Arvind Kadam

Others

2  

Arvind Kadam

Others

हरिश्चंद्रगडावरील एक चांदणी रात्र

हरिश्चंद्रगडावरील एक चांदणी रात्र

2 mins
117


गार वारा अंगाला जास्तच झोंबू लागल्याने मला जाग आली. पहाटेचे चार वाजले होते, बाजूचे सारे साथीदार अंगाचा मुटकुळा करून झोपले होते. झोपूनच मी आकाशात नजर टाकली तर , साऱ्या आकाशात लाखो तारकांचा सडा पडला होता. काही लखलखणारे तर काही स्थिर होते .लहानपणी वडिलांनी दाखवलेले तारकासमूह मी शोधू लागलो .मला उत्तरेचा ध्रुव व सप्तर्षी तेवढेच ओळखता आले. तेवढ्यात पूर्व दिशेला शुक्राची तेजस्वी चांदणी उदयास आली. शुक्राच्या चांदणीचा ठळकपणा स्पष्ट दिसत होता. दादा कोंडके च्या गाण्याच्या ओळी( शुक्राची गं तू चांदणी , लाजू नको ग... ) आठवल्या वर चेहेऱ्यावर आपोआपच हसू आले . मी उठून बसलो .उशा जवळ असलेले हरिश्चंद्राचे हेमाडपंती मंदिर चांदण्यात विलक्षण वेगळे दिसत होते .मंदिरावरील पताका वाऱ्यावर फडफडत होती. तिचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मोठ्या गुहांनी नी हे मंदिर वेढले आहे .


प्रमुख प्रवेश द्वारानी आत प्रवेश केल्यावरच साऱ्या गुहा नजरेस पडतात .या गुहा खोदतांना निघालेल्या दगडांनी हे मंदिर बांधले आहे .झोप पूर्ण उडाल्यामुळे मी उभा राहिलो व दक्षिण दिशेकडे पाहिले तर, तारा माचीवरील भगवी जरी पताका वाऱ्यावर स्वार होउन डोलत होता. या तारा माचीने अनेक स्वप्न व प्रसंग अनुभवले होते .मागे वळून पश्चिमेकडे पाहिले तर ,चन्द्र मावळतीला जाण्यासाठी कोकण कड्या कडे सरकू लागला होता. चंद्राची स्थिती व कोकण कड्यावर जाण्यास लागणारा वेळ याचा मनात हिशोब करून भरभर पावले टाकीत मी पंधरा-वीस मिनिटात कोकण कडा गाठला. आता चंद्राचे संक्रमण कोकण कड्याच्या खाली व्हायला सुरुवात झाली होती .कोकणकड्याच्या काठावरती बसून चंद्रास्ताचे नयनमनोहर दृश्य पहात व मनात साठवत होतो .कोकण कडा म्हणजे सह्याद्रीच्या अनेक डोंगर शिल्पा पैकी एक . एक दीड किलोमीटर लांबीचा हा पश्चिमकडील कडा, पंधराशे फूट खोल व डोंगराकडे अंतर्वक्र झालेला आहे . तो थेट कोकणात उतरतो. हा कोकण कडा पाहणे हे सर्व गिरीप्रेमीचं स्वप्न असते, व तो उतरणं किंवा चढणं हे हाडाच्या व कणखर दिलाच्या गिर्यारोहकांचे स्वप्न असते .


याच कड्यावरून जुलै-ऑगस्टमध्ये तुम्हाला ' इंद्रवज्र ' पाहण्याची अतिदुर्मिळ संधी मिळू शकते. इंद्रवज्र म्हणजे दरीमध्ये विरळ ढग थांबलेले असताना व सूर्याचा प्रकाश त्यावर पडतो त्यावेळी, तुमची सावली त्या ढगावर पडते त्यावेळी आपल्या सावली भोवती एक गोलाकार आभा दिसते .जशी देवतांच्या भोवती असते तशी .याच कड्यावरून कालचा देखणा सूर्यास्त पाहिला होता .आता चंद्रअस्त झाल्यावर खाली वसलेल्या कोकणावर नजर टाकली . गावातील लाईट लुकलुकत होत्या सारा कोकण अजून जागा झाला नव्हता. आपण एकटेच कोकणकड्यावर आलो आहोत हे आठवताच परतीचा प्रवास सुरू केला, कारण साथीदार जागे होऊन माझा शोध घेण्यासाठी धावपळ करतील... उजाडायला सुरुवात झाली होती, व आकाशातील तारकाही लुप्त झाल्या होत्या .झपाझप पावले टाकत मी हरिश्चंद्रेश्वराच मंदिर गाठलं. एकंदरीतच आजची हि रात्र माझ्या जीवनातील अगदी स्मरणीय रात्र होती .अशी अविस्मरणीय रात्र अनुभवण्यासाठी अत्यन्त खडतर साडेतीन तासाची दुर्गभ्रमंती करावी लागली . श्रमसफल्याची दिव्यानुभूती मिळाली.        


Rate this content
Log in