Vaibhav Kulkarni

Others

3  

Vaibhav Kulkarni

Others

दुधसागर

दुधसागर

8 mins
8.9K


(फेसाळणाऱ्या शुभ्र पाण्याचा अस्मानी धबधबा कि जणु दुधाची गंगा भगीरथाने पृथ्वीवर आणलेली)

पावसाळा आला कि सगळे जण ट्रेकर्स होतात, रस्त्यावर तुडुंब गर्दी, रस्त्याला खड्डे, आणि धबधब्यावर दारू पिऊन हुल्लडबाजी करणारे टोळभैरव या पेक्षा वेगळे चित्र नसते. हिरवागार शालू नेसलेली वसुंधरा, धुक्याची चादर या सगळ्या निसर्गकवींच्या कल्पना आहेत ज्या आपण इंस्टाग्राम, फेसबुक वर फोटोंमध्ये पाहू शकतो.

मागील वर्षी खूप ट्रेक्स केले पण धबधबा राहिला होता. दुधसागर ची सगळी माहिती काढली आणि या वेळेस जायचे ठरवले. ट्रेन नि जायचे असल्यामुळे रस्त्यात ट्रॅफिक मध्ये अडकण्याचा प्रश्नच नव्हता. २१ जुलै २०१८, शनिवारी गोवा एक्सप्रेसनी निघालो. पहाटे ३ वाजता चा अलार्म लावून झोपलो पण झोप लागत नव्हती बाहेर धो धो पाऊस कोसळत होता. शेवटी कॅसलरॉक स्टेशन वर सुचना ऐकली. दुधसागरला जाण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर उतरणाऱ्या लोकांना कायदेशीर ताकिद होती. पण "धूम्रपान आरोग्यास हानिकारक असते" ह्या सुचनेचे गांभीर्य जेवढे,  तेवढेच ह्या सूचनेचे देखील, आम्हाला आणि प्रशासनालासुद्धा. आता येईल त्या संकटाला तोंड द्यायची तयारी होती. बरोबर Explorers चे अनुभवी ट्रेक लीड्स तुषार आणि आदित्य होते. बरोबर रोप, हार्नेस, कॅराबिनर इत्यादी सर्व संरक्षक आयुधं होतीच, त्यामुळे चिंता करण्याचे काही कारण नव्हते. सोलेनिअम सर्विस स्टेशन वर गाडी २० सेकंद थांबली, तेवढ्यात तयारीत असलेले आम्हीसगळे जण खाली उतरलो. ट्रेन निघून पुढे गेली. आमच्या बरोबर अजूनही काही ग्रुप्स उतरले होते जे मोठ्या संख्येने आले होते. आमच्या मध्ये एक वयस्कर काका होते ज्यांची कदाचित ट्रेक आणि ट्रिप या मध्ये गल्लत झाली होती आणि ट्रॉली वाली ट्रॅव्हल बॅग, छत्री आणि एका पिशवीत पाण्याची बाटली आणि लक्ष्मी नारायण चिवडा घेऊन काका आमच्या बरोबर उतरले. त्यांची जय्यद तयारी पाहून आमच्या पोटात गोळा आला, आणि या पावसात आपले हाल होणार आहेत याची कल्पना आली, पण मनाचा निर्धार ठाम होता कि कुठल्याही संकटाला तोंड देऊ पण दुधसागर चा ट्रेक करू .

      गर्द अंधारात टॉर्चच्या साहाय्याने आम्ही ट्रॅक वरून खाली गावात उतरलो नाश्ता करण्यासाठी ठरवलेल्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि उजाडायची वाट पाहू लागलो. कोंबड्याने बांग दिली आणि तसा रात्रीचा अंधार विरत गेला, थोडेसे दिसू लागले होते पावसाचा जोरही ओसरला होता. प्राथमिक सूचना तुषार कडून मिळाल्यानंतर आम्ही दुधसागर कडे निघालो. वाटेत काही वेली झाडावरून खाली आल्या होत्या ज्या भयंकर काटेरी होत्या. एक दोन जखमा झाल्यानंतरच त्या अलगद कशा बाजूला करायच्या हे कौशल्य विकसित होत होते. वाटेत जळवा अंगावर चढायची भीती होती. तुषारच्याच पायावर सर्वप्रथम जळु लागल्यामुळे मीठ टाकून तिला कसे अलगद बाजूला करता येते याचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले. आता आम्ही सगळे अगदी रीतसर प्रशिक्षित आणी ट्रेक साठी तयार झालो होतो, आत्मविश्वास वाढला होता. आणि काकांची ओली झालेली बॅग उचलायला पण आमच्यात उसने अवसान आले होते.

         आणि परीक्षेची वेळ आली जंगलामधील एक ओढा पार करून आम्हाला जायचे होते. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे धबधब्याच्या पाण्याची पातळी आणि वेग वाढत होता आणि त्यामुळे ओढा पार करणे कठीण जात होते. थरार वाढत होता आणि तरुणांचा उत्साहसुद्धा, पण कमकुवत मनाच्या आणि जरा वयस्कर माणसांची कढी पातळ होत होती. आरडा ओरडा करत काही स्थानिक गावकरी, तुषार आणि आदित्य यांनी रोप च्या साहाय्याने ५ , ६ जणांना ओढा पार करून दिला पण त्यानंतर गणित अवघड झाले, पाण्याचा वेग प्रचंड वाढला आणि तुषार नि दुसऱ्या सोप्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. काही जणांचा हिरमुड झाला. पावसात वॉटरप्रूफ कव्हर मध्ये घातलेल्या मोबाईलने फोटो काढायची नामी संधी आम्ही दवडली होतो. पुन्हा वर आलो आणि पुढे चालू लागलो. पुन्हा तोच ओढा पण इथे जरा पाण्याचा वेग कमी होता आम्ही तत्परतेने दोरी बांधली आणि एका मागून एक पलीकडे गेलो. काकांचा एक बूट वाहून गेला आता मात्र आम्ही त्यांना तिथेच थांबायचा सल्ला दिला आणि त्यांनी तो ऐकला. जाताना आधारासाठी थांबलेल्या ४-५ जणांनि सर्व शक्ती पणाला लावली आणि महाभारतातल्या अरुणी ची गोष्ट आठवून दिली. आमचा आत्मविश्वास दुणावला आणि संकट हे तोंड दिल्यावर ते परत जाते हे पक्के झाले.

        आता थोडेच अंतर राहिले होते, View पॉईंट ला जवळ जवळ पोहोचलोच होतो. जाता जाता दुधसागरचे अर्धवट दर्शन घडत होते, त्याला छायाचित्रात टिपण्याची संधी आम्ही सोडणे शक्यच नव्हते. शेवटी View पॉईंट ला गेल्यावर आमचे डोळे दिपून गेले. डोंगर माथ्यावर धुक्याची चादर पसरलेली होती. आकाशात कृष्ण मेघांची गर्दी झालेली आणि त्यांना बाजूला सरकावुन आपली किरणे पसरवण्याची सूर्यनारायणाची निरर्थक धडपड चालू होती. काही तुरळक किरणे इमाने इतबारे प्रकाश पसरवण्याचे काम करत होती. डोंगरावरून प्रचंड वेगाने कोसळणारा धबधबा उरात धडकी भरवत होता. कड्या कपाऱ्यातुन वाट काढत अनेक क्षीर रांगा धरणी मातेकडे झेपावत होत्या. दूधसागर चे हे फेसाळणारे वेगळे दूध पाहायला मिळाले ज्याचा उंच शिखरावर कुठेतरी पान्हा फुटला होता आणि धरणी मातेची क्षुधा शांत करण्यासाठी वेगाने खाली सरसावत होता. खळखळणारे पाणी गर्जना करत खाली येत होते आणि हिरव्या निसर्गाच्या सौन्दर्यात भर घालत होते. त्यातून उडणारे धवल तुषार पुन्हा एकदा धुक्यात मिसळू पाहत होते. हे नयनरम्य दृश्य फोटो काढून चोरायचा आम्ही शिताफीने प्रयत्न करत होतो पण निसर्गाने सगळी कडे सेफ्टी डोअर्स लावले होते. तिथे असलेल्या माकडांनी आम्हाला सळो की पळो करून सोडले. कोणची पिशवी ओढ, कोणाला गुरगुरूंन भीती दाखव या आणि अशा नाना प्रकारांनी आम्हाला तिथून हुसकावून लावायचा त्यांनी प्रयत्न केला. पण शेवटी आम्हीही त्यांचीच सुधारीत आवृत्ती होतो आणि फोटो काढल्याशिवाय तिथून हलणार नव्हतो. शेवटी सेल्फी, सोलो, ग्रुप असे सगळे फोटो सेशन झाल्यावर आम्ही निघालो.

          पावसाचा जोर वाढला होता. दुधसागर अजूनच अक्राळविक्राळ होत होता. त्याचे विराट रूप मनामध्ये, कॅमेऱ्यामध्ये साठवून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. परत आम्ही ओढ्यापाशी आलो. काका आमची वाट बघून कंटाळलेले होते. अजून एक ग्रुप आम्ही लावलेल्या दोरीला धरून पलीकडे जात होता. त्यांचे लीडर्स आता अरुणी झाले होते. त्यांचा एकंदरीत पेहराव बघता ते प्रोफेशनल वाटत नव्हते, पण ग्रुप मोठा होता आणि रात्री पासून पावसात भिजल्यामुळे आता लवकरात लवकर परतीची गाडी पकडायची घाई झाली होती. पाऊस कोसळत होता क्षणाचीही उसंत न घेता. अजून थांबलो तर पाणी वाढेल आणि आपण इथेच अडकून राहू या भीतीने सर्व ग्रुप चे लीडर्स आपापल्या परीने लवकर ओढा ओलांडायला सांगत होते. आणि अचानक एका मुलीचा पाय घसरला, तिच्या ग्रुप च्या लीडरने सर्व शक्ती पणाला लावून तिला उभे करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्याही पायात बूट नसल्यामुळे तो जास्त वेळ तग धरू शकला नाही आणि त्याचा हि पाय घसरला. या सर्व प्रकारामुळे दोरी वर असलेल्या इतर लोकांवर ज्यादा ताण आला आणि त्यामुळे एकच कोलाहल माजला. पलीकडे उभा असलेला आमचा लीडर तुषार हा सर्व प्रकार पाहत होता त्याने तत्परतेने टेपस्लिंगला कॅराबिनर लावून अडकवून तो मैदानात उतरला. तो कॅराबिनर दोरीला अडकवणार एवढ्यात पाण्याचा वेग अचानक वाढला आणि एक जण त्या अरुणी लीडर्स च्या भिंतीला भेदून निसटला. एका क्षणात तो पार कोसभर लांब वाहून गेला. हा सगळा प्रकार पाहून भीती चे वातावरण पसरले आणि दोरीवरील सगळ्यांचे पाय घसरू लागले. एक, दोन करता करता बरेच जण वाहून जायला लागले. आम्ही मुख्य प्रवाहाच्या कडेला उभे राहून काळाने चालवलेली क्रूर चेष्टा पहात होतो. हळहळ करत होतो. एवढ्यात तुषारचा हि पाय घसरण्याच्या बेतात होता. त्याची धडपड बघून आमच्या काळजाचा ठोका चुकला. त्यानी मोठ्या धैर्याने स्वतःचा तोल सावरत कसे तरी करून कॅराबिनर दोरीला अडकवला आणि आमच्या जिवात जीव आला. सैल झालेला दोर झाडावरून काढून पुन्हा घट्ट बांधणे शक्य नसल्यामुळे रस्सीखेच केल्यासारखी आम्ही ती ओढून ताठ ठेवायचा प्रयत्न करु लागलो. एवढ्यात अंकित च्या मानेवर जळू चढली होती. पण आणलेले मीठ तुषारच्या बॅगमध्ये ओढ्याच्या पलीकडे होते. काय करावे सुचेना. तेवढ्या काही लोकांनी प्रसंगावधान राखून चुना काढला आणि त्याच्या मानेवर लावला तशी जळू खाली पडली. गायछाप खाणाऱ्या लोकांचा मना पासून राग येत असला तरी आज त्यांनी लावलेला चुना कामी आला होता.

          एवढ्यात पुढून कोणीतरी ओरडण्याचा आवाज आला तसे गावातले स्थानिक लोक पाण्यात पळत सुटले त्यांना असे पळताना पाहून आम्ही अजून गडबडलो कारण समजत नव्हते कि अपघात होऊन गेलाय आणि आता Rescue Operation सुरु झालंय. १५ मिनिटांनी ते एका मुलीला घेऊन बाहेर आले. ती प्रचंड भांबावलेली होती. सकाळ पर्यंत चढत्या क्रमाने वाढणारा आमचा आत्मविश्वास आता उतरता क्रम ना घेता थेट शून्यावर आला होता. पाऊस थांबत नव्हता. आम्ही उभे असलेल्या जागेवर आता पाणी साचू लागले होते. आत्ताच काही तरी प्रयत्न केले तर ट्रेन मिळेल अथवा जंगलात आणि या पाण्यात आपला काही टिकाव लागणार नाही याची खात्री झाली. काटेरी वेली, जळवा, पाऊस, चिखल, हुसकावणारी माकडे हि वास्तविक पाहता संकटे नव्हती तर निसर्गाची सूचना होती. पण माणसाचा उन्मत्तपणा ऐकायचे नाव घेत नव्हता. असे वाटत होते कि दूधसागर गर्जना करून सांगतोय "चालते व्हा". पण इकडे आड नि तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती. रात्री पासून पोटात काही नव्हते; वाजले होते सकाळचे ११. शेवटी तुषार ने निर्णय घेतला आणि आम्ही सगळ्यांनी डोंगर चढून रेल्वे ट्रॅक नि जायचे ठरवले. आदित्य ला ओढ्यातून परत पाठवण्यात आले. आदित्य आमच्यात आल्यावर आम्हाला थोडे हायसे वाटले. आम्ही इतर ग्रुप आणि आदित्य बरोबर उलटे चालू लागलो घनदाट झाडीतून काटेरी वेली चुकवत पोटाची भूक विसरून आम्ही चढू लागलो. एक अर्ध्यातासामध्ये आम्ही रेल्वे ट्रॅकवर लागलो. या सगळ्या प्रकारामुळे आमचे अंदाजे ३. ५ किमी अंतर वाढले होते. रेल्वे येताच बाजूला उभे राहून अधून मधून फोटो काढत मजल दरमजल करत आम्ही ज्या गावातून ट्रेक सुरु केला होता त्या गावात खाली उतरलो. सकाळच्या नाश्त्यासाठी सर्व ग्रुप ची एकाच ठिकाणी झुंबड उडाली होती. त्यांना सर्वांना नाश्ता देणे आणि त्याचा हिशेब ठेवणे त्या बिचाऱ्या गावातल्या हॉटेल मालकाला जिकिरीचे जात होते. शेवटी आम्ही नाश्ता वगळून थेट कुळें स्टेशनला जेवायला जायचे ठरवले, पण एकमत होईना शेवटी काहींनी तसेच पावसात पोहे पोटात कोंबले आणि चहाचे एक दोन झुरके मारले. पुन्हा प्रवास सुरु झाला. आता मात्र रात्रभर पायात असलेले ओले बूट सहन होत नव्हते आणि पायात गोळे यायला लागले होते. त्यात पुन्हा रेल्वेच्या रुळांवरुंन चालताना गुढघ्याच्या वाट्या कराकरा वाजत होत्या. घामेजलेल्या, ओल्या कपड्यांचा वास सहन होता नव्हता आणि रस्ता आमचा अंत बघत होता. कसे तरी करत आम्ही "कुळें" स्टेशन ला पोहोचलो तिथे वनाधिकाऱ्यांनी आमची चौकशी सुरु केली.

सुदैवाने आम्ही आवश्यक ती वनविभागाची परवानगी आणि तिकिटे काढलेली होती. आदित्य ती घेऊन आला. थोडी चुकामुक झाली आहे अशी कारणे देऊन आम्ही तिथून निसटलो. जे ३ लोक हरवले होते ते आमच्या आधी इतर ग्रुप बरोबर अंबिका हॉटेलवर पोहोचले होते. अंबिका हॉटेलवर आधी पोटभर जेवलो तेवढ्यात तुषार हि पोहोचला आणि आमची संख्या पूर्ण झाली. सरते शेवटी पांडुरंगाच्या कृपेने आम्ही वेळेत परतीच्या गाडीत बसलो आणि आषाढी एकादशीला आपापल्या घरी माऊलीच्या दर्शनाला पोहोचलो.

हि थरारकथा किंवा स्वानुभव लिहिण्यामागे कारण एवढेच कि हा प्रसंग कधीही येऊ शकतो आणि कोणावरही. दुधसागर ह्या धबधब्याजवळ जाण्यास सरकारने मनाई केली आहे ती या अशा प्रकारच्या भूतकाळातील प्रसंगानं मुळेच. निसर्गाचे सौंदर्य बघण्यात मजा घ्यावी पण कळपाने जाऊन माणसाची झुंडशाही तिथे चालणार नाही हे ध्यानात ठेवावे. एका फटक्यात निसर्ग आपल्याला लोळवु शकतो. त्याचा आदर करण्यातच सर्वांचे भले आहे. या सर्व प्रकारातून एक धडा मिळाला संकटाला तोंड हि देता आले पाहिजे आणि वेळप्रसंगी पाठसुद्धा दाखवता आली पाहिजे. म्हणतात ना "सर सलामत तो पगडी पचास !" तुषार च्या प्रसंगावधानाला आणि साहसाला सलाम. Explorers च्या टीमने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले म्हणून सर्व जण सुखरूप घरी येऊ शकलो.

बाकी ट्रेकिंग करत राहा, नवीन आव्हाने घेत राहा. त्याशिवाय कळणार तरी कसे तुम्ही नक्की कोणत्या परिस्थितीत आणि कोणाला घाबरता !!!


Rate this content
Log in

More marathi story from Vaibhav Kulkarni