्ही सगळ्यांनी फिरायला जाण्याचं ठरवलं होतं. पण सौरभने वेळ नसल्याचं सांगितल्यावर यावर पाणी फेरलं गेलं.

     काहीवेळाने मला सौरभचा कॉल आला. त्याने कॉलेज गेटजवळ ये म्हणून सांगितलं. तेही एकटीच ये. तुझ्याजवळ माझं काम आहे म्हणून.

          मी काही विचार न करता गेले. तेव्हा त्याने सोबत फिरायला येण्यास सांगितलं. 'आपण सर्वजण जाऊया' असं मी म्हणताच त्याने यासाठी नकार दिला.

    "आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे अन् हा दिवस तुझ्यासोबत जगायचा आहे." ह्या बोलण्याचा टोन मला काही कळला नाही. यामागचा खरा अर्थही मला त्यावेळी कळला नव्हता. मी त्याचा वाढदिवस आहे म्हणून त्याच्यासोबत जायला तयार झाले होते.

    बस स्टॉपवर बस आल्यावर आम्ही दोघे निघालो. काही वेळ शांततेत गेला. आज तर सौरभ फार गप्प बसला होता. एरवी त्याची बडबड थांबवणं मला कधी जमत नसे. आणि तसाही माझा अबोल स्वभाव असल्याने त्याला बोलण्याची मुभा जास्त असते. तसेच त्याच्या शांत राहण्यात गूढ काहीतरी लपलेलं आहे हे मला जाणवलं होतं.

           मोबाइलमधील गाणी ऐकण्यासाठी त्याने इअरफोन काढला. मलाही ऑफर केली. आता आमच्यात बोलकी होती ती फक्त गाणी.

'झुकी झुकी सी नजर, बेकरार हैं कि नहीं।

दबा दबासा सही, दिल मैं प्यार है कि नहीं।'

जगजीत सिंग यांच्या गझलचे हे शब्द माझ्या कानावर पडताच मला प्रश्न पडला की, नेहमी लेटेस्ट गाण्यांमध्ये रमणारा अचानक हृदयाला हळुवारपणे स्पर्श करणारी गाणी कशी काय ऐकू लागला?

"तुलातर―"

       "हो मला लेटेस्ट गाणी आवडतात, आणि आता जगजीत सिंग यांची गझल कशी काय ऐकतोय? हेच विचारायचं आहे न?" मला पडलेला प्रश्न त्याने ओळखला होता. माझं बोलणं तोडत सौरभ बोलला.

"हो" मी म्हणाले.

       "अक्षदा, मलाही आजकाल ऐकू वाटतात जुनी आणि सायलेंट गाणी. मस्त वाटतं ऐकताना."

"अरे वाह...छान! अजून कोणती गाणी ऐकतोस?" असं म्हणताच त्याने पुढचे गाणे ऐकवले.

'प्यार का पहला खत लिखने मैं, वक्त तो लगता हैं।

नए परिंदो को उड़ने मैं, वक्त तो लगता हैं।'

जगजीत सिंग यांची ही गझल ऐकताना आम्ही दोघे एकमेकांशी काहीही बोलत नव्हतो. बस तर वेगाने अंतर कापत होती. आवडतं संगीत, विंडो सीट आणि बाहेरून येणारा बेभान वारा. ह्या सगळ्या गोष्टी असल्यास प्रवास करण्याची मजा वेगळीच असते. परंतु मला आता एक वेगळ्या प्रकारचं दडपण वाटू लागलं होतं. तेही सौरभ माझ्या सोबतिला असताना. असं का होतंय आज? नाहीतर सौरभ सोबत असला की, त्याचा एक विलक्षण आधार वाटत असतो. माझ्या अनेक समस्या त्याने दूर केल्या आहेत. परिवारीक गोष्टी असतील किंवा वैयक्तिक गोष्टी असतील, यांच्याशी निगडीत तसेच प्रत्येक समस्यांवर उपाय म्हणून सौरभ. हे माझं सूत्र ठरलेलं होतं. आज मला कळत नव्हतं की, सौरभने मलाच का सोबत बोलवलं असेल? अन् तेही त्याच्या आवडत्या जागेवर घेऊन जायचं म्हणत आहे. नेमकं त्याच्या मनात काय आहे? तो माझ्या प्रेमात तर नाही न? नाही...मला नाही वाटत. आमच्या दोघांच्या नात्यात इतका मोकळेपणा आहे न...तर याला मैत्री म्हणावं...कि अजून काही―"

      अचानक सौरभने माझा हात हातात घेतला. अन् माझ्या विचार करण्याच्या, स्वतःशी संवाद करण्याच्या प्रोसेसला खीळ बसली.

'मिले हो तुम हमको बड़े नसीबो से।

चुराया हैं मैंने किस्मत की लकीरों से।'

          अगोदरचं गाणं संपून हे गाणं कधी चालू झालं हे कळलच नाही. सौरभने असा हातात घेणं आणि चेहऱ्यावर प्रफुल्लित स्मित ठेवणं हे माझ्यासाठी नवीनच होतं. त्याचा हा स्पर्श नवखा होता. मैत्रीच्या भावनेने मनमोकळेपणे एकमेकांना कित्येकवेळा मिठी मारली आहे तेव्हा काहीच वाटलं नाही. पण त्याचा स्पर्श अनोळखी भावनेचा होता हे निश्चित. पण कोणत्या? प्रेमाच्या?

        "आवडलं का तुला?" तेवढ्यात सौरभने प्रश्न विचारला.

"म्हणजे?" मला समजलं नाही की, कश्याबद्दल बोलत आहे. "गाणं....आवडलं न तुला?"

"हो...आवडलं. मी नेहा कक्करची गाणी ऐकत असते. आवडतात मला." मी सांगितलं.

         "ओह..सो नाइस! मलाही आवडतात. अरे चल..आपल्याला पुढच्या स्टॉपला उतरायचं आहे." त्याने बोलता बोलता आलेल्या बस स्टॉपवर नजर टाकली. आणि आम्ही बसमधून उतरण्यासाठी निघालो.

         प्रत्येकाच्या मनाच्या एका कोपऱ्यात स्थान मिळवणारा एक सोबती असतो. तो सोबती म्हणजे समुद्र. शांत तर कधी अक्राळ रुपात दिसणारा. शांततेच्या सान्निध्यात त्याच्या मनाशी केलेला संवाद फार बोलका असतो. मनावर साठलेलं नैराश्येचं मळभ दूर व्हायला हा नेहमी मदत करतो.

        "मी या जागेवर नेहमी येतो. फार बरं वाटतं इथं आल्यावर. लहानपणी बाबा घेऊन यायचे तेव्हापासून या जागेची आणि माझी ओळख आहे. इथं आल्यावर ना...मला माझं बालपण आठवतं. आणि नकळत चेहऱ्यावर गोड स्माइल येतं. आता कधी आनंदी असलो तर एकट्यात आनंद सेलिब्रेट करायला येतो; अन् अपसेट असलो तर रिलॅक्स व्हायला." समुद्रकिनारी पसरलेल्या मऊशार वाळूवर एक-एक पाऊल टाकत आम्ही चालत असताना सौरभ बोलू लागला.

किनाऱ्याच्या भेटीसाठी झुरणाऱ्या लाटा...लाटांच्या ओलाव्याने सैल झालेली वाळू...या मऊशार वाळुवर उघड्या पायांनी ठसे उमटवत चालत राहावं...समुद्राच्या लाटांमध्ये स्वतःला झोकून दिल्यावर परतणाऱ्या लाटांचा पायांना होणारा अलगद स्पर्शाचा अनुभव मला घ्यावासा वाटू लागला होता. पण असं मनाविरुद्ध इथं येणं..? असो, सौरभचं मन राखण्यासाठी स्वतःच्या इच्छेला दूर करणं यात मला कसला मोठेपणा वाटत नाही.

        "तू पण बोल न काहीतरी. जवळपास तू काहीच बोलली नाहीस." सौरभने मला बोलण्याचा आग्रह केला.

"नको बोल तूच...छान बोलतोस." मी मोघमपणे बोलले.

        "हे असं नको यार...मीच कुठवर बोलत राहणार? चल, तू पण बोल काहीतरी. बरं तिथं बसून बोलूया." त्याने जवळ असलेल्या खडकाजवळ बसण्यास सांगितलं. "हं...चल आता तू बोल...मी शांत राहतो. तू नेहमी बोलत असतेस न 'फार बडबडा आहे मी.' आज तू बडबड करायची आणि मी ऐकत राहणार."

        एकतर मला आजचा सौरभ बदललेला वाटत होता. त्याचं असं वागणं नवीनच होतं माझ्यासाठी. त्यामुळे काय बोलावं याच्याशी हे कळत नव्हतं. त्याला सांगू का? आज तू बदलला आहेस. तुझं आजचं वागणं मला कळत नाहीये, तू असा का वागत आहेस? हे विचारू का?

          "कसला विचार करत आहेस?" मी शांत राहून माझ्या डोक्यात खूप काही सुरू आहे हे त्याला जाणवलं.

"काही नाही."

          "अक्षदा, मला माहित आहे तू कसला विचार करत आहेस? हेच न की, आज मी असा का वागतोय? आता जास्त आढेवेढे न घेता स्पष्टच बोलतो. अक्षदा, हल्ली मला काय झालयं माझं मलाच कळत नाही. सतत तुझाच विचार डोक्यात चालू असतो यार...नेहमी वक्तशीर असणारा आता मात्र वेळेच भान विसरतोय, तू सोबत असलीस न, तर वेळ संथ गतीने फिरावी असं नेहमी वाटत असतं. नेहमी तुझ्याशी बोलावंसं वाटतं, तुला भेटावं वाटतं...असं का होतंय माझं मलाच कळत नव्हतं. पण काल तू मला बर्थडे विश केलं अन् रात्रभर झोप लागलीच नाही. तुझी आवडती गाणी डाउनलोड केली. ती ऐकत असताना तुझाच चेहरा डोळ्यासमोर दिसत होता. तुला कधी भेटून मन मोकळं करेन याची वाट पाहत होतो. अक्षदा, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर...आय रिअली लव्ह यु." अखेर तो मनातलं सगळं काही बोलला.

          मला हे अपेक्षित होतच. जेव्हा याने सगळ्या फ्रेंड्स ना खोटं बोलून मला घेऊन इथं आला तेव्हा याची चाहूल लागली होती. नंतर माझी आवडती गाणी ऐकवणं, बसमध्ये हातात हात घेणं हे सगळं नवीन होतं. त्याचा आजचा स्पेशल डे माझ्यासोबत जगण्याचा अर्थ आता कळाला होता. मी आता काय उत्तर देऊ हे कळत नव्हतं. माझ्याविषयी प्रेमाची ओढ सौरभला लागली होती...पण माझं? माझं सौरभवर प्रेम आहे असं काही नव्हतं. मित्र या नात्याने माझं याच्यावर जीवापाड प्रेम होतं. अन् आमच्या नात्याला प्रेमाचं सोफिस्टिक नाव द्यायचं नव्हतं. मी त्यावेळी काही बोलले नाही.

         "काय झालं बोल न काहीतरी. अशी शांत नको राहूस. नकार दे हवा तर." मी काहीतरी उत्तर द्यावं ही अपेक्षा ठेऊन मला म्हणाला.

मी त्याचा हात हातात घेतला अन् बोलले. "मला आपल्या नात्याला असं नाव द्यायला जमणार नाही रे मला. आपल्या मैत्रीतल्या जिव्हाळ्याने, वात्सल्याने, जुळवून घेतलंय आपल्या दोघांना. मला हवा असणारा आधार तू आहेसच. आणि हा आधार मला गमवायचा नाहीये."

        "अक्षदा, स्पष्ट बोल तुला काय बोलायचंय ते. असं कोड्यात बोलून मला कन्फूज करू नकोस." त्याचा बोलण्यात आता ताठरपणा आला होता.

"सौरभ, तुझ्याच भाषेत स्पष्ट बोलायचं तर माझं प्रेम नाहीये रे तुझ्यावर. पण मला तू मित्र म्हणून हवा आहेस. आतापर्यंत जसा आहेस तसा. राहशील न?"

         त्याने माझ्यावरची नजर हटवली. काहीवेळ तो काही बोलला नाही. माझ्यासाठी आणलेला गुलाब त्याने समुद्रात फेकला. मी लाटांच्या कुशीत तरंगणाऱ्या हसऱ्या गुलाबाकडे बघत होते. हा मात्र तिथून कधी निघून गेला ते कळलं पण नाही. मी एकटीच काहीवेळ तिथे बसले.

          दिक्षाला हे सगळं सांगितलं...आता होणाऱ्या त्रासाबद्दल तिलाही जाणीव आहेच. त्याचा पुरुषी अहंकार मनाला टोचत आहे. तो असा निष्ठुरपणे कधी वागला नाही. दूर गेल्यापासून मला राहवत नाही. त्याच्यात मी इतकी गुंतले आहे की त्यातून बाहेर पडणं आतातरी अवघड आहे. कदाचित गुंतने यापेक्षा गुरफटले गेलेय. त्याचं प्रेम स्वीकारणं यावर उपाय असेल का?

दिक्षा म्हणाली "त्याच्या दूर जाण्यामुळे तुला त्रास होत असेल तर तू त्याच्या प्रेमाचा स्वीकार कर. तुला यातून बरं वाटेल कदाचित." 

मी त्याच्या प्रेमाचा स्वीकार करण्याचं ठरवलं. लेक्चर्स झाले. कॅन्टीनमध्ये तो बसला होता. मी आणि दिक्षा आलो. मी आले हे त्याला जाणवलं नाही. दिक्षा त्याला बोलावण्यासाठी गेली.

दिक्षाने त्याला माझ्याशी एकट्यात बोलायचंय हे सांगितल्यावर त्याने माझ्याकडे पाहिलं. नंतर दिनेश, मयुरेश सोबत गप्पा मारण्यात रमला.

        "दिन्या लुक ऍट दिस" दिनेशला त्याच्या चेहऱ्यावर बघण्याचा इशारा केला.

"काय आहे तिथे" दिनेश उत्तरला.

         "इथे काय सी लिहिलंय का रे?"

"अरे ! अचानक असं का बोलतोयस." मयुरेशला प्रश्न पडला.

          "साला बघ न...म्हणजे एवढे मूर्ख असतो का आपण? टिपिकल बोलून आपला गेम करतात."

"झालं तरी काय तुला?" सौरभ मुद्दा बदलून वेगळाच मुद्द्यावर बोलत असल्यामुळे दिनेश आणि मयुरेश यांना याचा थांगपत्ता लागला नाही.

        "मित्र म्हणून रहा...या पोरींना मुलं फक्त खेळवायला हवीत. हा पण हवा आणि तो पण हवा. जगात सगळे शोध लागलेत पण यांना पोरींना नेमकं काय हवंय याचा शोध काही लागला नाही." सौरभ जे काही बोलतोय ते मला अनुसरून बोलतोय हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं.

मला आता कळलं होतं मला होणाऱ्या त्रासाची त्याला जाणीव का नाही? 'प्रेम आहे तुझ्यावर' असं म्हणाला तो परंतु त्याला 'ती' कळलीच नाही. आणि तिला 'हा' पण कळाला नव्हता.

         तिला प्रियकर मिळेल. पण तिच्या मनातलं न सांगता ओळखणारा...तिचं मनमोकळं करायला मुभा देणारा. जेव्हा तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मायेने डोक्यावरून हात फिरवणारा तो असेल का? जेव्हा तिच्या डोळ्यातल्या काठावर आसवं साठत असतील तेव्हा हि ओल झिरपून टाकायला जमेल का त्याला? ती हळवी असते रे...तिच्या हळव्यापणावर फुलांचा सुगंधी चेहरा ठेवून बोलायला जमेल का त्याला? तिला रोमँटिक स्पर्श हवासा असतो. प्रसंगी देऊन टाकेल ती तिचं शरीर पण त्याला तिच्या मनापर्यंत पोहचायला जमेल का?

तिला हेच म्हणायचं होतं...याच अपेक्षा घेऊन आलेली होती ती...ती म्हणाली; 'मित्र म्हणून हवा आहेस.' तेव्हा कसलीही तमा न बाळगता तिने तुला पूर्णपणे सुपूर्द केलं होतं. तेव्हा तू निघून गेलास न...बघ जर एखादी म्हणाली 'मला मित्र म्हणून तू हवा आहेस तर असं निघून जाण्याआधी नक्की विचार कर.

आणि हो तिला नक्की काय हवंय याचा तुला नक्की शोध लागेल. जेव्हा तू तिच्या नजरेतून...तिच्या मनातून बघशील.

 

 


Rate this content
Log in