माझ्या बाई
माझ्या बाई
रम्य असते बालपण
असती सुखाचे ते क्षण
विसरता कधी न येणारे
शोधत राही त्यास मन
तो माझ्या आयुष्यातला शाळेचा पहिला दिवस होता. थोडी भिती, थोडा आनंद घेऊन बाबांचा हात हाती घेऊन निघाले. कारण विश्वास होता बाबांवरचा ते माझ्यासाठी योग्य निर्णय घेतील याचा. शाळेच्या गेटमध्ये शिरलो अन् माझे पाय लटपटायला लागले. बाबांचा हात घट्ट पकडला आणि अश्रू आले. बाबा मला ऑफीस मध्ये घेऊन आले. समोर मुख्याध्यापक बाई बसलेल्या होत्या. चष्मा लावलेला प्रेमळ हास्य चेहऱ्यावर अगदी शांत होत्या. त्यांनी वर्गशिक्षक असलेल्या भावसार बाईंना बोलावले. थोड्याच वेळात त्या ऑफीसमध्ये अगदी हसत हसतच दाखल झाल्या. त्यांना पाहून माझी भिती थोडी कमी झाली खरी पण मी बाबांच्या मागे लपली. मला रडू येऊ लागले. मुख्याध्यापक बाईंनी माझा परिचय करून दिला व मला वर्गात घेऊन जाण्याची सुचना केली. मी घाबरले याची जाणीव भावसार बाईंना झाली. त्या हळुच माझ्याजवळ येऊन खाली वाकल्या व अगदी प्रेमाने माझा हात हातात घेत माझे नाव विचारले. मलाही थोडा धीर , मी नाव सांगितले. त्यांनी मला माझी आवड निवड विचारली, मला कोणत्या खेळाची आवड आहे याची ओळख केली. मी पण मोकळेपणाने बोलू लागले. मला बाई आवडल्या. बाईंनी प्रेमाने माझा हात धरला आणि सांगितले की, मला शाळेत बाई किंवा मैडम म्हणायचे व शाळेच्या वेळानंतर मावशी म्हटले तरी चालेल. अगदी माझ्या सखु मावशी सारख्याच भासल्या त्या क्षणी. मी बाबांचा निरोप घेत बाईबरोबर वर्गात गेले. त्या दिवसानंतर मी कधीही शाळेत न जाण्यासाठी रडले नाही.
आज जेव्हा माझ्या मुलास त्याच्या शाळेच्या पहिल्या दिवशी सोडण्यास गेले तेव्हा अनेक लहान मुले रडत होती. काही मैडम रडणाऱ्या त्या मुलांना ओढत नेत होत्या. तेव्हा जाणवले की, सगळ्याच भावसार बाई नाही होऊ शकत. त्याचवेळी माझ्या डोळ्यात टचकण पाणी आले.
