Pranali Deshmukh

Others

3  

Pranali Deshmukh

Others

चाळिशीनंतरच प्रेम

चाळिशीनंतरच प्रेम

7 mins
745


“ए आटोप लवकर , किती वेळ लावतेस देवयानी?”


इंद्रनीलने बाहेरून आवाज दिला. ती आतूनच नेहमीसारखी सुरु झाली , “अहो आम्हा स्त्रियांना कुठे जायचं म्हटलं तर साडी कुठली घालू, मॅचिंग बांगड्या, एअर रिंग्ज, हा विचार करण्यातच अर्धा तास जातो आणि तुम्हाला वाटतं की आम्ही शृंगार करायलाच इतका वेळ लावतो. तुम्ही व्हा पुढे मी आलेच.”


इंद्रनील देवयानीची वाट बघत अंगणात झुल्यात बसला होता. इतक्यात ती बाहेर आली. बघा झाले मी रेडी. इंद्रनील अवाक होवून तिच्याकडे बघत होता. "अगं थांब काहीतरी कमी आहे", तिथलाच एक गुलाब घेऊन इंद्रनील देवयानीच्या जूड्यात माळतो, “देवयानी एक सांगू, राहू दे ते पार्टीला जायचं आपण घरीच थांबू. तुला असं नखोशिखांत नटलेलं बघितल्यावर वाटतं, आपली बेडरूमच बरी.”


"इश्श काहीतरीच काय, मुलांनी आपल्यासाठी पार्टी अरेंज केली आहे. या वयात असं बोलायला काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला.”,


“अगं या वयात काय म्हणतेस खरं प्रेम चाळिशीनंतरच सुरु होतं बरं का!”, तिच्या 

 खांद्यावर हात ठेवत बाहेर तो आला. दोघेही गाडीत बसले.


"देवयानी तुला एक गुपित सांगायचं आहे," तिने प्रश्नार्थक मुद्रेने विचारले, “आता काय हे नवीन?”,


“अगं मला ना सारखी भीती वाटते, तुझ्या रुपाला तुझ्या सौंदर्याला कोणाची दृष्ट लागली तर!”


“अहो काय हा वेडेपणा! रोमॅंटिसिजममध्ये त्या जॉन किट्सलाही मागे पाडाल तुम्ही.”, देवयानी गालातल्या गालात हसत तिच्यत नाजूक हातांनी इंद्रनीलची मान समोर वळवून त्याला ड्रायविंगकडे लक्ष द्यायला सांगते. तो परत सुरु होतो, "तुझ्यासारखी रूपवान बायको समोर असल्यावर कोणीही कवी बनेल गं".


“बस झाली बायकॊस्तुती चला उतरा हॉटेल आलय.”


आदिश्री आणि आरव हातात बुके घेऊन उभे होते.


“आई, बाबा हॅप्पी अनिव्हर्सरी”, म्हणत दोघांनाही बुके दिले. काही जवळची मित्रमंडळी पण जमलेली होती. केक कापला दोघांनीही एकमेकांना केक भरवला. इंद्रनीलने देवयानीला एक छानसा डायमंड नेकलेस दिला. पार्टी सुरु असतांनाच अचानक देवयानीला भोवळ आली. ती खुर्चीचा आधार घेत खाली बसली. मुलं उगाचच काळजी करतील म्हणून तिने स्वतःच कसेबसे सावरले आणि तिथेच बसून राहिली. कदाचित एक्झर्शनमुळे झालं असावं असं तिला वाटलं.


दुसऱ्या दिवशी पहाटे मुलांनी पॅकिंग केले. देवयानी झोपलेली होती.


“आई तू आराम कर आम्ही निघतो”, म्हणून मुलं निघून गेली. दोघेही शिक्षणासाठी एका मेट्रोसिटीमध्ये राहायचे .


इंद्रनीलने कॉफी बनवून आणली एका हातात कॉफीचा कफ आणि दुसऱ्या हाताने तिला उठवत तो तिला डॉक्टरकडे जावून येवू म्हणाला. देवयानी, नको म्हणत होती. पण याआधीही एक दोन वेळा तिच्या छातीत बोचल्यासारखं आणि अस्वस्थ वाटलं होतं. शेवटी ती फ्रेश झाली आणि त्यांची फॅमिली डॉक्टर 'निकिता'कडे इंद्रनील तिला घेऊन गेला .


निकिताने चेक अप केलं. देवयानीच्या उजव्या स्तनावर अगदी छोटीशी गाठ तिला दिसली. तिच्या सांगण्यावर सर्व लक्षण एका भीषण आजाराकडे संकेत करत होते. पण जोपर्यंत टेस्ट होत नाही तोपर्यंत तर्क बांधणे चुकीचे म्हणून तिने इंद्रनीलला देवयानीच्या काही टेस्ट करायला सांगितल्या.


घरी परततांना दोघेही अबोल, इंद्रनील गाडी चालवत होता आणि देवयानी एकटक खिडकीबाहेर बघत होती. एकामागे एक घाईने जाणाऱ्या झाडांकडे बघत तिच्या मनात कितीतरी विचार पिंगा घालत होते. घरात येताच देवयानीने इंद्रनीलला मिठी मारली आणि रडायला लागली. तिच्या पाठीवर थोपटत तो देवयानीला समजावू लागला, "अगं देवयानी बी पॉझिटिव्ह आपण शंकेचं निरसन करायला टेस्ट करतोय. असं काहीच नसेल. देवयानीने त्याचा हात घट्ट पकडून विचारले, "खरच ना असं काहीच नसेल?


“अगं हो”, म्हणत इंद्रनीलने तिला सावरले .


तिच्या टेस्ट झाल्या आणि रीपोर्ट निकिताला दाखवले. रिपोर्टमध्ये काय असेल? या विचारानेच देवयानी बिथरलेली होती. निकिताने रिपोर्टविषयी सांगायला सुरुवात केली.


"हे बघ देवयानी आज बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा अनेक कारणांमुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलय, पण तो बरा होतो. त्यामुळे घाबरण्यासारखे काही नाही. 'कँसर', म्हटल्यावर देवयानीचा हात कापायला लागला.


“हे बघ इंद्रनील कँसर पूर्णपणे बरा होतो. त्यासाठी उपचाराबरोबर पेशंटला मानसिक आधाराचीही गरज असते. देवयानीला ब्रेस्ट कँसर आहे पण विश्वास ठेवा ती पूर्णतः बरी होऊ शकते. आपल्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरु करावी लागेल आणि...”


“आणि काय?”, देवयानीने लगेच निकिताला विचारले.


“तुझा स्तन काढून टाकावा लागेल”


देवयानी आणी इंद्रनील हॉस्पिटलमधून परत आले. त्याला कळत नव्हतं देवयानिशी काय बोलावं? दोघेही एकाच बिछान्यावर एकमेकांकडे पाठ फिरवून झोपले. खरं म्हणजे दोघांचीही झोप उडालेली होती. सकाळी देवयानीने इंद्रनीलसाठी चहा आणला. तो लगेच तिला रागावला, “अगं तू कशाला उठलीस आराम कर”


देवयानी त्याच्यावर चिडली, “काहीच नाही झालं मला, मी रात्रभर विचार केला जर देवानी माझं आयुष्य एवढच लिहलं असेल तर मंजूर आहे मला. जितके दिवस जितके महिने जितके वर्ष माझ्याकडे आहेत ते मी आनंदाने जगेन पण ट्रीटमेंट घेणार नाही.”


“अगं वेडी झालीस का? तू बरी होणार. मी तुला वचन देतो.”, इंद्रनील परत समजावू लागला.


ती गहिवरून गेली आणि त्याला म्हणाली, “इंद्रनील, माझ्या स्त्रीत्वाची, माझ्या मातृत्वाची ओळख माझ्या शरीरापासून वेगळी करणार अशा जीवनाला काय अर्थ आहे ? नाही ऑपरेट करायचं मला.”, इंद्रनीलच्या कुशीत शिरून देवयानी लहान मुलासारखी हमसून हमसून रडायला लागली. त्याने तिला स्वतःपासून दूर करत तिच्या डोळ्यातलं पाणी बोटावर टिपलं, आणि तिच्या डोक्यावरून अलगद हात फिरवत तो म्हणाला, "तुला जितक्या यातना होतायेत ना देवयानी तितकाच त्रास मलाही होतोय, मला तू हवी आहेस.”


इंद्रनीलने सर्व हकीकत डॉक्टर निकिताला सांगितली. निकिताने देवयानीला एकटीलाच क्लीनिकमध्ये बोलावले आणि तिच्या मनात जी भीती आहे ती दूर करायचा प्रयत्न करू लागली. निकिताचं समुपदेशन झाल्यावर देवयानीने लगेच तिला विचारले, “डॉक्टर आधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. मी बरी होवून घरी गेल्यावर इंद्रनील माझ्यावर पूर्वीइतकच प्रेम करेल का? माझ्या शरीरात बदल झालेला असेल मग तो मनापासून माझा स्वीकार करेल का? माझ्या रूपाची तासंतास तारीफ करणारा माझा नवरा माझ्या गेलेल्या केसांवरून परत हात फिरवेल का? असे अनेक प्रश्न पडतायेत मला. माझ्यातल्या स्त्रीत्वाचा माझ्या सौंदर्याचा एक अवयव काढून टाकणार. चार बायका जमल्यावर समोर आपलेपणा दाखवून चोरट्या नजरेने माझ्या पदरामागे डोकावणार. 'विचार जरी आला तरी काटा उभा राहतो. एक अपंग व्यक्ती आणि मी यात काय फरक आहे? म्हणून मला नकोय ती किमो थेरपी आणि उपचार मला असच जगायचं आहे.


खूप समजावल्यावर ती ऑपरेट करायला तयार होते .


देवयानीचं आज ऑपरेशन होतं दोन्ही मुलं आणि देवयानीचे आईबाबा, भाऊ तिथे हजर होता. तिला ऑपरेशन थेटर मध्ये नेलं तेव्हा तिच्या नजरेत हजार प्रश्न होते, “इंद्रनील का नाही आला?”


ऑपरेशन झालं, तिला भेटायची डॉक्टरांनी परवानगी दिली. सर्वाना तिला विचारायच होतं, इंद्रनील कुठे आहे? पण तिच्या लक्षात आलं आता त्याच्या वागण्यात असाच बदल होणार. तो तिला असच टाळणार ऑपरेशन होवून दोन दिवस झाले तो अजूनही भेटायला आला नव्हता. शेवटी तिला राहवलं नाही आणि तिने मुलांना विचारलं, "बाबा का आले नाही रे भेटायला?”


आरव ने सांगितलं की, “ऑफिसच्या कामासाठी टूरवर गेलेत.” हे ऐकून देवयानीला असंख्य यातना झाल्या. “त्याला ऑपरेशनपेक्षा ऑफिसचं काम महत्वाचं वाटलं”, ती स्वतःशीच पुटपुटली.


चार दिवसांनी इंद्रनील हॉस्पिटलमध्ये भेटायला आला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारू लागला, “कशी आहेस देवयानी? तुझ्या ऑपरेशनच्या वेळी मला थांबता आलं नाही इथे, म्हणून आई बांनाना मी बोलवून घेतलं होतं”.


ती ताडकन उत्तरली, "तशी कोणी थांबायची इथे गरज नव्हती. सिस्टर्स, डॉक्टर आहेत इथे.” तिच्या बोलण्यात कडवटपणा होता. थोडावेळ थांबून तो निघून गेला. हाताला इंजेक्शन टोचून टोचून देवयानीच्या मनगटावर व्रण उमटले होते शिवाय तिची चिडचिड वाढली होती. तब्बेतही घसरली होती, चेहरा सुकून गेला होता, थोडक्यात तिच्या रुपाला द्रिष्ट लागली होती.


देवयानीला आज डिस्चार्ज मिळणार होता.


“आई मामा गाडी घेवून येतोय आपण आज घरी जाणार”, आरवने तिला सांगितले पण देवयानीच्या चेहऱ्यावर थोडाही आनंद नव्हता. कारण इंद्रनील तिला घ्यायला आलेला नव्हता. जड मनाने ती गाडीत बसली.


“शेवटी तेच झालं. माझा नवराही पुरुषच, त्याचीही नजर छातीवर जाते पण त्यामागे जे मन आहे ते कधीच त्याला दिसत नाही.”, आतून त्याच्याविषयी अगदी संताप आलेला होता. विचारांचं जाळं विणताविणता घर कधी आलं कळलंच नाही.


सर्वजण गाडीतून उतरले. बघते तर काय! दारात इंद्रनील आरतीचं ताट घेवून उभा होता. पूर्ण घर फुलांनी सजवलेलं होतं. समोर दारातून थेट देवयानीच्या खोलीपर्यंत गुलाब पाकळ्याचा रेड कार्पेट अंथरला होता.


“देवयानी आत ये”, इंद्रनीलला समोर बघून देवयानीला भरून आलं. तिचं स्वागत असं होईल असा विचारही तिच्या मनात आला नव्हता. तीला सगळं स्वप्नासारखं वाटतं होतं. ती आत गेली. अशक्तपणामुळे तिला खूप वेळ उभं राहायला जमत नव्हतं इंद्रनील तिला पकडून रूममध्ये घेवून गेला. तू आराम कर मी निकिताला पाठवतो म्हणून तो बाहेर निघून आला.


निकिताने तिला तीचं डाएट समजावून सांगितलं आणि बोलता बोलता ती इंद्रनीलचं खूप कौतुक करू लागली. “देवयानी खूप नशीबवान आहेस तू अगं सगळंकाही सुखरूप पार पडावं म्हणून इंद्रनीलने पंढरीची पायी वारी केली. तुझ्या ऑपरेशनच्या आधीच तो निघाला. खूप प्रेम करतो गं तुझ्यावर, खरं म्हणजे मुलांना आणि मलाही त्याने ऑफिसच्या कामानिमित्त जातोय असं सांगितलं होतं. माझा विश्वास बसत नव्हता. मी खूप सुनावलं शेवटी तुझी शपथ दिली तेव्हा त्याने खरं काय ते सांगितलं. तूला जो त्रास झाला त्याची झळ इंद्रनीललाही लागली. बरं ट्रीटमेंटची एक पायरी यशस्वी झाली आता पुढे असाच धीर ठेवायचा आहे. काही दिवसातच केमोथेरपी सुरु होणार. कॅन्सरच्या विरोधात वापरली जाणारी औषधे गोळ्यांच्या माध्यमातून किंवा आयव्ही लाइनद्वारे दिली जातात. आयव्ही औषधांची सहा ते आठ चक्रं द्यावी लागतात. या चक्रांमध्ये तीन आठवड्यांचे अंतर ठेवावे लागते. अनेकदा काही औषधे आठवड्यांतून एकदाच दिली जातात. तू आराम कर येते”, मी म्हणत निकिता निघून गेली.


निकिताचं बोलणं ऐकून देवयानीला स्वतःचा राग आला.


“काय विचार केला होता मी इंद्रनीलविषयी? असं मनातच कसं आलं माझ्या! किती प्रेम आहे त्याचं माझ्यावर!” देवयानी आरशापुढे जावून उभी राहिली. गळ्याभोवती गुंडाळलेला स्कार्फ काढला. तिच्या सपाट भागावर हात फिरवत ती स्वतःलाच सांगू लागली


"जगात अशी कोणतीच शक्ती नाही जी आमचं एकमेकांवरचं प्रेम, विश्वास कमी करेल.”


इतक्यात इंद्रनील आत आला, “देवयानी काय बडबडतेय, आराम कर. अगं वेडाबाई आरशात काय बघतेस स्वतःला, माझ्या डोळ्यात बघ तू किती सुंदर आहेस! शरीराचं सौंदर्य हे वयानुसार ढळतं, दात पडतात, केस पांढरे होतात, पण म्हणून काय प्रेम कमी होत नाही. उलट चक्रवाढ व्याजासारखं दिवसेंदिवस ते वाढतच जातं.”


ती भावुक होतेय त्याच्या लक्षात आलं आणि त्याने विषय बदलवला.


“ही बघ माझी नवीन कविता, ऐकतेस ना!”


इंद्रनीलने देवयानीचा हात हातात घेतला. तिच्या डोळ्यात बघत तो कविता ऐकवू लागला.


खूप सच्च प्रेम आहे गं माझं तुझ्यावर 

 तुझ्या लुकलुकणार्या डोळ्यांवर 

 थरथरणाऱ्या ओठांवर 

 एवढच काय तर! 

 तू ज्या वाटेने जायची त्या पाऊलखुणांवर सुद्धा 

 खूप सच्च प्रेम आहे माझं


त्याला वाहवाची दाद देत, देवयानी कितीतरी दिवसांनी पूर्वीसारखी खळखळून हसली.



Rate this content
Log in