लढाईचा खेळ
लढाईचा खेळ
परिचय:
स्वर्गीय श्री वीणा इंदुरकर (२६ जून १९२८ - ३० नोव्हेंबर २०१९) ह्यांनी स्वातंत्रवीर सैनिकांवर रचलेलं हे एक छोटंसं बालनाट्य आहे. साधारणतः ६ ते ८ वर्षवयोगटातील मुलांकरिता.
माझी आजी देशभक्त आणि तिच्या ओठांवर सैनिकांबद्दल जितका आदर असे तितकीच सहानुभूती. आपले लोक(सैनिक)लढत आहेत प्राण पणाला लावत आहेत असे ती नेहमी म्हणत. तिच्या देशभक्तीचे हे छोटेसे स्वरूप.
लढाईचा खेळ
सूर्य पश्चिमेकडे झुकला. अंगणात सावली पडू लागली. रोजची खेळायची वेळ जवळ जवळ येऊ लागली. त्यातून आज रविवार.
खेळायची घाई सर्वांनाच झाली होती. आपापल्या घरातून एक एक बालवीर बाहेर पडू लागला.
हळू हळू सगळे जमले. पण त्या सर्वांचा नायक जयंता अजून आला नव्हता. सगळे त्याची वाट पाहू लागले. लवकरच तोही आला. सर्वांच्या अंगात नवचैतन्य शिरलं. जयंतानं सुरवात केली.
जयंत - हं गाड्यांनो, सांगा आज काय खेळायचं आहे आपण.
एक मित्र - आज कबड्डी खेळू या.
दुसरा मित्र - नाहीतर लपंडाव खेळू.
जयंत - छे: बुवा. हे तर रोजचेच खेळ आहेत. आज आपण काहीतरी नवीन खेळू या.
सारे - नवीन ! नवीन खेळ कोणता खेळायचा बरं?
जयंता - मी सांगतो. आज आपण खेळू लढाई लढाई.
आपल्या भारताची पाकिस्तानशी लढाई चालू आहे ना, तशी.
सारे - होय होय. खरंच. लढाईचा खेळ खेळू. गम्मत येईल.
जयंत - हं मग. आता आपण ठरवू या. कुणी कुणी काय काय व्हायचं ते.
सारे - आम्ही सैनिक होणार. सैनिक होणार!! शत्रूला असेच मारणार.
जयंत - अं हं. अशी गडबड नाही करायची बरं का. एकेकट्यांनी सांगायचं कोण काय होणार ते.
अशोक, तू सांग पहिल्यांदा तू कोण होणार ते!
अशोक - मी? ऐका तर मग ऽऽ
मर्द गडी मी होऊन सैनिक
खांद्यावरती घेऊन बंदुक
लेफ्ट राईट लेफ्ट राईट
आगे कदम आगे कदम
नेम धरूनि लक्षयावरती
पाडीन त्याला धरतीवरती
उडवीन धुव्वा शत्रूचा - सैनिक भारतमातेचा!!!
जयंत - वा वा. छान हं. आता सुरेश तू सांग.
सुरेश - मी ना? हो हो ऐका तर......
वैमानिक मी मोठा भारी
मारीन आकाशांत भरारी
भर भर फर फर
धडाड धुम धडाड धुम
बॉम्ब टाकुनी शत्रुवर्ती
येईन ऐटीत पुन्हा खालती
डोंब उसळवीन आगीचा -
वैमानिक भारतमातेचा!!!
जयंत - छान छान. आता अनिल तुझी पाळी.
अनिल - ऐका गड्यांनो....
सैनिक मी छत्रिधारी
लावीन पणा काय सारी
तरंगेन मी हवेत ऐसा
जाईन आणिक वाऱ्यासरसा
शत्रूच्या गोटांत शिरेन
उडवीन त्यांची दाणादाण
दाविन पराक्रम विराचा - सैनिक भारतमातेचा!!!
जयंत - उत्तम कल्पना आहे हं ही.
आता दीपक, तू सांग आपली करामत.
दीपक -
करामत आता माझी ऐका
कुशल हेर मी तुमचा बरं का
गुपचुप गुपचुप झाडावरती बसेन चढुनी
जाईन किंवा वेष पालटूनी
कारस्थाने गुप्त शत्रुची
सांगिन अपुल्या सैन्याला
फसविन बेत शत्रूचा-
गुप्तहेर भारतमातेच
ा!!!
जयंत - फारच छान. सगळे अगदी जय्यत तयारीत आहेत बरं का. सुमन, आता तू सांग ना. काय करणार ते.
सुमन - मी रे काय करणार? बरं ऐक...
शेतकरीण मी गरीब बिचारी
भाजिन घरच्या घरी भाकरी
लसूण कांदा भाकर भाजी
धाडीन अमुच्या सैन्याला
सोय करीन मी पोटाची - कन्या भारतभूमीची!!!
जयंत - किती छान बोललीस ग. पण त्या भाकरी पोचवणार कोण?
शशी - वा! मी आहे ना?
कारभारी मी माझ्याघरचा
जोडिन गाडा दोन बैलांचा
चला चला रे ढवळ्या पवळ्या
जी ऽ यो जी ऽ यो जी ऽ यो
पोट भरुनी खा सैनिक हो
मारा दुश्मन विर हो
अशिर्वच या गरिबाचा - शेतकरी भारतभूमीचा!!!
जयंत - आता ही बेबी राहिली.
कसे ओठ फुरफुरत आहेत पहा सांगायला.
हं कर सुरूवात बेबी.
बेबी - ऐका रे साऱ्यांनी....
मी तर बाबा लहान पोर
करेन गजरे आणिक हार
गजरे घ्या गजरे घ्या गजरे घ्या गजरे
गजरे विकुनी पैसे करुनी धाडिन
चव्हाण काकाला
दारू गोळ्या घ्यायला
करीन व्यवस्था पैश्याची - कन्या भारतमातेची!!!
जयंत - बेबिनी तर कमाल केली बुवा. आणि कुसुम, तू का दूर उभी? तू सांग की आपलं काही.
कुसुम - मला विचारतोस ना? एक मग....
परिचारिका मी व्हायची
सेवा करेन सैन्याची
शुभ्र पांढरी वस्त्रे घालीन
टप टप टप टप
बूट वाजवीत ऐटीत चालीन
गोड बोलूनी गोष्टी सांगुनी
जखमी लोका रिझवीन
दीक्षा घेऊन सेवेची - कन्या भारतमातेची!!!
जयंत - सुरेख. जमलं बरं का सारे. आता आपण गडी वाटून घेऊ या. अर्धे अर्धे.
अर्धे भारताकडे आणि अर्धे पाकिस्तानकडे.
सारे - आम्ही भारताकडून! आम्ही भारताकडून!
जयंत - अरे, पण अस करून कसं चालेल? लढाई करायची ना आपल्याला?
शशी - जयंता, हा छोटू बघ. रूसून चाललाय.
जयंत - अरे छोटू, तुला काय झालंय रे?
छोटू - आम्ही नाही होणार जा पाकिस्तान कडून.
जयंत - अरे पण ही थट्टा आहे . हा खेळ आहे.
छोटू - आम्ही थट्टेत सुद्धा नाही होणार. खेळात सुद्धा नाही होणार जा. आम्ही जातो घरी.
जयंत - बरं बाबा, ये. तू हो भारताकडून. मग तर झालं? आपण असं करू या. दोनदा लढाई करू. एकदा तुम्ही भारत. एकदा आम्ही. मग तर चालेल ना?
सारे - हो हो. जमेल.
जयंत - मग. करा सुरू. एक दोन तीन.
( सारे एकमेकांवर तुटून पडतात. मारा मारा. ठोका ठोका चा आवाज होतो. थोड्या वेळात एकच आवाज उठतो. पाकिस्तान कडचे सारे खाली पडतात)
सारे - भारत जिंकला. भारत जिंकला. भारत जिंकला.
भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. शास्त्री काका की जय.
भारत अमुचा महान भारत अमुचा महान.
स्वतंत्रते ने नटले भारत. स्वतंत्रते ने सजले भारत.
जय हिंद, जय हिंद जय हिंद. जय भारत जय भारत.
आवाज ऐकुन आजी आजोबा धावून आले. त्यांनी सगळ्यांना शांत करायचा प्रयत्न केला. पण काहीच उपयोग झाला नाही.