लेक वाचवा
लेक वाचवा


'मुलगी झाली म्हणून का बाळगता भिती
गुणवान लेक ही तर देशाची खरी संपत्ती'
आज मुलगी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उत्कृष्ट कार्य करत आहे. पण आजही समाजाची मानसिकता अशी आहे की मुलांच्या हव्यासापोटी पोटातील कित्येक कोवळ्या लेकीचा बळी घेतला जातो. जर जीव लावणारी आई हवी असते, ओवाळणारी बहीण हवी असते, जन्मभर साथ देणारी पत्नी हवी असते मग अजून न जन्मलेल्या मुलीबद्दलच एवढा नकारभाव का? आज आपण विचार केला तर लता मंगेशकर, कल्पना चावला, माधुरी दिक्षित, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, साइना नेहवाल, गीता फोगट, सानिया मिर्झा यांच्यासारख्या एक नाही हजारो मुली-महिला यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान आहेत. मग मुली म्हणजे परक्याचं धन हा विचार न करता मुलगी म्हणजे उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा स्तंभ म्हणून तिच्याकडे पाहिले तर मुलगी कधीच ओझे वाटणार नाही. ज्या मुलासाठी एवढे नवस करता, त्याला उत्तम शिक्षण देता, त्याचे हवे ते मागणे मान्य करता, तो भविष्यात तुम्हाला कधीही अंतर देणार नाही, ही खात्री तुम्ही देऊ शकता? पण मुली मात्र परक्या घरी जाऊन सुद्धा दोन्ही घरांची व्यवस्थित काळजी घेतात. नोकरी करुन घरही अगदी हसतमुखाने सांभाळतात. वेळप्रसंगी खचून न जाता धैर्याने संकटांचा सामना करतात. स्त्रीशिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनीही कित्येक हाल वाटेतला अन्याय सहन करत आपले मुलींना शिकवण्याचे महान कार्य अविरत सुरू ठेवले.
त्याच माऊलीचा वसा पुढे चालवत आज अनेक सावित्री विविध क्षेत्रात अनेक समस्यांना तोंड देत यशाच्या उच्चतम शिखरावर विराजमान आहेत. मग मुली जर कशातच कमी नाहीत तर मुलीला दुय्यम स्थान का? तेव्हा जागे व्हा आणि समाजात आत्मविश्वासाने वावरण्यासाठी आपल्या लेकीला मदतीचा,विश्वासाचा,संरक्षणाचा हात द्या.
" लेक वाचवा ,लेक शिकवा,
प्रत्येक लेकीला सन्मान द्या
होऊ नका अडसर तिच्या वाटेतला
तिच्या कार्यात तिला प्रोत्साहन द्या"