STORYMIRROR

Somesh Kulkarni

Children Stories

3  

Somesh Kulkarni

Children Stories

नातं

नातं

6 mins
6

त्या दिवशी शाळेत खूपच गोंधळ सुरु होता. दुसऱ्या दिवशी होळी होती. विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. काही मुलांनी दुकानातून रंग आणले होते. ज्यांच्याकडे रंग नव्हता ते एकतर स्वतःला रंग लागण्याासून वाचवण्याचा प्रयत्न करत होते तर ज्यांच्याकडे रंग होता ते इतरांना भिजवत होते. तास सुरु होणार असतानाच आशिषने माझ्यावर रंग टाकला. माझा पूर्ण शर्ट लाल झाला. मला खूप राग आला. आशिष माझा खूप चांगला मित्र होता. मला त्याचं वागणं अजिबात आवडलं नाही. मी त्याच्याकडं रागाने पाहिलं. तरीही तो मला चिडवत त्याच्या जागी बसला.

एव्हाना शिक्षकांनी वर्गात येऊन शिकवायला सुरुवात केली होती. माझे त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष नव्हते. मला आशिषने फेकलेल्या रंगाचा बदला घ्यायचा होता. त्याने कितीतरी वेळा बेंचवर पेन्सिलने टकटक केलं. मला कागदाचा बोळा फेकून मारला. माझं लक्ष वेधण्यासाठी नाना करामती केल्या. पण मी? ढिम्म. जागचा तसूभरही हललो नाही. ढुंकूनही पाहिलं नाही त्याच्याकडे. इतकी अक्षम्य चूक...चूक कसली? माझ्यादृष्टीने गुन्हाच होता तो तेव्हा! थोडं दुर्लक्ष केलं की याला आपली किंमत समजेल असं गृहित धरुन कसाबसा मी दिवस पूर्ण केला. आशिष आणि मी शेजारीच राहायला होतो. आम्ही दोघे एकत्र शाळेत जायचो. त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर मी त्याच्यासाठी थांबलो नाही. त्याला वाटलं कदाचित मी रागावलोय. घरी पोचलो तर आशिष आईशी बोलत होता. मी हातातला रंग त्याला लावण्यासाठी धावलो. तो मात्र पसार झाला. आता मात्र माझ्या रागाने सीमा ओलांडली. मी आईला म्हणालो, "त्याने शाळेत माझा अख्खा शर्ट खराब करून टाकला आणि इथे येऊन तुझ्याशी असं बोलत होता जसं काय काही घडलंच नाही. कित्ती खोटारडा आहे तो! मी त्याला सोडणार नाही." आई मला समजावत म्हणाली, "हे बघ राहुल, या गोष्टी चालूच असतात. शेवटी तो तुझा मित्र आहे. जाऊ दे. आज होळी आहे. आज एकमेकांना रंग लावायचाच सण आहे." पण मी कुठे ऐकणार होतो. "मग मीपण त्याला रंगवणार." मी त्याच्या घरी गेलो. माझ्या हातात भरपूर रंग होता.मी तयारीत होतो. तो काहीतरी काम करत होता. मी हळूच त्याच्याजवळ गेलो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो मागे वळून पाहणार तोच मी सगळा रंग त्याच्या चेहऱ्यावर टाकला. तो मला ढकलत घराच्या आत धावला. काय झाले ते मला समजले नाही. मी त्याच्या मागे घरात गेलो. तिथे त्याची आई त्याला अंघोळ घालत होती. त्याच्या चेहऱ्यावर लागलेला रंग काढायचा प्रयत्न करत होती.मी नीट निरखून पाहिलं,त्याच्या डोळ्यात रंग गेला होता.माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती.मी तरी काय करणार? मलाच बदला घ्यायची हौस होती. मी रडायला लागलो.त्याच्या आईचे माझ्याकडे लक्ष गेले.त्याचा चेहरा साफ करताना त्यांनी मला विचारलं "अरे बेटा, तू कशाला रडतोयस?" त्यांनी लगेचच डॉक्टरांना फोन करुन लगेचच "मी येतेय" असं सांगितलं. त्याची आई त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ लागली. चूक माझीच होती म्हणून मीही त्या दोघांच्या मागोमाग गेलो. मला माझी चूक लक्षात आली होती. मला आशिषसोबतच्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या. मी त्याच्यासोबत किती फिरलो,कितीतरी प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या होत्या. कित्येक झाडांचे आंबे, चिंचा आणि बोरं आम्ही एकत्र खाल्ले होते. कसा का असेना, तो माझा चांगला मित्र होता. मैत्रीसारखं नातं या पृथ्वीवर दुसरं कुठलंही नाही.

विझू पाहणाऱ्या आगीची ठिणगी,

वेदनेवरची हळुवार फुंकर;

जगावेगळ्या विश्वात जगण्याची खात्री,

नात्यापलीकडचं नातं म्हणजे मैत्री!

तो जितका आमच्या मैत्रीत प्रामाणिक होता तितकाच खोडकरही होता. आज त्याच्या खोडसाळपणाने आणि माझ्या रागाने असे काही केले होते ज्याने कदाचित त्याला कधीच दिसणार नाही. मला त्याची खूप काळजी वाटू लागली. मी बाहेर उभा राहून स्वतःला शिव्या देत होतो, त्याला लवकर बरं वाटावं म्हणून देवाला प्रार्थना करत होतो. मनापासून केलेली आर्त प्रार्थना कधीही यश देते. देव हा भावाचा भुकेला असतो. मी तिथेच हाॅस्पिटलमध्ये गावातलं कोण काय म्हणील याची पर्वा न करता गणपतीच्या मूर्तीसमोर नतमस्तक झालो. मनातल्या मनात जे काय देवाचं आठवेल ते पुटपुटताना माझा चेहरा रडवेला झाला होता. जणूकाय मी एक माझ्या हातात नसलेली गोष्ट साध्य करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो.

जेव्हा ही गोष्ट माझ्या आईला समजली, तिने लगेच हॉस्पिटल गाठले. डॉक्टर आशिषला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले होते. आईने आल्याआल्या माझ्या दोन कानामागं दिल्या. मी मागं सरलो. तिचं बरोबरच होतं. मी बोलायच्याही मनस्थितीत नव्हतो. आई आशिषच्या आईला म्हणाली, "मी त्याला हजारवेळा बजावत अालेय, स्वतःच्या रागावर माणसाचा ताबा पाहिजे. आता तुमच्याकडे येत होता तेव्हाही त्याला म्हणाले आज होळी आहे. आज सगळेजण रंग खेळतात, पण नाही. का रे, डोळ्यांची किंमत माहितीये का तुला? त्याच्या डोळ्यांना काही झालं तर काय करशील आता?" मी रडायला लागलो. "रडू नको हां, नाहीतर...." आई परत मला मारायला पुढे यायला लागली. आशिषच्या आईने तिला अडवलं. "अहो जाऊ द्या. लहान आहे अजून. या वयात नाही कळत गोष्टी. आपणही लहान होतोच की."

"मला आशिषची काळजी वाटतीये. त्याला काही व्हायला नको. तुम्हाला जितका आशिष जवळचा आहे तितकाच मलाही आहे,म्हणून मला याचा राग येतोय."

"होईल सगळं ठीक. काळजी करु नका."

"याला अक्कल नव्हती का असं वागायला?"

"अहो असू द्या. माझ्या मुलाने तुमच्या मुलासोबत असं केलं असतं तर माझीही हीच अवस्था झाली असती."आशिषच्या अाईने तिला शांत केलं.

मी हे ऐकून चक्रावलो.क्षणभर वाटलं आपली आई कोणती? जी आपल्या चुकीसाठी आपल्याला शिक्षा करुन आपल्याला योग्य मार्गावर आणतेय ती गुरु म्हणून, की आपल्याला क्षमा करुन तिची महती वेगळ्या स्वरुपात आपल्यासमोर मांडतीये ती...! 'या देवी सर्वभूतेषु...' हे तेव्हा कळत नव्हतं, पण अनुभवत होतो.शाळेत शिक्षक बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवतात ज्यांचा आपल्याला त्या क्षणाला उलगडा हित नाही. मात्र आज अशी घटना घडली होती जिने मला क्षणात भानावर आणलं. आईची महती वर्णनातीत आहे असं शिक्षक शिकवायचे. ती का वर्णनातीत आहे हे मी प्रत्यक्ष बघत होतो.

काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. "आशिष आता सुखरुप आहे. तुम्ही त्याला भेटू शकता."असं सांगून ते निघून गेले.

मी देवाचे मनोमन आभार मानले. त्या दोघी त्याला भेटायला आत गेल्या. मी बाहेरच बाकड्यावर बसलो आणि विचार करायला लागलो.इतका काळ आम्ही एकत्र घालवला असताना मी त्याच्या बाबतीत असा कसा वागलो? ही दुर्बुद्धी मला कुठून सुचली? एकीकडे मी आहे जो एका छोट्याशा गोष्टीचा राग मनात धरुन नको ते करुन बसलो आणि दुसरीकडे या दोघी आहेत ज्या एकमेकींच्या मुलांची काळजी करताहेत. त्यांच्या जागी मी असतो तर माझंही मन आभाळाएवढं झालं असतं का? मला स्वतःची खूप लाज वाटायला लागली. 'आई'ची महती खऱ्या अर्थाने मला तेव्हा उमगली. मनात एकीकडे स्वतःविषयी लज्जा,चीड आणि संकोच, तर दुसरीकडे आईविषयी आदर,प्रेम अाणि आत्मीयता दाटून आली.मला खरा आनंद तेव्हा झाला जेव्हा मला या दोघीही माझ्या 'आई' आहेत हे कळून चुकलं! त्या दोघी हसत हसत बाहेर आल्या. आईने माझ्याकडे आश्वासक नजरेने पाहिलं. मी जाऊन तिला बिलगलो. "मी इथूनपुढं तू सांगशील तसंच वागीन." म्हणालो. "ठीके. तुला अक्कल तर आली ना मोठ्यांचं ऐकायचं असतं ते, भरपूर आहे." ती म्हणाली आणि तिनं माझा हात हातात घेतला. "मोठ्यांचं नाही,आईचं ऐकायचं असतं." ती माझ्याकडं पाहून हसली. मी धावत आशिषला भेटायला आत गेलो. त्याच्या डोळ्यावर पट्टी होती. डाॅक्टर आणखी काही तासांनी पट्टी काढणार होते. मी त्याला घट्ट मिठी मारली. "आशा,मला माफ कर."म्हणताना मला हुंदका अनावर झाला. "रडू नको रे वेड्या." म्हणत त्यानंही मला आलिंगन दिलं. खरी मैत्री ही कधीच संपत नाही.तिला विश्वासाची आणि आपुलकीची किनार असते. दुसरीकडे ममता आणि वात्सल्य हे शब्द आईसाठीच का वापरले जातात त्याचं प्रात्यक्षिक मला पाहायला मिळालं. नाती अशी प्रत्यक्ष अनुभवण्यात आणि जपण्यातच जीवनाचं गमक दडलंय. त्याच्या डोळ्यांची पट्टी काढेपर्यंत मी त्याच्याजवळच बसून त्याला वेगवेगळे किस्से आणि विनोद सांगण्यात मग्न होतो. वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. डाॅक्टरांनी पट्टी काढून मला समोर बसायला सांगितलं. थोडीशी भीती आणि दडपण आलेला मी त्याच्याकडे कुतूहल आणि काहीसा चिंतित चेहरा घेऊन पाहत होतो. त्याला आपक्याविषयी काय वाटेल, जेव्हा तो आपल्याला पाहील तेव्हा तो काय म्हणील....कितीतरी प्रश्न डोक्यात घोंगावत होते. पण तो मला पाहून हसायला लागला. "मस्करी करत होतात का माझी तुम्ही सगळे मिळून?" म्हणत मी प्रश्नार्थक नजरेने डाॅक्टरांकडे पाहिलं. डाॅक्टरांनी नकारार्थी मान हलवली. याला काय वेड लागलंय का? 'इतकं सगळं घडलेलं असतानाही हा हातीच कसा?' असा प्रश्न मला पडला. मोठ्या मनाने माफ करणारा मित्र मला इतक्या लहान वयात मिळाला हे माझं भाग्यच!

"तू माझ्यावर नाराज नाहीयेस?" मी अनाहूतपणे त्याला विचारलं. "अजिब्बात नाही. उलट मी तुझ्याबर खूप खूष आहे." मला प्रश्न पडला. "अरे मी रंग फेकला तुझ्या चेहऱ्यावर. डोळे गेले असते ना तुझे." मी काळजीपोटी बोलत होतो. "तू प्रतिकार तर केलास." वर्गात कधीही कुठल्या भांडणात न पडण्यासाठी मी कुणाच्याही बोलण्या-वागण्याला उलट उत्तर देत नसायचो. प्रत्येकवेळी आशिषच मध्ये पडून मला वाचवायचा आणि इतरांना उलट उत्तरं द्यायचा. याबाबतीत त्याची कितीतरी वेळा मला बोलणी खावी लागली होती. आणि आज? आज तो 'मी प्रतिकार केला' म्हणून माझ्यावर खूष होता. मला त्याचं कौतुक करावं की स्वतःच्या नियतीवर हसावं तेच कळत नव्हतं. हाॅस्पिटलमधून बाहेर पडताना मात्र 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' हा सुविचार मला तीनतीनदा आठवत होता.


Rate this content
Log in

More marathi story from Somesh Kulkarni