Shriya Deshpande

Others

4.1  

Shriya Deshpande

Others

एक व्हॅलेंटाईन डे असाही..

एक व्हॅलेंटाईन डे असाही..

5 mins
478


"आप्पा... हे घ्या चहा. सोबत खारी पण आणली आहे..तुम्हाला आवडती ना.." निशा आप्पांची सून त्यांच्यासाठी चहा घेऊन आली होती....

"आप्पा काय झालं? काय शोधताय तिथे गुलाबाच्या झाडात? सांभाळून हा...काटे लागतील झाडाचे.."

निशाच्या आवाजाने आप्पा स्वतःच्या विचारातून बाहेर आले..

"काही नाही गं.. असच बघत होतो गुलाबाला फुल आलाय का ते..आजकाल त्याला जास्त फुलं येत नाहीत असं दिसतंय..." आप्पा थोडं अस्वस्थ होत म्हणाले.

" जाऊ दे ना आप्पा.. येतील तेव्हा येतील..आपण काय करणार त्याला..." निशा आपल्या टेरेस गार्डनमधल्या सगळ्या रोपंकडे एक नजर टाकत म्हणाली..

"अजय कुठाय? आवरलं का त्याचं? आणि मुलं उठली का? " आप्पांनी चहा घेताना विचारलं..

" अजय आवरतोय..मुलांना मी तयार केलंय..दूध पित आहेत..तुम्हाला हाक मारली तर तुमचं लक्ष नव्हतं, म्हणून इथे बाल्कनीत आले.." निशा किचनमध्ये जात म्हणाली..

" आरु , मनू झाला का दूध पिऊन..चला देवाला नमस्कार करा..हे घ्या तुमचे टिफिन..सगळं संपवायचं आहे..ओके? आवरा पटकन.. स्कूलबस ची वेळ झाली.." निशा त्यांना बॅग देत म्हणाली..

सगळ्यांना बाय करून मुलं निघाली तसं ती स्वतःच आवरायला रूममध्ये गेली..

"अजय आज आप्पांच काहीतरी बिनसल आहे वाटलं मला..खूप अस्वस्थ दिसत आहेत..." निशा आवरता आवरता अजयला तिच्या नवऱ्याला म्हणाली.

"निशू, अगं किरकोळ असेल काहीतरी..तू काळजी करू नको..चल मला ब्रेकफास्ट दे पटकन.." अजय डायनिंग टेबल जवळ येत म्हणाला..

"हे घे पोहे आणि तुझी कॉफी" निशा कप देत म्हणाली

"निशु, मला आज लवकर जायचं आहे..तुझं झालंय का? तुला जाताना ड्रॉप करतो.." अजय पोहे खात म्हणाला..

"अं... नको...मी थोडं लेट जाणार आहे..तू जा पुढे तुझं झालं की.."

निशा स्वतःच्या विचारातच म्हणाली..

"झालं माझं..निघतो मी..बाय" तिला हग करून ऑफिसला गेला..

थोड्यावेळ शांतपणे बसून मोबाईल बघावा म्हणून तो हातात घेतला तर तीच लक्ष आजच्या डेटकडे गेलं.."अरे आज 14 तारीख आहे..कामाच्या व्यापात माझ्या लक्षातच रहात नाही कुठली तारीख आहे ते..म्हणूनच आप्पा आज असे......" स्वतःशीच बोलता बोलता गप्प झाली...मनात काहीतरी ठरवून ती उठून आप्पांच्या खोलीत गेली..

"माई, ऐकतेस का ग? आज गुलाबाचं एकही फुल नाहीये झाडाला..बाहेर पण जवळ कुठे मिळत नाही..काय करू मी सांग आता..? अजयला सांगू का..? त्याला कुठे वेळ असतो पण..कामाच्या गडबडीत विसरेल तो...काय करू गं माई मी..? आज पहिल्यांदा असं झालंय बघ...😢" आप्पा माईसोबत बोलत होते

"आप्पा मी थोड्यावेळ बाहेर जाऊन येते...दुपारी आपण सोबतच जेवण करू.." निशा

"का गं.. आज ऑफिस नाही का?" आप्पा

"आज मी घरातूनच काम करेन..तस ही आज जास्त काम नव्हतं मला..मग म्हणलं आज घरीच थांबू..🙂" निशा

मी घरी आहे म्हणल्यावर आप्पांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपला नाही तिच्या नजरेतून..

"बरं..लवकर ये...हळू चालव गाडी.." आप्पा

हो म्हणत किल्ली घेऊन निशा घरातून बाहेर ही पडली..

संध्याकाळी...

" आप्पा, हे घ्या कपडे.. हा ड्रेस घाला आत्ता आणि लगेच तयार व्हा.." निशा आप्पांना ड्रेस देत म्हणाली..

" अगं पण हा ड्रेस कशाला...? "आप्पांच बोलणं पूर्ण व्हायच्या आत ती खोलीतून बाहेर गेली..

थोड्यावेळाने आरव आणि मनस्वी आप्पांना घेऊन बाहेर हॉलमध्ये आले..

"सरप्राईज!!!..." सगळे एकसाथ म्हणाले..

हॉलमध्ये छान सजावट केली होती..फुगे लावले होते..मधे टेबलवर मस्त केक ठेवला होता..आणि बाजूलाच माईचा फोटो...

" माईंची आठवण येते ना?" त्यांच्या डोळ्यात पाणी बघून निशा म्हणाली..

" तुला कसं कळलं गं.. आणि हे सगळं काय आहे...कधी केलं हे..?" आप्पा आश्चर्याने म्हणाले..

" सकाळपासून तुम्ही अस्वस्थ होता..मग नंतर लक्षात आलं की आज 14 फेब्रुवारी आहे..तुमच्या आणि माईंच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस..मग मी अजयला फोन करून तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं" निशा

" तरीच हे दोन बोके मला हॉलमध्ये येऊ देत नव्हते.. काय रे बोक्यांनो आता लगेच आईच्या टीममध्ये काय..पार्टीबदलू.." आप्पा हसत म्हणाले..

मुलं पळत त्यांच्या खोलीत गेली...

"हो आप्पा मी तर विसरलोच होतो..निशूने आठवण केली.." अजय आप्पांना चेअरवर बसवत म्हणाला..

"आरु, मनू कुठे आहात? बाहेर या पटकन...काय चाललंय तुमचं? " निशाने मुलांना हाक मारली..

"आम्ही हे आणायला गेलो होतो रूममध्ये..." मुलं बाहेर हॉलमध्ये येत म्हणाली..त्यांच्या हातात 2 कार्ड्स होते..त्यांनी एक ग्रीटिंग कार्ड आप्पांना दिलं आणि एक निशा आणि अजयला दिलं...

" मनू अगं हे काय, किती छान बनवलं आहेस... कधी केलं हे तू?" निशा

"तू दुपारी सांगितलंस ना संध्याकाळच्या प्लॅन बद्दल..मग मी माझा अभ्यास झाल्यावर हे बनवलं तुमच्यासाठी..आणि आरु ने पण हेल्प केली मला." मनू

"खूप सुंदर बनवलं आहे..थँक्स बेटा.." अजय म्हणाला "आणि माझ्याकडे पण एक सरप्राईज आहे सगळ्यांसाठी.. मी पुढच्या वीक मध्ये 4 -5 दिवस सुट्टी घेतली आहे.. मस्त पिकनिक ला जाऊ कुठेतरी...आणि आप्पा तुम्हीपण येणार आहात सोबत..मी काही एक ऐकणार नाही तुमचं..."

ये.... मुलं जोरात ओरडत अजयला बिलगली..

"मधेच कस काय सुट्टी आणि पिकनिक..?" निशा

"अगं निशु तूच म्हणतेस ना सारखं की तुला आमच्यासाठी वेळ नसतो, सारखं काम आणि ऑफिस.. मग घेतली सुट्टी..तू इतक छान सरप्राईज प्लॅन करते मग म्हणलं आपणही करू.. मग कसं वाटलं.." अजय

" गुड.. थँक यू सो मच.." निशा

"वेलकम माय डियर बायको...तुम्हारे लिये तो जान भी हाजीर है... तो सुट्टी क्या चीज है... " अजय फिल्मी स्टाईलने म्हणाला..

त्याच्या या डायलॉगवर सगळ्यांनी हसत टाळ्या वाजवल्या...निशाला थोडं लाजल्यासारखं झालं.."मी आलेच.." म्हणत ती तिथून किचनमध्ये गेली आणि फ़ुलं घेऊन आली..

"आरु बेटा ही घे फुलं..सगळ्यांना दे" निशा

आरवने फुलं घेतली आणि सगळ्यांना एक एक दिली..ती गुलाबाची फुले पाहून आप्पांच्या चेहऱ्यावर कोण आनंद पसरला... आणि ते जुन्या आठवणीत रमले...

" आज 14 फेब्रुवारी...60 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी मी तुमच्या माईंना बघायला गेलो होतो..तेही लग्न ठरल्यावर..त्यावेळी इतकी मोकळीक नसायची आम्हाला..चोरून भेटावं लागायचं..त्यानंतर लग्न होऊन ती माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्यच होऊन गेली..प्रत्येक चढ उतारात तिने खूप मोलाची साथ दिली..मी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं, तेव्हा घरातून खूप विरोध झाला..मग आम्ही ते घर सोडलं ...पण ती खंबीरपणे पाठीशी होती..सुरवातीला कधी कधी महिनाअखेरी पैसे नसायचे, किराणा संपायचा पण कधी कसली तक्रार नाही की काही नाही..नेहमी आनंदी असायची..तिला गुलाब खूप आवडायचा..घरात खास तिच्यासाठी म्हणून मी जमेल तितकी गुलाबाची रोप आणायचो..ती म्हणायची तुम्ही इतक्या आठवणीने माझ्यासाठी ही रोपं आणता.. हेच खूप आहे माझ्यासाठी..या सगळ्यात तो दिवस प्रत्येक वर्षी साजरा करत गेलो..ना चुकता..अगदी मागच्या वर्षी ती जाईपर्यंत.."

निशाने त्यांना थोडं पाणी प्यायला दिलं..

"नंतर नंतर हे व्हॅलेंटाईन डे वगैरे फॅड निघालं.. तर मी तिला गुलाबाचं फुल देताना चिडवायचो..बघ आपलं बघूनच हे निघालंय.."तुमचं आपलं काहीतरीच" असं म्हणून लज्जेने झालेलं तिच्या गालावरच गुलाब अजून आठवतोय मला..

आज एकही फुल नाही आलं झाडावर.. तर असं वाटलं की तीच प्रेम कमी झालंय.." आप्पा डोळे पुसत म्हणाले

"पण नाही..बघितलंस का माई..तुझं प्रेम कमी नाही झालं..बाकीच्यांचं माझ्यावरचं प्रेम वाढलंय..आज मी खरंच खूप भाग्यवान आहे..तू माझ्या जीवनात आलीस..पैसा, प्रतिष्ठा मिळाली.. इतकं प्रेम देणार कुंटुंब लाभलं..अजून काय हवं..त्या परमेश्वराचे आभार मानावेत तितके कमी आहेत..आत्ता मी तुला मिस करत नाहीये..तू हे आजचं सेलिब्रेशन मिस करत आहेस बरं का..कोण सांगितलं होतं इतक्या लवकर देवाच्या घरी जायला..?.." आप्पा हसत हसत म्हणाले

निशा आणि अजयचे पण डोळे भरून आले...

"केक कधी कापायचा..किती यम्मी केक आहे.. माझ्या तोंडाला तर कधीपासून पाणी सुटलंय..." असं आरव म्हणताच सगळे भानावर आले..

" हो बेटा.. कापू या हो..एक मिनिट.."आप्पा असं म्हणत खुर्चीवरून उठले...एक गुलाबाचं फुल माईंच्या फोटोसमोर ठेवलं.

" तुझ्यासमोर हे गुलाबाचं फुल अजूनही फिकच आहे..तू होतीस तेव्हा ही माझं आयुष्य या फुलासारख सुगंधित केलंस आणि गेल्यावरही तू या मुलांवर केलेल्या संस्कारातून आमचं आयुष्य सुगंधित करत आहेस.."

"चला केक कापू या..".. आपल्या थरथरत्या हातात सुरी घेत आप्पा म्हणाले.. त्यांचा तो थरथरणारा हात बघून आरु आणि मनू ने त्यांचा हात पकडला....आधारासाठी...निशाने आपला हात त्यांच्या खांद्यावर ठेवला...आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी...

हे बघणाऱ्या अजयच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान होतं आणि माईंच्या फोटोतल्या चेहऱ्यावरही..आणि खिडकीतून डोकवणारी टेरेस गार्डनमधल्या झाडावरची एक गुलाबाची कळी हा सोहळा बघून हळूच गालातल्या गालात हसली...


Rate this content
Log in