माझी मुख्याध्यापिका
माझी मुख्याध्यापिका
प्रत्येक शिक्षकास एक तरी मुख्याध्यापिका असते . कधी स्तुती करणारी तर, कधी परखडपणे भाष्य करणारी, कधी अति कामाखाली दाबणारी, तर कधी कामाकडे दुर्लक्ष करणारी, तर कधी अंतर्गुणांना वाव देणारी, तर कधी दुर्गुणच शोधणारी अशी एक नाही अनेक विशेषणे लाभणारी व्यक्ती म्हणजे शाळेची अध्यापिका . किंबहुना हीच व्याख्या शिक्षकांनी मुख्याध्यापिकांसाठी प्रचलित केली आहे.
अश्याच विचारांची असलेली मी जेव्हा सध्या कार्यरत असलेल्या शाळेमध्ये मुलाखतीसाठी गेली असताना मला एका आगळ्या वेगळ्या मुख्याध्यापिका भेटल्या. दरवाज्यावर थाप मारताना खूप मनात विचार येत होते की मुख्याध्यापिका कुठल्या प्रश्नांचा वर्षाव करतील , माझी शिकवण्याची पद्धत त्यांना आवडेल की नाही , मी त्यांच्याशी कसे बोलू काय बोलू सगळेच ' क ' चे प्रश्न मनात घोळू लागले .
दरवाजा उघडला गेला नी गोरीपान रंगाची, सडपातळ बांध्याची ,हसमुख चेहऱ्याची मुख्याध्यापिका मी पहिली . पाहताच क्षणी भीतीने थरथरणारे मन तिच्या वाणीने शांत झाले . मुलाखत उत्तम रित्या पार पडली पण जाताना मात्र त्यांच्या एका वाक्याने मनात घर केले त्या म्हणाल्या- " तुम्ही मन लावून काम करा मला तुमच्या कामावर विश्वास आहे " . जिथे वर्षानुववर्ष संबंध जपणारी नाती देखील एकमेकांवर विश्वास ठेवत नाही तर ह्या मुख्याध्यापिकेने पहिल्याच भेटीत माझ्यावर इतका विश्वास दाखवल . " विश्वास " ह्याच शब्दामुळे मी माझ्या कामाला जोर लावला .
त्यांनी अनेक जबाबदाऱ्या दिल्या , नेहमीच त्यांच्या मार्गदर्शनाने त्या मी पार पडत गेले . कधी चुकलेले मार्ग त्यांनी सरळ केले तर कधी माझ्या कामाचे तोंड भरून कौतुक केले ,पण माझा अपमान करणे , राग , द्वेष, निंदा करणे अशी वागणूक कधीच दिली नाही. अश्या अष्टपैलू व सर्व गुण संपन्न मुख्याध्यापिका मला लाभल्या हे मी माझे भाग्य समजते .
अनेक वर्ष लोटली गेली आणि माझ्या जीवनातील महत्वाचा क्षण आला तो म्हणजे बृह्नमुंबई महानगरपालिकेचा महापौर आदर्श शिक्षिकेचा सन्मान
सगळ्या शिक्षकानं मधून ह्या सन्मानासाठी माझी निवड झाली. माझ्या मुख्याध्यापिकेने माझी सगळी प्रमाणपत्र मागवून घेतली. त्यांच्या सही शिक्याने माझी सुंदर पुस्तिका तयार झाली. प्रमाणपत्र पाहणे त्यातील उणीवा काढून त्या सुधारण्यासाठी सतत मार्गदर्शन त्या करीत होत्या. आजच्या जगात स्वतःसाठी धडपडणारी माणसे पाहिलीत पण माझी मुख्याध्यापिका मला सन्मान मिळावा म्हणून धडपडत होती. ह्याचे मला मात्र नवलाच वाटत होते .
तिची मेहनत व धडपड पाहून माझे मन अजूनच घाबरे झाले . मुलाखतीची वेळ जवळ आली . सकाळची शाळा आटपून दुपारी त्यांचा आशीर्वाद घेउन मुलाखतीसाठी जावे असे मी ठरविले . पण जेंव्हा त्यांच्या दररवाज्यापाशी गेले तर मला असे कळले की त्या खूप व्यस्त आहेत . मन दुखी झाले आणि मी निघाले . देवाचा मी धावा करू लागले कारण मी माझ्या शाळेचे नाव घेऊन ह्या स्पर्धेला जात होते . मला जर हे महापौर पारितोषिक नाही मिळाले तर माझ्या मुख्याध्यापिकेचे नाव , शाळेचे नाव तर खराब होणार नाही ना ,असे एका ना अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले.
तेवढ्यातच भ्रमणध्वनीवर संदेश आला की - " तुम्ही उत्तम शिकवता हे सांगण्यासाठी मला कुठल्याही पारितोषिकाची गरज नाही . तुम्ही आमच्यासाठी नेहमी आदर्श शिक्षिका आहात . हे पारितोषिक तुम्हाला मिळेल याचा मला पूर्ण विश्वास आहे ".
हे शब्द वाचताना मन भावनांनी भरून आले आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या . परत त्यांच्या संदेशात " विश्वास " शब्द वाचल्यावर मन स्पर्धेसाठी तयार झाले . तिथेच ठरविले की पारितोषिक घेऊन जायचे आणि माझ्या मुख्याध्यापिकेच्या विश्वासामुळे मी महापौर पारितोषिकेची मानकरी ठरली . पारितोषिक शाळेत घेऊन जाताच माझ्या मुख्याध्यापिकेने मला घट्ट आलिंगन दिले . तिच्या कुशीत गेल्याबरोबर मन गद्गदून आले . तिच्या प्रेमाच्या ओलाव्याने मन तृप्त झाले. डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवणारी , पाठीवर शाब्बासकीची थाप मारणारी , अथक परिश्रमी , मन मिळाऊ, अशी एक नाही अनेक गुणांनी परिपूर्ण असलेली अशी ही माझी आवडती मुख्याध्यापिका म्हणजेच " श्रीमती दीपाली नेने "