Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

प्रितफुल प्रित

Others


3  

प्रितफुल प्रित

Others


किमया

किमया

17 mins 1.1K 17 mins 1.1K

*किमया*


आज एकमेकांच्या कुशीत शिरून दोघीजणी हमसून हमसून रडत होत्या. या जगात, आपल्या सभोवती अशा काही अघटित, अनाकलनीय घटना घडत असतात की त्यामुळे आपली मती गूंग झाल्याशिवाय राहत नाही.


दोघींच्या बाबतीत असंच काहीतरी झालं होतं. स्नेहा, एका सधन कुटूंबात जन्मलेली मुलगी ; एकुलती एक, गोंडस, वय ६ वर्ष. राजमहालाला लाजवेल असा बंगला अन् आर्थिक सुबत्ता. चारुदत्त इनामदार ही उद्योग जगतातली मोठी आसामी. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच एखाद्या राजकन्येसारखी लाडाकोडात वाढली होती स्नेहा. निलीमाचा, तिच्या आईचा तर तिच्यावर भारी जीव. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला जपायची ; अपार माया, कोडकौतुक करायची. स्नेहाही तिला एक क्षणही नजरेआड होऊ द्यायची नाही ; प्रत्येक गोष्टीत तिला आई हवी असायची. पण "खेळ कुणाला दैवाचा कळला" असच काहीसं घडलं. 


तिची ही आई एक दिवस खूप आजारी पडली. क्षुल्लकश्या तापाचं निमीत्त झालं अन् त्यानेच पुढे मेंदूज्वराचे काळसर्पी रुप घेऊन निलीमाला आपल्या मृत्युकवेत कवटाळलं. त्या इवल्याश्या बालकावर तर जणु दु:खाचा पहाडच कोसळला. मरण म्हणजे काय असतं, हे ही समजायचे वय नव्हते स्नेहाचे. पण तरीही आपल्या प्रेमळ आईशी कायमची ताटातूट तिच्या नशिबी आली. चारुदत्तांचे तर पूर्ण आयुष्यच जणु काही विस्कळीत झाल्यासारखे झाले. हादरुन गेले ते सहचारिणीच्या अशा अचानक जाण्यानेे. पण त्याही पेक्षा त्यांना जास्त काळजी होती ती स्नेहाची. ते दोघेही आता पोरके झाले होते. चारदत्त खूप संयमी अन् धिराचे होते. दैनंदिन कार्यालयीन कामकाजात त्यांनी स्वतः ला पुरते गुंतवून घेतले होते. पण स्नेहा जणु एखाद्या अबोल निर्जीव बाहुलीसारखी एका कोप-यात पडून रहायची. तिची कावरीबावरी नजर आपल्या आईला सभोवताली शोधत रहायची अन् मग आई न दिसताच कासावीस होऊन तिला हाका मारत ती डोळ्यांतून मूक अ‌श्रू ढाळत घरात, अंगणात फिरत रहायची. आई येईल अन् मला भरवेल, या वेड्या आशेपायी ती धड खायची प्यायची देखील नाही. चारुदत्तांना हे सारं पाहून गलबलून यायचे. तिला होणारा हा त्रास त्यांना पाहवेना. स्नेहाला वेड लागेल, या भितीने ते हादरले. त्यांनी मागे पुढे न पाहता एक महत्वाचा निर्णय घेतला. त्यांच्या स्वर्गवासी बायकोवर त्यांचे खूप प्रेम होते; पण तरीही स्नेहाच्या आयुष्यातील आईची कमी भरुन काढणे ही काळाची गरज होती..


एक दिवस चारुदत्तांचा हात हाती घेऊन ; घराचे माप ओलांडून किमया घरात आली ; त्यांच्या पत्नीच्या रुपात ; पण त्यापेक्षा जास्त स्नेहाची आई होऊन. किमया एका अनाथाश्रमाची सर्वेसर्वा. चारुदत्तांकडून समाजसेवेच्या अंतर्गत बरेच धनदान केले जायचे. तिथेच दोघांची भेट झाली. किमया तशी ८ वर्षांनी लहान होती चारुदत्तांपेक्षा. अनाथाश्रमातच लहानाची मोठी झालेली; अन् आता तोच अनाथाश्रम चालवण्याची धुरा तिने स्वत: पेलली होती. अतिशय बुद्धिमान, लाघवी स्वभाव, चेहऱ्यावर सतत असणारे धीरगंभीर भाव, संभाषण करताना शब्दांशब्दांतून झळकणारा आत्मविश्वास अन् एका कटाक्षातूनच समोरच्याच्या काळजाचा वेध घेणारी करारी नजर. पण तरुणाईच्या उंबरठ्यावर असतानाच एक दिवस तिला तिच्याबद्धल असे सत्य समजले की त्याने तिच्या जगण्याला एक वेगळा अर्थ मिळवून दिला. ती जन्माला आल्यावरच तिच्या अज्ञात आईने तिचे आईपण स्वीकारायचं नाकारलं अन् तिला याच अनाथाश्रमाच्या पायरीवर ठेऊन पलायन केलं होतं. पण या मागची कारणे किंवा त्या जन्मदात्रीला शोधण्याचा निरर्थक प्रयत्‍न तिने कधीच केला नाही. याउलट या सत्यामुळे ; आपल्याकडूनही भावनेच्या भरात अशी काही चूक होणार नाही नं? असे अविचारी पाऊल कधी आपल्याकडून उचलले जाऊ नये ; याबाबत ती जागृत राहू लागली. 


एक दिवस नित्यनेमाप्रमाणे चारुदत्तांनी अनाथाश्रमाला भेट दिली होती. किमयेने त्यांना सहजच त्यांच्या घरची जुजबी खुशाली विचारण्याचाच अवकाश; का, कसे, कोण जाणे, पण चारुदत्तांकडून

स्नेहासंदर्भातील त्यांचे विचार, त्यांच्या भावना अगदी सहजतेने तिच्याजवळ उलगडल्या गेल्या. स्नेहाची काळजी त्यांना पोखरत होती, सतत अस्वस्थ ठेवत होती ; हे पाहून तिला त्यांच्याबद्दल सहानुभूती दाटून आली. स्नेहाला खऱ्या अर्थाने मातृत्वाची नितांत गरज आहे ; हे किमयेच्या लक्षात आलं. स्वतः चं पोरकं, अनाथ बालपण तिला स्नेहात दिसायला लागलं. चारुदत्तांना ही हे हळुहळु वाटायला लागलं होतं की किमया स्नेहाच्या आईच्या भूमिकेत अगदीच चपखल बसते आहे; मग एक दिवस त्यांनी पुढचा मागचा विचार न करताच किमयेला मागणी घातली. किमयेचे विचार ही त्यांच्या विचारांशी जुळले अन् तिनेही सत्वर होकार दिला.


'किमया चारुदत्त इनामदार' म्हणून तिचा घरात प्रवेश झाला अन् तिने थोड्याच दिवसात तिच्या प्रेमळ वर्तणुकीने, चारुदत्तांसकट घरातल्या सर्वांची मने जिंकली. चारुदत्तांनाही आपल्या ह्या निर्णयाचे खूप समाधान वाटले.


स्नेहाच्या भल्यासाठी हे पाउल उचलताना स्नेहाचीही वैचारिक, मानसिक संमती घ्यावी; असा वास्तविक निकडीचा असणारा प्रश्न विचारण्याइतपत स्नेहाची बौद्धिक पातळी प्रगल्भ नव्हती; कारण ती लहान होती. पण इथेच चारुदत्तांच्या विचारांनी त्यांच्या विश्वासाला तडा दिला. स्नेहाने ह्या नव्या आईला, किमयाला स्वीकारण्यास चक्क नकार दिला. ती तिच्या सख्या आईला विसरू ही शकत नव्हती व किमयाला आई म्हणायला, तिच्या मायेच्या कुशीत जायला तर अजिबात तयार नव्हती. किमया तिचे सर्वतोपरी लाड करी, तिच्या खाण्यापिण्याकडे जातीने लक्ष घाली. तिचा अभ्यास घेऊ पाही, फिरायला घेऊन जाई. कुठल्याही प्रकारे तिचे मन दुखावणार नाही; याची सर्वतोपरी काळजी घेई. पण स्नेहा तिच्याशी तुटकपणेच वागे, मायेने जवळ घ्यायला गेली की झिडकारून लांब पळून जात असे. या सगळ्यातून कळत नकळत स्नेहाने चारुदत्तांच्या ह्या तिच्या खऱ्या आईची जागा किमयाने घेण्याच्या निर्णयाला अप्रत्यक्ष विरोधच केला. त्यांचे किमयासोबत, एक नवरा-बायको ह्या नात्याने आपुलकीने, प्रेमाने वागणेबोलणे, तिची काळजी घेणे स्नेहाला अजिबात आवडत नसे. तिने किमयेचा कोणत्याही रुपातला गृहप्रवेश नाकारला होती. ती मग किमयाचा राग राग करू लागली; इतका की गैरसमजुतींनी तिचे बालमन पोखरायला सुरूवात केली. तिच्या आईच्या स्वर्गवासी होण्याला किमयाच जबाबदार आहे; अशी कळतनकळत चुकीची भावना तिच्या मनात घर करू लागली. स्नेहाच्या स्वभावबदलीचे वारे चारुदत्तांनांही झोंबू लागले ; तसे त्यांनी तिला कधी गो़ड बोलून, कधी दटावून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला. किमयाही तिचे प्रयत्न करून थकली, पण व्यर्थ. अशातच काही वर्षेे हां हां म्हणता निघून गेली. स्नेहा किशोरवयात आली पण त्याच्या बऱ्याच आधी तिच्या मनाच्या ताटव्यात किमयेबाबतच्या आकसाचे, रागाचे विखारी बीज रोवले गेले होते.

===================


भलतीच कातर संध्याकाळ होती ती! चारुदत्त किमयासोबत एका कार्यक्रमासाठी चालले होते. चालकाने काही कारणासाठी सुट्टी घेतल्याने ते स्वतःच गाडी चालवत होते. स्नेहाने किमयाला त्यांच्यासोबत नेण्यास विरोध दर्शवला म्हणून निघतानाच ते तिला रागावले होते. काय केलं की ती सुधारेल या विचारांनी अस्वस्थ असतानाच अचानक त्यांचा गाडीवरील ताबा सुटला अनं गाडी बाजूच्या दुभाजकावर जाऊन आदळली. त्यांचे डोके पुढील स्टिअरींगवर जोरात आपटले अन् अवघ्या काही सेकंदातच होत्याचे नव्हते झाले. डोक्याला जबर मार लागल्याने ब्रेन हॅमरेज झाले अन् डोळ्याचे पाते लवते न लवते तोच, जागेवरच चारुदत्तांचा मृत्यु झाला. किमया पण जबर जखमी झाली पण त्याहीपेक्षा डोळ्यादेखत झालेल्या ह्या मृत्युतांडवाने तिची शुध्दच हरपली.


स्नेहा ह्या प्रसंगामळे पूर्ण हादरली, मोडून पडली. जणु तिचा मानसिक आधारवृक्षच उन्मळून पडला. आई गेल्यानंतर चारुदत्तांचाच तिला भावनिक आधार वाटायचा. किशोरवयात आली होती ती आता. किमयावरुन त्यांच्यात सतत नाराजी, वाद असायचे पण इतर वेळी तिला बाबाच लागायचे. किमया बऱ्याच वेळेला चारुदत्तांसोबत जायची, त्यांच्या कामकाजात त्यांना मदत करायची, मिटींग्ज अटेंड करायची. तर स्नेहाही मुद्दाम चारुदत्तांसोबत जाऊ लागली होती; कधी त्यांना डिस्टर्ब करायला तर कधी किमयापासून दूर राहण्यासाठी. कधीकधी किमयाबाबत त्यांना खोटंनाटं सांगून त्यांचे कान भरून त्यांच्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्नही केला तिने. त्या अल्लड वयातही स्वतः चे चारुदत्तांच्या आयुष्यातील निर्विवाद महत्व सिद्ध करण्यासाठी अन् किमयाला त्यांच्यापासून दूर करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न तिने केले. पण आता चारुदत्तच राहीले नाहीत. पोरकेपणाच्या भावनेचं प्रचंड मोठं वादळ आपल्यावर चालून आलय; असंं वाटलं तिला. एकीकडे बाबा सोबत नसल्याचं असीम दु:ख अन् दुसरीकडे डोळ्यांसमोरही नको असलेली; पण केवळ पर्याय नाही म्हणून तिच्या सोबत रहावं लागतय, अशी किमया नावाची नाकारलेली आई; हे दोन्हीही पेलणं या अपरिपक्व वयात तिला खूपच कठीण जातं होतं. किमयाला सख्ख्या आईच्या जाण्याला अप्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरवलच होतं तिने; अन् आता तर दुर्दैवाने किमया सोबत असतानाच अपघाताने ओढावलेल्या बाबांच्या मृत्युलाही किमयाच जबाबदार आहे; असं तिचं ठाम मत झालं. एक दिवस तिच्या मनातील भावनांच्या ज्वालामुखीचा उद्रेकच झाला व ती किमयावर कडाडलीच, "इतकच सांगते, तू म्हणजे माझ्या आईबाबांना खाल्लेली हडळ आहेस हडळ ! तू आमचं हसतंखेळतं सुखी कुटूंब उध्वस्त केलंस; माझ्या बाबांना माझ्यापासून दूर केलंस. कुठल्या जन्माचा सूड उगवलास माहीत नाही! मी तुला कधीच माफ करणार नाही; आई म्हणणं अन् मानणं तर बाजूलाच राहीलं". किमया 'आ' वासून हा तिचा रुद्रावतार पहातच राहीली. स्नेहाच्या शब्दांनी तिचा जणू गळाच आवळला होता शब्द जणु कंठात गोठले होते. डोळ्यांतील फुटलेल्या कालव्यांतून अश्रूंचे पाट वाहत होते. तिला आपलसं करण्यात, तिच्यावर प्रेम करण्यात मी कुठे कमी पडले का? जाणता अजाणता तिच्या मनावर भूतकाळाने केलेली पकड ढिली करणे मला कधीच जमले नाही का? तिच्या आईबाबांच्या मृत्युस मी खरोखरच कारणीभूत आहे का? अजून मी काय करु हिच्यासाठी की ही मला स्वेच्छेने आई म्हणून स्वीकारेल? पोटच्या अपत्यापेक्षाही जास्त प्रेम केलं हिच्यावर मी; सावत्रपणा कधीही जाणवू नाही दिला माझ्या वागण्यातून. मानापमान, स्वत्व, स्वाभिमान सगळं सगळं बासनात गुंडाळून ठेवलंं अन् स्वतः ला पूर्ण समर्पित केलं ह्या घरासाठी, तुझ्यासाठी. पण तरीही मी अशी सतत नाकारलेली का? चारुदत्त तिच्या वडीलांसोबत माझे सौभाग्य देखील होतें. तुझ्यासोबतच्या माझ्या प्रत्येक संघर्षात फक्त त्यांनी मला साथ दिली. मला कधीही एकटं पडू दिलं नाही. खऱ्या अर्थाने पोरकी तर मी झालेय. त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तीच पोकळी भरुन काढावी म्हणून हा सारा अट्टाहास केला होता. पण नियतीपुढे कुणाचे काय चालणार? असं म्हणून मोठा सुस्कारा टाकून ती गप्प राहिली.


स्नेहाच्या मनात संतापाची, द्वेषाची विषवल्ली वाढू लागली होती. किमयावर सूड उगवायचाच, या दुष्ट भावनेने तिचं मन पेटलं होतं. किमयाला या घरातूनच काय, या जगातूनच नाहीसं करायचं; ह्या अघोरी योजनेकडे हळुहळु तिची पावले वळत होती. त्याच विखारी मनोवस्थेत असताना तिने ताबडतोब कुणालातरी फोन लावला. आज किमया मिटींगसाठी जाणार आहे; हे तिला माहीत होते. ठरल्याप्रमाणे किमया मिटींगसाठी घराच्या बाहेर पडली सुद्धा. तिला जाऊन एक तासही जेमतेम उरकला नसेल. अन् थोड्याच वेळात स्नेहाला एक अज्ञात फोन आला. फोनवर बोलतानाच तिचे डोळे लकलकायला लागले, चेहऱ्यावर छद्मी हास्याच्या छटा पसरायला लागल्या. फोन ठेवल्यावरही बराच वेळ ती तिच्याच धुंदीत गात नाचत होती. वैरिणीने डाव साधला होता. होय, किमयाचे अपहरण करण्यात आले होते; स्नेहाने ते घडवून आणले होते. काही काळानंतर बाहेर वातावरण शांत झाल्यानंतर तिला ठार मारण्यात येणार होते. याच फळाला आलेल्या डावाचा आनंद ती साजरा करत होती. 

===========


चारुदत्तांच्या स्टाफला, घरगड्यांना असं सांगण्यात आलं होतं की, किमया प्रदीर्घ मुदतीच्या टूरवर गेली आहे; त्यामुळे तिला शोधायचे प्रयत्न करण्याचा प्रश्नच नव्हता. स्नेहाला आता पिंजर्‍यातून मुक्त झालेल्या ; विनाअडसर, गगनाला गवसणी घालू पहाणार्‍या स्वच्छंदी विहंगासारखं वाटत होतं. वाटलं तर काॅलेजला जाणं, मित्रमैत्रिणींसोबत मौजमजा करणंं, सर्रास सुरू होतं. चारुदत्तांकडील एक एक कर्मचारी विश्वासू होता, कामांत तरबेज होता. त्यामुळे ते नसतानाही किमयेच्या दूरदृष्टीमुळे त्यांच्या उद्योग जगतावर काहीच नकारात्मक परिणाम झाला नाही; अन् त्यामुळेच स्नेहाचं मनमौजी, निष्काळजी वर्तन सुरु होतं. दिवसांमागून दिवस सरत होते. अपहरणकर्त्यांकडून आलेल्या त्या फोननंतर पुन्हा काहीच खबरबात आली नव्हती. स्नेहाला एक दोन वेळा शंका आली की काही दगाबाजी तर नसेल ना! पण एका खात्रीच्या मित्राकरवी ही योजना अमलात आणली गेल्यामुळे ती शक्यता मावळली अन् स्नेहा निर्धास्त झाली.


पण काळ अन् वेळ सदैव सारखं रहात नाही म्हणतात ना! 


स्वतःच्याच अहंकाराच्या मस्तीत गुंग असलेल्या स्नेहाला अचानक काही तरी वेगळेच अनुभव यायला लागले होते. तिचे कशातही लक्ष लागतं नव्हते. दिमतीला तर घरात नोकर चाकर खूप होते पण तिची नजर सतत काहीतरी, कुणालातरी शोधत होती. कशाची तरी कमतरता भासत होती तिला. पण नेमकं काय ते उमगत नव्हते. मित्रमैत्रिणींमधे, पार्ट्यामधे मन रमवायचा बराच प्रयत्न केला तिने पण तिथेही करमेना. स्वतः च्या नकळत तिची पावले किमयाच्या खोलीकडे वळायची अन् मग वास्तवाचे भान आलं की चपापून मागे परतायची. कधीकधी तिला किमयाच्या हाका ऐकू यायच्या; जेवायला बोलावताना, सकाळी उठवताना. अन् मग नेहमीचेच वैतागवाडीतले खेकसणे, "आले ग, काय कटकट आहे तुझी! " अन् मग शरमल्यासारखे व्हायचे. गहन विचारांती तिला समजलं की; की तिच्याही नकळत ती किमयाला सतत आठवू लागली होती, मिस करू लागली होती. आता मात्र तिचाच तिला राग यायला लागला. आपल्याला कळायला लागल्यापासून जिचा कायम आपण फक्त राग, द्वेश केला, अपमानच केला, आई म्हणून तिला कधी साधी हाक देखील मारली नाही, तिची एवढी आठवण का येत आहे आताशा आपल्याला? आपणच तिचे अपहरण करायला लावले, आत्तापर्यंत तिला ठारही करण्यात आले असेल कदाचीत. मरूदे मेली तर! माझ्या मागची कटकट तरी संपेल एकदाची. पण मग मला तिचा विचार सतत का छळतो आहे ? ज्या गोष्टीचा मी वास्तविक उत्सव करायला हवा; त्या गोष्टीचा मला एवढा त्रास का होत आहे? हे सारे तिच्या कळण्यापलिकडे होते.


एव्हाना स्नेहाच्या लक्षात आलं की, इतक्या वर्षांत तिला किमयाची, तिच्या स्नेहाभोवतीच्या सततच्या वावराची, तिच्या नाकारलेल्या का होईना, अस्तित्वाची सवय झाली होती; इतकी की आयुष्यभर तिचा द्वेश करून सुद्धा आज तिचं तिच्याजवळ नसणं तिला टोचत होतं. मनाच्या मलीन झालेल्या गाभाऱ्यात एका वापर नसलेल्या चांगुलपणाच्या दिव्यात खोल कुठेतरी सद्विचाराची ठिणगी पडली होती. तिचं मन विचार करत करत १२-१३ वर्षे मागे गेलं होतं अन् किमया घरात आल्यापासून नाहिशी होईपर्यंतचं सगळं चलचित्र मनाच्या पडद्यावर लख्ख रेखाटलं जात होतं ; ते इतकं की आता गैरसमजांचं स्वत: च पांघरलेलं गडद धूकं आपोआपच विरघळत होतं. निलीमा, आपली सख्खी आई वारली ती तिच्या आजारपणामुळे. त्याच्याशी किमयाचा काय संबंध? आपल्या बाबांचा झालेला अपघाती मृत्यु हे विधीलिखीत होतं. केवळ किमया त्यांच्या सोबत होती; म्हणून ती त्यांच्या मृत्युला जबाबदार कशी? ते बाहेर जाताना ज्या उद्विग्न मनस्थितीत घराबाहेर पडले; ते साऱ्यांनी पाहीलं होतं; अन् ती ही जखमी झालीच होती की! तिच्या मनात काही काळंबेरं असतं तर ती त्यांच्या सोबत कारमधून का गेली असती? एवढं सरळसोपं गणित आपल्याला का समजू नये? किमयेने घरात आल्यापासून माझ्यावर भरभरून माया केली, अपार लाड केले, माझे छोट्यात छोटे नखरे उचलून धरलेे. पण माझ्यात अविचारांचा कली शिरला होता ना! मी...मी पदोपदी तिला अपमानित केलं, सतत घालूनपाडून बोलले, एवढेच नाही तर सगळ्यात घृणात्मक कृत्य हे केलं की तिच्याबाबत बाबांना सतत खोटंनाटं सांगून त्यांचे कान भरले अन् त्यांच्यात भांडणे लावून दोघांना वेगळं करायचा प्रयत्न केला. किती हीन मनोवृत्ती होती माझी. पण ते दोघेही सुजाण, विचारसमृद्ध असल्याने व बाबांचा तिच्यावर पूर्ण विश्वास असल्याने माझा हा डावही फोल ठरला.


अस्वस्थ मनाने स्नेहा किमयेच्या खोलीत गेली. कित्येक वर्षांनी ती त्या खोलीत जात होती पण त्या खोलीतही स्नेहाविषयी अपार माया दाटून होती. सगळीकडे तिचे विवीध फोटो लावले होते, कपाटात खेळणी, अगदी लहानपणीचे कपडे सुद्धा होते. स्नेहाला वाटलं की आपल्याला इथे पाहून ही खोलीही मला प्रेमातिशयाने कवेत घेईल की काय? कपाटातल्या एका खणात तिने स्नेहाला विसाव्या वाढदिवसाबद्धल भेट म्हणून दिलेली अंगठी होती. स्नेहाला तो प्रसंग आठवला. त्यादिवशी घरातली किमयाने ठेवलेली पार्टी लाथाडून ती रात्री खूप उशीरा घरी आली म्हणून बाबांनी जाब विचारताच स्नेहाने संतापून ती किमयाच्या अंगावर फेकली होती. तो प्रसंग आठवताच स्नेहाला भडभडून आलंं. एक गोळ्यांची बाटली ही होती तिथेच जवळपास पडलेली, ३-४ गोळ्या होत्या. स्नेहाने सहज तिचे घटक वाचले अन् ती उडालीच. बापरे, मी हिला इतकं छळलं की हिची झोपही उडाली, पर्यायाने झोपेच्या गोळ्यांचा आधार घ्यावा लागला तिला. किती क्रूर आहे मी. खणातल्या एका डायरीकडे तिची नजर गेली. डायरीच्या पहिल्या पानावर त्या तिघांचा फोटो होता तिच्या लहानपणीचा. तोही काढताना चेहऱ्यावर नाराजी अन् रागाचं संमिश्र मिश्रण. स्नेहाला स्वतःचीच लाज वाटली. तिने सहज म्हणून डायरी चाळली; एकाही पानावर स्नेहाबद्धल नकारात्मक, अपशब्द किंवा नाराजीचे शब्द नव्हते. सगळीकडे तिचे कौतुक, माया, काळजी एवढच होतं. हां, नाही म्हणायला एक फोल्ड केलेला कागद होता. त्यात लिहीलं होतं, "कधीतरी मला आई म्हणून हाक मारशील नं स्नेहा! " कागदावर असलेल्या काजळमिश्रीत अश्रूंच्या डागांवरून किमयेच्या हताश मनस्थितीची तिला कल्पना आली. चेहऱ्यावर सदा हसू मिरवणारी ही किमयागार आतून किती उध्वस्त झाली असेल, हे त्याक्षणी तिला कळले व त्या पत्राला अन् फोटोला हृदयाशी कवटाळून ती पश्चात्तापाने मोठमोठयाने रडू लागली. 


बऱ्याच वेळाने ती सावरली. बरेच दिवस लोटले होते. किमयाचा काहीच ठावठिकाणा नव्हता; ना अपहरणकर्त्यांचा काही फोन. तिने त्या मित्राला फोन लावला पण तो ही गायब झाला होता. आता मात्र स्नेहाचं उरलंसुरलं अवसानही गळालं. अतिसंतापाच्या भरात आपण हे काय करून बसलो, ह्या कल्पनेने तिचे हातपाय कापायला लागले. गैरसमजुतीच्या सुळावर मी तिला लटकवले, जीव घेतला आईच्या ममत्वाचा. आई-मुलीच्या सुंदर नात्याचा आपल्या राक्षसी वृत्तीने कसा स्वतः हून गळा घोटला, हे सारं सारं आठवलं अन् त्याचा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या माझ्या पातकाला देवही माफ करणार नाही. याचा निवाडा आपणच करायचा असा कठोर निर्णय तिच्या मनाने घेतला अन् झरझर ती किमयेच्या खोलीत गेली. कपाटाच्या खणातली झोपेच्या गोळ्यांची बाटली काढली अन् क्षणाचाही विलंब न लावता त्यातल्या सर्व गोळ्या घशात रित्या केल्या.

====================


"हा कसला औषधांचा उग्र वास खोलीभर पसरलाय. खूप थंडी वाजतेय मला. हाताला कसली पट्टी लावली आहे, सुई असावी आत खुपसलेली. पण हा आपल्या चेहऱ्यावर कुणाचा उबदार स्पर्श फिरतोय? डोळ्यांच्या धुरकट पटलांपलीकडे ही कोणती ओळखीची छाया दिसत आहे? ही किमया तर नाही ना? पण कसं शक्य आहे? आपण तर आपल्या राक्षसी विश्वासघाताने तिचा बळी घेतला". स्नेहाच्या मनात स्वगत सुरू होतं. त्यासरशी तिने जोर करून खाडकन् डोळे उघडले. अन् पाहते तो काय, ती किमयाच होती. आनंदातिशयाने तिने तिला मिठीच मारली. "कसं शक्य आहे हे? अगं, मी तर तुला....' किमयाने तिचं बोलणं तिथेच तोडलंं अन् म्हंटलं, "स्नेहा बाळा, बास्स् ! काहीही बोलू नकोस पुढे. आणि अगोदर शांत हो. सगळं माहीत आहे मला. आपण बोलू सावकाश. तू आधी आराम कर पाहू. खूप थकली आहेस बाळा तू. मानसिक ही अन् शारिरिक ही. झोपून रहा. मग आपण बोलू सविस्तर.". पण आता स्नेहाचा संयम सुटला होता. "नाही नाही, तू आधी सांगच. हे सारं कसं घडलं? मी इथे इस्पितळात कशी आले? कुणी आणलं, का वाचवलं मला, मरू द्यायचं होतं. मी केलेल्या अगणित पापांचं तेच एक प्रायश्चित्त होतं.". 

किमया तरी शांतपणे म्हणाली, "हे बघ बाळा, तू तुझ्या मित्राला मला संपवण्याची सुपारी द्यायला सांगितलस ना, त्याने त्या क्षणी मला भेटून तुझा प्लॅन माझ्या कानावर घातला होता. कारण त्याला आपले संबंध माहीत नव्हते असे नाही पण तो तुला काही बोलला नाही. त्याची सद्सद्विवेकबुद्घी जागी झाली अन् त्याने तुझ्या योजनेबाबत मला भेटून सर्व सांगितलं. मग आम्ही असं ठरवलं की काही दिवस इथेच जवळच एका घरात मी अज्ञातवासात राहून तुझ्यावर नजर ठेवायची अन् त्याने मला रिपोर्टींग करायचं. आपल्या घरात छुपे कॅमेरे त्यानेच बसवून दिले अन् तिथून मी तुझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं बाळा! काय दैवी योगायोग असतात बघ किंवा ईश्वरी संकेत म्हण हवं तर ! तू जेव्हा झोपेच्या गोळ्या घेतल्यास ना तेव्हाच मी नेमकी कॅमेऱ्याची फुटेज् चेक करत होते. त्याक्षणी असं वाटलं सारं संपलं, जगबुडीचं जणु काही! काळजाचा ठोकाच चुकला. पण एका क्षणात स्वतः ला सावरलं, कारण ती वेळ कोसळायची नव्हती तर स्वतः ला सावरुन तुझा जीव वाचवायची होती. लगेच तुझ्या मित्राला फोन करून अँब्यूलन्स मागवली अन् धावपळ करुन तुला हाॅस्पीटलमधे भरती केलं." पण खरं सांगू का, माझा अजूनही तुझ्यावर तीळभर ही राग नाही हं! कारण तू माझी पोटची पोर नसलीस तरी मला तुझी हरेक मनोवस्था माहीत आहे अन् तुझ्यासोबत मी ही ती पुरेपुर जगले आहे". स्नेहाने एक मोठा सुस्कारा सोडला अन् म्हणाली, "माझे असुया, मत्सर, एवढ्या पराकोटीला गेले की मी हे ही विसरले की आपणही एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या मुळावर उठलो. स्त्रीच्या हृदयातला ममत्वाचा जिवंत, संतत निर्झर ही तर स्त्रीत्वाची पहिली ओळख अन् पराकोटीची सहनशीलता, हा सगळ्यात दुर्मीळ गुण म्हणजे तिचा अलंकार. तू या दोन्हीला जागलीस अन् त्यातच जगलीसही. तुझी कूस मला अतीव प्रेमाने जवळ घ्यायला किती तडफडली असेल, तुझी पंचेंद्रिये "आई" ही हाक ऐकायला किती तरसली असतील आणि मी तुला काय दिलं पराकोटीचा मत्सर, द्वेश फक्त. आई होणे यासारखे मोठं सुख नाही अन् प्रत्येक स्त्रीचा तो मुलभूत अधिकार आहे. तोच हक्क मी तुझ्या पासून हिरावून घेतला अन् मातृत्वाच्या सुखापासून तुला वंचित ठेवलं; इतकी वर्षेे तडफडत ठेवलं. तुझी काहीही चूक नसताना तुला नाकारलं. वास्तविक एका पोटच्या मुलाचंही कुणी करणार नाही, इतकं तू माझं केलस अन् तेही स्वतः पोरकेपणाच्या यातनांमधून गेलेली असताना देखील. आजच्या घडीला तुझ्या इतकं कुणीच मला समजून घेऊ शकत नाही. माझ्या रंध्रारंध्राची, माझ्या स्वभावाची इतकी अचूक पारख जगात तुझ्याशिवाय कुणालाही नाही आणि असं असताना देखील तू मनात जराही किल्मिश न बाळगता मला सतत उराशी कवटाळून ठेवलस अन् मी हे काय केलं? देवापेक्षाही श्रेष्ठ अशा तुला माझ्या अस्तित्वापासून लांब ठेवलं. शी......मला माझीच लाज वाटत आहे की; या माझ्या देवाला मी संपवायला, माझ्या जगातून नाहीसं करायला निघाले होते. किती कृतघ्न, विश्वासघातकी, पाताळयंत्री मुलगी आहे मी! खरं सांगू, मलाच आता जगायचा काहीही अधिकार नाही. मी निघून जाईन तुझ्या आयुष्यातून दूर कुठेतरी. "जमल्यास या पापी जिवाला माफ कर", असं म्हणायचीही माझी लायकी नाही. फक्त जायच्या आधी आई, मला एकदा तुझ्या कुशीत झोपायचय. तुझ्या मायेची उबदार कूस अनुभवायची आहे. खूप खूप लाड करून घ्यायचे आहेत. तुझी अंगाई ऐकत थोडा वेळ झोपायचय गं! तुझ्या ह्या प्रेमळ ओंजळीचे झुले झुलायचे आहेत अन् या लुसलुशीत हातांनी गोड गोड घास खायचे आहेत. फक्त थोडाच वेळ हे दैवी सूख अनुभवू दे. मग मी निघून जाईन तुझ्या आयुष्यातून. माझे हे काळे पापी तोंड कधीही दाखवणार नाही बघ!"


बोलून बोलून दु:खातिरेकाने स्नेहाला धाप लागली आणि तिने किमयेच्या खांद्यावर आपलं डोकच टाकलं. किमया स्तब्धच झाली होती. राक्षसी वृत्तीच्या माणसातलं माणूसपण जागृत होण्याच्या ह्या अवस्थेकडे, ह्या मुर्तीमंत उदाहरणाकडे किमया एकटक पाहत होती. थोड्या वेळाने स्वतः ला सावरुन ती स्नेहाला म्हणाली "शांत हो आता स्नेहा, एकदम शांत! आता एक शब्दही बोलू नकोस. एका खंबीर, संयमी व्यक्तीमत्वाची तू सुंदर, हुशार मुलगी आहेस. असं लगेच कोसळून गेलेलं मलाही आवडणार नाही अन् तुझ्या बाबांनाही त्याचा खूप त्रास होईल बर! सावर स्वतः ला. आणि तुला सांगू, तू जेव्हा जेव्हा माझ्याशी वाईट वागत होतीस ना, तेव्हा तेव्हा मी तुला माफ केलं होतं, कारण तुझे ते अल्लड वय होतं. अत्यंत प्रिय माणसांच्या, तेही आईबाबांच्या अकाली निधनाने निर्माण झालेल्या तुझ्या आयुष्यातल्या पोकळीने तुला अविचारांच्या दलदलीत ढकलले अन् तूही रुतत गेलीस. त्यातुन बाहेर येण्यासाठी मी मदतीचा हातही पुढे केला. पण तू त्यालाही झिडकारत गेलीस अन् अजूनच खोल खोल रुतलीस. पण तुझं दैव बलवत्तर अन् माझंही नशीब थोर, म्हणून जेव्हा तुझ्या नाकातोंडात पाणी जायला लागलं तेव्हा तुला उपरती झाली आणि देवाने तुला वेळेत वर काढलं."


मनाच्या आभाळावर साचलेले ; रागाने, द्वेशाने, तिरस्काराने काठोकाठ भरलेले ढग ; अकाली आलेल्या त्या वादळाने उतू जाऊन रिकामे झाले होते. अन् सारं कसं स्वच्छ आणि निरभ्र झालं होतं.


"अगं वेडे, तू मला सोडून जात नव्हतीस. स्वतः सोबत अजून एका जिवाला परकं करून जात होतीस. अगं, ज्या उत्कट मायेची अपेक्षा आत्ता तू माझ्याकडे करत आहेस ना, तिच्यासाठी मीही माझं निरागस बालपण अन् किशोरवयही खर्ची घातलय. पण मी शेवटपर्यंत अनाथच राहीले गं! आधी एकटी होते म्हणून; नंतर तू जवळ असूनही मला दूर लोटलस म्हणून आणि आता इतकी जवळ आलेली असूनही मला सोडून जात आहेस म्हणून. सांग आता, मी आता "माझी छकुली" अशी हाक कुणाला मारू? तुझ्या रुपात मला स्वर्ग भेटलाय गं! आता परत सोडून जाऊन मला परतंत्र करू नकोस. आत्तापर्यंत काळाचे अपरिमित घाव मी खंबीरपणे सहन केले पण आता ती ताकद नाहीये गं माझ्यात! तू माझ्या जगण्याचा एकमेव आधार आहेस. तू नसलीस तर मी कोसळून जाईन बघ. आपण दोघीही एकमेकांचे बळकट आधारस्थंभ बनून जगू. मला माझ्या छकुलीला खूप मोठं, कर्तबगार झालेलं पहायचय. खूप शिकून तुझ्या बाबांचा कारभार स्वतः हातात घेऊन त्याला सांभाळायचय. त्याची अजून भरभराट झालेली पहायची आहे. पण तू आकाशात उडत असताना तुझे पाय मात्र कायम जमिनीवरच राहूदेत ह! ए बाळा, एकदा तरी मला "आई" म्हणून हाक मार ना गं, प्लीज. प्राण कंठाशी आले आहेत गं तुझ्या तोंडून ही हाक ऐकायला, खरच!"


स्नेहाने "आई" असे म्हणून किमयेला कडकडून मिठी मारली. इतक्या वर्षांचा संताप, मत्सर, आकस, द्वेश यांचा कचरा, जो डोळ्यांत खूपत होता, तो आता वाहून जाऊन आईविषयीचा अपार स्नेह जन्माला आला होता. पण खरी किमया त्या परमदयाळू परमेश्वराने केली होती. किमयेतील दैवत्वाची प्रचिती त्याने वेळीच स्नेहाला आणून दिली होती अन् या मायलेकराच्या पवित्र नात्याची अतूट नाळ परत एकदा जोडून दिली होती.


'त्या' चपलांगी नर्तकीच्या धमाकेदार परफॉर्मन्सनंतर निवेदकाने एक अत्रंगी विनोद सांगून प्रेक्षकांना खळखळून हसविले. स्टेजच्या मध्यभागी लावलेल्या भल्यामोठ्या स्क्रीनवर "सर्वोत्कृष्ट पटकथा आणि संवाद" कॅटेगरीमधील नामांकनं झळकू लागली. एका प्रथितयश नामवंताने विजेत्या नावाची घोषणा केली अन टाळ्यांच्या गजरात बक्षिस स्वीकारले गेले. आता बक्षीस मिळालेली व्यक्ती आपले मनोगत व्यक्त करू लागली. "सर्वप्रथम सगळ्यांचे आभार, मात्र माझा इथपर्यंतचा प्रवास जिच्या अपार माया आणि कष्टांमुळे सुकर झाला तिचे पांग शंभर जन्मानंतरही फिटणार नाहीत." बोलता बोलता तिचा आवाज हळवा झाला होता. "असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो; पण मी त्यापुढे जाऊन म्हणेन की यशस्वी स्री मागेही स्रीचाच हात असतो. आज मी जी काही आहे ती माझ्या आईमुळेच". एका 'फिल्मफेअर' ची बाहुली उंचावून तिने दुसर्‍या हाताने प्रेक्षकांपुढे व्हीआयपी सीटवर बसलेल्या आईकडे निर्देश केला. लाईट्सचा एक झोत सर्रकन मारला गेला. स्टेजजवळचे फोटोग्राफर सरसावले. फ्लॅशच्या लखलखाटात, पांढरी तलम शाल पांघरलेली 'किमया' न्हाऊन निघत होती.


Rate this content
Log in

More marathi story from प्रितफुल प्रित