STORYMIRROR

Supriya Mahadevkar

Others

2  

Supriya Mahadevkar

Others

नातं मायलेकीचं...

नातं मायलेकीचं...

3 mins
827


आई म्हणजे घराला घरपण

        आई म्हणजे पिलांसाठी काहीपण

 आई म्हणजे मायेचा,प्रेमाचा झरा

 आई म्हणजे कडक उन्हात गार वारा

      आई म्हणजे भरभरून जगण्याला आशा

      आईमुळे तेजस्वी आहेत दाही दिशा

 माय म्हणजे साक्षात विठू माऊली

  लेक म्हणजे तिचीच असते सावली.....


"आई" या शब्दातच आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर सामावला आहे.ह्या आत्मेश्वराचा मेळ म्हणजे आई...


माय आणि लेकीचं नातं म्हणजे जणू एक रोपटं आणि त्याला येणारं सुंदर फुल,एक जीवन तर दुसरी जगण्यातला श्वास असं असतं. अनेकरंगी, अनेकपदरी, वाढत जाणाऱ्या वयानुसार बदलत जाणाऱ्या छटांनी सजणारं. आईच्या मायेच्या नि प्रेमाच्या आधारावर मुलीला बहरायला बळ देणारं असं हे नातं!

बहिणाबाई चौधरी यांनी एका कवितेत एका प्रसंगातून आईचं आणि मुलीचं नातं सांगितलंय...

" एका खेडे गावात एक साधू भिक्षांदेही म्हणत फिरत आहे.आणी एका घरची सुन, काम करतांना माहेरच्या वर्णनाची गाणी गुणगुणते आहे. तो तिची चौकशी करतो आहे सासरी होणारा त्रास सांगताना तिच्या डोळ्यातून अश्रु वाहत आहेत ते पाहून साधू विचारतो; की बाई गं, इतकं जर माहेर तुला हवंहवंसं वाटतयं तर तू का इथे नांदते आहेस? त्यावर ती म्हणते; "ऐक ऐक साधू बोवा, काय मी सांगते-

"लेकीच्या माहेरासाठी,माय सासरी नांदते!"

या उत्तरातच माय-लेकीच्या नात्याची अलवार वीण उलगडली आहे.आपल्या लेकीच्या डोईवरची पाखर जाऊ नये यासाठी पडेल तो त्रास स्वेच्छेनं,नेटानं सहन करणारी 'आई' ...


खरोखरच 'आईपणाच्या' भूमिकेत,स्वतः आई झाल्यावर ही सांभाळण्याची, जोपासण्याची,आणि लेकीच्या मायेनं हळवं होण्याची भावना आपोआपच रुजत जाते.

मानवी नात्यांच्या सगळ्या आडव्या उभ्या धाग्यांत 'आई लेकराचं' नातं हे सर्वात आदिम, नैसर्गिक आणि छेद न देता येणारं मानलं जातं.


आईपणाच्या,बाईपणाच्या त्याच त्या रेषेवरच्या कितीतरी गोष्टी,अनुभव त्या दोघीजणी वाटून घेत असतात.आई म्हणजे लेकीचा भक्कम आधार असतो! जरा कुठे खुट्ट झालं तरीही आई,आई हाका सुरू होणारच... मग आई समोर असली तर मोठमोठ्याने आणि लांब असली तर मनातल्या मनात तिची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही...


अर्थातच हे नातं कितीही खोल असलं तरीही अगदीच राजरस्त्यासारखं गुळगुळीत, छानछान आणि गोडगोडच असतं असं नाही.या नात्यातही कितीतरी ताणतणाव, खेचाखेची असते. बाईपणाचे वळसे, वेलांट्या या नात्यातही कशा बरे सुटतील? मुलीची जात म्हणून तिचं वळण, तीची काळजी, तीची जपणूक या शतकानुशतके चालत आलेल्या गोष्टीही यात असतातचं! माझी आई याबद्दल नेहमी एक वाक्य म्हणत असते...


"बाईचा जन्म हा देण्यासाठी आपल्या मुलांना खुलताना पाहण्यासाठी....आईने शिकवावं ते मुलीने वारसा जपत पुढं न्यावं...."


अत्यंत निटनेटकेपणाने, शिस्तीने आणि कडकपणाने, आई तिला जे वळण लावते तेच पुढे जाऊन तिला सुनेची भुमिका करतांना कामी येतं.हे अगदी खरचं आहे नाही का??


माझी आई आणि माझं नातं म्हणजे जिवलग मैत्रिणींचं...मी न बोलताही मनातलं सारं ओळखणारी... मी मुलगी असले तरी मुलाप्रमाणे मला वागवणारी...मुलींना सगळं जमलं पाहिजे...मुली कशात कमी नसतात हे लहानपणापासून रुजवणारी...आम्हा भावंडाना स्वावलंबी बनवणारी...वेळ पडल्यास मुलांसाठी सगळ्यांशी लढणारी...धाडसी,खंबीर तितकीच मायाळू...घरची लक्ष्मी...घरचं घरपण म्हणजे माझी आई...आज ती आहे म्हणून आम्ही सगळे जीवनात यशस्वी आणि स्वावलंबी आहोत...तुझं हे ऋण फेडता येणं कठीणचं..


लग्नाआधी आईची सावली सतत असते लग्नानंतर स्वतः आई झाल्यावर आई जास्त कळते.. असं हे बहुरंगी माय-लेकीचं नातं...दोघींचही वय वाढत जातं तसं तसं हे नातं अजून गहिरं बनत जातं! एक वेगळच आंतरिक घट्ट मैत्रीचं नातं मूळ धरू लागतं. आणि प्रौढपणी मायलेकी एकमेकींच्या घट्ट जीवलग मैत्रिणी बनतात.आईच्या मायेच्या सावलीत वाढवून ही, आई तिच्या या रोपट्याला थोडे उन्हांचे चटके, वाऱ्याचे धक्के, मातीतला कोरडेपणा सारं सारं सोसून; कसं बहरायचं याचं बळ देते.


असं ऊनपावसाचं, वाऱ्यावादळाचं जग आपल्या लेकींना देऊन ज्यांनी आपल्या लेकीला घट्टमुट्ट केलं आणि त्यांच्या लेकींनीही त्या आयांच्या आचार-विचारांचा व संस्कारांचा वसा आपआपल्या कर्तृत्वाने पुढे नेला,अशा सगळ्या माय लेकींना आणि 'मायलेकीच्या' या अलौकिक नात्याला शतशः नमन..!!




टिप: आईची महती सांगताना भल्याभल्यांची मती गुंग होते.. अन शब्द अपुरे पडतात.. तिथे माझी काय गत..!

खरंतर तिच्या ऋणातून कधीच मोकळं होऊ शकत नाहीत आपण.. आणि व्हायचंही नसतं..! पण तिच्याबद्दल बोलायला, लिहायला हा एक दिवस म्हणजे एक गोड संधी म्हणून हा लेखनप्रपंच..!!


सर्व रुपातील मातृत्वाला सादर प्रणाम..

अन् बाईपणातील आईपणाला सलाम.. !!



Rate this content
Log in