SAGAR PAWAR

Others

3  

SAGAR PAWAR

Others

मनू

मनू

7 mins
623


बालपणीतलं गाव म्हटलं कि आठवते ती शाळेला लागलेली उन्हाळी सुट्टी, कोकणकन्यातला प्रवास आणि महिनाभर तिथल्या हिरवळीत, तिथल्या मातीत घातलेला धुडगूस. साधारणपणे या वर्णनावरून तुम्हाला कळलंच असेल, कि मी कोकणातला आहे. अर्थात माझं गाव म्हणजे कोकणातल्या राजापूर तालुक्यातील लहानसा खेडेगाव - मोरोशी. गुगलमॅपवर सुद्धा न सापडणार माझं हे गाव लहानपणापासूनच माझ्या मनातलं घरं बनून राहिलय. जस प्रत्येकासाठी आपलं गाव मोठं असतंच, तसंच माझं हि आहे.

 जन्मापासून मुंबईत असणारा मी शाळेत असल्यापासूनच उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी पळायचो. अगदी पुढच्या इयत्तेत गेल्या पासूनच म्हणजे जून पासूनच पुढच्या उन्हाळी सुट्टीचा प्लॅन ठरलेला असायचा. मग त्यात क्रिकेट, लपंडाव, पोहणे, आंबे, फणस या असल्या कित्येक शब्दांनी निबंध बनून जायचा. कधी एकदा शेवटचा पेपर होतोय आणि आम्ही गावी पोचतोय, असं सगळं व्हायचं. मग पोचल्यावर किंचित सुद्धा आराम नाही कि आजीने दिलेलं घोटभर पाणी नाही. पोहोचल्या क्षणापासून त्या निबंधातल्या शब्दांप्रमाणे आम्ही कार्यरत व्हायचो. मी, माझा चुलतभाऊ, बहिणी. सगळे आधी गोठा, मग देऊळ आणि मग वाडी असा एक एक टप्पा पूर्ण करत फिरायचो. तशी आमच्या वाडीतली घरं गावातल्या एका कोपऱ्यातच आहेत. सारं गाव एका बाजूला आणि आम्ही एका बाजूला, असं असलं तरी या एका बाजू मध्ये सुद्धा दोन-तीन वाड्या आहेत. आधी हनुमंताचा मंदिर, बाजूला शाळा आणि मग आमची घरं अशी एकूणच वाडीची रचना आहे.

   माझे आजोबा शेतकरी असले तरी मासेमार व त्यासाठी लागणारे साहित्य ते स्वतः बनवतं. टोपली, सूप यांसारख्या आणखी खूप बांबूच्या वस्तू बनवतं. वेळप्रसंगी कधी सुतार होत, तर कधी तुटकी चप्पल स्वतःच शिवत, ते सर्वगुण संपन्न आहेत, हे म्हणायला काहीच हरकत नव्हती. आजोबांचे हे गुण काकांना सुद्धा अवगत झाले होते. बाबांना मात्र मुंबईत राहिल्याने हि कला जमलीच नाही. आजोबांच्या या गुणांमुळे गावातले सगळे लोक आपल्या कामासाठी आमच्या घरी ये-जा करत. त्यातलाच आमच्याकडे येणार मनू नावाचा गृहस्थ हा वेगळाच महाभाग ठरायचा - मनू कदम.

 बहुतेक खेड्यात तेव्हा तंटामुक्त, व्यसनमुक्त गाव अशी लाट पसरली होती. पण हा मनू कदम या सगळ्याला अपवाद होता. आमच्या गावात व्यसनमुक्ती असताना काहीजण लपून आपला गळा ओला करत होते. पण हा मनू मात्र सगळ्यांसमोरच दारू पिऊन बडबड करायचा. त्याला कशाचीच भीती नव्हती. एकदा तर व्यसनमुक्ती पथक आणि समोर असलेल्या सरपंचांच्या पुढ्यातच त्याने दोन बाटल्या रिचवल्या. खरतर हे मी ऐकून होतो पण ह्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नव्हती. कारण तो माणूस पंतप्रधानांसमोर सुद्धा दारू पिऊन एकटाच बडबडत बसू शकतो. हा विश्वास माझ्या इतकाच सगळ्या गावाला होता.

एकदा गावात वार्ता पसरली कि मनू कदम गायब झालाय. सगळीकडे शोधाशोध चालू होती. कुणी म्हणत होत बाजारपेठेत गेला असेल, कुणी नदीवर गेला म्हणून सांगत होते. शक्यता असणाऱ्या सगळ्या जागा शोधल्या. मग कोणतरी म्हणाल देवदेवस्की करायला हवी. कुणी म्हणाल पोलीस तक्रार करूया काय झालं असेल तर ते शोधतील. अर्थात कोकण असल्या कारणाने देवदेवस्कीला प्राधान्य देण्यात आलं. सगळे सोपस्कार पार पाडले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याच बाजूच एक पोरगं सकाळच्या कार्यक्रमाला गेलं तेव्हा तिथल्या झाडावर झोपलेला दिसला. त्या पोराने बोंब उठवली.

 "मनूतात्याक भूतांन झाडावर लट्कवल्यानं"

 खाली उतरवल्यावर कळलं याच्या किश्यात आणि गळ्यात बॉटल लटकवली होती आणि हा खूप प्यायला होता. पण काहीजण अजूनही असं म्हणतात कि, दारू प्यायल्याने त्याला भुताने तिथे टाकलं. तर काही जण म्हणतात भूत दारू प्यायलेला जवळ घेतच नाही. खरं खोटं माहित नाही, पण या घटनेमुळे गावातल्या दहा पंधरा जणांनी दारू सोडली होती.

  अशीच एकदा गावात पारध लागली होती. कोकणात शिकारीला पारध म्हणतात. पारध गावच्या बाजूला असणाऱ्या ऐरणीच्या जंगलात लागली होती. सगळे पारधी दबा धरून बसले होते. मनू सुद्धा पारधी म्हणून वरच्या बाजूने जात होता. बडखनदार म्हणजेच बंदूक घेऊन असणारा खालच्या बाजूने वर येत होता. तिथेच जाळीत काहीतरी सळसळल्या सारखं झालं. सगळे स्तब्ध झाले. एकमेकांना खाणाखुणा करू लागले. पारधी, बडखनदार सगळे दबक्या पाऊलाने आवाजाच्या दिशेने जाऊ लागले बादखानदाराने बंदूक तयार ठेवली होती. आता फक्त चाफ ओढायचा बाकी होता. इतक्यात आतून कोणीतरी बाहेर आलं. पारध्यांनी काट्या उचलल्या आणि मारणार इतक्यात ती आकृती माणसासारखी झाली.

  "ए मारू नका, मी असा - मनू"

 हा मनू चक्क बाटली घेऊन दारू पीत होता आणि त्याच्या आवाजाने दुसऱ्या जाळीत असणारा अटकीचा म्हणजेच बऱ्याच वजनाचा डुक्कर लांब पळून गेला होता. या कारणाने आण्णा मनूवर भडकले. पण मनूने तो बसलेल्या जाळीतून काढलेली गोणी दाखवली. या गोणीत आण्णांचे दोन महिन्यांपूर्वी हरवलेले नांगराचे खूर, फावडा, कुदळ अश्या अनेक लोखंडी वस्तू सापडल्या. आण्णा खुश झाले. त्या रात्री पारध काय झाली नाही, पण अण्णांनी दारुड्या मनूचं तोंडभरून कौतुक केलं. ती गोणी तिथं कशी आली ते आजतागायत कोणाला कळलं नाही.

  मनू गावात फक्त दारू या एकाच गोष्टीसाठी ओळखला जात नव्हता. तर त्याच्याकडे गाणी गाऊन, डफ वाजवायची कला सुद्धा होती. गावाच्या शिमग्यात सात-आठ दिवस तर तो मंदावरच असायचा. पालखी जिथे जाईल त्या प्रत्येक घरात मनु डफ वाजवून पालखीच्या खेळाचं गाणं म्हणायचा. असा हा मनू गावकऱ्यांच्या कोणत्याच कामाला नाही म्हणायचा नाही. गावातल्या कित्येक म्हाताऱ्या माणसांना मुद्दाम हाक मारायला जायचा. ज्यांची पोरंबाळं मुंबईला गेलेत आणि गावात एकटेच आहेत अश्या कित्येक आजारपणातल्या म्हातार्यांना मनू स्वतःच्या हातावर उचलून गावच्या दवाखान्यात घेऊन जायचा. स्वतःच्या आजारी असलेल्या म्हाताऱ्या आईला चालता येईना म्हणून दुसऱ्या गावात डोंगरातून पाठीवरून घेऊन जायचा. मला मनोमनी वाटायचं याची वाईट सवय म्हणजेच दारू सुटावी, हा व्यसनमुक्त व्हावा. पण सगळं गाव दारू सोडेल, तंटामुक्त होईल. पण मनू मात्र जैसे थे..!

   एकदा ऐन आषाढात सगळे गावातले पंढरपूरला जायचं म्हणत होते. मनू सुद्धा तयार झाला. गावातून दोन एसटी कराव्या लागल्या, इतकी माणसं आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेली. मनू सगळं पंढरपूर फिरला. विठ्ठल दर्शन घेतलं. तिथल्या वारकऱ्यांची भक्ती आणि श्रद्धा पाहून तो सुद्धा त्यात हरवला. त्याने ठरवलं दारू सोडायची. पंढरपूरला गेलेले सगळे गावकरी एकादशीनंतर परतले. पंढरपूरला जाऊन मनू सुधारला अशी चर्चा सगळ्यांमध्ये रंगली. पण मनू पंढरपूरला गेल्यामुळे त्याच्या आईकडे दुर्लक्ष झालं होत. ती खूपच आजारी पडली होती. गावाच्या दवाखान्यातल्या डॉक्टरने तालुक्याला जावं लागेल असे सांगितले. वेळ फार कमी होता. त्याने ओळखीवर गाडी तयार केली पण आईने तिथंच प्राण सोडला होता. सगळ्या विधी झाल्या. सगळ्यांनी मनूला मदत केली. गावात कोणाच्याच प्रेताला इतकी गर्दी झाली नव्हती. सगळे मनूचं सांत्वन करत होते. पण मनूला मात्र सारखं वाटत होतं कि त्याच्या इथे नसण्याने आई देवाघरी गेली. दुसऱ्या दिवशी मनू खूप दारू पिऊन मोठ्याने रडत होता आणि म्हणत होता, "पंढरपुराक गेलं नसतंय तर माझी आउस वाचली असती.."

   मनुची आई जाऊन आता सात आठ वर्ष झाली असावित. पण तो अजूनही कोणत्याना कोणत्या कारणावरून तिची आठवण काढतोच. कधी कोणी आईच्या नावाने शिव्यांनी उद्धार केला तर त्याला म्हणतो "ए बारबोड्या कित्याक आवशीवरसुन गळीयों देतेस तुझ्या आवशिक असा चव्हाट्यावर आणलां तर चलात काय तुका..?" 

 हा मनू आमच्या इथे कधी आलाच तर त्याच्या गप्पांनी दुपारची संध्याकाळ झालेली हि आम्हाला कळायचीच नाही. आम्ही गुंतून जात असू.. एकदा मला सांगत होता..

"व्हयता काय शिक्षण घेतास ना ता भरपूर घे, आणि गावाचा नाव मोठा कर.. तुमच्या महामुंबईत आपल्या या चिचोका एवढ्या गावाचा नाव अभिमानानं घेऊक व्हया."

" पण मुंबई पेक्षा आपलं गाव बरं.. मला तर इथेच आवडत.." असं मी माझी आवड दर्शवत त्याला म्हणालो.

"अरे काय ठेवला हा या गावात.. ना नोकरी, ना धंदो.. इथल्या मास्तरांका पण कसलाच टेंशन नाय असा, कारण दोनचारच पोराच असतत ना शाळेत.. सगळी मुंबैक पळाली हत.. गांधीजी उगीच म्हणायचे खेड्याकडे चला... खरो गांधी तर मुंबईकच गावतलो ..तू शिक बाबा, मोठा हो.." मनू हे सगळं तुच्छतेने बोलतोय असं मला आतून वाटत होत. पण हे मनू बोलत होता कि त्याची दारू..?, आणि जरी दारू बोलत असेल तर ती एवढं चांगलं आणि टोचेल असं खरं कशी बोलतेय..?, मग दारू चांगली कि वाईट..? या असंख्य प्रश्नांनी माझ्या डोक्यात वादळ उठवलं होत. मनू हा हुशार आहे, त्याला नेहमीच काहीतरी सांगायचं असत. पण त्याच्या रचना कोणालाच कळत नसाव्यात असं माझं मत तयार झालं होत.. कदाचित तो व्यसनी आहे हेच कारण पुरेसं आहे त्याची रचना हि बडबड ठरायला..

       एका उन्हाळी सुट्टीत तर मी राखण म्हणजे काय हे शिकलो.. खरतर हे मी ऐकून होतो कि 'आपल्यावर लक्ष ठेवणाऱ्याला वर्षातून एकदा राखण द्यावी लागते'. वाडीतले सगळे पुरुष जमले होते, गावकर म्हणजेच वाडीतील प्रमुख सुद्धा आले.. कोंबडी, नारळ या गोष्टी घेऊन हळू हळू इतर मंडळी आली आणि आम्ही शेताकडे जायला निघालो... मी मुद्दाम मनू सोबतच चालत होतो.. तो त्यादिवशी सुद्धा दारू प्यायला होता.. काहीजण त्याला ''नको येऊ अंधार आहे" असं सांगत होते. पण वाडीतल्या सगळ्या कामात पुढे असणारा, इथे तरी कसा मागे राहील.. अंधार पडला होता. बॅटरीच्या प्रकाशावर सगळ्यांनी शेताकडील रस्ता धरला. काहीजण शेतातल्या खळ्यापर्यंत पोचले होते.. आम्ही मात्र मनु सोबत हळू हळू चालत होतो.. मध्येच डांबरी रस्ता लागला, नुकत्याच लावलेल्या रोडलॅम्पमुळे तो रस्ता उजळून निघाला होता. आम्ही बॅटरी बंद केल्या. इतक्यात मनूचा कशावरून तरी तोल गेला... आम्ही त्याला सावरलं, "मनूतात्या गावात आता रस्त्यारस्त्यावर सुद्धा लाईट आलीय तरी अजून तू धडपडतोयस.." सचिन उगीचच त्याला चिडवत म्हणाला.. "हा माका नको शिकवूस.. लाईट इली असली तरी प्रकाश खय अजून पडलो हा..?" मनूच्या या उत्तराने आम्ही रस्त्यावरून शेताच्या वाटेला लागलो.. बाकीच्यांना हि नेहमीची बडबड वाटली. मी मात्र शून्य होऊन चालत राहिलो.. खरतर त्यावेळी नारळ, कोंबडी मनूलाच द्यायला पाहिजे असं मला वाटायला लागलं.

  त्यानंतर मनू प्रत्येकवेळेला माझ्या दृष्टिकोनातून ठळक होत होता. कधी लोकांच्या चर्चेतून, कधी त्याच्या कामातून, कधी निस्वार्थी मदतीतून, तर कधी गावच्या विकासातून. पण गावात लोकांना त्याचा ठळकपणा जाणवत होता तो त्याच्या व्यसनी बडबडीतून.त्याने मला कित्येकदा वेगवेगळे किस्से ऐकवले. सल्ले दिले. मी त्याची ती बडबड अमलात सुद्धा आणलीय. पण "तू दारू सोड " हे माझं म्हणणं त्याने कधीच ऐकलं नाही..

आता उन्हाळी सुट्टी फारशी अनुभवता नाही येत.. 'कामात व्यस्त असतो' हे ठरलेलं कारण आम्हा मुंबईकरांना गाव विसरण्यास पुरेसं झालाय. पण आजही कधी गावाला गेलो तर मनूला भेटल्याशिवाय परतीची गाडी नसतेच. भेटल्यावर आम्ही खूप गप्पा मारतो, त्याने साठवलेले किस्से तो मला ऐकवतो, मुंबईचे हाल हवाल विचारतो. मग मीही त्याला आवर्जून विचारतो "दारू अजून सोडली नाहीस ना..?" यावर त्याच ठरलेलं उत्तर तो देतो.."मी दारू सोडलंय तर माका "दारू सोड" म्हणानं सांगूक तू गावक येवुचस नाय, तू गाव सोडशीत म्हणानं मी दारू सोडत नाय.." असं म्हणत मोठ्याने हसत अगदी दारू, गाव या विषयापासून अमेरिकेपर्यंत त्याची बडबड चालूच ठेवतो, मी मात्र त्याच्या दारूच्या वासात त्याच्याच रचनात्मक बोलण्यात भरकटत जातो.Rate this content
Log in

More marathi story from SAGAR PAWAR