लेकीची हाक
लेकीची हाक


आई अगं ए आई..! आई...
अगं मी बोलतेय तुझी लाडकी छकुली. तुझी सखी. ओळखलं नाही मला, मी तुझाच अंश आहे.
मला की नाही तुझ्याशी खूप खूप
बोलायचं. खूप खूप खेळायचं.
बाबांशी, दादाशी, आजी, आबूशी
पण खूप बोलायचं. त्यांचे लाड
करायचं. अय्या..! बोलता बोलता
मी विसरलेच की तू माझं नाव
काय ठेवणार गं? काहीही ठेव
मला चालेल. ठीक आहे माझी
गुणांची गोड गोड आई.
आई.! काय होतं आहे ग?
कसला हा आवाज? असं वाटतं
आहे मला कुणी तरी धक्के मारत
आहे. जिव कासावीस होत आहे.
काही तरी विपरीत, भयानक
होणार आहे आज. काहीतरी ओंगळवाणे, अघटीत.....!
आई आई किती वेदना होत आहे
गं... आ... आ... आ... अगं आई गं
तुला ही वेदना होत असेल ना गं.
थाबंव ना ग या वेदना. मला असह्य
होतं आहे गं......... कुणीतरी सूया
खूपसल्यागत वाटतं आहे गं.....
माझा जीव गुदमरतोय गं.
आई..... आई.... आई गं. सांग ना गं
आई का अशी निष्ठूर झालीस.
सांग ना गं बाबा, आजी, आबाला.
मी तुम्हाला कधी कधी त्रास देणार
नाही. मला कपडे नको, खेळणी नको, खाऊ नको काही काहीच
नको. फक्त मला जन्म दे गं. मी
तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही गं त्याची परतफेड करीन.
खूप खूप शिकून तुमची सेवा करील. आजी आबाजीचे पाय
दाबील. त्यांची मी काठी बनील.
आजी तू तरी सांग ना गं आई-बाबांना तुझे ते ऐकतील. दादा, दादा ए दादा तू तरी साग ना रे.
तुझे सर्व काम ऐकील. माझा पण
खाऊ तुला देईल. तू मला साडीचोळी नाही घेऊन दिली तरी
चालेल रे... पण तू तरी सांग ना रे
दादा.....
आई ऐक ना गं माझं तू पण
एक स्त्रीच आहे ना गं. आजीने तुला
जन्म दिला नसता तर..........
याचा पण तू विचार करत नाही.
अख्खं जग माझ्या विरोधात आहे.
त्यांच्या त्या वखवखलेल्या नजरा,
त्यांचे ते पाशवी हास्य.........
यासाठी तर तू माझा जन्म नाकारत नाही ना........ अगं त्यांची काळजी करू नकोस तू.
फाडून टाकीन एकएकांना...
फक्त तू मला जन्म देऊन
तर बघ....!!!
आई मारू नकोस गं मला
मी तुझाच अंश आहे
इवल्या इवल्या डोळ्यांनी
मलाही जग पाहायचंय
आजी-आबांची मला
काठी व्हायचंय.......!!!