इमानदारी
इमानदारी
एक रामपूर नावाचे छोटेसे गाव होते. त्या गावात एक मेंढपाळ आपल्या परिवारासोबत राहायचा . मेंढपाळ खूपच गरीब आणि प्रामाणिक होता . पण परिस्थिती हलाखीची असल्याने आपला उदरिर्वाह चालवण्यासाठी आपल्या जवळच्या मित्रांची मदत मागितली . मित्रांच्या आर्थिक मदतीने बाजारातून काही शेळ्या मेंढ्या विकत घेतल्या . व विकत घेतलेल्या शेळ्या मेंढ्या घेऊन तो जंगलात चरायला जायचा. कालांतराने त्याच्या जवळील शेळ्या आणि मेंढ्यांची संख्या वाढू लागली. परिणामी सर्व मित्रांचे पैसे परत देऊन देखील त्याच्या हातात चांगला पैसा खेळू लागला . शेळ्या मेंढ्यांची संख्या जास्त झाल्याने आता त्याला चोर आणि जंगली प्राणी यांची भीती वाटू लागली. परिणामी भितीपोटी त्याने एक छोटेसे कुत्र्याचे पिल्लू शेळ्या मेंढ्यांच्या संरक्षण करण्यासाठी घेऊन आला .
पिल्लू जसे जसे मोठे होऊ लागले तसे तसे तो शेळ्या मेंढ्यांची इमान इतबारे रक्षा करू लागला. पण कुत्र्याची अती ईमानदारी काही लबाड लांडग्याला आवडली नाही. कारण लांडगे जेंव्हा जेंव्हा शिकारीला जायचे त्या त्या वेळी कुत्रा भो भो करून आपल्या मालकाला जागे करायचा. आणि मालक जागे होऊन त्यांना पाठी लागून काठीने मारायचा.
परिणामी लांडग्याची खूप उपासमार होऊ लागली . करिता भूकेपोटी सारे लांडगे एकत्र जमा झाले आणि भूक शमविण्यासाठी कुत्र्याला आपल्या जाळ्यात कसे आणावे याविषयी विचार मंथन करू लागले. विचाराअंती असे ठरले की आपण कुत्र्याशी खोटी खोटी मैत्री करायची आणि त्याची नजर चुकवून आपण शेळ्यांची शिकार करायची.
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे एक लांडगा कुत्र्याची नजर चुकवून हळूच शेळ्यांच्या कळपाजवळ शिकार करण्यासाठी गेला . पण कुत्रा खूप हुशार होता . शेळ्यांच्या बारीक हालचालींमुळे तो लगेच सावध झाला आणि सरळ लांडग्यावर धाऊन गेला. प्रसंग ओळखून लांडगा हात जोडून म्हणू लागला "अरे रे रे अरे जरा थांब . मी तुझ्याकडेच आलो आहे तुझ्या भेटीसाठी .
कुत्रा म्हणाला माझ्या भेटीसाठी . पण का ?
लांडगा म्हणाला "अरे आम्ही आता मांस मासे खाणे सोडून दिलेले आहे. आमच्या गुरूने आम्हाला तशी दिक्षा दिली आहे.
कुत्रा म्हणाला खरंच का ?
लांडगा म्हणाला " अरे आम्ही पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी असा भेद न करता सर्वांशी मैत्रीने आणि प्रेमाने राहण्याचा संकल्प केला आहे . आता तू सुद्धा आमच्यासोबत खेळायला बाहेर येऊ शकतोस . आनंदाने मोकळ्या वातावरणात फिरू शकतोस..
कुत्रा रागाने म्हणाला "अरे हो पण तू असा लपून छपून का आलास ?
लांडगा म्हणाला "अरे तुझा मालक जागा होईल. जागा झाला की मला मारेल आणि आपली मैत्री कदाचित होऊन देणार नाही म्हणून...
कुत्रा म्हणाला " असं का ! बरं बरं. पण तू हे सारे खरंच म्हणत आहेस का .?
लांडगा म्हणाला " हो हो मी खरंच म्हणत आहे.".
कुत्र्याला वाटले बर झालं माझी रोजची कटकट कमी झाली . आता मी दिवसा आणि रात्री ही आराम करू शकेल.
लांडगा म्हणाला " अरे विचार काय करत आहेस . उद्या येणार ना तू आमच्यासोबत बाहेर खेळायला. आपले मित्र मंडळ तुझी वाट पाहतील .
( कुत्रा लांडग्याच्या गोल मोल गोष्टींवर विश्वास ठेवला आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर आपला कळप सोडून निःस्वार्थ भावनेने लांडग्यासोबत खेळू लागला. )
खेळ खेळत असताना नियोजनाप्रमाणे दोन लांडगे कुत्र्याची नजर चुकवून शेळ्याकडे शिकारीसाठी लाळ गाळत आनंदाने धावत पळत सुटले . इकडे काही लांडगे कुत्र्याला खेळ खेळवण्यात भुलवू लागले . पण कुत्र्याने एक गोष्ट अचूक हेरली की काही लांडगे खेळ अर्धवट सोडून कळपाच्या दिशेने पळाले . कुत्रा लगेच सावध झाला. त्याला वाटले की आता आपल्या कळपातील शेळ्या आणि मेंढ्याशी दगा फटका होणार . कुत्रा खेळ अर्धवट सोडून आपल्या कळपाच्या दिशेने जोऱ्याने धावत सुटला. लांडगा शेळीला पकडणार इतक्यात कुत्रा जोरजोराने धावत जाऊन लांडग्यावर तुटुन पडला. लांडग्याला पळता भुई थोडी झाली. लांडगा कसाबसा आपला जीव मुठीत घेऊन धूम पळत सुटला . लांडग्यांनी आपली फसवणूक केली होती पण प्रसंग ओळखून आपण सावध झालो आणि आपल्या कळपातील शेळ्या मेंढ्यांची रक्षा केलो याचा त्याला अभिमान वाटू लागले . कुत्र्याने केलेलं कार्य पाहून मालकाने जवळ घेऊन त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवला आणि कुत्र्याने शेपूट हलवून आपली ईमानदारी कृतीमधून त्यांच्या चरणी अर्पण केली.