एका वृक्षाचं मनोगत
एका वृक्षाचं मनोगत
मी उभा आहे इथे वर्षानुवर्षे,
माझी मुळं जमिनीत खुप खोलवर रुतलेली आहेतं,
म्हणुनच मला उपटण्याचं सामर्थ्यं झालं नाही कदाचित, बिल्डिंग उभारण्यासाठी,
कष्ट झाले असते ना उपटण्याचें...
मी उभा आहे इथे एकटाच,
अगदी लांब कुठेतरी आहेत माझे भाई बंधू,
मध्ये मध्ये आलेल्या या काँक्रीटच्या गर्दित दिसत नाहीत आता मला ते आणि त्यांना मी,
मग मी माझ्या भाषेत बोलणार तरी कुणाशी?
बाजुलाच असलेल्या मोठ्या रस्त्यांवरून भरधाव जाणाऱ्या गाड्या आणि त्यांचे कर्णकर्कश्च आवाज ,हाच काय तो विरंगुळा...
माझ्या सावलीत असलेल्या बाकड्यावर एक आजी येऊन बसते,पांढऱ्या केसांची,
तिची अडगळ होते म्हणे घरी तिच्या मुलांना, म्हणुन ती बराच वेळ बसते ईथे, माझ्या सावलीत,
तिला सावली देण्याचं पुण
्यं हेच काय ते समाधान,
मलाही वाट्टं तिच्याशी खुप बोलावं पण माझ्या पानांची सळसळ काही तिला समजत नाही आणि मलाही तिचं पुटपुटणं काही कळत नाही...
तिची निघायची वेळ झाली की ती उठते,क्षणभर माझा आधार घेते...
तिच्या सुरकूतल्या हातांचा मायेचा स्पर्श काही काळ माझं एकाकीपण घालवतं...
ती गेल्यावर मग मला ओढ लागते ती मावळणाऱ्या सुर्याची,
ओढ लागते ती,संध्याकाळ झाल्यावर माझ्या विसाव्याला येणाऱ्या असंख्य पक्षांची,त्यांच्या किलबिलाटात मग मला त्या मोटारिंचे आवाज ऐकु येत नाहीत,
त्यांची चिवचिव माझ्या असण्याला,माझ्या अस्तित्वाला अर्थ देऊन जाते..
अगदी पान अन् पान व्यापून टाकणारे ते असंख्य पक्षी माझ्यात त्यांचा निवारा शोधतात ,की मी त्यांच्यात माझा आश्रय शोधतो,
हे काही कळत नाही...