बकुळी
बकुळी
बकुळी अर्थात आम्ही याला गावी ओहोळणीची फुले म्हणायचो. मी जिल्हा सिंधुदुर्गमधील वैभववाडी तालुक्यातील सुंदर अशा विविधतेने व सृष्टीसौन्दर्याने नटलेल्या ज्याला ऐतिहासिक वारसा आहे अशा गावात लहानाची मोठी झाले आहे.
माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावातील श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे येथील प्राथमिक शाळेत झाले.खूप मजा मस्तीचे दिवस आठवले की खूप हळवं व्हायला होतं. शाळेतील शिक्षक आमच्या गावातील व आजूबाजूच्या गावातीलच होते ज्यांचे आम्ही विद्यार्थी व आमचे आमचे शिक्षक प्रभू गुरुजी,सुतार गुरुजी,सरवणकर गुरुजी,पुजारी गुरुजी,सुर्वे बाई,म्हसजन बाई लाडके शिक्षक होते.
आमच्या शाळेजवळच गावातील अनेक मंदिरे आहेत.शाळेच्या जवळ गांगो देवाचे मंदिर आहे त्या मंदिराजवळ काही झाडे आहेत ,त्या झाडांपैकी एक झाड बकुळीच्या फुलांचे आहे.लहानपणी आम्ही सर्व मुले ती फुले जमा करायला मधल्या सुट्टीत पळत जायचो ,त्याची ती सुंदर,नाजूक,फुले मला खूप आवडायची अगदी सुकली तरी त्या फुलांचा सुवास असतो,त्याची ती शुभ्र फुलं म्हणजे तारका जणू ,.बकुळीला गावी ओहोळणीची फुलेही म्हणतात. ताची ती गोड, तुरट फळेही आम्हाला खूप आवडायची. त्या फुलांचे गजरे करून केसात घालायचे,देवांच्या मूर्त्यांवर रुळणारे ते नाजूक हार खूप छान दिसायचे.मनाला एक प्रसन्नता मिळायची. बांईना त्या फुलांचा गजरा देणे म्हणजे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असायची.
मी आता नेरुळ नवी मुंबईत राहते,सकाळच्या walk ला जाताना पामबीच रोडजवळ एक बालाजी सोसायटी आहे ,त्या सोसायटी जवळच्या कोपऱ्यात एक बकुळीचे झाड आहे ते पाहिले आणि मला माझ्या बालपणीची आठवण तीव्रतेने आली जी माझ्या मनाच्या नाजूकशा कोपऱ्यात घर करून अजूनही आहे.खूप फुल जमा केली,झाडावरची ताजी फुलेही तोडली,त्यातला तो मध चाखायला अजूनही मजा . सुंदर फुलांचे गजरे तयार केले . फुल तसं नाजूक पण या नाजूक फुलाने माझ्या मनावर अधिराज्य केलं आहे त्याची जादू अजूनही मनात आहे ती अगदी माझ्या बालपणात घेऊन जाते आहे. त्यानिमित्ताने मला माझी या बकुळीच्या फुलावरची कविताही सादर करायला मिळाली.
अजूनही तशीच फुलते दारात ती बकुळी
वासात मी तिच्याही सडा वेचते सकाळी
हातात ओंजळीत नाजूक फुल साजे
मनमंदिरी कोपऱ्यात हलकेच धून वाजे
ते बालपणीचे दिस कोवळे उन्हाचे खास
सय आजही मनात जशी कालचीच आज
विणता तयाचा हार दोऱ्यात गुंफलेला
अजूनही सुवासिक तो सुकलेली सुगंधी दोरा
फुल नाजूकसे टपोरे हलकेच सयीत आले
ते बालपणीचे क्षण जागून ताजे झाले
किती गोड गोड होते दिस बालपणीचे ते
ते बालपणीचे सगळे सख्या, गोप,गोपी एक होते
सय तयांची येता ओलावती हे नेत्र
तव बालपणीचे ते फुल एक हाती आले
झाले शुष्क तरीही क्षण अनेक ताजे झाले.
