STORYMIRROR

ASHWINI NAVALE

Others

3  

ASHWINI NAVALE

Others

कल्पनेतील वास्तव

कल्पनेतील वास्तव

2 mins
358

का? कुणास ठाऊक? पण काही गोष्टींच अस्तित्व ठरवणं कधी कधी खरंच खूप अवघड असतं, पण अनुभवांचं जाळं विणताना उलगडू लागतात गुपितं... सत्य-असत्याला बाजूला सारून शांतपणे डोळे मिटून ते अस्तित्व अनुभवण्यातदेखील मनाला एक आनंददायी लहर स्पर्शून जाते, तेव्हा धन्यवाद द्यावे वाटतात त्या निर्मिकाचे... जो की निर्गुण, निराकार, अथांग, अतर्क्य, अद्वितीय, पवित्र आहे !

  जशी उगवत्या सूर्याबरोबर मनाला ओढ असते, ती नव्या उमेदीची, स्फूर्तीची, स्वप्नांमागे अथकपणे धावण्याची... तशीच ओढ असावी मावळत्या दिनकराला निरोप देताना संधीप्रकाशाला साक्ष ठेवून अमंगल, अपवित्र दूर सारून उद्यासाठी सुंदर आठवणींचा समृद्ध खजिना जपण्याची... रात्रीच्या वेळी आकाशातील चांदण्या बघताना कधी तुटता तारा दिसला तर वाटतं की मनात एखादी इच्छा बोलावी का? पोहोचेल का खरंच ती त्या निर्मिकापर्यंत ? मन किती वेडं असतं ना, क्षणाचाही विलंब न करता मागून मोकळं होतं आणि एका वेड्या आशेवर गुंफली जाते स्वप्नांची वेल. क्षणासाठी का होईना, ही एक खगोलशास्त्रीय घटना असल्याचा मनाला विसर पडतो. 

   उमलणाऱ्या फुलालादेखील माहित नसतं की ते देवचरणी अर्पण होणार की प्रेताचरणी... पण कुठलीही तक्रार न करता आपले सुगंध देण्याचे कर्तव्य ते पार पाडत असते. काही प्रहारांचं ते आयुष्य; पण भरभरून देणं काय असतं ते त्यांच्या कडूनच शिकावं ! माणसानेही आयुष्यात भावना व्यक्त कराव्यात, रडावं, माफी मागावी, आत्मपरीक्षण करावं, शिकावं, मोठ्या मनाने माफ करावं ; पण थांबून खूप विचार करून आयुष्यातील सुंदर क्षण गमावू नयेत. कदाचित आपले आजचे अश्रू समस्यारूपी बियांना योग्य खत-पाणी घालून उद्याच्या आयुष्यात सुखाच्या रूपात बहर आणू शकतात. 

  हेच बघा ना, वर्षानुवर्षे पंढरीची वारी करणाऱ्या भक्ताला ओढ असते ती विठूमाऊलीला डोळे भरून पाहून मनात साठवून ठेवण्याची, मनातलं हितगुज करण्याची ;पण खरंच ही विठूमाऊली भक्ताला मंदिराच्या गाभाऱ्यात भेटते का हो? तरीही अपार श्रद्धा व निस्सीम भक्ती यांचा नजराणा विठूरायाला अर्पण करण्यासाठी भक्त आतुर झालेला असतो. जणू निर्मिकाविषयीची कृतज्ञताच यातून व्यक्त होत असते आणि आशीर्वादरूपी संजीवनी घेऊन सुरु होतो भक्तांच्या आयुष्याचा पुढचा प्रवास... 

   सृष्टीतील सर्व सजीव -निर्जीवांवर स्वतः च्या लेकरांप्रमाणे माया असते त्या निर्मिकाची. अशावेळी जणू अक्षरे नसलेल्या भाषेतून एक अबोल संवाद चालू असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच वास्तव आणि कल्पना या ऊन-सावलीच्या खेळात वास्तवाचा शोध नक्कीच घ्यावा ; परंतु कल्पनेच्या विश्वात रमून जाण्यातदेखील जो आनंद असतो ना तो काही औरच !


Rate this content
Log in