मोती
मोती
आज सुटी होती आणि इतर विशेष काही काम नव्हते त्यामुळे निवांत लोळत पडलो होतो. नुकताच चहा नाष्टा झाला होता. सकाळचे दहा साडे दहा वाजले असतील. वेळ आहे तर काहीतरी लिहावं असा विचार करत होतो.
आसपास शांतता होती. घरातही शांतता होती पण मधेच एखादं भांडं उगीचच आवाज काढत होतं. त्याला आवडत नाही ना मी असं लोळत पडलेलं.
मोबाईल वर वाचन चालू होतं, वाचनाची मस्त तंद्री लागली होती. अचानक कुत्र्याच्या पिलाचा भुंकण्याचा आवाज आला. मी त्याकडे दुर्लक्ष करुन परत वाचनाचा प्रयत्न करु लागलो. आता त्याचा आवाज आणखी वाढू लागला. विचित्र आवाज होता तो. म्हणजे भुंकणं ओरडणं असं संमिश्र केकाटत होतं ते. लक्ष देऊन ऐकलं तर आवाज ओळखीचा वाटला. कुत्र्याचा आवाज ओळखीचा कसा. ते ही सांगतो, पुढे वाचा.
रोज ऑफिस मधून घरी यायला रात्रीचे नऊ साडेनऊ होतात. काही दिवसांपूर्वी रोजच्या प्रमाणे घरी आलो. पार्किंग मध्ये गाडी लावत होतो. बाजूला कॉलमच्या आड हालचाल जाणवली. एक कुत्र्याचं पिलू हळूच डोकावून पहात होतं. त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर ते पळून गेलं. मात्र जाता जाता माझ्या अंगावर भुंकून गेलं. स्वर नाराजीचा जाणवला. हे आता रोजचंच झालं. रात्री मी परत येण्याच्या वेळी ते जिथे मी गाडी लावतो, तिथे आसपास घुटमळत असायचं. मी आलो की थोडं दूर जाऊन थांबायचं. त्याला आता मी मोती या नावाने संबोधू लागलो.
एके दिवशी मी थोडा घाईतच आलो. मोती तिथेच होता. त्याला शिटी वाजवली त्यानेही लांबूनच शेपटी हलवत प्रतिसाद दिला. मी गाडी लावून घरी आलो. जेवण करुन परत मला पुतण्याला घ्यायला जायचे होते. तो पुण्याहून रात्री येणार होता. जेवण करुन मी खाली आलो. गाडीला चावी लावतच होतो तेव्हा खाली लक्ष गेलं. माझी गाडी ॲक्टीवा आहे आणि मी तिला नेहमीच middle stand ला लावत असतो. तर गाडीला चावी लावताना लक्ष खाली गेलं. जिथे आपण पाय ठेवतो त्या मोकळ्या जागेत मोती शांतपणे झोपला होता. मग माझ्या लक्षात आलं की हा रोज माझ्या येण्याच्या वेळी इथे का घुटमळत असायचा ते. त्याची झोपमोड व्हायला नको म्हणून मी मिसेसची गाडी घेवून गेलो.
सकाळी ऑफिसला जाताना हातात एक पोळी घेऊन खाली आलो. मोती तिथेच त्याच्या आई, भाऊ बहणींसोबत खेळत होता. मला बघून आज हळूच जवळ यायचा प्रयत्न करत होता. माझ्या हातातली पोळी बघून तो जवळ आला. त्याला मी पोळी खाऊ घातली. त्याच्या अंगावरून हात फिरवला. त्याची भीती कमी झाली आणि आमची गट्टी जमली. रोज मी ऑफिस मधून परत आलो की महाशय माझी वाट बघत थांबलेले असायचे. मी गाडी लावली की पटकन तो त्याच्या बेडरुममधे शिरुन झोपून जायचा. आता आम्हा दोघांनाही एकमेकांचा लळा लागला होता. आणि मोती आता सोसायतीतल्या बच्चे कंपनीचा ही खास खेळगडी बनला होता. सगळी मुलं त्याच्याबरोबर खेळायची.
तर आज या मोतीला झालंय तरी काय? तो असा का करतोय ते समजेना. काय झालं बघावं म्हणून बेड वरुन उठलो. जिन्यातून खाली बघितले तर मोती जिन्यापर्यंत येवून वर बघून भुंकायचा आणि पार्किंगकडे पाळायचा पुन्हा जिन्याकडे यायचा. असं एक दोन वेळा झालेलं बघून मी नेमका काय प्रकार आहे ते बघायला खाली उतरलो. मला बघून त्याचा जोश अजूनच वाढला. हा भुंकत पार्किंग कडे जायचा परत माझ्याकडे यायचा. त्याचं भुंकणं नॉर्मल नव्हतं. नक्कीच त्याला काहीतरी वेगळं सूचित करायचं आहे असं मला वाटत होतं. पण काय ते मलाही समजेना.
पार्किंगमध्ये मी जिथे गाडी लावतो तिथे बाजूला आमच्या बिल्डिंग मधली मुलं रोजचं खेळणं झालं की त्यांच्या खेळण्याचं सगळं साहित्य कोपऱ्यात ठेवत असतात. तिथे बॉल, बॅट, फुटबॉल, उड्या मारण्याची दोरी, रॅकेट वगैरे सगळं ठेवलेलं होतं. तिथे बघून मोती भुंकत होता. जवळ जावून मी नीट निरखून पाहिलं. आणि मी हादरलो. बघून झटकाच बसला. अंगाला दरदरुन घाम फुटला. त्या साहित्यात एक साप घुसला होता. एकदम लक्षात आलं आज शनिवार. सगळ्या बालगोपाळांची अर्धी शाळा. तासाभरात सगळी टोळधाड आपापलं साहित्य घ्यायला तुटून पडणार. आता काय करावं.
आधी मोतीला जवळ घेवून शांत केलं. बिल्डिंग मधल्या एक दोघांना बोलावलं. त्यांना कल्पना दिली. साप आहे म्हटल्यावर एक जण जाड काठी घेवून आला. सापाला मारु म्हणाला. सगळ्यांनी त्याला समजावलं. आमच्या शेजाऱ्यांनी सर्पमित्राला फोन करुन सांगितलं. तो आमच्या बाजूच्या सोसायटीतच राहतो. सुदैवाने तो ही घरीच होता. पाचच मिनिटांत तो आला. दरम्यान मोती शांत झाला होता. माझ्या जवळच बसून होता. सर्प मित्राने त्याच्या पद्धतीने सापाच्या शेपटीला पकडून बाहेर खेचले. त्या सापाला पाहून आम्हा सगळ्यांची पाचावर धारण बसली.
सर्पमित्राने जसे त्याला बाहेर खेचले, त्या सापाने मोठा फुत्कार सोडून फणा काढला. अरे बापरे, हा तर नाग आहे. किंग कोब्रा. त्याला व्यवस्थित पकडून सर्पमित्र घेऊन गेला. एव्हाना तिथे बरीच गर्दी झाली. सगळे जण माझे आभार मानू लागले. तुमच्यामुळे नाग पकडला गेला. पण मी म्हणालो आभारच मानायचे असतील तर मोतीचे माना. मी सगळ्यांना घटनाक्रम सांगितला. मग सगळेच मोतीला जवळ घेऊन त्याचे लाड करु लागले. मी विचार केला, जर मोतीच्या लक्षात आलं नसतं तर सगळी बच्चेकंपनी रोजच्या प्रमाणे त्यांचं खेळाचं साहित्य उचकायला आली असती आणि...
आज मोती मुळे मोठा अनर्थ टळला होता. आज सगळेच त्याचे लाड करत होते. आजवर त्याला हाड हाड करणारेही त्याला प्रेमाने जवळ घेत होते. मी भरल्या डोळ्यांनी त्याचं कौतुक बघत होतो.
______________________
सुरेश अनंत तारे🖋️
छत्रपती संभाजीनगर.
