Mandar Shinde

Others

2.0  

Mandar Shinde

Others

खारीचा वाटा

खारीचा वाटा

2 mins
1.1K


रामाच्या मंदीरात प्रवचन सुरू होतं. कीर्तनकार बुवा सत्तरी उलटलेले. मोठ्या आत्मीयतेनं आणि रसाळ वाणीत श्रीरामाची कथा सांगत होते. प्रवचन-सप्‍ताहातला आज पाचवा दिवस होता. प्रवचन ऐकायला रोज लोक गर्दी करत होते. मन लावून प्रवचन ऐकायचे, माना डोलवायचे, आणि 'जय श्रीराम' म्हणत जाताना दक्षिणा-पेटीत पैसे टाकायचे. कुणी पन्‍नासची नोट टाकायचे, तर कुणी शंभराची. कुणी कीर्तनकार बुवांसाठी फुलांचा मोठ्ठा हारही घेऊन यायचे. मंदीराशेजारी राहणारी एक म्हातारी प्रवचनाला रोज येत होती. दिवसभर चार घरची कामं करून स्वतःचं पोट भरायची. घर जवळच असल्यानं प्रवचनाला सगळ्यात आधी हजर असायची. येताना घरातून एक तांब्या भरून पाणी आणायची आणि कीर्तनकार बुवांच्या समोर ठेवायची. मग कीर्तन करता-करता बुवा त्यातलं पाणी प्यायचे. असं रोज चाललं होतं.


आजच्या प्रवचनात बुवांनी श्रीरामाला सेतू बांधण्यात मदत करणार्‍या खारीची गोष्ट घेतली होती. लोक तल्लीन होऊन ऐकत होते. म्हातारीच्या मनात मात्र आज चलबिचल होती. प्रवचन संपताना लोक रोज दक्षिणा-पेटीत पैसे टाकतात हे ती बघत होती. आपण गरीब आहोत, आपण दक्षिणा टाकू शकत नाही, याचं तिला वाईट वाटत होतं. बुवांसाठी इतरांसारखा हार आणू शकत नाही, याची तिला लाजही वाटत होती. प्रभू श्रीरामाची सेवा करण्यात आपण कमी पडतोय, याचं तिला खूप दुःख होत होतं. याच विचारात मग्न असल्यानं आज तिचं कथेकडंही लक्ष नव्हतं. आजूबाजूचे सगळे लोक दानाचं पुण्य कमावून समाधानी दिसतायत, आपण मात्र कमनशीबी, असं तिला वाटत होतं. इतक्यात...


कथा सांगता-सांगता अचानक कीर्तनकार बुवांना मोठ्ठा ठसका लागला. समोर बसलेल्या श्रोत्यांमध्ये चुळबूळ झाली. तीन-चार जण उठून बुवांकडं धावले. म्हातारीलाही काहीतरी करावंसं वाटलं. पण ती जागेवरून उठेपर्यंत बुवांनी शेजारी ठेवलेला पाण्याचा तांब्या उचलला आणि पाण्याचे तीन-चार घोट घेतले. ठसका थांबला. बुवांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य तरळलं. श्रोत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आणि सगळ्यात मागं बसलेली म्हातारी पदर तोंडाला लावून खुदकन्‌ हसली. तिनं भरून ठेवलेल्या पाण्याच्या तांब्याची किंमत या प्रसंगी लाखमोलाची होती. हीच तिची सेवा होती. हीच तिची खरी दक्षिणा होती. म्हातारीच्या चेहर्‍यावर समाधान पसरलं. आणि कीर्तनकार बुवा 'खारीच्या वाट्या'ची गोष्ट पुढं सांगू लागले...


Rate this content
Log in