दरवळ (शतशब्दकथा)
दरवळ (शतशब्दकथा)


“तुझा आवडता perfume कुठला?”
“मी नाही सांगणार, secret आहे.”
“दूरदेशी जातोय, तिथून तुझ्यासाठी सुगंधी भेट आणीन म्हणतो. कधी कधी वाटतं, जाई, जुई, मोगरा, चाफा ही मंडळी नशिबवान आहेत. त्यांना तुझा सहवास कायमच मिळतो. माझ्यामुळे तुझी संध्याकाळ सुगंधी, भारावलेली झाली तर मी कृतार्थ होईन गं!”
तिचे मौन बघून काहीश्या निराशेनेच तो तिथून निघाला.
ठरल्याप्रमाणे त्याने आकाशात उंच भरारी घेतली. पण दुर्दैव! तो अगम्य उंचीवरून कोसळला! त्या परिस्थितीही, आपण तिच्यासाठी काही आणू शकलो नाही ह्या भावनेने आणि अतीव वेदनेने तो जणू अश्रू बनून कोसळू लागला. त्याच्या अंगप्रत्यंगांचा प्रत्येक कण जमिनीशी एकरूप होऊ पाहत होता आणि
वातावरणात मृदगंध पसरत चालला होता!!