Sandip Khurud

Others

4  

Sandip Khurud

Others

भूतदया

भूतदया

5 mins
379


   ती ऊन्हाळयाच्या दुपारची वेळ होती. रखरखत्या ऊन्हात अमर व करन फायनल ईयरची परीक्षा संपल्याने गावाकडे मोटारसायकलवर निघाले होते. अमर गाडी चालवत होता. गाडी रस्त्याने भरधाव वेगात निघाली होती. उन्हाच्या झळा अंग पोळून काढत होत्या. करन अमरला सावकाश गाडी चालव म्हणून सांगत होता. पण अमर त्याच्याच तालात होता.त्याला लवकर गाव जवळ करायचा होता.

   

हायवे संपून आता गावाकडील कच्चा रस्ता लागला होता. त्यामुळे आता गाडीचा वेग थोडा कमी झाला होता. उन्हाळा असल्यामुळे रस्त्यावर वर्दळ नव्हती. माणसं गरजेच्या कामासाठीच बाहेर पडत होती. काही माणसं कामासाठी उन उतरण्याची वाट पाहत होती. चिंचेच्या झाडाच्या थंडगार सावलीतील हॉटेल पाहून अमरने त्या हॉटेलजवळ गाडी थांबवली. त्या हॉटेलवर पालापाचोळा टाकून छत तयार केलेले होते. त्यामुळे रखरखत्या उन्हात तेथे थंडावा वाटत होता. त्या दोघांनीही प्लास्टीकच्या टाकीमधून मगाने पाणी घेवून चेहऱ्यावर मारले. थंड पाण्याचा चेहऱ्याला स्पर्श होताच त्यांना हायसे वाटले. रुमालाने चेहरा पुसत ते दोघेही जवळच्या बाकडयावर बसले. खेडयातील हॉटेल असल्यामुळे तिथे जास्त गर्दी नव्हती. दोन म्हातारे इसम विडया फुंकत बसले होते. विडीचा झुरका घेताना दात पडून आधीच आत गेलेले गाल आणखी आत जात त्यांच्या तोंडाचा चंबु होत होता. धुर आतमध्ये घेत असताना खोकल्याची आलेली उबळ तशीच दाबून ते म्हातारे विडी फुंकीत होते. त्यांना पाहून अमरलाही सिगारेट पिण्याचा मोह आवरता आला नाही. उन्हात चहा पिल्याने उन उतरतं म्हणत त्याने स्वत:ला चहा सांगून करनला लिंबु सरबत सांगीतले.


   अमरने सिगारेट पेटवली. चहा पित-पित तो सिगारेटचे झुरके घेऊ लागला. तेवढयात त्याला तेथील टेबलवर एक मुंगळा चहाच्या पडलेल्या डागापाशी घुटमळताना दिसला. त्याने काडी पेटवली. व तो त्या मुंगळयाला चटके देऊ लागला. करनला ते पाहावले नाही. त्याने त्याला विरोध केला. पण तोपर्यंत तो मुंगळा चांगला होरपळून तडफडु लागला होता. अमरने परत एक काडी ओढली आणि त्या मुंगळयाजवळ ती पेटती काडी धरली. त्या जाळाने तो मुंगळा तडफडत जळून खाक झाला. त्याचा अमरला असुरी आनंद झाला. मुक्या प्राण्यांना त्रास देणे चांगले नाही म्हणून करनने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर निर्दयी मनाचा अमर म्हणाला,

   "आरे! तु पण खुप हळवा आहेस.मुंगी, मुंगळा यांच्या इतकुशा जीवाची पर्वा करतोस?"

   "इतकुसा असला तरी तो पण एक जीवच आहे मित्रा. त्यामुळे यापुढे असे करू नको." करन त्याला समजावत म्हणाला.

   त्याच्या बोलण्यावर हसत अमर म्हणाला, "बरं चल.निघुयात."


   ते दोघेही परत रस्त्याला लागले. करनच्या बोलण्याचा किंचीतही परिणाम अमरच्या भावनाशुन्य मनावर झाला नाही. रस्त्याच्या बाजूच्या एका लिंबाच्या झाडाच्या सावलीखाली एक कुत्रं रस्त्यावरच झोपलं होतं. अमरला खोडी करण्याची संधी मिळाली. गाडी जाण्यासाठी बराच रस्ता मोकळा असताना अमरने मुद्दाम त्या कुत्र्याच्या पायांवरून गाडी घातली. ते कुत्रं मोठयाने केकाटू लागलं. उठण्याची धडपड करु लागलं. पण पाय मोडल्यामुळे त्या कुत्र्याला उठता येत नव्हतं. ते पाहून करनच्या मनाला अतिशय वाईट वाटले. तो रागात अमरला बोलु लागला.

   "तु मुद्दामच त्या मुक्या प्राण्याच्या पायावर गाडी घातलीस."

   "नाही. ते कुत्रंच रस्त्यामध्ये झोपलं होतं. त्याला कळत नाही का मग रस्त्याच्या बाजूला झोपायचं." अमर तोऱ्यातच बोलला.

   "ते कुत्रं शांत झोपलं होतं? तु मुद्दामच त्याच्या पायावरून गाडी घातलीस." करन पुन्हा रागात बोलला.

   "हो. मुद्दामच घातली. मग काय करायचं आता?" अमरही रागातच बोलला.

   आता करनलाही राग आला होता. त्याने अमरला गाडी थांबवण्यास सांगीतले.तो गाडीवरून उतरला. व "मी येतो चालत. तु जा." असे त्याने अमरला सांगीतले. त्यावर अमर हसत म्हणाला, "कुत्र्यासाठी व मुंगळयासाठी माझ्यासोबत भांडण करायलास. आता ये मग ऊनाचं चालत."


   त्यावर करन त्याला काहीच बोलला नाही. अमर गाडी घेवून पुढे निघाला.करन पायी चालू लागला.आता गाव जवळ आलं होतं. त्यामुळे चालत निघालं तरी अर्ध्या तासात घरी पोहचता येणार होतं. करनला अमरच्या कृत्याबाबत वाईट वाटत होतं. सृष्टीतील प्रत्येक प्राण्याला जीव आहे. आणि ज्याला जीव आहे त्याला वेदना आहेत. मग माणसं या प्राण्यांच्या जीवाची पर्वा का करत नसतील? या मुक्या प्राण्यांना त्रास देताना माणसं निर्दयी कसे होत असतील? त्याने त्या निष्पाप मुंगळयाला जाळून मारले. आपल्याला थोडे जरी पोळाले तरी कसे होते? त्या असहय कुत्र्याच्या पायावरून मुद्दामच गाडी घातली. आपल्या पायावरून गाडीचे चाक गेल्यावर आपल्याला किती वेदना होतील? या कल्पनेनेच त्याच्या अंगावर शहारे आले.


   अमर आता गावाजवळ आला होता. गावाच्या बाहेर एक झोपडी होती. त्या झोपडी जवळ चार-पाच लहान मुले गोटया खेळत होते. एक कुत्रं जीभ बाहेर काढून पाण्याच्या शोधात जनावरांना पाणी पिण्यासाठी बांधलेल्या दगडी हौदाकडे जात होतं. तेवढयात एका मुलाची नजर त्या कुत्र्याकडे गेली. त्या मुलाने जवळच पडलेला एक दगड उचलला आणि त्या कुत्र्याच्या दिशेने जोरात भिरकावला. तो दगड त्या कुत्र्याला लागण्यापासून हुकला आणि बाजूला ठेवलेल्या लोखंडी नांगरावर आदळून समोरून गाडीवर येणाऱ्या अमरच्या कपाळावर बसला. त्या अचानक झालेल्या प्रहाराने अमरच्या डोळयापुढं अंधाऱ्या येऊ लागल्या. त्याचा तोल गेला आणि गाडी बाजूच्या एका छोटया खड्डयात गेली. अमरला गाडी सावरता आली नाही. तो गाडीसकट त्या खड्डयात पडला. ते पाहून ती लहान मुलं पळून गेली. गाडी अमरच्या पायावर पडली होती. त्याचा पाय गाडीखाली सापडला होता. गाडीचं सायलेंसर चांगलेच गरम झाले होते. सायलेंसर पोळत असल्यामुळे त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पण गाडी खाली अडकलेला पाय त्याला खूप प्रयत्न करूनही काढता येईना. तो कोणाच्या तरी मदतीची वाट पाहू लागला. पण जवळपास कोणीच दिसत नव्हते. कपाळावर झालेल्या जखमेतून भळाभळा रक्त वाहत होते. पायाला गाडीच्या सायलेंसरचे व सर्वांगाला ऊन्हाचे चटके बसत होते. असहय वेदनेने तो मोठमोठयाने ओरडू लागला. थोडया अंतरावर असलेल्या करनने तो आवाज ऐकला. तो आवाजाच्या दिशेने धावत सुटला. पाहतो तर काय? अमर खाली पडला आहे.व त्याच्या पायावर गाडी पडली आहे. करनने त्याच्या पायावर पडलेली गाडी उचलली. अमरची पँट जळून पायाला चांगलाच चटका बसला होता. त्या चटक्याने त्याचे आतील मासही दिसु लागले होते.कपाळाला झालेल्या जखमेतून वाहणाऱ्या रक्ताने अंगावरील पांढरा शर्ट लाल झाला होता.


   करनने अमरच्या कपाळावरील जखमेवर रुमाल बांधला. गाडी ढकलत रस्त्यावर आणून उभी केली. अमरला आधार देत गाडीपर्यंत आणले व गाडीवर बसवून तो रस्त्याला लागला. दवाखाना येईपर्यंत दहा मिनिटे लागली. तो दहा मिनिटांचा काळ अमरला खूप मोठा वाटला. अमर वेदनेने विव्हळत होता. वेदना काय असतात आता त्याला कळून चुकले होते. दवाखान्यात त्याच्या जखमेवर मलमपट्टी करण्यात आली. अमर करनला घेवून घरी गेला. अमर करनकडे पाहत बोलला,

   "मित्रा तुझं मन हळवं आहे असं मी म्हणालो होतो. हळव्या मनाची माणसं नेभळट असतात असा माझा गैरसमज होता. पण मी चुकलो. तु मोठया मनाचा माणूस आहेस. माझं भाग्य आहे मला तुझ्यासारखा मायाळू मित्र मिळाला."

   "आपल्याला काही झालं तर आपण लगेच दवाखान्यात जातो. पण तु त्या कुत्र्याच्या पायावर गाडी घातलीस ते कुत्रं कुठे गेले असेल? त्याने वेदना असहय होवून कदाचित तेथेच प्राण सोडले असतील.आपल्या वेदना आपल्याला सांगता येतात. पण त्यांना होणाऱ्या वेदना त्यांनी कोणाला सांगायच्या? त्यामुळे आपण कोणत्याच प्राण्यांना मुद्दाम त्रास दिला नाही पाहिजे."

   त्याचे बोलणे ऐकत अमर हसत बोलला,"मला ना कधी-कधी तु संत वाटतोस."

   "मी काही साधु-संत नाही रे बाबा. मी एक माणूस आहे. आणि भुतदया ही माणुसकीची ओळख आहे."

   तेवढयात तेथे एक मांजर आले. अमरने त्या मांजराला फेकून मारण्यासाठी जवळचा ग्लास उचलला. आणि परत त्याने हात अकडला.

   करन त्याच्याकडे हसत पाहत म्हणाला, "मार ना. पण मारण्याआधी एकदा तोच ग्लास स्वत:ला मारून घेवून बघ कशा वेदना होतात. आपल्यावरून दुसऱ्याला जाणावे लागते."

   अमर हसत म्हणाला,"नाही रे बाबा. मजाक केली मी. आता मला चांगलीच अद्दल घडली इथून पुढे कोणालाच मुद्दाम त्रास द्यायचा नाही."

   त्याच्या बोलण्यावर हसत करनने त्याचा ‍ निरोप घेतला. आपल्या प्रेमळ मित्राच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत अमर स्वत:च्या मनाशीच बोलला. 'खरंय मित्रा तुझं. शेवटी जीव म्हणलं की, त्यालाही वेदना आल्याच. खरंच माणसानं मुक्या प्राण्यांच्या जीवाशी न खेळता त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं 'भूतदया' मला शिकवलीस.'


Rate this content
Log in