गजरा
गजरा
आज विजयादशमीची रात्र. विजय आणि करुणा अंबे मातेच्या मंदिरात ओटी भरायला गेले. करुणाची ही पहिलीच नवरात्र. काठापदराची साडी, सोन्याचे दागिने, केसांचा आंबेडा त्यावर शेवंतीची वेणी असा शृंगार करून ती त्या नवरात्रीत जणू आकाशातून खाली उतरलेली शुक्राची चांदणीच वाटत होती. विजयही सालस, राजबिंडा गुलाबी तिच्या साडीला मॅचिंग सदरा घालून तयार झाला. जाता जाता एका मंदिरा शेजारच्या दुकानातून त्यांनी सुंदरशी, काठापदराची, देवीची ओटी भरण्यासाठी एक साडी खरेदी केली. मिठाईच्या दुकानातून पेढे घेतले आणि वेण्या संपल्या म्हणून मोगऱ्याचे चांगले चार गजरे घेतले.
मंदिराच्याच बाजूला एक नारळ घेऊन ते मंदिरात पोहोचले. बघतायत तर काय ही गर्दी ! ढकला ढकल, मध्येच घुसा घुशी. असं पाहून दोघेही चकित झाले. सर्वांच्या हातात ओटीचे सामान सुंदर सुंदर साड्या, मिठाई. क्षणभर दोघानी विचार केला देवी माता ह्या सर्वाचं काय करणार? त्या पेक्षा एखाद्या गरीब स्त्रीची ओटी भरावी तिच्या आशीर्वादाने आपल्याला सुख मिळेल. दोघे मंदिरा बाहेर पडले. गेटवर चारपाच भिकारी दिसले. एक लंगडा पुरुष काठी घेऊन उभा होता. समोरच्या बाजूला एक अंध स्त्री तिच्या तान्हया मुलासोबत बसली होती. तिच्या दुसऱ्या बाजूला एक दाढीवाला भिकारी बसला होता. सर्वांचा खूप अवतार होता.. कित्येक दिवस आंघोळही केली नसेल त्यांनी.
करुणाने ओटीची साडी, नारळ आणि गजरे त्या अंध स्त्रीला दिले. विजयने सर्वांना पेढे वाटले. सर्व खूश झाले. सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून करुणा आणि विजय फार तृप्त झाले. खूप उत्साही मुद्रेत ते त्यांच्या गाडी कडे गेले.
त्यांची गाडी चालू होताच बाकीच्या भिकाऱ्यानी नारळ ओढून घेतला आणि खाण्यासाठी तो फोडला. तितक्यात तो दाढीवाला भिकारी ती साडीची पिशवी ओढून घेत साडीच्या दुकानाकडे सरसावला. आता केवळ मोगऱ्याचे गजरेच हिच्या हातात उरले होते. तिने पटकन ते तिच्या विखुरलेल्या केसांना एकत्र गोळा करून माळले. ते माळताच तीचा तो लंगडा नवरा हाताने इशारा करत मोठ्याने ओरडला.. राणी खूप सुंदर दिसतेस ! आणि त्या मोगऱ्याच्या मनमोहक सुगंधामुळे तिचं बाळ तीला अजूनच बिलगत होतं.
गाडी चालवत विजय आणि करुणा हे सर्व दृश्य त्यांच्या अश्रू मिश्रित डोळ्यांमध्ये टिपत होते.
