माझा दुधभाऊ
माझा दुधभाऊ
2015 साली माझी गाई हरणी पहिल्यांदा गाभण होती तिला जेव्हा ९ वा महिना लागला होता ना तेव्हा मी वेड्या सारखा रात्रभर गोठ्या कडे जाऊन थांबायचो. तिला रोज पिठाचा गोळा द्यायचो
खामुंडी ला जाऊन भैरवनाथा कड साकडं पण घातलं होत कि देवा माझ्या गायीला गोऱ्हा होऊ देत
अजून आठवतंय नोव्हेंबर च्या १७-१८ला ती खाली होणार होती
तीन चार दिवसात मित्रांन सोबत शिर्डी आणि शनिशिंनपुर चा नियोजन झालं
२२ नोव्हेंबर ला संध्याकाळी आम्ही शिर्डीला गेलो २३ ला शनी अमावस्या आणि माझा जन्मदिवस होता. सकाळीच साई बाबांचं दर्शन घेऊन शनिशिंनपुर ला गेलो
घरी येताना निम्म्या रस्त्याच्या पुढे आलो असेल आणि घरच्यांचे फोन वर फोन चालू झाले खूप वेळा फोन आले म्हणून मी फोन केला तर समजलं कि हरणी ला गोऱ्हा झाला .
आनंद इतका झाला कि व्यक्त करता येत नव्हता
९०-९५ च्या स्पीड नि घरी आलो आणि डायरेक्ट गोठ्या कडे गेलो आणि गोर्ह्या ला मिठी मारली
काम वाले मामा सांगत होते कि हरणीनी कोणालाच हात लाऊन नाय दिला गोर्ह्या. लाथा मारायची गोर्ह्या च्या जवळ गेलं कि पण तुला काय नाय केल.
हे ऐकलं आणि तिच्या डोक्यावर हात फिरवायला गेलो पण तिने हात लाऊन नाय दिला म्हणून तिच्या पाठीवरचा हात फिरवत राहिलो.
खूप मस्त फीलिंग्स होत्या त्या...
जन्म दिनाच्या दिवशी मला देवाने सर्वात मोठं गिफ्ट दिलं होत. त्यावेळी देवयानी म्हणून एक सिरीयल खूप पॉप्युलर झाली होती
त्यातल्या मुख्य कलाकारांचे नाव होत #एक्का. म्हणून मी त्याच नाव एक्का ठेवलं होत
पप्पा बाबा सगळे म्हणायचे कि गायीचं थोडं दूध काढू गायी ला धुवायची सवय ठेवली पाहिजे, पण मी सगळ्यां सोबत भांडून सर्व दूध एक्का लाच पाजायचो.
दूध पाजायला सोडला कि शेपूट वर करून उड्या मारत आईपशी जायचा.
रोज संध्याकाळी त्याला दाव बांधून पळवायचो. पळून झालं कि पिठाचा गोळा चारायचो
मी कुठून पण आवाज टाकला की ताडकण उठायचा आणि कान टवकारायचा.
पाणी पिण्या करता सोडला कि दावणीकडे सुसाट पाळायचा.
पोळ्याच्या दिवशी देवीच्या मंदिरा कडे नेताना तर आम्हा चौघांचा पार घाम काढला होता २ बैल धरायला १ जणआणि एक्का पकडायला ३ जण
देवी पाशी गेलो आणि म्हटलं सलामी मारतोय का पहावं
म्हणून पार फुल जोर लावला तेव्हा कुठं सलामी पडली.
घरी परतीच्या मार्गाला एकदम मस्त आला
थोडा मोठा झाला तेव्हा त्याला छकडीला जुंपले पहिल्या दिवशीच असा जुकाटा खाली आला जस काय रोजच जुंपतोय पाळायला लागला. तेव्हा कुठे हि ओढायचा मग काय त्याच एक दाव धरून मला ही पाळायला लागायचं जस काय माझी तब्यत कमी व्हावी म्हणून तोच मला पळवतोय, एकदा तर सगळी गाडी घेऊनच वढ्यात गेला २-३ दिवसांनंतर छकड्याला असा पाळायचा कि जोडीच्या बैलाला पण ऐकत नसायचा. रोज संध्याकाळी त्याला पळवायचो
अनोळखी कोणी जवळ गेलं तर असा फुस्कारायचा कि जवळ गेलेला चार पावलं मागे सरायचा
एक्का हळू हळू मोठा होऊ लागला तशी त्याची ताकत हि वाढली आणि मग गोठ्यातल्या साखळ्या असा तोडायचा कि त्याला साखळीनी नाही सुतळी नी बांधलाय...त्याच्या त्या फुस्काऱ्यांची घरच्यांला भीती वाटू लागली होती. दोन चार टाळकी यायची आणि त्याच्या जवळ जायची
अनोळखी म्हणून तो हि फुस्कारायचा मग यांची फटायची, आणि हेच घरच्यांला येऊन सांगायचे कि गोर्ह लय मारतायआणि घरचे मला बडबड करायचे असला राग यायचा ना तेव्हा अस वाटायचं की.....
पण काय करणार मी
त्यांचा सगळा राग एक्का वरच निघायचा चाबूक हातात घेतला कि एक्का थैथै नाचायचा
मी हि २-३ फटाके मारायचो त्याला आणि घरातलं कोण तरी मला समजवायला येत नाही तो पर्यंत गोठ्या कडेच चाबूक वाजवत बसायचो मग बाबा किंवा पप्पा यायचे बोलायचे नको मारू त्या मुक्या जितराबला त्यांनी काय केलाय ..... अस बोलले कि मी पण चाबूक ठेवून द्यायचो आणि एक्काला चोळत बसायचो..मला कसलंही tension असलं कि मी लवकर झोपायचो आणि रात्रीच सगळे झोपले की १०-१०.३० ला उठून त्याच्या पाशी जाऊन गाणी ऐकत बसायचो
आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवता फिरवता मनातल्या मनात सगळ्या गोष्टी त्याच्या जवळ सांगायचो अगदी मन हलकं झाल्या सारख वाटायचं. १-२ वाजे पर्यंत त्याच्या पाशीच रात्र काढायचो मच्छर जरा जास्त चावायला लागले कि घरी येऊन झोपायचो.
कॉलेज ला जाताना कॉलेज वरून आल्यावर त्याच्या कडे जायचो त्याच्या पाठीवर हात फिरवायचो.
घरचे मला खूप बडबड करायला लागले. कश्याला पोसायच त्याला, झालाय मोठा आता विकू त्याला,
मारतोय तोकश्याला ठेवायच त्याला, कुठं आवुत काठी बैलांनी करतोय आपण,
गाडे पण बंद आहेत,
असे अनेक प्रश्न विचारायचे.पण माझं उत्तर ठरलेलं
माझ एक्का आहे मी काय पण करल आणि कोणी हात लावून दाखवा त्याला मग सांगतो मी....
खूप भांडण व्हायला लागली होती घरात मला ही कस तरी वाटायचं...
माझे पेपर चालू होणार होते मला अभ्यासाच tension यायचं आणि त्यात घरच्यांसोबत पण भांडण व्हायचं २वेळा खूप भांडण झाली आणि शेवटी मी फक्त म्हटलो की विकू एक्का आपण तर लगेच सोमवारी बेल्हे बाजारात न्यायचा ठरवलं
रविवारी त्याला घासून आंघोळ घातली
रविवार ची रात्र जवळपास ३ वाजे पर्यंत गोठ्या कडेच होतो. घरी आलो झोप लागत नव्हती थोडासा डोळा लागला तोच पप्पा उठावायला आले उठ लवकर अंघोळ करून घे ५ वाजले
मला आठवत पण नव्हतं की मी शेवटचं इतकं केव्हा रडलो होतो ५ ला अंघोळी ला गलय ६ झाले अजून कसा हा बाहेर आला नाही हे पाहायला पप्पानी दरवाजा जोरात ढकलला आणि मला रडताना पाहिलं काही न बोलता निघून गेले आज्जी अली बोलली रडू नको अंघोळ करून घे उशीर होतोय.
रडत रडत अंगावर पाणी टाकलं बाहेर आलो आणि खाटेवर गेलो तोंडावर पांघरून घेतलं आणि रडतच बसलो.
दादा बाबा आज्जी आई सगळे एक एक करून यायचं आणि मला समजवायच. पप्पा आले आणि एकदम हळू आवाजात बोलले नाही न्यायचा का एक्काला गाडी आली, परत पाठून देऊ का पप्पांच्या आवाजात अस वाटलं की त्यांच्या मनात पण नसावं एक्का ला विकायचं.... पण नंतर विचार आला की मला रडताना पाहून पप्पा तस बोलले असतील मला अजून रडू आलं पण डोळे पुसले तोंड धुतलं भाकर घेतली आई ताट घेऊन आली एक्काच औक्षण केलं. त्याला भाकर खाऊ घातली दावी सोडली आणि मला रडूच आवरलं नाही म्हणून मी पळत घरा कडे गेलो. गाडी घेऊन आलो तो पर्यंत एक्का ला गाडीत घातलं आणि गाडी निघाली होती मी तासाच गाडी माघे निघालो.
आळेफाट्या जवळ ड्राइवर मामा नी अचानक ब्रेक मारला एक्का गाडीतच सरकला पण काही झालं नाही तरी मी त्या बिचाऱ्या मामांला खूप बोललो.
बाजारात जळगाव च्या एका शेतकऱ्याला एक्का विकला त्याच्या पासून दूर जाऊशी वाटत नसतानाही दूर जाऊशी वाटलं. घरी राजबिंड्या सारखा राहणार एक्का सुद्धा शांत उभा होता अस वाटत होत कि त्या मुक्या जनावरा ला सुद्धा कळून चुकलंय की त्याचा दुधभाऊ त्याला परत कधीच भेटणार नाही म्हणून......... .
