Sanjay Gupte

Others

2  

Sanjay Gupte

Others

एक सक्षम महिला

एक सक्षम महिला

5 mins
638


महिला दिन म्हणलं की ‘नावाजलेल्या कंपन्यामधल्या नावाजलेल्या महिलांचे ‘ फोटो व मुलाखती ही अगदी नेहमी होणारी गोष्ट आहे. अगदी दरवर्षी, नियमीत प्रमाणे !

पण या नावाजलेल्या कंपन्या ज्या महिलांच्या प्रगतीचे दाखले देऊन आपली पाठ थोपटून घेतात त्या महिला बहूतेक वेळा मुळातच खूप शिकलेल्या व सर्व क्वालीफिकेशन घेऊनच आलेल्या असतात. अगदी रेडी मेड. आणि त्या त्यांच्या गुणांवरच पुढे जातात. कंपन्या फक्त ‘महिला असण्याचा तोटा’ करियर ग्रोथमध्ये येणार नाही असे वातावरण करत असतात. आणि या अश्या,थोड्याशा पोषक वातावरणात त्या ‘ग्लास सिलींग’ तोडतात !

पण आपल्या आर्थिक क्षमतेत खूप मोठा वाटा हा MSME म्हणजे छोट्या व लघु उद्योगांचा आहे. त्यांत एम्लॅयमेंट पण बरीच आहे. मात्र तिकडे या बाबतींत जरा गडबडच आहे. मुली अक्षरश: रोजंदारीवर काम करत असतात. म्हणजे पिस रेटवर. इतके उत्पादन तर इतके पैसे. ना प्रोव्हीडंट फंड ! ना ग्रॅच्यूइटी !कोणतेही इतर फायदे नाहीत. फार तर ESI वगैरे असतो. पण या मुली कामाला वाघ असतात. मुंबईचे अख्खे SEEPZ या मुलींच्या कमी पगाराच्या बळावर विदेशी बाजारपेठ काबीज करून चालू आहे. हजारांच्या संख्येने तिथे मुली काम करतात. गिरणी कामगारांच्या त्या दुर्दैवी संपानंतर त्या कामगारांच्या धिटुकल्या मुलींनी अशी थेट वसईपर्यंतच्या छोट्या छोट्या कंपन्यात कामे करून आपल्या आईवडीलांचा व नंतर स्वत:चा संसार अक्षरश: खेचलाय ! त्या मुली दहावी , फार तर बारावी शिकलेल्या असत. पण जिद्दीने त्यांनी त्या संपात वाट लागलेल्या संसारांना परत उभारले. त्यांचे मात्र कोणी कौतुक केले नाही.

पण म्हणतात नां , नियम म्हणलं की अपवाद असतोच ! अश्याच एका “अपवादा” बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली.

वर्ष २००२. मुंबईच्या सिप्झ मधल्या एका कंपनी बरोबर आम्ही नव्याने बिझनेस सुरू करत होतो. ते प्रोडक्ट आधी ती कंपनी इम्पोर्ट करत होती. आम्ही भारतात तयार करून इंम्पोर्ट substitute करणार होतो. अर्थातच पहिल्या लौटची अगदी कसून तपासणी करून पाठवला होता. रात्रीत मुंबईला पोहचून पहाटेच माल डिलीव्हर करून सकाळच्या पहिल्या शिफ्टला तो माल वापरला जाणार होता. मी सकाळी पुण्यातल्या आमच्या कार्यालयात पोहचलो नाही तर फोन, ताबडतोब SEEPZ मघ्ये या , लाईन थांबल्येय ! क्वालीटी इन्सपेक्टरला परत विचारले , काय झाले असेल?, तो तर म्हणत होता , सर, असं रेजेक्शन व्हायला नको कारण सॅम्पल साईझ दुप्पट घेतला होता. त्याला घेतला बरोबर, सर्व ड्राईंग वगैरे घेऊन डायरेक्ट सिप्झला निघालो. पोहचल्यावर तिकडचा शिफ्ट इंजिनीयर लाईन वरच घेउन गेला. गेल्या गेल्या ५० मुलींनी गराडा घातला व एकदम बोलायला लागल्या. मराठीतच बोलत होत्या पण ५० बायका एकदम बोलायला लागल्यावर मला कळेनाच काय भानगड आहे ? शेवटी एका मुलीने सगळ्यांना गप्प केले व काय प्रोब्लेम आहे त्याचे वर्णन केले. आमचे प्रोडक्ट त्याच्या असेंब्लीत वापरले जाणार होते पण ते वापरले की त्यांची लाईन स्लो होत होती. त्यांचा पिस रेट कमी होणार म्हणून त्या चिडल्या होत्या ! बाप रे , चिडल्या म्हणजे चवताळल्याच होत्या ! त्यांच्या मते ह्या नव्या कंपनीचा माल ताबडतोब बंद करा ! त्या मुलीने सगळ्यांना शांत केलं आणि मग आम्ही व्यवस्थित बोलायला लागलो. समोरचा माणूस , म्हणजे मी , मराठीतच बोलतोय म्हटल्यावर जरा अजून शांत. मग प्रोब्लेम कळला. पॅकींग मधून आमचे प्रोडक्ट काढायला त्यांना जास्त वेळ लागत होता. त्यामुळे त्यांचा जास्त वेळ जाऊन लाईन स्लो होत होती. त्यामुळे त्यांना दर दिवसाचे पेमेंट कमी होणार ही त्यांची काळजी होती. कारण असे होते की आमचे प्रोडक्ट सिरॅमिक सारखे असल्यामुळे व मुंबई पर्यंतचा प्रवास ट्रकने असल्यामुळे आम्ही पॅकींग जरा जास्तच टाईट केले होते. त्यावरची उपाय योजना अगदीच सोपी होती. मी फोन वरून पुण्याला फॅक्टरीत कळवून आवश्यक बदल करून नवीन लोट रात्रीच परत पाठवायला सांगितले. तो पर्यंत इकडे सुरेखाने – त्या मुलीचे नाव सुरेखा होते – सगळ्यांना नीट समजावले की माल खराब होऊ नये या काळजीपोटी सरांनी जास्त पॅकींग वापरले होते. पण आता ते नीट करतील. मी रात्री मुंबईलाच राहीलो व सकाळी परत लाईनवर ! तो पर्यंत आमचा माल डिलीव्हर होऊन लाईनवर पण आला होता. अर्थातच प्रथम सुरेखाला भेटलो. तिने परत सगळ्यांना एकत्र बोलवले. त्यांचा प्रश्न सुटला होता! मग मी त्यांना आमच्या प्रोडक्टने त्यांच्या हाताला कशी इजा होणार नाही हे आमचे वैशिष्टय सांगितले. त्यांचा चहा व नाश्ता आला.त्यांच्यातच बसून मी चहा घेऊन थोड्या गप्पा मारून निघालो. पण जाण्याआघी कंपनीच्या CEO ला भेटलो. त्याला सुरेखाने केलेल्या मदतीबद्दल सांगितले व आभार मानले. तो म्हणाला की त्या मुलीत लिडरशीप आहे व हुषार आहे मात्र पुढे ती युनियनच्या मार्गाने गेली नाही तर काही तरी करता येईल.

महिन्याभराने परत कसं काय चाललंय हे बघायला गेलो. त्या वेळी आवर्जुन सुरेखाला भेटलो. CEO चे तिच्या बद्दलचे मत सांगितले व थोडा सल्ला दिला. ती म्हणाली, सर विचार करते.

CEO ने आपला शब्द पाळला. सुरेखाला प्रथम इंग्लिशच्या क्लासला घातले, मग कमर्शियल डिप्लोमा करवला, मग कोम्प्यूटरच्या क्लासला घातले. सर्व कंपनीच्या वेळेत व खर्चात. सुरेखाची बदली परचेसला झाली. हळूहळू प्रगती करत ती परचेसची मुख्य झाली. जगभरातून माल खरेदी करायची. मस्त इंग्रजीत निगोशीएट करायची. आमच्या कंपनीत तिला “ सुरेखा मॅडम “ असे नाव होते. पण मी सुरेखा मॅडम म्हणलेले तिला आवडायचे नाही.मी फक्त “ सुरेखा “ म्हणायचे ! जरी आमचा मॅनेजर हा कस्टमर हॅन्डल करत असला तरी माझी वर्षातून दोनदा विजीट व्हायचीच. CEO ची भेट झाल्यावर नंतर सुरेखाच्या क्युबीकलमध्ये परत चहा व्हायचा.एकदा सांगत होती की संसार व शिक्षण दोन्ही करताना खुप दमछाक व्हायची पण सासुबाईंनी संभाळून घेतले म्हणून जमले. प्रत्येक व्हिजीटमघ्ये होणारी तिची प्रगती बघून समाधान नक्कीच वाटायचे !

सुरेखामघ्ये असलेले leadership व communication चे गुण तिच्या कंपनीने हेरले. त्या बरोबर त्यांना तिच्यातली परिस्थिती बदलून पुढे जाण्याची इच्छा पण जाणवली. एक चांगली असेंब्ली वर्कर चांगली परचेस मॅनेजर झाली. तिची आर्थिक स्थिती तर खुपच सुधारली !

” सुरेखा मुलगी आहे “ याचा काहीही विचार न करता तिच्या कंपनीने फक्त तिचे गुण हेरले. त्या गुणांना अनुरूप व त्यांना हवे असलेले शिक्षण देऊन, तिच्या हाताला धरून, तिला सक्षम केले !

आणि सुरेखा ?

परचेसचे काम करताना येणाऱ्या प्रलोभनांना कधीही बळी न पडता व SEEPZ मधल्याच अनेक कंपन्यांच्या “जास्त पगाराच्या” निमंत्रणाकडे लक्ष न देतां ती कंपनीशी एकनिष्ठ राहीली.

अगदी सक्षमपणे !


Rate this content
Log in