“जी निर्माण करते जिव्हाळा, तीच खरी शाळा ” शाळेची धास्ती नसावी
“जी निर्माण करते जिव्हाळा, तीच खरी शाळा ” शाळेची धास्ती नसावी
शाळा म्हणजे विद्येचे माहेरघर. या पवित्र मंदिरात दर्शन घडते ते अगदी निष्पाप, निरागस अशा चिमुकल्या बालगोपाळाचे. अशा या पवित्र मंदिरात कार्य करण्याची संधी मिळाली याचा मनापासून आनंद आहे. घरातून मुल जेंव्हा शाळेत येते तेंव्हा ते आई-वडिलांच्या धास्तीने किंवा जबरदस्तीने आलेले नसावे. तसे विद्यार्थी केवळ शरीराने आलेले असतात त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. त्यावेळी त्यांना शाळा एक कोंडवाडा असल्यागत भासते. असे होऊ नये यासाठी मी सुरुवातीपासूनच माझ्या शाळेचे बब्रीद ठरवलेले आहे. “जी निर्माण करते जिव्हाळा, तीच खरी शाळा”. विद्यार्थ्यांमध्ये आवडीच्या खेळाचे शैक्षणिक खेळात रूपांतर केल्यामुळे आणि छडीला त्यांच्या नजरेसमोरून दूर केल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक हे मैत्रीपूर्ण नाते दृढ होण्यास मदत झाली. सन 2014 चा एक अनुभव त्याची आठवण काढतात आजही माझ्या अंगावर शहारे उभे राहतात.
हिमायतनगर येथे 2013 मध्ये बदलीने रुजू झालो, तेव्हा माझ्या वर्गातील एक विद्यार्थी अनिल प्रकाश शेळके जो फक्त पटावर होता, शाळेत जाऊन मला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला तरीपण त्याची ओळख झाली नव्हती. पालकांशी संपर्क साधला. मुलांना बोललो, परंतु काहीच फरक पडला नाही. बरेचदा मी ज्या रस्त्याने येतोय हे त्याला कळताच तो घरात स्वतःला कोंडून घ्यायचा विशेष म्हणजे त्याचे घर अगदी शाळेपासून हाकेच्या अंतरावर. अक्षरशः दोन महिने मी त्याला शाळेत आणण्याचा प्रयत्न करत राहिलो परंतु त्या पठ्ठ्याने मला दाद दिलीच नाही. काहीवेळा जबरदस्तीने मुलांना पाठवून त्याला आणण्याचा प्रयत्न केला तोही अयशस्वी ठरला. पालकांनासुद्धा विनंती केली, ते हताश होऊन म्हणायचे, “जाऊ द्या सर, तो येत नाही. त्याच्या मागे लागू नका.” काही दिवस शांत बसलो. एके दिवशी मनाने पक्के ठरवले. आज त्याला शाळेत घेऊन जायचेच. आई-बाबांसोबत तो बाहेरच भेटला. तो बेसावध असल्याने त्याच्या हाताला धरले आणि शाळेत घेऊन जायला निघालो तितक्यात त्याने माझ्या हाताला हिसका दिला आणि जोरात पळाला तो थेट सार्वजनिक विहिरीकडेच.. आता मी जीव देतो... असा आकात करतच. मला तर घामच फुटला. कारण त्या घरचा तो एकुलता एक मुलगा होता लागलीच गल्लीतील काही लोकांना इशारा केला त्यांनी ताबडतोब त्याला पकडले आणि माझा जीव भांड्यात पडला.
काही दिवस लोटले. त्याला शाळेत आणण्याची घालमेल मनात चालुच होती. कोणता नेमका उपाय करावा समजत नव्हते. एके दिवशी शाळेत खेळ चालू असताना माझे लक्ष अनिलकडे गेले. घरासमोर उभे टाकून खूप जीव लावून तो खेळ पाहत होता. अखेर मला वाट सापडली. दुसऱ्या दिवशी शाळेतील मुलांना घेवून त्याच्या दारात जाऊन खेळायला सुरुवात केली. असे चार-पाच दिवस केले नंतरचे काही दिवस त्याच्या घरा पुढे असलेल्या मोठ्या लिंबाच्या झाडाखाली डब्बा खाण्यास सुरुवात केली आणि हळूहळू अनिल शाळेकडे आकर्षिला जाऊ लागला हे सहज लक्षात आले. काही दिवस हा प्रयोग असाच चालू ठेवला. नंतर दोन दिवस मुद्दामच उपक्रम बंद केला. मला हवा तो बदल मिळायला सुरुवात झाली. अनिलची पाऊले शाळेच्या दारापर्यंत स्वतःहून चालत आली. खेळाच्या माध्यमातून त्याला आपलेसे केले. एक दोन गोष्टी बोलून पळणारा काही दिवसातच शाळेत रमणारा विद्यार्थी झाला, बोलायला लागला. आई वडील सुद्धा खूप आश्चर्यचकित झाले. नंतर हळूच तो शाळेत येण्यास का घाबरतो? याचे कारण त्याच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि लक्षात आले. आमच्याच कुणीतरी बांधवांनी त्याला खूप मारले होते आणि त्याची धसकी त्याला भरली होती. शाळेत आला रमला प्रत्येक उपक्रमात सहभाग घेणारा शाळेचा नियमित विद्यार्थी बनला. खूप समाधान वाटले. त्याची आई शेतात कामाला जायची, आईने आणलेली पालेभाजी मुद्दाम मला रूमवर आणून द्यायचा. सर्वांच्या अगोदर शाळेत येऊन शाळेचे दार उघडणारा एक चांगला विद्यार्थी तो बनला. आजही तो प्रसंग आठवला की अंगावर रोमांच उभे राहतात आणि यशाचे समाधानही वाटते.
