Vikas Yesade

Others

2  

Vikas Yesade

Others

माझ्या जीवनाचे शिल्पकार

माझ्या जीवनाचे शिल्पकार

4 mins
117


गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।

गुरुरेव परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।।

हा श्लोक जेव्हा जेव्हा कधी मी म्हटला असेल तेव्हा तेव्हा मला घडवणाऱ्या माझ्या शिक्षकांची आठवण मला झाली नाही असं खचितच झालं असेल. प्रत्येक माणसाचा प्रथम गुरु म्हणजे त्याचे आई-वडील हेच असले पाहिजेत. आई-वडिलांइतका सोशिक, ,,संयमी, आणि प्रेमळ गुरु जगात दुसरा कोणीही नाही. आयुष्यातलं त्यांचं स्थान निश्चितच अढळ आहे. माझ्या एकूण स्वभावातली संवेदनशीलता, हळवेपणा, सोशिकता हे सगळं माझ्या आईच देणं आहे. तर न्यायबुद्धी, कणखरपणा, खंबीरपणा हे देणं माझ्या बाबांचं आहे.


घराबाहेर टाकलेलं पहिलं पाऊल शाळेत पडण्याआधीच ‘शाळा हे माता शारदेचं मंदिर आहे. तिथले शिक्षक म्हणजे साक्षात शारदेची विविध रूपे आहेत. विद्यार्थी म्हणजे तिचे भक्त, अभ्यास ही तिची पूजा आणि परीक्षेत मिळणारे यश हा मातेने दिलेला प्रसाद आहे.’ हे सगळं माझ्या आईनं माझ्या बालमनावर करून ठेवलं होतं. त्यामुळे अत्यंत भारावलेल्या अवस्थेत मी त्या ‘शाळा’ नामक ज्ञान मंदिरात विश्वासानं पहिलं पाऊल टाकलं होतं. बाबांचं बोट सोडून शिक्षकांकडे सुपूर्द होताना मी जराही चलबिचल झालो नाही की कचरलो नाही. बाबांना या गोष्टीचं केवढं कौतुक !

 

माझं नशीबच इतकं थोर की जिथं तिथं खूप चांगले शिक्षक मिळत गेले. आणि म्हणूनच की काय कुणास ठाऊक, इयत्ता पहिलीपासून ते पदव्युत्तर शिक्षण घेईपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर व्यक्तिमत्त्वाची घडण करणारा शिक्षकच मला भेटला. मग ते प्राथमिक शाळेतले शिक्षक असोत वा पुढचे कुठले असोत.


अगदी नावानिशी सांगायचं झालं तर इयत्ता चौथीचा शिवछत्रपतींचा इतिहास डोळ्यांपुढं उभं करणारे दादोजी शेडेकर गुरुजी. यांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द कानात जीव आणून ऐकावासा वाटे. शिवबापासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंतचा प्रत्येक प्रसंग ऐकताना मीच तो शिवाजी असं त्या वयात कितीतरी वेळा वाटून गेलं होतं. आपण शिक्षकच व्हायचं हे पहिल्यांदा मनात आलं ते शेडेकर गुरुजींमुळेच. मी कोण होणार याबाबत कोणी विचारलं की ‘मी शिक्षक होणार आहे,’ असं म्हणता मी म्हणत असे ‘मी मोठा होऊन शेडेकर गुरुजी होणाराय. गुरुजींनी सांगितलेली एक ही गोष्ट मी आजही विसरलो नसेल.

 

पुढे मला अत्यंत आपलेपणाने शिकविणाऱ्या शिक्षिका मिळाल्या - पन्हाळकर बाई. विद्यार्थ्यांना आपलंसं करायच्या. मग शिकवायच्या. त्यांच्या नि माझ्या आईच्या चेहऱ्यात काहीतरी साम्य होतं असं मला वाटे. सातवी स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यासक्रम बाईंनी त्यांच्या घरी शिकवला होता काही महिने. तोही कसलीही फी न घेता. फी देऊन शिकण्याचे ते दिवस नसावेत. किंबहुना तुटपुंज्या पगारातदेखील समाधानानं जगण्याची कला शिक्षकांना तेव्हा अवगत असावी.

कौलग्याचे संभाजी देसाई गुरुजी. शिस्तीचे प्राथमिक धडे यांच्यामुळेच आम्हा विद्यार्थ्यांना मिळाले असतील. शिस्तबद्ध असले तरी तितकंच आपलेपणा जपण्याचं कसब गुरुजींचं होतं.


प्राथमिक शाळेतलं कधीही न विसरण्यासारखं नाव म्हणजे बजरंग माळी गुरुजींचं. गुरुजींनी काय शिकवलं नाही आम्हाला? सगळंच शिकवलं. विज्ञान,गणित,योगासनं,खेळ,गाणी,शिस्त,संस्कार... सगळं सगळं शिकवलं. पुढे बरीच वर्ष मी गुरुजींच्या संपर्कात राहिलो. कुठेही रस्त्यात भेटले की वाकून त्यांच्या पावलांना वंदन केल्याखेरीज मला आजही चैन पडत नाही. गुरुजींच्या मुलाचं नि माझं नावही एकच. त्याच्या स्वभावातदेखील मला माझ्या गुरुजींचं सूक्ष्म दर्शन होतंच. माझ्याहून वयाने लहान असला तरी मी त्याच्याशी खूप आदरपूर्वक बोलत आलो आहे.


सावित्रीबाई फुले हायस्कूलमध्ये तर एकापेक्षा एक शिक्षक होते. कडक शिस्त असली तरी शाळेच्या रूपाने आमच्यासमोर ज्ञानाचं भांडार खुलं होतं. पुढच्या आयुष्याची दिशा इथंच निश्चित व्हायची. इथं विनोदात आयुष्याचं गांभीर्य समजावून देणाऱ्या विष्णू कुंभार सरांनी भाषेची अनेक रूपं शिकवली. आयुष्याचं व्याकरण त्यांनीच समजावलं. माझी परीक्षेतली उत्तरं सरांनी वर्गात वाचून दाखवली आणि माझ्या भाषेचं कौतुक केलं तिथंच भाषेविषयी जिव्हाळा निर्माण झाला होता. सदा हसत असणारे कुंभार सर हसत हसतच आम्हापासून अनंताच्या प्रवासाला निघून गेले हे आमचं दुर्दैव. हायस्कूलच्या कोंदणातला हिरा हरवला.


गुराप्पा इराप्पा पाटील सर हे विद्यार्थ्यांना मित्रत्वानं वागवत नि गणित भूमिती तल्लीन होऊन शिकवत. सरांमुळंच आम्हाला गणिताची गोडी लागली आणि तो हातचा मळ वाटू लागला. पाटील सरांइतकं सुंदरतेनं आणि सहजतेनं गणित शिकवणारा दुसरा शिक्षक माझ्या पाहण्यात नाही.

 आवटे मॅडम याही गणिताच्याच. हायस्कूलातंच काय; तर पुढे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतानादेखील मॅडमनी मला खूप मार्गदर्शन केलेलं आहे. कडक शिस्तीची परंपरा असलेल्या शाळेत मॅडमचा लाघवी स्वभाव कधी लपून राहिला नाही. के. बी. पवार सर आणि कापसे सर यांचंही योगदान मोठं आहे.

हायस्कूलातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे पी. बी. आयरनाईक सरांचं. सर माझ्या शब्दांत मावणारे नाहीत. माझ्या स्वतःच्या वागण्यात,बोलण्यात आणि विद्यार्थ्यांपुढे उभा राहून शिकवण्यात सतत डोकावणारं हे व्यक्तिमत्व. सरांनी केवळ पुस्तकातलं विज्ञान शिकवलं नाही. विज्ञानात जगायला शिकवलं. पूर्वी नारायणाच्या मंदिरात भरत असलेल्या आमच्या वर्गाची सर आज कुठल्याही मोठ्यातल्या मोठ्या शाळेला कधीच यायची नाही. त्या बेंचवर तासन् तास बसून आयर नाईक सरांचे शिकवणे अनुभवण्याचा आनंद तीन तास एसी थिएटरमध्ये बसून रोमँटिक सिनेमा पाहण्यात नाही. त्या काळातले अनेक प्रसंग,सरांसोबतच्या अनेक आठवणी आजही ताज्या आहेत. इतक्या की जणू घटना कालच घडून गेल्या आहेत. चांगल्या सवयींवर सरांनी कधीच भाषणं दिली नाहीत. तर त्या सवयी स्वतःच्या वागण्यातूनच दाखवून दिल्या. त्यांच्या'बद्दल लिहिताना माझी लेखणी कधीच थकायची नाही. स्वतंत्रपणे ते लेखन मी नक्कीच करीन. ते केल्याशिवाय सरांचं माझ्यावरचं ऋण फिटणार तरी कसं?

 

गडहिंग्लजच्या डॉ. घाळी कॉलेजमधले उंदरे सर. मी तर यांच्या घरचाच एक भाग होतो. डिग्री कॉलेजमध्ये इतकी जवळीक जपणारे सर मिळणं हे भाग्य नव्हे काय? हाच वारसा पुढे जपला तो त्याच कॉलेजमधील मासाळ सरांनी आणि चिंचणे मॅडमनी.


शिवराज कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य डॉ. डी. व्ही. तोगले सरांइतकी शिस्तबद्धता एकाही प्राचार्यानात दिसली नाही; दिसणारही नाही. तिथलेच गुळवणी सर म्हणजे आईच्या मायेनं इंग्रजी साहित्य शिकवणारा प्राध्यापक.


गडहिंग्लजच्या डी. के. शिंदे बी.एड्. कॉलेजमध्ये रायकर,खवणेकर मॅडम नि खोचगे सर या त्रयींनी जसं मार्गदर्शन केलं असेल तितक्याच आत्मीयतेनं कोल्हापुरातल्या बी. टी. कॉलेजमधल्या लता पाटील मॅडमनी मार्गदर्शन केलं आहे. लता पाटील मॅडमबद्दल सांगायचं झालं तर ती समर्पणाची मूर्ती आहे. स्वतःला कष्ट पडले तरी चालतील परंतु विद्यार्थी मागे पडता कामा नये हा त्यांनी घेतलेला ध्यास आहे. त्यांच्याशिवाय बी. टी. कॉलेजची कल्पनाच करवत नाही. बी. टी. कॉलेज म्हणजेच डॉ. लता पाटील मॅडम आणि मॅडम म्हणजेच बी. टी. कॉलेज हे समीकरण आहे.

आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सगळ्या गुरूंची आठवण आली. धन्य पावलो. माझ्या जडणघडणीत मोलाचं योगदान देणाऱ्या या सर्वांना त्रिवार वंदन आणि आमच्यासाठी व्यासपीठ खुले करून देणाऱ्या स्टोरी मिररचे आभार.


Rate this content
Log in