Santosh Kuigade

Others

4  

Santosh Kuigade

Others

जेव्हा टीव्ही आयात होतो

जेव्हा टीव्ही आयात होतो

19 mins
16.4K


सौरभने इंजिनिअरींग पूर्ण केले आणि छोटी कंपनी, छोटा पगार असे करत करत अनुभव पाठीशी गोळा केला. त्याने एकच निश्चय केला होता की सुरुवातीच्या काळात प्रथम प्राधान्य अनुभवाला आणि मग नंतर किती पगार मिळतोय या गोष्टीला. एकदा का पाठीशी अनुभव झाला की मग सांगाल तेवढा पगार मिळू शकतो अशी त्याची समजूत. बर्याच अंशी ते खरंही होतं म्हणा. आता सौरभ नोकरीत स्थिरस्थावर झाला होता. लग्न होऊन एक छानशी गोंडस मुलगीही झाली होती त्याला. सौरभबरोबर इंजिनिअरींगला सोबत असणारे त्याचे मित्रही आता मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर काम करत होते, काहीजणांनी स्वतःचा उद्योगधंदा सुरु करुन त्यात नावही कमावले होते. काहीजण चांगल्या कंपनीत, उच्चपदावर काम करत होते. काहीजण परदेशात जाऊन स्थिरावले होते. १९९० च्या दशकाबरोबर तुलना केली तर नोकरीनिमित्त खाजगी कंपनीतून परदेशी जाणार्या अभियंत्यांची संख्या देखील वाढू लागली होती. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते या सर्वात आघाडीवर होते. सौरभबरोबर महाविद्यालयीन दशेपासून एकत्र असलेले सर्व वर्गमित्र वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या देशात स्थिरस्थावर झाले असले तरी त्यांची एकमेकांद्दलची मैत्री, आपुलकी व ओढ अबाधित होती.

साधारणपणे डिसेंबर २०१२ मधील किंवा जानेवारी २०१३ मधील एखाद्या दिवसाची सुरुवात असावी. सकाळी साडेसात वाजले होते. नेहमीप्रमाणे सौरभ वर्तमानपत्रातील मुख्य बातम्यांवरुन नजर फिरवत होता. वर्तमानपत्र वाचण्याची प्रत्येकाची एक विशिष्ट शैली असते, एक विशिष्ट पद्धत असते. कुणी वर्तमानपत्र हातात पडताच थेट राशीभविष्य वाचतात. सौरभच्या मनात विचार आला की संपादकांकडे बारा-पंधरा प्रकारची रोजच्या भविष्याबद्दलची भाकीतं ठरवून ठेवलेली असावीत आणि तीच भाकीतं रोज वेगवेगळ्या राशींसाठी आलटून-पालटून छापत असावेत. तरीदेखील रोजच्यारोज भविष्य वाचणार्यांची उत्सुकता थोडीसुद्धा कमी होत नाही. कुणी वर्तमानपत्र हातात पडताच हवामान अंदाज बघतं, कुणी सोन्याच्या दरात झालेली चढ-उतार प्रथम पाहतं. जे कुणी अंकशास्त्रावर (Numerology) विश्वास ठेवतात ते त्या दिवसाचा मुंबई किंवा कल्याण शुभांक काय आला आहे हे प्रथम पाहत असावेत. काही सूज्ञ मंडळी थेट अग्रलेखालाच हात घालतात. सौरभची पद्धत म्हणाल तर तो प्रथम मुख्य पानावरुन नजर फिरवायचा आणि मग क्रीडा क्षेत्रातील बातम्यांकडे मोर्चा वळवायचा. असाच तो वर्तमानपत्र चाळत असताना त्याला एका मित्राचा फोन आला. हा मित्र तसा त्याला क्वचितच आणि काही कामानिमित्तच फोन करायचा. फोन उचलल्यावर लगेच पलीकडून आवाज आला, " अरे त्यो अमर्या कसा काय अमेरिकेला गेला? खरोखरच गेला काय? त्याचा पेपरमध्ये फोटो आलाय." सौरभच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, वर्तमानपत्रवाल्यांना शेवटी अमर अमेरिकेला गेल्याची बातमी कळाली होती तर. लगेच सौरभने वर्तमानपत्राची सर्व पाने चाळून बघितली तर आतील एका पानावर त्याचा शालेय व महाविद्यालायीन दशेतील मित्र अमर आणि त्याच्या बायकोचा म्हणजेच सौरभच्या वहिनीचा फोटो होता. जाहिरातवजा बातमी होती ती. शीर्षक एकदमच दिलखेचक होते, "सुट्टी नाही जीवाला, अमरभाऊ चालले अमेरिकेला!" खालच्या बाजूस शुभेच्छूकांची नावे होती. अमरच्या अमेरिका प्रस्थानची बातमी पेपरमध्ये छापून आल्यामुळे त्या दिवशी शहरात वर्तमानपत्रांचा रेकॉर्डब्रेक खप झाला. अमर मूळचा कोल्हापूरचा, तिथे तर वर्तमानपत्राच्या संपादकांनी सर्वच्या सर्व अंक विकले गेल्यामुळे खुश होऊन पूर्ण स्टाफला पार्टी देऊन टाकली. अमरभोवती प्रसिद्धीचं फार मोठं वलय! याच्याबाबतीत काही गोष्टी लपवायच्या म्हटल्या तरी त्या लपत नाहीत. त्याला ओळखणारा वर्गच एवढा मोठा की अमरने नुसतं कपाळावर बोटे फिरवत विचार करतानाची पोझ दिली तरी त्याची बातमी होऊन जाते. त्याच्या तोंडातून बाहेर पडलेल्या 'सुट्टी नाही' या डायलॉगवर लोक अक्षरशः तुटून पडतात. सौरभचा शालेय मित्र अमर नोकरीनिमित्त अमेरिकेला दीर्घकाळासाठी जाणार होता. जसजसे लोक ती बातमी वाचू लागले तसतसे बातमीची सत्यता पडताळण्यासाठी काहीजणांचे सौरभला फोन येऊ लागले. कुणालाही खरी वाटणार नाही अशीच ती बातमी होती. प्रखर देशप्रेम, जाज्वल्य देशभक्ती, मातृभूमीबद्दल विलक्षण अभिमान हे सर्व ज्याच्यामध्ये भिनलंय तो कसा काय परदेशाच्या सेवेसाठी देशाच्या सीमा ओलांडून जाऊ शकतो? सौरभलादेखील सुरुवातीला हा प्रश्न पडला होता. आपल्या शिक्षणाचा उपयोग करुन अमर आपल्या जन्मभूमीच्या म्हणजेच तालुक्याच्या विकासासाठी झटेल किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन थेट निवडणुकीचा शड्डू ठोकेल असेच सौरभला वाटायचे. त्याला अगदी तशी स्वप्नं देखील पडायचीत. आमदारकीच्या निवडणुकीत स्टेजवर उभं राहून रजनीकांत स्टाईलने हातवारे करत मतदारांना भावनिक आवाहन करणारा अमर किंवा घराजवळील देशमुख हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना वेळेच्या कुशल व्यवस्थापनाबद्दल व्याख्यान देणारा मॕनेजमेंट गुरु अमर ....अशा अमरच्या वेगवेगळ्या छबी सौरभच्या स्वप्नात यायच्या. पण या सगळ्या स्वप्नांना मूठमाती देत अमरने अमेरिकेला प्रस्थान केले.

कर्मचार्यांच्या परदेश दौर्यासाठी परकीय चलनाची व्यवस्था करणारा खाजगी कंपनीमधील कारकून, विमानतिकीट काढून देणारा विमान कंपनीचा कारकून, अमेरिकन टुरीस्टर कंपनीच्या मोठ्ठाल्या बॕग्ज् विकणारा दुकानदार, लोकरीचे कपडे आणि स्वेटर विक्रेता, फॉर्मल ड्रेस विकणारे दुकानदार, फॉर्मल शूजचे विक्रेते, मुंबई विमानतळावर प्रवाशांना ने-आण करणारा ड्रायव्हर, विमानतळावरील प्रवेशद्वारावर सुरक्षेसाठी तैनात असलेला सुरक्षारक्षक, विमानकंपन्यांच्या काउंटरवर प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात केलेल्या मदतनीस, सिक्युरिटी चेक-इन करणारा पोलिस, इमिग्रेशन अॉफीसर, विमानाचा पायलट या सर्वांना कळून चुकले होते की अमरभाऊ अमेरिकेला चालल्यामुळे अमेरिकेचं काही खरं नाही.

नाही नाही म्हणत एकदाचा अमर अमेरिकेत पोचला. पण त्यामुळे समस्त जिल्ह्यावर मरगळ पसरली. उत्साहाचा झरा आता भारतात आटला होता आणि तोच झरा आता अमेरिकेतील पोर्टलँड नगरीत स्वयंभू प्रकटला होता. अमरभाऊ तिकडे वहिनींसोबत स्थिरस्थावर झाल्यावर त्याचा दर आठवड्याला शनिवार किंवा रविवारच्या दिवशी न चुकता सौरभला फोन यायचा. अमर भारतातून निघून गेल्यावर जी पोकळी निर्माण झाली होती, ती काही अंशी या फोनवरच्या बोलण्यामुळे भरुन निघाली होती. अमरभाउच्या निमित्ताने सौरभला घरबसल्या अमेरिकेतील गमती-जमती ऐकायला मिळत होत्या. खुद्द अमेरिकन लोकांनी देखील त्यांच्या उभ्या आयुष्यात एवढा आत्मविश्वासाने ठासून भरलेला माणूस बघितला नसेल. त्यांनी आपल्या विविध शब्दकोशात आत्मविश्वासासाठी अमर हा समानार्थी शब्द लागू केला असेल असे सौरभला वाटू लागले. अमरभाऊच्या आत्मविश्वासामुळेच अमेरिकन लोक शाळेत शिकलेलं इंग्रजी व्याकरण बरोबर की चुकीचे या विवंचनेत पडले असतील असं सौरभला वाटू लागले. अमर तसा दिसायला अशोक सराफांसारखा! अशोक सराफांची "व्याख्या, विख्खी, वुख्खु" स्टाईल डायलॕगबाजी आणि रजनीकांतची दोन्ही हात वेगवेगळ्या दिशेत वेगाने फिरवून देहबोलीतून आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचे अमरचे कसब पाहून अमेरिकन लोकांनी तोंडात बोट घालून "ओह् माय गॉड" म्हणायला सुरु केले असेल असे सौरभला वाटू लागले.

आपण काही व्यक्तींबद्दल एक तर्क लावतो की ती व्यक्ती एका प्रसंगाला विशिष्ट अशा प्रकारे सामोरी जाईल. अमरभाऊ बद्दल पण सौरभने एक तर्क लावला होता. अमेरिका काय अमरभाऊला मानवायची नाही आणि "स्वदेस" सिनेमातील मोहन भार्गवचे पात्र साकारलेल्या शाहरुख खानप्रमाणे तो आपल्या मातृभूमीला परतेल. नदीच्या पाण्याचा रस्सा मिळत नाही या सबबीखाली तो भारताला परतेल. पण कुठचं काय? अमरभाऊला आता अमेरिकेतील वितळलेल्या बर्फाच्या पाण्यापासून बनवलेल्या रश्याची चटक लागली होती. रंकाळ्याच्या कट्ट्यावर बसून प्रियदर्शनीचा वडा पाव खाणारा अमर आता वीकेंड्सला पोर्टलँडमध्ये मॕक्डोनाल्ड्सचे बर्गरवर बर्गर रिचवू लागला. पंचायत समित्या-जिल्हा परिषदच्या निवडणुकीपेक्षा अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष आणि सिनेट यांच्या निवडणुकीत तो जास्त रस घेऊ लागला. हिवाळा-पावसाळ्यात स्वेटर वा रेनकोट न वापरणारा अमर आता लेदरचे जॕकेट्स वापरु लागला होता. फावल्या वेळेत भरत जाधव, महेशबाबू यांचे सिनेमे बघणारा अमर आता आॕस्कर सोहळे आवडीने बघू लागला. " कोंबडी पळाली, तंगडी धरुन लंगडी घालाय लागली" वर थिरकणारा अमर आता एनरिक इग्लेसियसच्या ओळी गुणगुणू लागला. सौरभने विचार केला.... असो....बदल हा झालाच पाहिजे आणि त्यामुळेच आयुष्यात नवचैतन्य येते, नवी उभारी लाभते. अमरभाऊ भारतातून गेल्यापासून साधारण वर्ष झाले असेल. त्यांचे चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी आसुसले होते. सौरभही त्यातीलच एक. पण अमरभाऊ अमेरिकेत एवढे रममाण झाले होते की त्यांनी आपली भारत भेट एक वर्ष पुढे ढकलली.

वर्षभर सौरभला फोनवरुन अमरची खुशाली कळायची. अमरच्या अॉफीसमधील अमेरिकन सहकारीदेखील "सुट्टी नाही" या डायलॉगवर टाळ्या पिटू लागले. काहीजण तर काम करताना अडचण आली आणि त्यावर काही सुचेनासं झालं की अमरभाऊप्रमाणे कपाळाला खाजवून अडचणींवर उत्तर शोधू लागले. आपल्याकडे शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी जसा तर्खडकर इंग्रजी कोर्स शिकवला जातो तसा अमेरिकन लोक आपले इंग्रजीचे व्याकरण पक्के होण्यासाठी अमरच्या इंग्रजीचे अनुकरण करु लागले. थोडक्यात काय तर अमरमुळे अमेरिकेत अच्छे दिन आले. शेवटी साधारणपणे दोन वर्षांचे वास्तव्य झाल्यानंतर अमरभाऊंनी भारतात काय सुरु आहे हे पाहण्यासाठी एक महिन्याच्या सुट्टीवर भारतात जायचे ठरवले. जसजशी ही बातमी लोकांपर्यंत पोचू लागली तसतशी लोकांमध्ये अमरला भेटण्यासाठीची उत्सुकता वाढू लागली. एमिरात एअरलाईन्सच्या हवाई सुंदरींच्या ताफ्यात खलबतं आखली जाऊ लागलीत. प्रत्येक हवाईसुंदरी अमरची प्रवासादरम्यान सेवा करण्यासाठी आसुसली. अमरच्या सेवेसाठी मीच हजर असणार अशी प्रतिज्ञा प्रत्येक हवाईसुंदरी करु लागली. अमरचा चाहता वर्ग लक्षात घेता अमर अमेरिकेहून येताना बर्याच इंपोर्टेड वस्तू घेऊन येणार अशी टीप सीमाशुल्क विभागाला मिळाल्यामुळे तेही दक्ष झाले. ६ डिसेंबरच्या पहाटे म्हणजेच शनिवारी साधारण सव्वादोन वाजता अमरला घेऊन येणारे विमान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार असल्यामुळे मुंबई पोलीस काही प्रमाणात धास्तावले. डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनामुळे मुंबईत येणारे त्यांचे अनुयायी आणि अमरला रिसीव्ह करण्यासाठी मुंबई विमानतळावर येणारे त्याचे चाहते यांची प्रचंड गर्दी लक्षात घेता पोलिसांना कडेकोट बंदोबस्त ठेवावा लागणार होता. अमरच्या अमेरिकेला जातानाच्या जाहिरातीमुळे ज्या वर्तमानपत्राचा खप अचानक वाढला होता, त्या वर्तमानपत्राचे वार्ताहर व छायाचित्रकार पण अमरची छबी टिपण्यासाठी आले होते.

एवढं सगळं अमरमय वातावरण झालं असताना सौरभ तरी कसा मागे राहणार?त्याने अमरच्या नकळत त्याच्याकडून त्याच्या प्रवासाचा तपशील, विमान उड्डाणाच्या वेळा वगैरे माहिती काढून घेतली. पुण्यात-मुंबईत-कोल्हापूरात असलेल्या अमरच्या चाहत्यांशी संपर्क साधून त्यांना मुंबईला अमरला रिसीव्ह करायला येण्याची विनंती केली. या चाहत्यांसमवेत अमरला विमानतळावर भेटायचे व अमरला एक सुखद धक्का द्यायचा अशी योजना सौरभने आखली. अमर हा जवळपास सर्व मित्रांच्या गळ्यातील ताईत असल्यामुळे सगळेच त्याला रिसीव्ह करण्यासाठी उत्सुक होते. तरी पण सर्वांना पुण्यातून शुक्रवारच्या रात्री मुंबई विमानतळावर नेणे हे जिकीरीचे काम होते. कोल्हापूरातून एक सचिन नावाचा मित्र त्याची नवी कोरी, पांढरी शुभ्र डस्टर कार घेऊन पुण्यात आला. अमरला भेटण्याबरोबरच त्याला नव्या गाडीतून मित्रांसमवेत लाँग ड्राईव्हचा अनुभव घ्यायचा होता. दुसरा एक मुंबईमध्ये स्थाईक असलेला, अमरपेक्षा वयाने लहान पण नात्याने अमरचा मामा असलेला संदीप पण आपल्या भाच्याला भेटण्यासाठी आसुसला होता. पाचजण पुण्यातून अमरभाऊंच्या भेटीसाठी उत्सुक होते....खुद्द सौरभ, रवी, सचिन (चांग), पिंटू व गौतम. सर्वांनी शुक्रवारी रात्री पुण्यातून प्रस्थान केले तेव्हा हे प्रस्थान पंढरीच्या वारीप्रमाणे वाटू लागले. ज्याप्रमाणे वारीतील प्रत्येकाला विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेली असती अगदी तशीच आस या पाचणांना अमरभाऊच्या भेटीची लागली होती. ज्याप्रमाणे वारीमध्ये हौशे-नवशे-गवशे लोक असतात अगदी तशाच प्रवृत्तीचे लोक या ताफ्यात होते. विठ्ठलाच्या भेटीची हौस भागवणारे हौशे लोक, वारी म्हणजे नेमकं काय असतं याचा आयुष्यात एकदा तरी अनुभव घेणारे नवखे लोक आणि वारीदरम्यान फुकट वस्तू, भरपेट खायला मिळते म्हणून सहभागी होणारे गवसे लोक! सर्व प्रकारच्या लोकांचे अंतिम ध्येय हे विठ्ठलाची भेट हेच असते. तशाच प्रकारे या पाचजणांमध्ये हौशे-नवशे आणि गवशे होते. "मी मुंबईला अमरला रिसीव्ह करायला येणार ते पण एका अटीवर" असं सांगणारा गौतम हा 'गवशे' प्रकारात मोडणारा. अमरला रिसीव्ह करायला मी सुट्टी टाकून अमेरिकेला देखील येईन पण मला पोटभर खायला दिलं तरच, असा त्याचा पवित्रा. खाईन तर मांसाहारीच असं कायमचं गौतमचं पालुपद. कुठंतरी आफ्रिकेच्या जंगलात जन्माला यायचं सोडून हा भारतात जन्मला होता. ह्याला एक अखंड भाजलेली कोंबडी खायला दिली तरी दुसर्याच्या ताटातील बिर्याणीवर याचा डोळा असणारच. कदाचित याला भस्म्या रोगाची लागण झालेली......सौरभला प्रश्न पडला... खायचं तर ते किती? काही प्रमाण आहे की नाही त्याला? पुण्यातून सर्वांचा मुंबई विमानतळासाठीचा प्रवास सुरु होण्याअगोदर याला एका हॉटेलात नेऊन भरपेट खायला घातले. ते खाल्लेलं पचेपर्यंत तरी हा बकासूर शांत बसणार होता. पुढच्या चार-पाच तासांची कटकट मिटली होती. पण बकासूराच्या डोक्यात पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गाडी विश्रांतीसाठी थांबल्यावर काय खायचे याची आखणी सुरु झाली होती. "पिण्यासाठी जन्म आपुला" या बिरुदावलीनुसार खाण्याऐवजी जलपदार्थ पिण्यात धन्यता मानणारा रवी त्याच्या जलपेयांच्या हौसेपायी पुण्याहून मुंबईला येण्यास तयार झाला. अमर आपल्यासाठी ड्युटी फ्री शॉप्स मधून जॕक किंवा जॉनी चे पेय घेऊन येणार ही भाबडी आशा मनात घेऊन गाडीत बसला तर खरा; पण विमानतळावर अमरच्या हातातून ते पेय जोपर्यंत स्वतःच्या हातात घेत नाही तोपर्यंत त्याची घालमेल सुरुच होती. प्रवासादरम्यान रवीने 'जलपदार्थ पिल्याने होणारे फायदे' या विषयावर माहिती देऊन सर्वांच्या ज्ञानात भर घातली. तसेच भारतापेक्षा बाहेरील देशात; विशेषकरुन विमानतळावर स्वस्तात मिळणार्या जलपदार्थांची खरेदी केल्याने देशां-देशांमधील आयात-निर्यातीस कशी चालना मिळते याची माहिती देखील दिली. ती माहिती इतरांच्या डोक्यात कितपत शिरली हा एक मोठा प्रश्न होता. चांग म्हणजे मुंबईचा तोंडपाठ नकाशा होता. नोकरीनिमित्त वारंवार मुंबईला चारचाकीने जात आसल्यामुळे त्याला मुंबईतील रस्ते तोंडपाठ होते. त्याच्या याच कौशल्याचा वापर करण्यासाठी सौरभने त्याला ड्रायव्हरशेजारी म्हणजे सचिनशेजारी बसवले. अजून एक मित्र सोबत होता.....तो म्हणजे अमरचा एकेकाळचा रुममेट पिंटू. लोक खाल्लेल्या मीठाला जागतात तसं हा अमरने पाजलेल्या टाटा स्वच्छमधील प्युरिफायरच्या पाण्याला जागायचं म्हणून अमरला रिसीव्ह करायला आला होता. अमरचे लग्न होण्यापूर्वी तो ज्या रुमवर रहात होता तेथील वाॕटर प्युरिफायर म्हणजे एक वैशिष्ट्य होते. मुलखाचे आळशी रुममेट असल्यामुळे या प्युरिफायरमध्ये पाणी भरायची तसदी कुणी घेत नव्हतं. अमरच बहुतांश वेळा त्यात पाणी भरायचा.प्युरिफायरचं नाव टाटा स्वच्छ, पण हा प्युरिफायर बाहेरुन एवढा घाण आसायचा की त्यातील पाणी प्यायला बाहेरुन आलेला कुणी धजावायचा नाही. जिथे प्युरिफायरमध्ये पाणी भरायची वानवा, तिथे तो प्युरिफायर स्वच्छ करायच्या फंदात कोण पडणार? अमरचा दुसरा एक रुममेट होता, तो या प्युरिफायरमधील पाण्याचा वापर चुळा भरण्यासाठी करायचा. त्याला चुळा भरायचा छंद होता, त्यामुळे पाणी लगेच संपून जायचं. अमरला एकदा सलग पोटदुखी सुरु झाल्यामुळे त्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा प्युरिफायर रुमवर बसवला होता. त्या स्वच्छ पाण्यामुळे देखील अमरची पोटदुखी कमी झाली नाही. सरतेशेवटी असं निष्पन्न झालं की सततच्या शाकाहारी जेवणामुळे त्याचे आतडे व्यवस्थित काम करत नव्हते. मग अमरने मांसाहारावर जोर लावला आणि पोटदुखी गायब झाली.

सौरभला तर काही दिवसांपासून स्वप्न पडायला लागली होती. विनोद खन्ना ज्याप्रमाणे "आप की खातिर" या हिंदी चित्रपटात 'बंबई से आया मेरा दोस्त" या गाण्यावर नाचतो त्या प्रमाणे सौरभ देखील मुंबई विमानतळावर त्याच्या मित्रांसमवेत 'अमरिका से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो' असं गाण म्हणत नाचत आहे. हे पाहून अमर देखील आपल्या हातातील बॅग सोडून आमच्या नृत्यात सहभागी झालाय आणि अशोक सराफ स्टाईल नाच करत आहे. हे पाहून फ्लॕश मॉबप्रमाणे विमानतळावरील इतर अनोळखी लोक देखील सोबत नृत्यसाथ देत आहेत.

चार-पाच दिवस अगोदर सर्व योजना सौरभने आखून ठेवली होती. पुण्यातून सहाजण व मुंबईतून संदीप असे सातजण होते. ठरल्याप्रमाणे आदल्या रात्री म्हणजे शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी जेवण करुन सहाजण साधारण दहाच्या सुमारास पुण्याहून निघाले. हे सर्वजण अमरला रिसीव्ह करायला विमानतळावर येत आहेत याची अमरला बिल्कुल खबर नव्हती. तो विमानतळावरुन बाहेर आल्यावर अचानक त्याच्यासमोर जाऊन त्याला आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का द्यायचा, अशी योजना होती. गाडी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला लागली तोवर लक्षात आले की अमरचे स्वागत करायला फुलांचा हार घ्यायला विसरला. शेवटी सौरभने मुंबईत संदीपला फोन केला व त्याला हार विकत घ्यायला सांगितला. हा संदीप मुलखाचा आळशी! वेळेत होणारी कामे कशी न करता येतील यात त्याचा हातखंडा. अशा रात्रीच्या वेळी तो धावपळ करुन हार घेऊन यायचा म्हणजे जरा अवघडच होतं. गौतमने आपले डोके चालवले की हार मिळाला नाही तर विमानतळावरुन मस्तपैकी मुंबईवडा न्यायचा अमरसाठी. बर्याच दिवसानंतर भारतीय पदार्थ खायला मिळाल्यामुळे अमर पण खुष होईल आणि त्याच्यासोबत याला पण २-३ वडापाव पोटात ढकलायला मिळतील. गाडीत दंगामस्ती सुरु होती. इतरांपेक्षा जास्तीचं चिकन तंदूरी खायला मिळाल्यामुळे गौतम डस्टरच्या मागील भागात बसायला तयार झाला होता. पोटभर खायला मिळालं की गडी कायपण करायला तयार. गाडी लोणावळ्यापर्यंत पोहोचली असेल तोपर्यंत चांगच्या लक्षात आलं की समोर ट्रॅफिक जाम आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम झालं की ते लवकर हटत नाही हा चांगचा अनुभव. त्याने सांगितले की रस्ता मोकळा व्हायला एक तास लागेल. म्हणजे विमानतळावर पोचायला एक तास उशीर होणार होता.सौरभच्या मनात घालमेल सुरु झाली. जर रस्ता लवकर मोकळा नाही झाला तर परत माघारी पुण्याला निघायचं आणि पुण्याच्या वेशीवर अमरचे स्वागत करायचे. पण तो ही पर्याय जवळपास अशक्य होता. पुण्याहून निघालेल्या बहुतांशी (बेशिस्त) वाहनचालकांनी सर्वच रस्ते बंद करुन टाकले होते. शेवटी जवळपास तासाभराने वाहतूक सुरळीत झाली आणि सर्वांच्या जीवात जीव आला. एक तास उशीर झाला असला तरी गाडी पंधरा मिनिटे वेळेअगोदर पोहोचली होती. मुंबई विमानतळावरील वाहनतळाची अव्वाच्या सव्वा फी भरुन सचिनने गाडी वाहनतळावर लावली. तेथील फलकावर येणार्या विमानांच्या वेळा व सद्यस्थिती पाहून सर्वजण टी२ (T2) टर्मिनलकडे मार्गस्थ झाले. अमर दुबईमार्गे मुंबईत येणार होता. टी२ टर्मिनलवर अमरला रिसीव्ह करण्यासाठी त्याचे भाऊ, मेहुणा, मावशी, काका, मामा, मित्रमंडळी सर्वजण अगोदरच हजर होते. विशेष म्हणजे संदीपमामा सांगितल्याप्रमाणे फुलांचा हार घेऊन वाट बघत उभा होता. आश्चर्याचा पहिला धक्का होता तो सर्वांसाठी. अमरची मावशी सोबत स्टीलच्या डब्यातून गोड शेवया घेऊन आली होती. अमरला भेटल्या भेटल्या त्याचे तोंड गोड करायचे म्हणून तिचा हा छोटासा प्रयत्न होता. तसं बघायला गेलं तर गोड पदार्थ आणि अमर यांचे फारसे सख्य नाही. पण त्यातल्या त्यात अमरला गोड शेवया विशेष आवडायच्या. अमरचे काका हातात पुष्पगुच्छ घेऊन उभे होते. अमरचा भाऊ व मेहुणा हातातील घड्याळ व वेळेचा फलक याकडे आलटून पालटून पाहत होते. सौरभ व बाकीचे मित्र असे सातजण, जिथून प्रवासी बाहेर पडतात त्या मुख्य दरवाजापासून किंचित दूर, कोणाच्या दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी बसले होते. अमर बाहेर आल्यावर अचानक त्याच्यासमोर जायचे आणि त्याला हार घालून स्वागत करायचे असा बेत होता त्यांचा. रात्रीचे सव्वादोन वाजले होते. सर्वांच्या डोळ्यात जरी झोप असली तरी अमरला पाहण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी सर्वजण आसुसले होते. दुबईवरुन येणारे विमान मुंबई विमानतळावर उतरले होते.गेली दोन वर्षे ज्या जीवाभावाच्या मित्राने अमेरिकेत जाऊन तळ ठोकला होता तो आज दोन वर्षांनी परत भेटणार होता. ही भावनाच फार सुखद होती. अमरला भेटण्यासाठीचा क्षण जवळ येऊन ठेपला होता. एखाद्या विशेष क्षणापेक्षा तो क्षण येण्यापूर्वीचे असंख्य क्षण जास्त आनंद देऊन जातात. कारण त्यामध्ये उत्सुकता असते, ओढ असते, तळमळ असते, जीवाची घालमेल होत असते. अमरला भेटायचा क्षण जरी जवळ येऊन ठेपला असला तरी त्या अगोदर या क्षणाची वाट बघण्यात व तयारी करण्याकामी जे क्षण खर्च झाले होते, तेदेखील खूपच सुखद होते या सर्व मित्रांसाठी. टी२ टर्मिनलच्या दरवाज्यातून प्रवासी बाहेर येत होते आणि ते प्रवासी त्यांना रिसीव्ह करायला येणार्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना शोधत होते. एकमेकांची नजरानजर होताच त्यांच्यामधील आनंदाच्या लहरी उफाळून येत होत्या आणि दोन्ही बाजूंकडून एकमेकांना मिठी मारली जात होती, कवटाळलं जात होतं. प्रवाशांच्या बॕगवरील टॕगवरुन लक्षात येत होतं की एखाद दुसरा प्रवासी हा दुबईवरुन आलेल्या विमानातून आला होता. सौरभची व इतर मित्रांची नजर लांंबून अमरला शोधू लागली. अमरला पाहून दोन वर्षे झाली असल्यामुळे त्याच्या एकंदरीत शरीररचनेत बदल झाला असणार असं गृहीत धरुन जो तो आपल्या परीने अमरची प्रतिमा रंगवून त्या प्रतिमेला शोधू लागला. कुणी म्हटलं की अमेरिकेत दोन वर्षे राहिल्यामुळे मूळचा गव्हाळ असलेला अमर गोरा झाला असणार. कुणी म्हटलं, दोन वर्षे अमेरिकेत थंड हवामानात राहून भरपूर मांस-मच्छी खाऊन अमर जाडजूड झाला असणार. कुणी म्हणू लागलं की अमर आता भेटल्यावर मराठीत बोलणारच नाही, तो तडक इंग्रजीमध्येच फाडफाड करणार. रवी तर लांबून येणार्या प्रवाशांऐवजी त्यांनी आणलेल्या ड्युटी-फ्री वस्तूंवर डोळा ठेऊन होता. संदीपमामा विमानतळावरुन आलेल्या परदेशी पाहुण्यांना न्याहाळत होता. संदीपला उंची कपड्यांचे भयंकर आकर्षण. स्वतः वापरत असलेले कपडे व परदेशी प्रवाशांनी परिधान केलेले कपडे यातील फरक तो अभ्यासत होता. गौतमचा विमानतळावर पाय ठेवल्या ठेवल्या प्रश्न होता, "अरे, ते रेल्वे स्टेशनवर चाय गरम‌‌‍‌स्SSS, वडा गरमSSS असं ओरडतात, तसा आवाज विमानतळावर ऐकू येत नाही. मग कुठं काय खायला मिळतंय ते कसं कळणार?" सौरभने त्याला जरा दरडावलं आणि खाण्यावरील लक्ष वळवून अमर विमानतळावरुन बाहेर येतोय का यावर ठेवायला सांगितलं. हा गौतम तसा शरीरसौष्ठवपट्टू, पण सौरभने दरडावलं की कधी कधी ऐकायचा. विमानतळावर देखील सौरभ ओरडल्यावर शांत बसला हे पाहून सौरभच्या अंगावर मूठभर मांस चढले. कुत्र्याचं शेपूट, वाकडं ते वाकडंच....ते कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी ते वाकडंच राहणार. थोडा वेळ प्रवेशद्वाराकडे लक्ष ठेवल्याचं सोंग करुन गौतमने आपला मोर्चा दूरवर बसलेल्या अमरच्या मावशीकडे वळवला. मावशीने दोन कप्पी डब्यामध्ये शेवया आणल्या होत्या. त्यातला एक डबा हस्तगत करण्यात तो यशस्वी झाला. आणि मग अधाशासारखं एका हातात डबा पकडून दुसरा हात डब्यात घालून थेट हाताचा आणि तोंडाचा संगम केला. मध्येच सौरभकडे बघून दात विचकवायला तो विसरत नव्हता. अमेरिकेतून आलेल्या अमरने हे दृश्य बघितले असते तर त्याने गौतमला काटा चमचा धरुन शेवया कशा खातात हे शिकवलं असतं.

आतापर्यंत प्रत्येकजण विमानतळावरुन बाहेर पडणार्या प्रत्येक प्रवाशावर लक्ष ठेवून होता. एखादा अमरच्या शरीरयष्टीशी मिळता-जुळता प्रवासी नजरेस पडला की कुणीतरी ओरडायचं, "अमर आला, अमर आला." मग सर्वजण आहे त्या जागेवरुन प्रवेशद्वाराकडे पळत सुटायचे. पण जवळ गेल्यावर लक्षात यायचं की ती व्यक्ती अमर नसून दुसरंच कुणीतरी आहे. मग हताश होऊन परत सगळे आपापल्या जागेवर जाऊन बसायचे. परत कुणीतरी नवीन प्रवासी बाहेर आला की कुणीतरी ओरडायचं ,"अमर आला." पण तो अमर नसायचा. बराच वेळ हा असा पळापळीचा खेळ सुरु होता. नंतर तर कुणी जागेवरून देखील हालेना. "लांडगा आला रे आला" या गोष्टीसारखी परिस्थिती उद्भवली होती. फुलांच्या हारामधील फुले सुद्धा आता कोमेजून गेली होती. अमरच्या काकांच्या हातातील पुष्पगुच्छामधील गुलाब सोडला तर बाकी सर्व फुलांनी नांगी टाकली होती. इतका वेळ होऊन देखील काका कंटाळले नव्हते. कदाचित याचेच प्रतिक म्हणून त्यांच्या हातातील गुलाब अजून टवटवीत होता. पिंटूला सकाळी नोकरीला जायचं असल्यामुळे त्याने तिथेच एका बाकावर ताणून दिली होती. इतरांप्रमाणे शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्टीचं सुख त्या बिचार्याच्या नशिबी नव्हतं. रात्री सवादोन वाजता अमरला मुंबईत रिसीव्ह करुन सकाळी नऊ वाजता पुण्यात त्याला नोकरीवर जायचं होतं. कधीकाळचा रुममेट पिंटू जीवाचा एवढा आटापिटा करुन आपल्याला रिसीव्ह करायला आला आहे हे अमरला कळले असते तर त्याच्यादेखील डोळ्यातून अश्रू ओघळले असते आणि ते अश्रू टाटा स्वच्छ प्युरिफायरमधील पाण्याइतकेच स्वच्छ असते.

एव्हाना पहाटेचे चार वाजायला आले होते. अमरला हार घालायची जबाबदारी रवीवर सोपवली असल्यामुळे तो केव्हापासून हार हातात पकडून बसला होता. ड्युटी फ्रीच्या नादापायी झोपेचं खोबरं झाल्यामुळे तो जाम वैतागला होता. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि सौरभच्या नादाला लागून टी२ टर्मिनलला आलो याचा त्याला प्रचंड राग आला होता. हातातील हार स्वतःच्याच गळ्यात घालून एका खुर्चीत तो झोपी गेला. अमरचे विमान धावपट्टीवर उतरुन दोन तास उलटून गेले होते तरी तो विमानतळावरील आगमन कक्षाच्या प्रवेशद्वाराजवळ आला नव्हता. त्याचे सामान मिळाले नसेल का, सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्यांनी त्याची झाडाझडती घेतली असेल का.....असे एक ना अनेक प्रश्न सौरभला पडून गेले. पण अमरच्या काका-मावशींसमोर त्याने या गोष्टीचा तणाव अजिबात जाणवू दिला नाही आणि त्यांना सांगितले की एवढा वेळ तर सर्वसाधारणपणे लागतोच. संदीपने त्याच्या ओळखीतील विमानसेवेशी संंबंधित दोघा तिघांना पहाटे ४ वाजता फोन लावला. त्यापैकी एकाने त्याच्या संपर्कातील एकाचा मोबाईल नंबर दिला व त्याच्याशी संपर्क साधायला सांगितले. नशीब चांगले म्हणून की काय, ती व्यक्ती रात्रपाळीवर विमानतळावर सेवा बजावत होती. ती व्यक्ती देखरेख विभागात कामाला होती. अमरपर्यंत पोहोचणे शक्य नसले तरी दुरुन त्याचा हालहवाला सांगणे त्याला शक्य होते. संदीपने अमरचे छायाचित्र शोधण्याचा प्रयत्न केला. त्याला काही ते सापडले नाही. मग त्याने अमरच्या काकांकडे अमरचे छायाचित्र मिळते का ते बघितले. त्यांच्याकडे छायाचित्र मिळाले पण अमरने त्यात खाकी चड्डी व पांढरा सदरा घातला होता. अमर शाळेत असतानाचे म्हणजे साधारण १५ वर्षापूर्वीचे छायाचित्र होते ते. त्याचा विमानतळावरील व्यक्तीला अमरची ओळख पटवण्यासाठी काहीच उपयोग नव्हता.

संदीपने छायाचित्राचा पर्याय बाजूला ठेवला आणि त्या व्यक्तीला अमरचे वर्णन सांगायला सुरुवात केली, "किंचितसे मोठे कपाळ, सावळा वर्ण, कपाळावर सदैव बोटे फिरवण्याची सवय, हसला तर गालावर खळी आणि राग आला तर नाकपुड्या फुगलेल्या, बोलताना शब्द कमी आणि रजनीकांत स्टाईलचे हातवारे जास्त, अशोक सराफचा डमी म्हणून कुणीही चित्रपटात काम देईल अशी एकंदरीत देहरचना. फक्त अशोक सराफांकडे अमरकडे असलेली एकच गोष्ट नव्हती, ती म्हणजे....प्रचंड आत्मविश्वास!" संदीपने असे हे अमरचे पटपट केलेले वर्णन ऐकून असे वाटले की दूरदर्शनच्या मराठी वाहिनीवर सध्या जर "आपण यांना पाहिलंत का?" हा कार्यक्रम सुरु असता तर त्यामध्ये संदीपला निवेदकाची नोकरी सहज मिळाली असती. विमानतळावरील व्यक्तीने पंधरा-वीस मिनिटांत अमरचा ठावठिकाणा शोधून काढला. त्याने परत संदीपला फोन केला आणि सांगितले की अमरला सीमाशुल्क विभागातील वरिष्ठांनी अडवून ठेवले आहे. त्याने पुढे सांगितलेली माहिती ऐकून सर्वांना हसावे की रडावे हेच कळेना. इलेक्ट्रॉनिक उपकरणांची आवड असलेला प्रवासी फार तर एखादा लॕपटॉप घेऊन आला असता अमेरिकेतून. पण अमरने अमेरिकेतून येताना तब्बल ४८ इंची एलईडी टीव्ही आणला होता. त्या टीव्हीचा खोक्यासहित ६० इंची आकार झाला होता. एवढी किमती वस्तू सीमाशुल्क न भरता आणल्यामुळे अमरला वस्तूच्या दुप्पट किमतीएवढा दंड भरण्यास सांगितले होते. अमर दुबईमार्गे आल्यामुळे त्याच्या विमानात दुबईहून आलेले असे काही प्रवासी होते की ज्यांनी दुबईमधून टीव्ही संच खरेदी केले होते. फरक फक्त एवढाच होता की ते टीव्ही अमरच्या टीव्हीप्रमाणे अवाढव्य नव्हते, ३० इंची वा त्यापेक्षा कमी आकारातील होते. अमरमुळे त्या इतर प्रवाशांना देखील अडवून धरले होते. त्यांच्या टीव्हीचा आकार लहान असूनदेखील निव्वळ अमरमुळे त्यांना तिष्ठत उभे रहावे लागले होते. त्यांच्यासाठी विमानप्रवास तीन तास आणि सीमाशुल्क तपासणीचा वेळ चार तास अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. एका बाजूने अमर दंड भरायची गरज नाही असे सांगत होता तर दुसऱ्या बाजूने अधिकारी दंड भरावा लागणारच असे बजावत होते. हे सगळं ऐकल्यावर रवी खडखडून जागा झाला व पुढे येऊन विचारु लागला, "ते अधिकारी अमरकडे असलेले ड्युटी फ्री मधील जलपदार्थ तर जप्त करणार नाहीत ना?" तोपर्यंत खादाड गौतम पुढे आला आणि म्हणाला, "त्या अमर्याला पकडलं तर पकडू देत, आपल्याला चॉकलेट खायला मिळाले पाहिजेत." इकडे कोहिनूर हिर्यापेक्षा पण बहुमोल माणूस अडकून पडला होता आणि यांना खाण्या-पिण्याची चिंता लागून राहिली होती. संदीपने त्या माहिती देणाऱ्या इसमाचे आभार मानून पुन्हा अमरची वाट बघण्याच्या क्रियेत गुंग झाला.

रवी पुन्हा हार गळ्यात घालून झोपी गेला. त्यानंतर साधारण एक तास झाल्यानंतर टीव्हीचे छोटे खोके घेऊन येणारे प्रवासी विमानतळातून बाहेर पडताना दिसले. सर्वांच्या चेहर्यावर सुटकेचा निश्वास स्पष्टपणे दिसत होता. त्यातील काही लोकांच्या तोंडून पुढील प्रकारची वाक्ये ऐकायला मिळत होती, "इतना बडा टीव्ही कोई कभी लेकर आता है क्या?", "अरे यह आदमी इतना बडा टीव्ही घर पर लगाने वाला है या महल में?", "न जाने क्यूं, लोग खुद की गलती की वजह से दूसरों को मुसीबत में डालते है!" त्यातील एका प्रवाशाला बाजूला घेऊन सौरभने विचारले की मोठा टीव्ही वाल्या प्रवाशास सीमाशुल्क अधिकार्यांनी सोडले काय? तर त्यावर तो म्हणाला की त्यांची काहीतरी तडजोड झाली आहे आणि त्या मोठा टीव्हीवाल्याला सोडून दिले आहे. गेले काही तास ज्या क्षणाची सर्वांना आतुरता होती तो क्षण येऊन ठेपला होता. पंक्चर झालेल्या टायरला दुरुस्त करुन त्यात हवा भरल्यानंतर तो टायर जसा टुम्म फुगतो तसे सर्वजण मरगळ झटकून उत्साहाने अमरची वाट पहात होते. इतक्यात त्यांना दूरवरून एक मोठा खाकी रंगाचा खोका आपोआप पुढे येताना दिसला.खोक्याच्या आजूबाजूला कुणीच दिसत नव्हतं. क्षणभर असं वाटत होतं की कुठल्या तरी जादूगाराचा खेळ सुरु आहे आणि तो जादूगार आपोआप खोका हलवत आहे. बघता बघता तो ६० इंची खोका सौरभ व त्याच्या मित्रांजवळ येऊन थबकला आणि त्याच्यामागून एक हॕट घातलेली व्यक्ती सामोरी आली. ती व्यक्ती दुसरंतिसरं कुणी नसून साक्षात अमर होता. "अजि म्या ब्रम्ह पाहिले" अशी अनुभुती सौरभला त्या क्षणी झाली. सर्व मित्रांना पाहताच "ओह् माय गॉड!" असे तीन शब्द अमरच्या तोंडून बाहेर पडले. ते पाश्चिमात्त्य सुरातील तीन शब्द अमरच्या तोंडून ऐकून एवढं गोड वाटलं की त्याचं वर्णन करता येणं अशक्य होतं. अमरला सर्वांनी आश्चर्याचा धक्का देण्याऐवजी त्यानेच इतरांना धक्का दिला होता. सौरभने त्याला एक करकचून मिठी मारली तेवढ्यात झोपलेल्या रवीला जाऊन कुणीतरी उठवले व सांगितले, "अरे उठ, अमर आलाय." त्याने किंचीतसे डोळे उघडले आणि "आलाय तर येऊ दे" म्हणून तो परत झोपी गेला. तोंडावर पाणी मारल्यावर तो नीटपणे झोपेतून उठला आणि आपल्या गळ्यातील हार अमरच्या गळ्यात घातला. कुणीतरी म्हटलं की या हाराचा खरा मानकरी अमर नसून तो टीव्ही आहे. जेव्हा रवीला कळले की टीव्ही सोडवून आणण्यासाठी त्याच्याकरता ड्युटी फ्री मधून घेतलेल्या वस्तू तिथेच तडजोडीसाठी सोडाव्या लागल्या तेव्हा रवी मनातून कोसळला आणि त्याने तिथेच शपथ घेतली की आता आयुष्यात परत कधीच कुणाला टी२ टर्मिनलला रिसीव्ह करायला जाणार नाही, अगदी स्वतःची बायको असली तरीही. सकाळचे साडेसहा वाजले होते. डोळ्यावर झोप आणि मनात ६० इंची टीव्हीच्या आठवणी जागवत सर्वजण पुण्याच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागले. ज्या टीव्हीने सर्वांना तब्बल पाच तास ताटकळत ठेवले त्या टीव्हीसमोर दोन-तीन तास बसून सिनेमा बघायची इच्छा अजून सौरभच्या व त्याच्या मित्रांच्या मनात जागृत आहे.


Rate this content
Log in