देव : तो की ती ?
देव : तो की ती ?
“ आयुष्याच्या प्रवासात काही परोपकारांची, सत्कृत्यांची पेरणी करत जा. परतीच्या वाटेवर त्यांची झाडं तुम्हाला सावली आणि फळं देतील”
वाक्य थेट कुठल्यातरी बाबाजींच्या सत्संगातून उचललेलं वाटतंय ना? किंवा शाळेत रोज फळ्यावर बदलणाऱ्या सुविचारासारखं? रोज नवा सुविचार लिहिणं मोठं जिकिरीचं वाटायचं बुवा तेव्हा. शिक्षाच वाटायची. कारण मुळात मी फारसा परोपकारी वगैरे नाही. पण तरीही ते करायचो कारण खडूंच्या खोक्यावर डोळा असायचा. शिवाय वर्गात थोडं चमकायला मिळायचं तो एक बोनसच. बाकी सुविचाराचा अर्थ समजून घेऊन तो आचरणात आणणं वगैरे जरा अतीच वाटायचं तेव्हा. व्यक्तिमत्वविकास वगैरे जडजंबाल शब्द त्या वयात कळावेत अशी अपेक्षा करणं म्हणजे सोमवारी सक्काळी ८.४५ च्या बोरीवली चर्चगेट फास्ट मध्ये विंडोसीट मिळण्याच्या अपेक्षेइतकंच मूर्खपणाचं. उपमा थोडी कायच्या काय वाटतेय ना? पण कुठल्याही महाभागाने अशा दिवशी, अशा वेळी, अशा ट्रेनमध्ये अशी सीट मिळवली आणि ते निव्वळ त्याच्या उदात्त व्यक्तिमत्वामुळे शक्य झालंय असा दावा केला, तर त्याला पोकळ बांबूचे चार फटके यथायोग्य जागी देईन मी. आता सांगतो ही उपमा मला का सुचली ते .
असाच एक सोमवार, अशीच वेळ , आणि अशीच एक ट्रेन होती ती. त्यात आमच्या या जन्मातल्या पुण्याईची बोंब, आणि मागल्या जन्मीच्या पुण्याईचा पत्ता नाही असा मामला. तेव्हा अशा गाडीत बसायला जागा सोडाच, पण गाडीला निव्वळ हात लावायला तरी मिळेल की नाही इथपासून तयारी होती. पण एक भारीपैकी अनुभव पदरात पडला बघा.
त्या वेळच्या बोरीवलीच्या प्लाटफॉर्मचं थोडं वर्णन इथे अप्रस्तुत ठरणार नाही. खरं तर याची देही याची डोळा अनुभवण्याचा प्रकार आहे तो. ट्रेन येताना दिसते तेव्हा सगळं पब्लिक “रेडी स्टेडी स्टार्ट” च्या पवित्र्यात उभं राहतं. दीर्घ श्वास घेतले जातात, अस्तन्या मागे सारल्या जातात आणि डोळ्यात खून उतरतो लोकांच्या. येणाऱ्या ट्रेनला काही अक्कल असती तर ती हा प्रकार बघून परत फिरली असती, आणि पुन्हा आलीच नसती. पण ती बिचारी तिच्या वेळेवर येते, आणि “हर हर महादेव” म्हणावं की “वदनी कवल घेता” म्हणावं अशा दुविधेत असलेली जनता तिच्यावर तुटून पडते. नंतरच्या पाचेक मिनिटात तिथे जे रणकंदन चालतं ते पाहून भले भले पैलवान फेटा आणि लंगोट विकून गांधीवादी व्हावेत. उतरणारे बिचारे प्लाटफॉर्मवर फेकले जातात, आणि तोल सांभाळत स्वतःचे खिसे, मोबाईल वगैरे चाचपत , केस आणि कपडे ठीकठाक करत पुढल्या साहसाला निघतात. काही कालच गावाकडून आलेले नवखे उतरूच शकत नाहीत कारण चढणारे त्यांना उलट मागे रेटतात. आत आलेले नशीबवान लोक क्षणार्धात ‘प्रस्थापित’ होतात आणि चढू पाहणाऱ्या उपऱ्याना त्यांचा निर्णय बदलायला लावतात. शिव्याशाप, रणगर्जना इत्यादींनी सभोवताल दुमदुमतो. माहौल फारच गरम झाला तर दोन दोन टक्के टोणपे दिले-घेतले जातात. आणि एकदाची ती ट्रेन ओल्या नारळाच्या करंजीसारखी टम्म होते.
तर या सगळ्या पार्श्वभूमीवर, माझ्या मते खरे पुण्यात्मे तेच , ज्यांना ट्रेनने प्रवास करायची वेळच येत नाही. नोकरदार वर्ग या सगळ्याला सरावलेला असतो कारण त्याला बिचाऱ्याला दुसरा पर्यायच नसतो. मी मागल्या जन्मी चित्रगुप्ताचे खिसे नक्कीच गरम केलेले असणार, कारण या जन्मी माझा स्वतःचा व्यवसाय असल्याने मला ट्रेनने प्रवास करण्याची वेळ रोजच्या रोज येत नाही. गर्दीच्या वेळा टाळून मी माझं वेळापत्रक ठरवू शकतो. पण असं आहे, की सिंह स्वतःच्या गुहेत कितीही टग्या असला तरी त्यालाही शिकारीसाठी कधी ना कधी बाहेर पडावं लागतंच, आणि इतर पोटासाठी झगडावं लागतंच. तद्वत , मलाही त्या दिवशी आयकर भवनला एक काम होतं आणि मुलाखतीची वेळ पाळणं भाग होतं. आदल्या रात्री जरा तापाची कणकण असूनही जाणं टाळता येण्यासारखं नव्हतं.
कसाबसा फलाटावर पोचलो. बघतो तर अशी तोबा गर्दी की जणू पुढल्या तासाभरात जगबुडी येणार होती आणि येणारी ट्रेन आम्हाला कुठल्यातरी सुरक्षित ठिकाणी नेणार होती. पण ट्रेन येताना दिसली आणि मी पेनल्टी किक थोपवणाऱ्या गोलकीपरचा पवित्रा घेतला. दीर्घ श्वास, पाय भक्कम रोवलेले, आणि शरीरातला स्नायू अन स्नायू स्प्रिंगसारखा ताणलेला, कुठल्याही क्षणी ट्रेनवर झडप घालायला तय्यार ! प्रॉब्लेम एकच होता. या नेत्रदीपक अवस्थेत मी एकटाच नव्हतो. माझ्या आजूबाजूला, आणि पुढेमागे शेकडो असेच लोक उभे होते. ट्रेन स्टेशनात शिरली....जवळ आली....आणखी जवळ...आलीच !
आणि नेमक्या याच क्षणी माझ्यातल्या रणछोडदासाला जाग आली. पुढे होऊ घातलेली धुमश्चक्री लक्षात आली आणि मी ती ट्रेन सोडायचा निर्णय घेतला. पण फार उशीर झाला होता. ऑफस्टंप बाहेरच्या चेंडूला सोडताना जसा उशीर होतो तसाच. माझ्या सहप्रवाशांनी माझा निर्णय एकमताने फेटाळून लावला आणि काय होतंय हे कळायच्या आतच काही सेकंद डोळ्यापुढे काळोख झाला आणि काजवेही चमकले. डोळे उघडले तेव्हा मी ट्रेनमध्ये होतो. बाहेरून आत येण्याच्या प्रक्रियेला जो काही कालावधी लागला असेल त्यात मी एखाद्या कणकेच्या गोळ्यासारखा मळला गेलो, एखाद्या जुन्या शर्टासारखा वाशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये फिरलो, आणि होत्याचा नव्हता होणार इतक्यात वाचलो. खाटेत चिरडल्या जाणाऱ्या ढेकणाने आपले अवतारकार्य संपले वगैरे म्हणू नये असं पुलं म्हणाले होते, म्हणून मीही म्हणणार नाही.
असो. आता आत आलोच आहे तर जाऊ चर्चगेटपर्यंत असा विचार करत मी माझे चुरगळलेले कपडे शक्यतो ठीक केले, श्वास जागेवर आणला, आणि आता हाडं मोजायला घ्यावीत या विचारापर्यंत आलो. इकडे तिकडे नजर फिरवली, खिडकी सोडाच पण एकही चौथी सीटसुद्धा शिल्लक नव्हती. या ट्रेनची विंडोसीट फक्त रात्री ट्रेन यार्डात झोपायला जाते तेव्हाच मिळते म्हणतात. नशिबावर चरफडत, आणि बसलेल्या लोकांकडे असूयेने बघत असतानाच एका चौथ्या सीटवरून एक बाई उठून उभी राहिली, आणि देव नक्कीच स्त्रीलिंगी असणार असा कयास मी बांधला. झटक्यात रिकाम्या सीटवर बसू म्हणून मी लगबगीने पुढे झालो तेवढ्यात कानावर आवाज आला. “क्यू सर ? कैसे हो ? पहचाना मेरे को ?”
आता मला देवाच्या लिंगाविषयी ताबडतोब पुनर्विचार करणं भाग होतं, कारण अस्सल मुंबईकर एका तृतीयपंथी आवाजाला झोपेतसुद्धा ओळखू शकतो.
सीटवर बसता बसता मी अत्यंत कृतज्ञ नजरेने तिच्याकडे बघितलं. मेकपच्या भडक थराखालचा निबर, सुरकुतलेला तो चेहरा मला फक्त सुंदर नव्हे, तर चक्क ओळखीचा वाटला.
“ प्रभा ? कैसी हो ?” मी विचारलं.
“अच्छी हू सर . आप ठीक हो ना ? पानी पियोगे ?”
तिने बहुतेक मला गर्दीत चुरगाळलं जाताना बघितलं होतं, आणि नंतर अर्धमेल्या अवस्थेतल्या मला पाहून तिला माझी दया आली असावी. तिने तिच्या पिशवीतून एक पाण्याची बाटली काढली आणि माझ्यापुढे केली.
“ लीजिये सर ! अभी अभी खरीदी है..अभी सील भी नही खोला है !”
आजूबाजूचे लोक आमच्याकडे कुतूहलमिश्रित विचित्र नजरा टाकत होते. मी तिच्याकडून बाटली घेतली आणि सील खरंच बंद आहे हे पडताळल्याबद्दल मनातल्या मनात स्वतःला चार शिव्याही हासडल्या .
एकदोन घोटातच माझ्या जिवात जीव आला, आणि मी तिचे आभार मानले. तिने फक्त तिचे खांदे उडवले आणि म्हणाली “उसमे क्या सर ? इन्सानही इन्सान के काम आता है , और हम तो दोस्त है !”
असंय ना, की एका हिजड्याचा मित्र असणं हा काही दखलपात्र गुन्हा नसला तरी ती काही चारचौघात मिरवण्यासारखी गोष्टही नाही हे मला माहित होतं, पण वेळेला पाण्याचा घोट देणारा हात हा फक्त मित्राचाच असू शकतो हेही खोडून काढता येत नव्हतं. बाटलीत उरलेल्या पाण्यात मला जीव द्यावासा वाटत होता. इथे एका तळागाळातल्या शोषित, पिडीत, अशिक्षित हिजड्याने अत्यंत सहजपणे, निर्व्याज मनाने एका तथाकथित सुशिक्षित, सुसंस्कृत माणसाकडे मदतीचा हात पुढे केला होता, आणि तो माणूस ‘लोक काय म्हणतील’ या तीन शब्दांपलीकडे बघूच शकत नव्हता. आणि प्रभाने मला माझा मित्र समजावं असं मी काहीच केलं नव्हतं ही जाणीव माझा संकोच आणखीनच अधोरेखित करत होती. अगदी खरं सांगायचं तर पाचसहा वर्षांपूर्वीदेखील याच प्रभाने मला मदत केली होती.........
जूनचा रखरखीत महिना होता तो. पावसाळा तोंडावर आला होता, आणि वातावरण सगळ्या आसमंताला भाजून किंवा शिजवून काढायच्या मूडमध्ये होतं. बेक्कार गदमदत होतं. जणू काही वाऱ्याची आई मेली होती आणि सूर्याचा बाप खपला होता. सकाळी मी मुद्दामच छत्री न घेता बाहेर पडलो होतो, तो फक्त पावसाला खिजवण्यासाठी आणि चिडवण्यासाठी. बोरीवलीहून मीरा रोडला जाताना दहिसर चेकनाक्याला रिक्षा बदलावी लागत असे तेव्हाची ही गोष्ट आहे. मी एका रिक्षात बसून चेकनाक्यापर्यंत पोचतो न पोचतो एवढ्यात रिमझिम सुरु झाली, आणि बघता बघता तिने चांगला सूर धरला. पहिल्या पावसाबरोबर येणारा मातीचा सुवास मला इतका आवडतो की माती खावीशी वाटते. आज मात्र तो सुवास आलाच नाही कारण कालच नवीन घेतलेले पेटंट लेदरचे शूज आणि बेल्ट आता बरबाद होणार या विचाराने रिमझिम सुरु झाल्याझाल्याच सॉलिड वैतागलो होतो. रिक्षावाल्याला विनंती करून पावसाची झड कमी होईपर्यंत बसू म्हटलं, तर पाउस जास्तच चेकाळला. इथे माझा रिक्षावालासुद्धा सुगीचा मोसम बघून चूळबुळ करू लागला होता. एक रिक्षा सोडून दुसरीत बसेपर्यंत माझ्या शूज आणि बेल्टचा चिखल झाला असता, म्हणून मग कुणी छत्रीवाला दिसतो का ते बघू लागलो. जी पहिली छत्री दिसली तिच्याखाली छत्रीवालाही नव्हता आणि वालीही नव्हती. तो होता एक हिजडा. पण आज माझा वाली तोच, असा विचार करून मी हाताच्या इशाऱ्याने तिला बोलावलं. ओलेत्या अंगाला एकदम जालीम आळोखेपिळोखे देत देत ती जवळ आली. मी विचारलं “क्या मुझे दुसरे रिक्षातक तुम्हारे छातेमें छोडोगी ?”
“छातेमें क्या रखा है राजा , सीधे मेरे दिलमें आजा !” तिने थेट ऑफर दिली. मग हसत म्हणाली “आओ सर ! इतनीसी तो बात है, खुशीसे कर दूंगी ! आखिर इन्सान ही इन्सानके काम आता है !”
अंगाचा स्पर्श टाळत, आणि छत्री माझ्या वाट्याला जास्त कशी येईल या बेताने तिने मला दुसऱ्या रिक्षापर्यंत सोडलं. मी तिचं नाव विचारलं, माझं सांगितलं, आणि एक दहा रुपयांची नोट तिच्या पुढे धरली. नम्रपणे हसत तिने ती नाकारली आणि म्हणाली “एक जंटलमन को मदद करनेका मौका मिला आज ! पैसे लेकर उसका मजा कम नही करूंगी !”
ती तिच्या मार्गाने चालू लागली, माझी रिक्षा माझ्या मार्गाला लागली. तिला मिळालं होतं एक साधं, निर्व्याज समाधान, एका तथाकथित जंटलमनला मदत केल्याचं. तर मला मिळाला होता एक अनपेक्षित, समृद्ध करणारा अनुभव.
त्यानंतर आम्ही बरेचदा भेटलो. त्याच चेकनाक्यावर, जिथे ती तिचा धंदा करायची. धंदा हा शब्द तिचाच. भिक या शब्दावर खूप चिडायची ती. म्हणायची “उसूलवाले है हम ! दुवा बेचते है, रोटी खरीदते है !”
मला जमेल तेवढा बिझिनेस मी तिच्याबरोबर करायचो. आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवून, कडकडा बोटं मोडून ती मला दुवा द्यायची, दृष्ट काढायची. . .
पुढे पुढे माझ्या कामाचं स्वरूप बदललं आणि मी घरूनच माझी कामं करू लागलो. प्रभाच्या भेटी कमी होत गेल्या आणि ती हळू हळू विस्मृतीच्या पडद्याआड गेली.
इथे flashback संपतो. मी पुन्हा ट्रेनमध्ये आहे. माझ्या डोक्यावरून हात फिरवून, पाण्याची बाटली मलाच देऊन प्रभा गोरेगावला उतरली, आणि मी इथे बसून आहे, माझ्या चुरगळलेल्या कपड्यांविषयी आणि आयकर भवनातल्या माझ्या कामाविषयी विचार करत.
मी सुरुवातीलाच स्पष्ट सांगितलंय की मी परोपकारी वगैरे नाही. जागरूकपणे सत्कृत्य करणारा तर नाहीच नाही. म्हणूनच असं वाटतंय की प्रभासारखी माणसं मला भेटावीत यामागे काहीतरी पूर्वसंचित असावं. निव्वळ माझं चांगलं नशीब म्हणून प्रभा मला दोनदा भेटली आणि मी या जन्मात न केलेल्या काही सत्कृत्यांची फळं माझ्या पदरात टाकून गेली. देव करो आणि ती जिथे कुठे असेल तिथे सुखात असो आणि तिला कुणाच्याच मदतीची कधीच गरज न पडो. पण ती उद्या मला तशा परिस्थितीत भेटलीच तर तिच्याइतक्याच निर्व्याज मनाने मला तिला मदत करता यावी इतकं मोठेपण माझ्या अंगी असो.
बरं ! आता देव पुल्लिंगी की स्त्रीलिंगी यावर चर्चा करुया का आपण ?