दुसर माहेर
दुसर माहेर
मानसीबाईंचा लेक विलास लग्नाला उभा होता. मुलींची स्थळे पाहाणे चालू होते.मानसीबाईंची खास मैत्रिण लीनाने सरोजचे स्थळ विलास करता आणले होते. मुलगी त्यांच्या माहितीतील आहे असे सांगितले होते. सरोज सर्व द्रुष्टीने योग्य वाटल्याने विलासने मुलगी पाहाण्याचा निर्णय घेतला.
आजकालच्या प्रथेनुसार आईवडीलांबरोबर घरी मुलगी पाहाण्याचा कार्यक्रम न होता दोघांनीही सोयीच्या हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरविले. विलास ठरलेल्या वेळी हॉटेलमध्ये पोहोचला सरोज त्याची वाट पहात होतीच. सुरवातीचे हाय हॅलो झाल्यावर एकमेकांचे विचार समजून घेण्याच्या दृष्टीने त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. विलासने सरोजला विचारून खाण्याची ऑर्डर दिली. 'मुलगी सावळी पण स्मार्ट दिसते' असा विलासच्या मनाने प्रथमदर्शनी कौल दिला. खाण आल्यावर गप्पांचा ओघ मंदावला.नंतर आपल्याला एक धक्कादायक गोष्ट ऐकावयास लागणार आहे याची विलासला अजिबात कल्पना नव्हती.
खाणे झाल्यावर सरोजने बोलण्याचील सूत्रे आपल्या हातात घेऊन विलासला म्हटले "आता मी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐक.लांबण न लावता मी तुला सांगते कि ही आपली पहिली व शेवटची भेट आहे, कारण दुसरी एक व्यक्ती 'जीवनसाथी' या नात्याने माझ्या आयुष्यात आहे. काही व्यक्तिगत कारणांमुळे ही गोष्ट मी आमच्या घरात कोणालाच सांगितली नाही. आणखी काही काळ तरी ही गोष्ट आम्हाला उघड करता येणार नाही. त्यामुळे तुला विनंती आहे कि तू देखील कोणालाच ही गोष्ट सांगू नकोस. कृपया तुझ्यात काही कमी आहे असे समजू नकोस. ज्या लीनाबाईंनी तुझे स्थळ आणले ती माझ्या आईची जवळची मैत्रिण असल्याने तुला हॉटेलमध्ये भेटण्याचा हा देखावा करणे मला भाग आहे. कृपया मला समजून घे.
लग्नाचे स्थळ म्हणून बघायला गेलेल्या मुलीकडून असे काही एैकण्यास मिळेल अशी अजिबातच कल्पना नसल्याने बिचारा विलास हबकूनच गेला.पण सुस्वभावी विलासने सरोजला तसे करण्याचे आश्वासन दिले व अवघडलेल्या मनस्थितीत सरोजचा निरोप घेतला, आणि घरी परतला. घरी परतल्यावर विलास आपल्या खोलीत निघून गेला. मानसीबाईंना ते जरा खटकले, पण बाहेरून आल्याने विलास थोडा कंटाळला असेल थोड्या विश्रांती नंतर आपण
त्यास सर्व विचारून घेऊच अशी मानसीबाईंनी आपली समजूत करून घेतली.
थोडा वेळ गेला तरी विलास आपल्या खोलीतून बाहेर आला नाही त्यामुळे न राहवून मानसीबाईंच विलासच्या खोलीत गेल्या. तो बेडवर लोळत पडला
होता.काहीतरी बिनसले असावे असा मानसीबाईंना अंदाज आला.त्यांनी विलासला विचारले " अरे डोक वगैरे दुखत का? मी जरा बाम वगैरे लावून चेपून देते. आत्ता बर वाटेल!" आईला वाटणारी माया पाहून विलास गहिवरून गेला. सरोजने 'ती' गोष्ट कोणालाही सांगू नकोस असे सांगितले तरी आईपासून ही गोष्ट लपवून ठेवणे शक्यच नाही याची विलासला जाणीव झाली. फक्त आईला हे कसे सांगावे हा यक्षप्रश्न त्याच्यापुढे होता. नकार सांगितला तर
योग्य कारण देणे आवश्यक होते.सरोज शिकलेली होती, दिसावयास छान होती शिवाय तिची नोकरीही चांगली होती असे असताना सरोजला नकार दिल्यास हा उगीचच मुली नाकारतो असा समज नातलगांत पसरला असता. त्याचा कोणताच दोष नसताना हा अवघड प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला होता.
आईला कमीतकमी त्रास होईल अशा प्रकारे ही कोंडी फोडणे जरूरीचे होते.शेवटी डॉक्टर ज्याप्रमाणे कडू गोळी साखरेच्या आवरणातून देतात त्याप्रमाणे विनोदाचा आधार घेऊन ही गोष्ट आईला सांगण्याचे त्याने ठरवले.विलास आईला म्हणाला " सिनेमात असतो तसा प्रसंग आज माझ्या बाबतीत घडला. अशी सुरवात करून सरोज बरोबर घडलेला सर्व प्रसंग त्याने आईला सांगितला. ते सर्व ऐकताच आईची प्रथम प्रतिक्रिया आश्चर्याची होती पण नंतर
त्याची जागा संतापाने घेतली.त्यांनी विलासला रागाने सांगितले कि " मला सरोजचा मोबाईल नंबर दे. मी तिला चांगलेच खडसावते. तिला इंटरेस्ट नव्हता तर तिने आधीच तसे कळवावयास हवे होते म्हणजे हा मनस्ताप टळला असता." त्या संतापून पुढे म्हणाल्या "त्यापेक्षा मी सरळ तिच्या आईशीच बोलते. आपल्या मुलीची थेरं आईला कळलीच पाहीजेत. आमच समाजातील प्रतिष्ठित कुटुंब आहे आमच्याशी ते असा व्यवहार कसा करू शकतात? "
विलासने आईची कशीबशी समजूत घातली. तो म्हणाला " यात सरोजच्या आईची चूक नसावी कारण घरातील सरोजच वागण व्यवस्थित असल्याने तिच्या आईला याची कल्पनाच आली नसावी.सरोजच्या बाबत म्हणशील तर तो मुलगा जातीबाहेरील असेल व वडील तापट स्वभावाचे असल्याने वा इतरही काही कारणांनी सरोजने याविषयी घरी काही सांगितले नसावे."
अशी समजूत काढल्यावर मानसीबाई थोड्या शांत झाल्या. पण त्यांच्या डोक्यातून तो विषय जाईना. त्यानी आपल्या मैत्रिणीला लीनाला फोन केला व विलासने सांगितलेला सर्व प्रसंग तीला सांगितला व अस स्थळ विलासकरता कस सुचवले असे जरा रागातच विचारले. लीनाबाईना हे सर्व एैकल्यावर खूपच धक्का बसला. कारण सरोज त्यांच्या ओळखीतील मुलगी असल्याने तिच्या बाबतीत असे काही असेल याची कल्पनाच त्या करू शकल्या नाहीत. त्यांच्याने घरी बसवेना तासाभरातच त्या मानसी बाईंच्या घरी आल्या.सुरवातीला मानसीबाईं त्यांच्याशी नीट बोलण्यासच तयार होतात.मानसीबाईंचे
पतीराज महेशराव देखील या सर्व प्रसंगामुळे नाराजच होते व घरातील एकूण वातावरण बिघडले होते. पण लीनाबाईनी डोळ्यात पाणी आणून देवाशपथ सांगितले कि त्यांना याची अजिबात कल्पना नव्हती. अशा रीतीने समजावल्यावर व त्यांची अनेक वर्षांची मैत्री लक्षात घेऊन त्या बऱ्याच शांत झाल्या.
पण आता पुढे काय करणार? यावर दोघींनी बराच विचार केला कारण सरोज देखील लीनाबाईच्या परिचयातील होती व तीचे आयुष्य नीट मार्गी लागावे म्हणून लीनाबाईनी मानसीबाईंच्या मदतीने एक योजना तयार केली. त्यात महेशरावांना देखील सामील केले. यासाठी प्रथम सरोजला विश्वासात घेऊन विलासच्या आईवडिलांच्या मदतीने तुझे तुझ्या प्रियकराबरोबर लग्न लावून देते असे आश्वासन दिले. प्रथम त्यांनी आपल्या बेतानुसार सरोजला लग्नाच्या बोलण्याकरता आपले आई-वडील प्रतापराव व प्रभाबाई यांच्यासह लीनाबाईच्या घरी येण्यास सांगितले. मानसीबाई व महेशराव तेथे अगोदरच आले होते. चहापाणी व ओळख वगैरे झाल्यावर लीनाबाईनी प्रतापरावांना विलास व सरोजच्या भेटीच्या वेळेच्या प्रकरणाची माहिती दिली. ते ऐकल्यावर प्रतापराव भडकले "आमची मुलगी सरळ चालीची आहे. तुमचा नकार असल्यास तसे सरळ सांगा." असे मोठयाने ओरडू लागले. "तिचे माझ्या मित्राच्या मुलाबरोबर लग्न लावतो" असे सांगू लागले.
तेव्हा महेशराव मधे पडले त्यानी प्रतापरावांना समजावले कि असे करून तुम्ही तुमच्या मुलीला दु:खी करालच पण ज्याच्यावर तिचे प्रेम आहे तो व ज्याच्याशी तिचा विवाह होईल तोही दु:खी होईल. याऐवजी तुम्ही सरोजला विश्वासात घेऊन मुलाची नीट माहिती काढा व योग्य वाटल्यास त्याच्याशी लग्न लावा. पण शेवटी मुलगी तुमची आहे तिचे आयुष्य वाया जाऊ नये म्हणून आम्ही हे धाडस केले.
हे सर्व ऐकल्यावर प्रतापराव नरमले. आपल्या कृतीचे काय परिणाम होतील हे लक्षात आल्यावर उभयतांनी मुलाची माहिती काढून मगच निर्णय घेऊ असे सांगितले व आभार मानून निरोप घेतला.
पंधरा दिवसांनी लीनाबाईंकडून सरोजचे लग्न तिच्या प्रियकराशीच ठरल्याची गोड बातमी मिळाली. नंतर प्रतापराव व प्रभाबाई मिठाई घेऊन महेशरावांच्या घरी आल्या व त्यांच्या कुटुंबीयांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. ते म्हणाले "चौकशीअंती मुलगा जातीबाहेरचा असल्याचे समजले. पण तो उत्तम रीतीने द्विपदवीधर झालेला आहे. पण नुकताच नामांकित कंपनीत अधिकारी पदावर लागला आहे पण प्रोबेशन काळ चालू आहे. स्वतःच्या घरासाठी बिल्डरकडे पैसेही भरले आहेत पण घर पूर्ण होण्यास वर्षभराचा कालावधी लागणार आहे. मुलगा जातीबाहेरील असल्याने, अजून घरदेखील तयार नाही त्यामुळे माझा रागीट स्वभाव पाहाता घाबरून काही कालावधीसाठी सरोजने हे गुपितच ठेवण्याचे ठरविले. पण आता लवकरच साखरपुडा
करण्याचे ठरविले आहे. तुमच्या योग्य सल्ल्यामुळे हे शक्य झाले त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आता मी रागीटपणा कमी करण्याचे
ठरविले आहे" असे म्हणून उभयतांनी महेशरावांचा निरोप घेतला.
नंतर सरोजने साखरपुड्याचे आमंत्रण देतेवेळी मानसीबाईंसाठी भारी साडी तर विलास व महेशरावांकरता उत्तम शर्ट व पॅन्ट पीस आणले कारण सरोजला दुसरे माहेर मिळाले होते.
