STORYMIRROR

Trupti Deshmukh

Others

2  

Trupti Deshmukh

Others

जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन

4 mins
47

दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला. असे असले तरीही सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेतील सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

आज जागतिक महिला दिन, आज सगळीकडे महिलांवर शुभेच्छांचे वर्षाव झाले असतील, कार्यालयांमध्ये महिलांचा स्तकार झाला असेल, सोसायटी मध्ये महिला दिन साजरा करुन महिलांना भेटवस्तू दिल्या गेल्या असतील, पण अश्या प्रकारचे सत्कार, भेटवस्तू यांची खर तर गरज नसते महिलांना त्यांना फक्त हवा असतो तो तुमचा अधार, निर्भयपणे जगात वावरण्याच स्वातंत्र्य, आदर, माया, आपुलकी परंतु हेच कधी मिळत नाही. ज्या दिवशी प्रत्येक स्त्री जगात निर्भयतेने वावरेल तेव्हाच खरा महिला दिन साजरा करेल.

आजही बर्याच घरांमध्ये महिलांवर अत्याचार होताना दिसतात आणि अशा घरगुती अत्याचारांमध्ये एका महिलेवर अत्याचार करणारी बर्याच वेळेस दुसरी महिलाच असते. मग जिथे एक स्त्री दुसर्या स्त्री चा आदर करू शकत नाही तिथे हे पुरूष काय आदर करणार. आजच्या काळातही घरगुती अत्याचारांच्या केसेस रोज समोर येत आहेत. ही खरच शरमेची बाब आहे. आज प्रत्येक स्त्रीने दुसर्या स्त्री साठी तिच्या सोबत कणखर राहण्याची गरज आहे. स्त्रीने स्वतः कणखर होण्याची गरज आहे.

बलात्काराचे प्रमाण तर दिवसेंदिवस वाढतच आहे. पाच वर्षाच्या मुलापासून ते ६० वर्षाच्या महिलेपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरो यांच्या माहितीनुसार सन २०२० मध्ये आपल्या देशात दिवसाला ७७ बलात्काराच्या घटना समोर आल्या आणि आज अजुनही संख्या वाढतच आहे. खरच किती भयानक आहे हे आणि या बलात्कारा करणार्या लोकांवर न्यायपालिका अजुनही कठोर अशी शिक्षा करीत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. आज आपल्या सरकारने यामध्ये लक्ष घालून कठोरातील कठोर अश्या शिक्षेचा कायदा मंजूर करायला हवा परंतु आपल्याकडे असे काही घडताना दिसत नाही. याला कारण असेही असू शकते की बर्याच वेळा या गुन्ह्यातील गुन्हेगार हा एखादा राजकारणी असतो मग कशी होणार कठोर शिक्षा, यांना तर सर्व गुन्हे माफ असल्यासारखे वागतात ही लोक.

आज महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करताना दिसतात. कुठलेही असे क्षेत्र नाही जिथे महिला पोहोंचल्या नाहीत. डॉक्टर, शिक्षण, राजकारण, पोलीस, बॅंक, कंपन्या अगदी सर्वच क्षेत्रात आज महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. मग जो मान आज घरातल्या पुरूषाला मिळतो तो स्त्रीला का नाही मिळत, स्त्री तर उलट घर सांभाळून, मुल सांभाळून सगळ्या गोष्टी करते परंतु आजही तिला तेवढा मान मिळत नाही. काही घरे याला अपवाद देखील असतात जिथे स्त्रीला पुरूषांसमान मान दिला जातो. ज्या दिवशी हे सुख समाजातील प्रत्येक स्त्रीला मिळेल तो खरा महिला दिन असेल.

आजही बर्याच घरांमधुन मुलगी नको चा नारा ऐकायला मिळतो आणि यातुनच मग स्त्रीभ्रुण हत्येचे प्रमाण वाढते. आपल्याला आपल्या पाठीवरून हात फिरवणारी आई हवी असते, आपल्याला समजुन घेणारी, कधीकधी भांडणारी पण आपली बाजु घेवुन बोलणारी बहीण हवी असते, आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखात साथ देणारी पत्नी हवी असते, पण मग मुलगीच का नको? आई, बहीण, बायको ही देखील स्त्रीच आहे ना मग मुलगीच का नको? या स्त्रीभ्रुणहत्ये सारख्या गुन्ह्याला फाशीची शिक्षा असायला हवी. काही डॉक्टर तर सरकार मान्यता नसताना देखील बरेचसे डॉक्टर पैशाच्या हव्यासापोटी स्त्रीभ्रुण हत्या करतात. अश्या लोकांसाठी फाशीचीच शिक्षा योग्य आहे. जोपर्यंत या गुन्हेगारांना फाशी होणार नाही तोपर्यंत हे स्त्रीभ्रुण हत्येचे प्रमाण कमी होणार नाही आणि ज्या दिवशी ही स्त्रीभ्रुण हत्या थांबेल त्या दिवशी खरा जागतीक महिला दिन साजरा करण्यात अर्थ असेल.

अजुनही स्त्री पुरुष समानता ही सर्वच पातळीवर समाजात स्वीकारली गेलेली दिसत नाही. स्त्रीला सन्मानाने वागवले गेले पाहिजे. स्त्री ही कणखर, सक्षम असतेच परंतु बर्याच वेळेस तीचे मानसीक, शारीरिक खच्चीकरण करून तिला अबला बनवले जाते. हे खच्चीकरण थांबवुन जेव्हा स्त्रीला सन्मानाने वागवले जाईल तेव्हा खरा महिला दिन साजरा होईल.

आज या महिला दिनी सर्व महिलांनी मिळुन असे ठरवले पाहिजे की आज जे आपल्या समाजात बलात्कार, स्त्रीभ्रुणहत्या, हुंडबळी असे अतिशय घ्रुणास्पद प्रकार घडत आहेत त्याला आपण सर्वांनी मिळून मुळापासून उखडून काढायला हवे. जर आपल्या डोळ्यासमोर एखादा असा अमानुष अत्याचार होताना दिसला तर तेव्हा आपण डळमळुन न जाता सर्वांनी मिळून आपली नारीशक्ती एकवटून, साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा वापर करून हा घडणारा गुन्हा थांबवायला हवा. समाज काय म्हणेल, घरचे लोक नातेवाईक काय म्हणतील हा विचार सोडून द्या. माझ्या मनाला या क्षणी काय वाटत आहे आणि ते योग्य असेल तर ते मी नक्की करणार हा आत्मविश्वास बाळगा, कणखर बना, कोणत्याही क्षणी घाबरून जावु नका कारण आज तुम्ही जर कणखर झालात तर काय कोणाची हिम्मत आहे तुम्हाला हात लावायची अथवा तुमच्या विरोधात अपशब्द काढायची. सरकार दरबारी आपल्याला न्याय मिळेल या भ्रमात तर राहूच नका. मी माझे स्वतःचे संरक्षण करण्यास सिद्ध आहे हा आत्मविश्वास बाळगा. आजकालच्या जगात कोणाही व्यक्तीवर विश्वास ठेवताच येत नाही, जर तुम्ही कणखर असाल तर तुम्हाला तुमच्या मुलांनाही कणखर बनवता येईल. लक्षात ठेवा नारीशक्ती पुढे कोणाचाही निभाव लागत नाही. ज्या दिवशी स्त्री स्वतःच्या संकटाशी निर्भयपणे स्वतःच सामना करेल तेव्हा ती जिंकेल आणि तोच खरा महिला दिन असेल.


Rate this content
Log in