गोष्ट एका बूटाची
गोष्ट एका बूटाची
“ए राजूSSS, उठ की रे बाबा, घोडा झालास तरी अक्कल नाही गधड्याला,” सकाळची सर्व कामे आवरत-आवरतच राजेशची आई राजेश ला ओरडत होती.
-
राजेश बोलू शकत नव्हता, जन्मत: मुकेपण त्याच्या नशिबी होते. त्याचे वडील व्यसनाधीन असल्याने लवकरच देवाघरी गेले. घरात आई आणि आणखी तीन भावंडे. रमेश, उमेश, दिनेश आणि चौथा राजेश. राजेश सर्वांचा लाडका परंतु त्याचे इशारे समजता-समजता प्रत्येकजण कंटाळून जायचा. रमेश हा राजेशचे खूप लाड करी, तोच त्याला प्रेमाने ‘राजू’ म्हणायचा. राजूला सोडले तर बाकी मुले थोडे-फार शिकलेले होते. वडील गेल्यापासून घरची परिस्थिती बेताचीच. आईने खंबीरपणे घर सावरले होते. आता तर रमेश, उमेश आणि दिनेश तिघेही मिळेल ते काम करत होते. तुटपुंज्या कमाईमध्ये मुलांच्या व स्वत:च्या गरजा पूर्ण करणे आईसाठी जिकीरीचे काम होते. राजूला शाळा शिकायची आवड होती परंतु मुका असल्याने शाळा शिकता आली नाही. आईने मुकबधिर शाळेत शिकवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु राजूला ते आवडले नाही आणि त्याने शाळा सोडली. दुसऱ्यांना पाहून राजूही बोलण्याचा प्रयत्न करायचा परंतु नियतीपुढे त्याचे काय चालणार?
-
प्रत्येक सकाळी राजूला झोपेतून उठविण्याचा कार्यक्रम व्हायचाच. कुंभकर्णानंतर राजूचाच नंबर. त्याला झोपायला फार आवडायचं, यावर मोठा भाऊ रमेश म्हणायचा, “अगं आई, झोपू दे त्याला, बिचारा छान-छान स्वप्नं बघत असेल.” वडील गेल्यापासूनच रमेशने वडीलांची भूमिका अंगिकारली होती.
-
एके दिवशी राजू घरासमोर खेळत असताना रस्त्यावरून शाळकरी मुले निघाली होती, त्यातील एकाचा वाढदिवस असल्याने त्याने रंगीत कपडे व नवीन बूट घातला होता. राजूने त्याला पाहिले, त्याचे बूट राजूला अत्यंत आवडले. त्याने लगेचच आईच्या हाताला धरून घरातून बाहेर आणले आणि त्या मुलाकडे बोट दाखवून बूटाकडे खूणवू लागला. आईच्या लक्षात आले की, राजूला बूट हवेत. आईने तत्काळ नकार दर्शविला, “वा रे वाSSS म्हणे बूट पाहिजे, कशाला हवाय रे तूला?” परिस्थितीसमोर ती ही हताश झाली होती, राजू मात्र हिरमूसला. संध्याकाळी रमेश आल्यानंतर राजू इशाऱ्याने सांगण्याचा प्रयत्न करू लागला. रमेशने आईला विचारले, “आई, राजू काय मागतोय गं?” आई म्हणाली, “बूट पाहिजेत म्हणे तुझ्या राजकुमाराला!!!” रमेश थोडासा हसला आणि राजूला समजावत म्हणाला, “राजू आपल्याला बूटाची काय गरज? छानशी चप्पल आहे की, बूट फार महाग असतात 300 रूपयाला मिळतात, आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत, आपण नंतर घेऊ.” राजूला मात्र त्याचे समजावने पटले नाही आणि त्या रात्री तो न जेवता झोपी गेला.
-
बूट मिळण्यासाठी देवाकडेही राजू प्रार्थना करु लागला. एके दिवशी राजूने बराच विचार केल्यानंतर बूट विकत घेण्यासाठी रमेश सोबत काम करायचे ठरवले. रमेशला ही बाब कळताच त्याच्या डोळ्यात पाणीच आले, रमेशनेही त्याला त्याच्यासोबत काम करण्याची परवानगी दिली. राजू रमेश सोबत काम करु लागला, काम करत असताना किती मेहनत असते हे त्याने पाहिले. राजूचे लक्ष रमेश च्या पायाकडे गेले, रमेश गवंडीच्या हाताखाली काम करत होता. बूट नसल्याकारणाने रमेशचे पाय सिमेंटमूळे खराब होऊन गेले होते. राजूने आतापर्यंत कधीच या गोष्टींकडे लक्ष दिले नव्हते. बरेच दिवस काम केल्यानंतर पैसे जमा झाले खरे, परंतु ते खर्च करण्याची हिंमत राजू करत नव्हता. दरम्यानच्या काळात घाम गाळून कमावलेल्या पैशाची किंमत काय असते ते राजूला उमगले होते. तरीही त्याने रमेशसाठीच बूट विकत घेण्याचे ठरवले. जमा केलेल्या पैशातून पहिल्यांदाच खर्च करुन राजूने रमेशसाठी बूट व राहिलेल्या पैशातून घरासाठी सामान खरेदी केले. घरी आल्यानंतर राजूने आणलेले सामान बघून आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. राजू समजदार व कर्तुत्ववान झाल्याचा आनंद आईच्या डोळ्यात दिसत होता. राजूने रमेशसाठी बूट खरेदी केल्याचे पाहून रमेशलाही आनंदाश्रू अनावर झाले. इकडे रमेशनेही राजूच्या नकळत राजूसाठी बूट खरेदी केले होते, ते त्याच्या पुढ्यात ठेवले. बूट पाहताच राजू रमेशला बिलगला अन् दोघेही रडू लागले. राजूला बूट मिळाल्याचे समाधानही होते. त्यांच्या लक्षात आले होते की, कुठल्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी कष्टाला पर्याय नाही.