एक विसावा या वळणावर
एक विसावा या वळणावर
गौरी गणपती विसर्जन झाले तसे मृणाल नि आपले सामान आवरायला घेतले...मकरंद च्या डोळ्यात पाणी जमा झाले. खरंच! आपण चुकलो....? आयुष्यभर मृणालला हिणवले... इतर मैत्रिणींची तिच्याशी तुलना करत राहिलो....तुला काय येतंय? फक्त घरदार, चुलमूल ह्या पलीकडे तुझं कधी विश्वच नव्हतं का? घशात आलेला आवंढा गिळून....मनू...ऐक ना! प्लीज...आता इथेच राहा. नको जाऊ ग!..आश्रमात! मला एकट्याला एवढं मोठं घर खायला उठतं! सुधीर, सीमा...एकदा सकाळी ऑफिसला गेले की घरात कोणीही नसते...नाही म्हणायला... पल्लवी असते पण तिचा अभ्यास, क्लास, कॉलेज यात ती बिझी!....मृणाल नी हसूनच मकरंदकडे पाहिले...पण त्याला न दुखावता त्याच्या प्रश्नाला बगल दिली...अरे! असं काय करतोस दर महिन्यालाएक फेरी असते ना माझी घरी...आणि उद्या माझ्या खास मैत्रिणीचा प्रीती चा वाढदिवस आहे. शिवाय आश्रमात अनेक प्रोग्रॅम्स मी आयोजित केलेत. गेस्ट येणारेत....ह्या सगळ्याची जबाबदारी मी घेतली आणि आता मला थांबणे शक्य नाही. शिवाय तुला वाटले तर तू भेटायला येऊ शकतोस ना!! असा किती लांब आहे आश्रम तासभर चा प्रवास, फक्त!!.... मकरंद घरादारासाठी राबणारी मी एक मुर्ख बाई होते रे, मला स्वतःची अशी स्पेस कधी नव्हतीच! किंबहुना मी स्वतःलाच त्या घराच्या चौकटीत गुरफटून घेतलं होतं....पण आता ह्या जबाबदारीतून मी मुक्त झालेय!!....म्हणूनच स्वतःच विश्व निर्माण करण्यासाठी ह्या मोकळ्या आभाळाकडे पाहून फिनिक्स भरारी घ्यायचे स्वप्न पाहतेय!...आणि आता ह्या वयात माझ्याकडे कोणी पाहणार नाही...सो तुला संशय यायला नको म्हणून म्हटले हा, रागावू नकोस!!....मृणालने मारलेला शालजोडीतून जोडा मकरंद ला चांगलाच झोंबला. आता हिच्याशी वाद घालण्यात किंवा हिला थोपविण्यात काहीच अर्थ नाही हे त्याने ओळखले. आयुष्याच्या या टप्प्यावर तिला नातेवाईक, मित्र - मैत्रिणी, स्नेहीजन यांची भक्कम साथ मिळत होती. मुळात आपणच चुकत आलो...कोणत्या तोंडाने तिच्याकडून अपेक्षा करणार? सुधीर व सीमा चा तिला फुल सपोर्ट होता.सीमा ने पुढाकार घेऊन सासूबाईंच्या, मैत्रिणीचा प्रीती चा सल्ला घेऊन हा निर्णय घेतला. प्रीती वकील होती, महिलांच्या प्रश्नांची जाण त्यांना होती. त्यांची आयुष्यभर होणारी कुचंबणा यासाठी ती झटत होती...म्हणूनच सीमा ने ठरवले आपल्या सासूबाईंना आता थोडी मोकळीक द्यायची. मृणालने तिच्या ह्या निर्णयाचे मनापासून स्वागत केले....आता ह्या वेळेचा उपयोग स्वतःचे छंद जपायला मिळणार म्हणून ती आनंदली.
मृणालची गाडी विसावा आश्रमाच्या दिशेने निघाली. तशी ती प्रवासात.... विचारमग्न झाली. कितीही मनाने ठरवले की वर्तमानात जगायला शिका, तसे आपण वागतो, पण भूतकाळ विसरू शकत नाही....!! मृणाल लग्न होऊन सासरी आली. माहेरी इनमिन तिघे ममी, पप्पा व ती एकुलती एक!! पण सासरचा गोतावळा प्रचंड मोठा! सगळ्यांचे करता करता ती पार थकून जाई. शिक्षणात हुशार असल्याने नोकरीच्या अनेक संधी मिळत होत्या. परंतु घरी सासू - सासरे, दीर, नणंद ह्यांच्यासाठी ती आयतीच कामवाली मिळाली. तसेच मकरंद चा स्वभाव ही आड येत होता. पैशाला कमी नव्हते पण बाईच्या जातीने कसे गरज असेल तरच घराबाहेर पडावे ह्या बुरसटलेल्या विचारांचे सासर पदरी पडले बाईने अगदी गृहकृत्यदर्श असले पाहिजे....शिवाय त्याचा संशयी स्वभाव!! देखण्या मृणालचे कोणी कौतुक केलेले ही त्याला खपत नसे. लग्न झाल्यावर कोणाशी बोलावे कसे वागावे ह्याचे बाळकडू शिकवायला सासू - सासऱ्यांची जोड होतीच. मनात आलेले विचार झटकायचा मृणालने खुप प्रयत्न केला पण घरी जाऊन आले की ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवतात....!!सुधीर चा जन्म झाल्यावर मकरंदच्या स्वभावात थोडा फरक पडेल असे वाटत होते, पण....ती ही आशा मावळली.... छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण कटकट!शेवटी तिने मनाशी निश्चय करून स्वतःत बदल केला. आहे त्या परिस्थितीत जुळवून घ्यायचे. सुधीरच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. मकरंद सतत टूर वर.....तरी देखील हिने सगळी कर्तव्ये पार पाडली. सुधीर CA होऊन स्थिरसावर झाल्यावर त्याची मैत्रीण सीमा शी विवाहबद्ध झाला. सासू सासऱ्यांच्या माघारी, तसेच सुनबाई घरी आल्यावर तरी मकरंदचा स्वभाव बदलेल अगदी वयोमानाप्रमाणे म्हणून मृणाल आशावादी होती, पण.....!!! सून सीमा समोर होणारा सततचा पाणउतारा पाहून मृणाल मूक अश्रू ढाळत!! नात पल्लवी चा जन्म झाला तिचे बालपण वगैरे सरले तसे वयाच्या पंचावन्न व्या वर्षी मृणालने विसावा वृद्धाश्रमात राहून मैत्रीण प्रीती च्या समाजसेवेला हातभार लावला. मकरंद साठी हा मोठा धक्का होता! अगदी भांडणात नुकतेच गेलेल्या तिच्या वडिलांचाही उद्धार झाला कारण माहेरची इस्टेटीची ही एकटीच वारसदार ना!!
मृणाल ला आठवले सासरी दर महिन्याला सक्तीने चार दिवस पाळीच्या काळात बाजूला बसावे लागायचे....त्या काळात तिने थोडावेळ काढून कथा, कविता लिहिल्या. आपली आवड, छंद जोपासायला मिळतो म्हणून ती तिच्या या सखीची वाट बघत, पण त्याही काळात पूर्वीच्या रितीरिवाजाप्रमाणे कोरडी कामे जसे धान्ये निवडणे वगैरे... हिच्याकडून करून घेतली जात. शिवाय आयते जेवायला देताना सासूबाईं ची चिडचिड....! नंतर तिने ह्यावर तोडगा काढून फक्त या काळात तीन दिवस माहेरी सोडायची परवानगी मकरंदकडून मिळवली. माहेरी आली की मृणाल आपली लिखाणाची बरीच आवड जोपासत. सासरी हे आर्टिकल न्यायला ही बंदी!काय फालतू वेळ घालवतेस....हे असले फुकटचे उद्योग का करतेस? ह्यातून तुला पैसे मिळणार का? असे अनेक बोल ऐकावे लागत. हे सगळे आठवून मृणाल च्या डोळ्यातून अलवार अश्रू ओघळत होते...पण आता मागे बघू नकोस मृणाल ह्या अश्रूंची आता फुले झालीत अगदी ताजी टवटवीत अशी!! मनाने फ्रेश हो! तुझ्या पहिल्या वहिल्या कादंबरी ला मिळालेला पुरस्कार..तुझे होणारे कोडकौतुक, नावलौकिक पाहून मकरंद हबकलाय हे लक्षात घे!! मृणाल चे अंतर्मन तिला बजावत होते. आत्ता कुठे तुझे जग विस्तारतेय. आज तुझ्या कथा विकत घ्यायला डायरेक्टर तुझ्याकडे येतात. हीच संधी आहे तुला पुढे येण्याची!!.....स्वतःची ओळख निर्माण कर....जुने दिवस विसर...नको त्या आठवणी मनात आणूस!!त्यात गुंतून पडू नकोस!! Yes!! My own space ही हवीच की, म्हणून ती स्वतःशीच हसली, पण मृणाल हे ही विसरू नकोस तू तुझी स्वतःची स्पेस राखताना एक आई, बायको, आजी आहेस ह्याचे भान राख. हो, हो नक्कीच!!....स्वतःच्या मनाला पुन्हा पुन्हा बजावत मृणाल....... विसावा वृध्दाश्रमाच्या पायऱ्या चढत होती....अगदी मनात नसतानाही.... असतानाही!....या द्विधा अवस्थेत...!
