Smita Kapase - Deshmukh.

Others

2  

Smita Kapase - Deshmukh.

Others

चंदेरी क्षण

चंदेरी क्षण

3 mins
96


धुंद शितल हे चांदणे

बेधुंद होऊन त्यात मनसोक्त फिरणे....


मला आजही आठवते ते छोटेसे मालवण. हो ... गर्द झाडी... टेकड्या , झरे ,सर्वत्र पसरलेली लाल माती.... रानफुलांचा घमघमाट... करवंदाचा आंबटगोड सुवास आणि पक्ष्यांचा किलबिलाट. आकाशाला गवसणी घालणारे माड , डेरेदार झाडावर लागलेले फणसाचे पाड...किती वर्णु तो डोळ्यात न मावणारा निसर्ग.... आम्ही रानावनात भटकंती करत होतो अचानक सुधा म्हणाली,ए स्मिता ,इथं दिवस असा तर रात्र कशी असेल?मी म्हटलं ,"ती अनुभवायला आपल्याला याच निसर्गाच्या सानिध्यात राहाव लागेल". भारती म्हणाली ,"आयडिया!!!इथे जवळच एक छान मंदिर आहे आपण येथे रात्र काढता येईल का पाहूया". ठरल्याप्रमाणे रात्री महादेवाचे मंदिर गाठले. एका टुमदार खेड्यात कोठून मिळणार हाँटेल पण मंदिराच्या प्रांगणात लोळत जे अफाट सौंदर्य न्याहळायला मिळणार होते ते आलिशान हाँटेलात थोडेच मिळणार?आमचा निर्णय पक्का झाला की आजची रात्र या मंदिरात काढायची तीन कुटुंब नियोजन करून एकत्र फिरत होतो. भारती बोलत होती ," आपल्या या दशम्या मला आज पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे दिसत आहेत". बरोबर आणलेल्या दशम्या खाऊन प्रत्येकजण विश्रांती घ्यावी या उद्देशाने मंदीरासमोरील प्रांगणात आला. पुजारी बाबा म्हणाले ,"हे पहा तुमचे गाव आणि मालवण यात फरक आहे बाहेर झोपत आहात पण जंगलातील विविध प्राण्यांचे आवाज ऐकून घाबरू नका". मंदिराच्या प्रांगणात झोपण्याची त्यांनी परवानगी दिली होती. सर्वांनी अंथरुणावर अंग टाकले.... 


काळ्याभोर आकाशात लुकलुकणाऱ्या अगणित तारकांच्या मैफली जमल्या होत्या. चंद्र त्यांना साद घालत होता वाऱ्याची मंद झुळूक , रातराणीचा बेधुंद करणारा दरवळ ,वेलीवर झोपलेल्या जाई जुई ,झाडावर आपल्या घरट्यात चुळबूळ करणारी चिऊताई आणि मंदीरामागे विशाल पसरलेला समुद्र. मधूनच किनाऱ्यावर येऊन आदळणाऱ्या लाटा.... त्यांच ते किनाऱ्याला येऊन बिलगणं आणि लख्ख प्रकाश देणारं ते पौर्णिमेचं चांदणं....आजही आठवते मला. मी भारतीला म्हटले ," एक सांगू तुला ,मला असे वाटते , रात्रभर न झोपता असेच जागे रहावे व या ईश्वर किमयेची शरीराने नाही तर मनाने सफर करावी अस मनोमन वाटतयं.... तू येणार?" तिने होकारार्थी मान डोलावली. आम्ही दोघी हळूच उठलो आणि चिऊताई च्या घरट्यात डोकावले....आपल्या मऊशार पंखाखाली चिमुकल्या पिलांना घेऊन ती शांत झोपली होती. जवळच असलेल्या गोठ्यात गाय रवंथ करत होती तर मोती कुत्रा मंदिराच्या गाभाऱ्यात टक लाऊन पाहत होता. मंदिरात समई तेवत होती तिच्या प्रकाशात महादेवाची पिंड उजळून निघाली होती...


मंदिराच्या समोरच एक विहीर होती त्यात असणारी कासवे शांतपणे पाण्यात फिरत होती. मंदिराच्या मागे पसरलेल्या विशाल सागराच्या कुशीत सर्व जलचर विसावले होते. किनाऱ्यावर लागलेल्या होड्याच्या जवळ छोटे छोटे खेकडे आसरा शोधत होते. लहानपणीचा चांदोमामा आता मात्र माझ्यासाठी प्रौढ झाला होता त्याची चंदेरी दुनिया आम्ही न्याहाळत होतो त्याचा शितल प्रकाश आमच्या अंगारुन ओसंडून वाहत होता. असं वाटत होत की सूर्योदय होऊच नये. फारशी न बोलणारी भारती भरभरून बोलू लागली ," रजनीच्या या रम्य कुशीत दुधी चांदण पाघंरुन मनसोक्त लोळावं!! झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर लपंडाव खेळावा.खळखळ वाहणाऱ्या झऱ्यात चिंब भिजून जाव!! मनाला गरुडाचे पंख लाऊन अंतराळाच्या चंदेरी दुनियेत फिरुन याव!! "मीही ऐकत होते तेवढ्यात दुरवर मोटेचा कुईकुई आवाज ऐकू येऊ लागला. कोंबडा बांग देऊ लागला. क्षितिजावर लालसर छटा लक्ष्य वेधू लागल्या चंदेरी टिपूर चांदण्यात फिरता फिरता सूर्यदेव हजेरी लावण्यास कधी हजर झाले हे कळले सुद्धा नाही.. सुधा मात्र थंडगार हवेत मस्त झोपली होती. पण या चंदेरी क्षणांना मुकली होती...


Rate this content
Log in

More marathi story from Smita Kapase - Deshmukh.