manoj sadamate

Others

3  

manoj sadamate

Others

बेदखल

बेदखल

13 mins
817


गीतानानी सकाळी रोजच्या वेळी उठली.तिने आत बाहेरची साफसफाई केली.मग गोठ्यातल्या जनावरांची सोड बांध करुन तिने गोठा चकाचक केला.शेण चगाळा उकिरड्यावर टाकून ती माघार आली.हातपाय स्वच्छ करुन ती शुचिर्भूत झाली.तशीच ती न्हाणीत शिरली.थंड पाणी अंगा खांद्यावर घेतलं नी ती साडी चोळी बदलून घरात आली.

शिवानाना सोप्यात पलंगावर बसून होता.त्याच्याकडे बघितलं न बघितलं करत तिने जाता जाता त्याला विचारले,

"काय वं ,पाणी काढून देती आंघोळ करुन घ्या जा!"

"नको.मी रोजच्यासारखा आजही नदीला जाईन."

तो शांतपणे म्हणाला.

"आवंं,इतक्यात च्या करतीया ;घेतला असतासा."

"माझं आवरलंंय. चूळ भरुन आलोय."

"मग तुमची मर्जी.बसा उलीसं ."असं सांगून ती आत गेली.शिवानाना शून्यात बघत तिथेच बसून राहिला.

वैशाखातली ती सकाळ तशी आल्हादायी नसली तरी बरीच हवीशी वाटणारी होती.दूरच्या लालबूंद गुलमोहराच्या ढहाळीवर नजर स्थिरावून तो काही हरवलेल्या हिशोबांची आकडेमोड मनात मांडत होता.काही हुकलं चुकलं शोधत होता.दरम्यान गीतानानी चहाचा पेला घेऊन बाहेर आली. 

"आवं,च्या घ्या!"शून्यात हरवलेला शिवानाना एकदम

दचकून भानावर आला.तिच्या हातातला पेला घेत म्हणाला,

"व्हय.तुम्ही घेतला?"

-------------------------------2.--------------------------------------

"आवंं,आसं का इच्यारताय? तुमच्या आधी माझ्या नरडीत घोट उतरल का?"ते ऐकून तो जरा वरमला . तसा तो आतून फुलूनही आला.तिचं ते खरंही होतं.गीता वरवर फटकळ,स्पष्ट बोलणारी होती. ती स्वत: पारदर्शी होती. दुस-यांनीही तसेच असावे अशी तीची अपेक्षा होती. शिवानाना भोळा सांब होता.तर गीतानानी सौंदर्याचा बॉंब होती.एवढं वय झालं तरी तिच्या मूळ सौंदर्याचं तेज अजून तसंच होतं.जोडी तशी विजोड होती.तरीही त्यांच्या संसारात यावरुन कधी वादविवाद,रुसवाफुगवा झाला नव्हता. नानी सोशिक , समजूतदार होती.तसा नानाही इतरांसारखा उठता बसता बायकोवर नवरेपणाचा रुबाब मिरवणारा नव्हता.तसं दोघांचं मस्त ट्युनिंग जमलेलं होतं.

नाना सारवासारव करत म्हणाला,"मीही तेच म्हणतोय, तुम्ही उगा नसता त्रास करुन घेता.मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय,तुम्ही माझ्यासाठी थांबू नका.माझ्या आधी तुम्ही खाल्लंपिल्लं तर मी तुम्हाला जाचहाट करणार हाय का? पण नाही तुम्हाला ते कधीच पटायचं नाही!"त्यावर नानी हसत म्हणाली," त्यासाठी बाई म्हणून जलम घिया पाहिजे तवा कळंल;का खायापियासाठी आपल्या माणसाची वाट बघायची ते!" असं म्हणत ती आत निघाली. तेवढयात नाना स्वत:शी बोलल्यागत म्हणाला,"म्या काय म्हणतोय तुमचं काय काम नसंल तर म्या निघालोया!"

"का असं करायलाय ?म्या काय म्हणती असं तोंड दडवून आपल्या मागचं सरतं का?"थांबत नानीनं त्याला विचारले.

"मग म्या काय करावं म्हणता ?दाद्या रानात मन घालत न्हाय.आन बाल्या माझं ऐकत न्हाय.जरा सांगाय गेलं की उलटून मलाच बोलतोय !कसला तो आब राखत न्हाय!सारं मनच उडालंय सा-यातनं!"

----------------------------- 3.------------------------------------

"आवं,असं करुन कसं चालंल?पोरं आता का लहान हाईत ?त्येंचं त्येंच्या जागी बरोबरच असतंय आन आपल्या जागी आपलंबी चुकीचं नसतंया.नव्या जुन्यात अंतर राहतं.

समजुतीनं आपूनच घ्यायला हवं.असं केलं तर वाद का होतील?"

"दाद्यालाबी बोल्लू .त्योबी मलाच सांगतुय ,तुम्ही गप्प बसा.मग म्याबी गप्पच हाय.रानात न्हाय थारा न घरात रिकामं बसून उचलून फेकल्यावनी होतंय.गावात तोंड दावाय लाज वाटतीय."डबडबले डोळे दिसू नयेत म्हणून नाना तोंड फिरवून म्हणाले.

"आवं,अजूनबी तीन दुणं पाचच का म्हणताय?असं हे आपल्याच घरात हाय का?सा-या दुनयेत हे असंच चालू हाय.आवं,ढेकणं झाली म्हण कोण आपलं घर जाळतं का?" 

"तुम्ही काय बी म्हणा ,मला न्हाय पटत.आपूनच जलम

दिलेली पोरं उलटून बोलून पाणउतारा कराय लागली तर ह्या जगण्यात काय उरलंय?"

"तसं काय बी नसतं.उगं डोसक्यात राख कालवून नका घेऊसा!उगं दोन रोज बसा गप्प.मग बघा झक्कत कसं येतात तुम्हाकडंच इच्यारत !"

"तेवढी मला न्हाय सवड!तुम्हीच बघा वाट त्येंची!"असं म्हणत नानानी पेल्यातला चहा दोन तीन भुरक्यात संपवला नी रिकामा पेला नानीकडे दिला.नानीला काय बोलावं नी नानांना कसं समजवावं तेच कळेनासे झाले.नाना काही न बोलताच निघून गेले.नानी हताशपणे नानांना पाठमोरं पहात राहिल्या...

----------------------------------4.---------'-----------------------

नानी जड मनाने आत जायला वळल्या.त्यांची नजर सोप्यातल्या कोप-यात गेली. तिथल्या 'शोकेस' मध्ये ठेवलेल्या चांदीच्या गदेसोबत पदके,शील्डसवर तिची नजर स्थिरावली.ते दृश्य बघून त्यांचं उदासलेलं मन थोडं शांत झालं.त्यांची पाऊले अडखळली. त्या तिथंच थांबल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर भूतकाळातले ते दृश्य अलगद तरंगत आले.

..."आवं,हायसा का?" नानांनी मोठ्या खुशीत साद दिली.घरकामात गुंतलेल्या नानी हातातली कामे तिथेच

टाकून बाहेर आल्या.

"काय वं,असं का इच्यारता? तुम्हाला ठावं न्हाय का मी कुठं हाय ते ?"

"व्हय ,पर राहवतंय कुठं?कवा तुमच्या कानावं घालीन

आसं झालंय !"


"असं?असलं काय सांगणार हायसा?"

"आवं, आपल्या दाद्यानं लय मोठा विजय मिळवला बघा!"

"आं?काय सांगताय? कसला विजय?कुणाची खोड काढली का मारामारी केलीया?"

"छा!तुमचं आणि येगळच हे!आवं, तशा गोष्टीला कोण विजय म्हणल का? दाद्यानं खरा पराक्रम गाजवलाय.

आन माझं ठरलंय !"

"थांबा.जरा समजल असं उलगडून सांगता?तुमचं हे

हुमान मला वं काय कळायचं!"

"हा तेच्या !ते माझ्या न्हाय ध्येनात आलं!बरं का ,

आपल्या दाद्यानं जबरा कुस्ती मारली बघा!हे,सा-यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं!बघून काळीज सुपाएवढं झालं! आपल्या घराण्याचं नाव उजारलं लेकानं!म्हणून म्हणतोय मी ,माझं ठरलंय!तुम्ही लेकाची दिष्ट काढा,औक्षन करा!"

--------------------------------5.-------------------------------------

असं सारं ऐकल्यावर नानीचाही ऊर अभिमानाने भरून आला.तिने धावत जाऊन दाद्याला कवेत घेतले.त्याचे मटामटा मुके घेतले.त्याला आंजारले.गोंजारले.पुन्हा छातीशी कवटाळून ती त्याला नजरेत साठवू लागली.मग ती लगबगीनं घरात गेली.या सा-या प्रकाराने दाद्या नी नानाही भारावून गेली.काही वेळात ती औक्षनाचं ताट घेऊन

बाहेर आली.दाद्याच्या कपाळाला अक्षदा-कुंकूम लावून तिने

त्याचे औक्षन केले.त्याच्या कानाखाली काजळाची तीट लावून त्याची दृष्ट काढली नी त्याला प्रेमाने घरात घेतले.

घरात पोरी मुलांना त्याचे खूप कौतुक वाटले.दाद्याने त्या दिवशी ख-या अर्थाने सा-यांची मने जिंकली होती

...नानीला आठवलं. तिने दाद्याला कुरवाळीत नानाला विचारले,"व्हय वं,तुम्ही मगा काय म्हणत हुता?"

"कवा काय?ते दाद्याच्या कुस्तीचं सांगत हुतो. आवं, आपल्या दाद्यानं कमालच केली .डोळ्याची पापणी लवते

.न लवते तोच त्याने त्याच्यापेक्षा दुप्पट ताकतीच्या 

पैलवानाला अस्मान दाखवलं.आवं,लोकांनी केवढं कौतुक केलं आपल्या लेकाचं!बघून डोळ्याचं पारणं फिटलं!म्हणून

माझं ठरलंया!"

"आवं,मगाठावणं तेच इच्यारतीय;काय ठरविलासा ते तर सांगा!"

"आपल्या दाद्याला म्या दांडगा पहिलवान करणार.म्या त्याला हिंदकेसरी करणार!व्हय,रातीचा दिस करीन . ढोर

मेहनतबी करीन.आन दाद्याला लई म्हाजूर पैलवान करणारच!काय रं दाद्या ,म्या म्हनतू तसा पैलवान होशील का न्हाय?"ऐकून दाद्यालाबी चेव आला.बहाद्दरानं पैलवानी

मुंडा ठोकून नानाला अपेक्षीत उत्तर दिले.ते ऐकून तोळा मासा प्रकृत्ती असलेल्या नानांच्या छातीवर शर्टाची बटणं ताणल्यासारखी झाली.नानींनाही आपल्या मनातला आनंद

--------------------------------6.----------------------------'-------

नी कौतुक लपवता आलं नव्हतं. ...

बाहेर मोटार सायकल थांबली.त्यावरुन उतरलेला अजय

घरात आला.त्याने नानीला हाक दिली.

"आई,ये आई $$ "निश्चल थांबलेली नानी आपल्या तंद्रीतून सावध होत ती मागे वळली.

"आई,काय करतेस इथं?हाक देतोय;बोलत का नाहीस?"

"तू आलास?"

"होय. तू इथं काय करत होतीस?"

"काय न्हाय रं,ते तुझी गदा,ढाली बघून त्यातच गुरफटुन गेली.काय कळलंच न्हाय रं!चल, तू आंघोळी कर. तवर मी बी तुझ्या न्ह्यारीची तयारी करते."दोघे बोलत घरात गेले.

... अजय टकाटक होऊन बाहेर येताच नानीने त्याच्या

पुढ्यात साजुक तुपातला काजू,बदाम घालून तयार केलेला

शिरा ठेवला.त्याच्या जोडीला केसर घातलेला दुधाचा मोठा

ग्लास होता.व्यायाम ,कसरत करुन आलेल्या अजयला तो समोरचा खुराक बघून दम निघतोय का? तो अधाशासारखा

त्यावर तुटून पडला. ते समाधानानं बघत नानी आपल्याच तंद्रीत हरवून गेली होती.

अजयचा नास्ता झाल्यावर त्याचं लक्ष नानीकडे गेले.

तिला तसे बघून त्याने तिला विचारले,"आई,अशी शांत का बसलीस?तूही काही खाऊन घ्यायचं नाहीस का?"

"मी चहा घेतलाय.बाल्या ,ह्येनी बी घरात न्हायीत.ते आले की त्येंच्या संगंच खाईन."

"आबा दिसत नाहीत;कुठं गेलेत ते?"

"त्येनी कुठं गेलेत ते आता इच्यारतूस? का रं,तुम्ही भावानी मिळून असं का केलंसा ? त्येनी तुमचं कवा घोडं मारलतं?असं का तेंच्याशी वागलात? बाल्याचं सोड. पण तू बी शेता-मळ्यात जाऊ नको म्हणालास!का रं,तेंनला त्येंच्या मालकीच्या घरा-मळ्यातनं बेदखल केलंसा?"

----------------------------------7.-----------------------------------

"आई,काय बोलतेस तू? अगं,त्यांना आम्ही बेदखल करणारे कोण?तेवढी आमची योग्यता तर आहे का?बाल्याचा नी त्यांचा वाद नको म्हणून मी त्यांना तुम्ही निवांत रहा.नका काळजी करु.असं समजुतीनं म्हणालो,

आणि तू ..."

"आरं,त्येंंनाच समजुतीनं सांगितलं.त्यापेक्षा धाकल्याचा कान धरून समजावलं असतं तर माझंच काय तुझ्या आबाचं बी काळीज सुपाएवढा झालं असतं! "

"आई,तसं मी केलं नसतं का? पण तुला बालाजीचा स्वभाव माहीत आहे.अगं,त्याचा गैरसमज कुणी नी कसा दूर करणार?त्याच्या डोक्यात आबाविषयी राग आहे."

"का? असं त्येंनी त्येचं कसलं नुकसान केलंंय?"

"ते तुला नी आबालाबी ठाऊक आहे.माझ्या पैलवानकी-

साठी त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.त्याला त्याचं शिक्षण सोडावं लागलं.आबानी त्याला आपल्या हाताखाली घेतलं. त्याच्या बरोबरीचे त्याचे मित्र शहरात चांगल्या नोकरी धंद्यात आहेत. ते बघितलं की,त्याचं पित्त खवळतं.त्याचा राग तो आबावर काढतो.ते घडू नये म्हणून मी आबाना त्याच्या नादाला लागू नका.तुम्ही आता आराम करा असं सांगितलं.त्यात खरंच माझं चुकलं का?"अजयने एका दमात सांगितलं.

"चुकलं म्हणून आता इच्यारतोस?आधी माणसाला त्येच्या घरादारातनं बेदखल करायचं मग चुकलं म्हणायचंं.

कुठं शिकला रं ह्ये? जरा बी माणसाच्या मनाचा इच्यार करायचा न्हाय ! आन काय रं,ह्यो शिकला न्हाय त्येच्या करमानं; आन खापर बापाच्या माथ्यावर फोडतोय !ह्यो कसला न्याय रं?"

"आई,खरंच माझ्या बोलण्यानं गोष्ट एवढ्या थराला जाईल याची मला कल्पना नव्हती.याचं प्रायश्चित म्हणून

-------------------------------8.-------------------------

मी आबाची त्यांच्या पायावर नाक घासून माफी मागणार आहे; अन तुझ्यासमक्ष बाल्याचंही कान उपटून ,त्याला सांगणार आहे, पुन्हा आबाना उलटून बोलायचं नाही!आता तरी मला माफ कर."अजय काकुळतीने म्हणाला. ते ऐकून

नानींचं समाधान झाले.त्याही गप्प झाल्या.मग काही वेळानं त्यांनीच अजयला विचारले,"का रंं, आज घरी यायला इतका येळ का झाला?"

"अगं आई ,आज कारखान्याच्या चेअरमननी बंगल्यावर बोलवून घेतलं."

"का रं,काय केलंस?बाळा,कुणाच्या नजरला येईल असं

काय बी करु नये,दिली भाकरी भंजून खावी.लय उतमात बरा नसतो.कुणी तुझी कागाळी केली का त्येंच्याकडं?सांग

काय झालं त्ये?बाळा,ऐकून माझा जीव नकात आलाय!"

"आई,जरा थांब ! जरा ऐक. मग बोल. तुझं सुतावरुन स्वर्ग गाठणं पुरे कर! अगं,तू समजतेस तसं काहीच नाही.तुम्हा दोघांना खाली बघायला लागेल असं काहीही मी करणार नाही.त्यांनी मला महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीची तयारी कशी चालू आहे? सराव,खुराक ,कोच इ.विषयी अडचणी आहेत का? नवीन काही सुधारणांचीआवश्यकता आहे का ?या चौकशीसाठी त्यांनी मला बोलावून घेतलं होतं."

"व्हय?मग काय म्हणालं?"

"महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या कारखान्यात आली पाहिजे!त्यासाठी पैसा कमी पडणार नाही;तू तुझी जिद्द सोडू नको असे ते म्हणाले."

"व्हय,त्येनी असं म्हणाले ?"

"होय,असंच म्हणाले! आणि मीही ठरवलंय !

"काय ठरवलंस ?"

"ह्यावेळी आपल्या कारखान्यात गदा आणायचीच!

----------------------------9.--------------------------

-'त्यासाठी कोणतंही अग्निदिव्य मी करणारच!आई,मला निघायला हवं! येतो मी."असं सांगत तो बाहेर पडला.

त्याच्या पाठोपाठ नानी त्याला जेवणाचं विचारत होती;

तरी तो थांबला नव्हता.

...नानी पुन्हा एकट्याच घरात राहिल्या.त्यांचं पुन्हा आत

बाहेर सुरु असताना त्यांचं मन वा-यासारखं भरकटू लागलं.

अवतीभोवती सारा गोतावळा असूनही त्यांना मात्र घरातलं

एकटंपण अस्वस्थ करत होतं.

...का यांनी पोरांशी अबोला धरावा?डोक्यात राख घालून भरलं घरदार सोडून रानोमाळ,नदीनाल्यानी फिरावं?एवढा एककल्लीपणा बरा आसतो का?राग न भीक माग!

आशानं कुणाचं भलं झालंय का?या सा-यात त्येंनी आपल्या जीवाचं काही बरं वाईट करुन घेतलं तर?...

या आणि अशा विचारांच्या डोईजड गर्दीत नानी हैराण

झाल्या.त्यांना नानांच्या नी बाल्याच्या टोकाच्या वागण्याचा

त्रास जाणवू लागला.अशा या अवस्थेत दोघांच्यात ओलावा

कसा निर्माण करायचा हा पेच तिला काही केल्या सुटत नव्हता.त्या तणावात ती असताना तिला गोट्यातून वासराचं

हंबरणं तिच्या कानावर आलं.ती लगबगीनं गोट्यात गेली.

तिने गोट्यात डोकावलं. समोर खुंट्याशी वासरू दावं गळ्यात घेऊन जागच्या जागी उड्या मारत हंबरत होतं. त्याची आई नजरेनं त्याला कुरवाळत त्याला जवळ घेण्यासाठी अनावर झाली होती.ते वात्सल्यपूर्ण दृश्य पाहून ती जागच्याजागी थबकली. तिने लगबगीने वासराचे दावे खुंट्यातून वेगळे केले. एका क्षणाचा अवकाश वासरु दोन चार झेपात गायीजवळ गेले. माय लेकराच्या भेटीचा तो क्षण डोळ्यात साठवत ती शांत बघत बाजूला उभी राहिली.

धारेच्या आधीच वासरू प्यायलं .डेअरिला दूध आज कसं जाईल?चारशेचा फटका बसणार...तिच्या व्यवहारी मनात विचार आला.

---------------------------------10.---------------------------------

मातृ-वात्सल्याचा समोर अमोघ झरा वाहात 

असताना त्याचा आस्वाद घेण्याऐवजी कद्रुवृत्तीने फायद्या तोट्याचा विचार करणं कसं योग्य असेल?तिला स्वत:लाच लाजल्यासारखं झालं. तिने खुशाल वासराला लुचू दिले. ...

हाच जिव्हाळा,असेच प्रेम आपल्या घरात आले तर... निर्माण झालेला दुरावा, दुभंगलेली मनं पुन्हा जवळ आली

तर...देवा,असंच कर!माझ्याघरात मुलालेकराचं आनंदीगोकुळ नांदू दे! ...तिने मनातल्या मनात कुलदैवत खंडेरायाला हात जोडले.त्याच दरम्यान मागून बाल्याची साद तिच्या कानावर आली.

"आई$ये आ$ई$$"नानीने वळून मागे पाहत त्याला विचारले,"काय रं,लवकर आलास? पाणी धरलंस का तसाच आलास?"

"मोटार चालू करुन एक खांड भिजतंय न भिजतंय तवर

लाईट गेली.दारी मोडून आलोय.तिथं बसून तर काय करु?"बाल्यानं बैजवार सांगितलं . 

"बरं केलंस!तेवढं वासरू खुट्याला गुतवून ये.तवर च्याला आदान ठेवते."नानी निघून गेली. बाल्या मुकाट्याने वासराला धरायला गोठ्यात शिरला.

...समोर बसलेल्या बाल्यापुढे चहाचा पेला ठेवून नानी

त्याच्या शेजारी बसली.चहाचा घोट घेऊन बाल्या म्हणाला,

"आई ,दाद्या अजून आला नाही ?"

"येऊन आताच गेला.का रं?काय काम होतं 

त्याच्याकडं?"

"ते बी मलाच इचार !दोघांनी माझ्या एकट्याच्या खांद्यावं शिवाळ ठेवलं नी निवांत राहिल्यात!"

"व्हय?"

"मग काय?आता दाद्यानं सुट्टी दिशी तरी फिरकावं का न्हाय आपल्या शेता मळ्यात?"चहाचा पेला खाली ठेवत तो म्हणाला. ते ऐकून नानीला आयतीच संधी मिळाली.

------------------------------11.----------------------------------

"खरं हाय तुझं.दाद्याचं चुकतंय.पण तुझ्या बापाचं काय

चुकलं म्हणून त्येंना तेंच्या मालकीच्या शेता मळ्यातनं बेदखल केलंसा?वैरी असल्यागत त्येंना पाण्यात बघतासा?

त्येंचा पाणऊतारा करुन वाटंल ते बोलता?का रं त्येंनी तुम्हासाठी झट्याझोंब्या घेतल्या न्हाईत का? का असंच लहानाचं मोठं झालासा ?"

"आई,कुणाला काय सांगतेस?आबाला त्येच्या सोताच्या

घरा शिवारातनं बेदखल कुणी केलं?त्याचा जाब तू मला विचारतेस?खरं तुम्ही दोघांनी मिळून माझ्याच आयुष्याची

माती केलीत?माझ्या न कळत्या वयात तुम्हीच मला सा-यातून बेदखल केलंसा !का?मी असा कोणता गुन्हा केला होता?तुम्ही इरेनं गाढव खायचं ठरवलं!एकट्या दाद्याच्या पैलवानकीसाठी माझं ,तायडीचं नुकसान केलंत. आमच्या मुखीचा घास काढून त्येला पैलवान केलं. आम्हाला शाळेतून काढून हाताखाली कामात रगडलं.का आमच्या आयुष्याची नासाडी करून त्याचं आयुष्य सजवलं? सांग ना?"

"बाल्या,लय बोललास!आय बापाला सारी मुलं सारखी असत्यात!असं कोण कुणासाठी कुणाचं नुकसान न्हाय करत.पण तुला सांगून काय उपेग?आरं दुस-याच्या करमाला घासून आपलं नशीब न्हाय घडीवता येत!उगं बोलाय येतं म्हण काय बी लागला बोलाय!आरं करणी गॉड आसली की आपसुक होतं मनासारखं.असं कुणाच्या बी नावानं गळा काढायची येळ न्हाय येत!मनात पाप असलं की सारी दुनिया पापी दिसायला लागती.म्हणं माझं

नुकसान केलंसा !"

"खोटं हाय का ते? नुकसानच केलं तुम्ही ! एकदा का दहादा म्हणेन!"असं म्हणत बाल्या ताडताड घरातून बाहेर निघून गेला. नानी एकटीच त्याच्या या प्रतिक्रियेने तडफडत राहिली. पोटच्या गोळ्याचं असं हे ऐकून घेण्याआधी

------------------------'--------12.------------------------------'

आपल्याला मरण का आलं नाही? कुठल्या जन्मात पाप केलं त्याची ही शिक्षा?...असाच काही विचार करुन तिचं डोकं फुटायची तिच्यावर वेळ आली.तिचा सकाळचा सारा उत्साह मरगळून गेला. ...

...नानी बाल्याच्या आततायी वागण्याने खचून गेली.तिचे कशातच मन लागत नव्हते.या सा-या प्रकाराने तिला आपणच बेदखल झालोय असे वाटू लागले.तिला स्वत: निराधार झाल्याची जाणीव बोचू रुतू लागली.तिचे तिच्यावरचे नियंत्रण सुटले.तिच्या उरातली पोकळी रुंदावत गेली.तिचे दोन्ही डोळे आसवांनी डबडबून गालावर ओघळू 

लागले.ती स्फ़ुंदून रडत असतानाच तिच्या खांद्यावर थरथरता हात आला.त्याही स्थितीत तिने पाठीमागे पाहिले.तिच्या मागे नाना उभे होते.तिला कोसळलेली बघून नानांचेही डोळे पान्हावले. ते स्वत:ला सावरुन म्हणाले,"काय झालं?"नानींनी मानेने नकार देत सांगितले,

"काय न्हाय !"

"मग ही डोळ्यात टीपं का?"नानींच्या मनाचा बांध फुटला.त्या अनावर होत पुटपुटल्या ,"आपून आपल्या घरामाणसांतनं बेदखल झालो! आसं कसं झालं?राब राबून 

हाताला कायच न्हाय गवसलं!पोटच्या पोरालाबी आपली कणव येत न्हाय?का?का आसं झालं?"नानानी नानींला थोपटत धीर देत सांगितलं ,"आवं,जरा धीरानं घ्या.उगं आपल्याच सावटाला भूत समजू नका. कोण चुकत न्हाय?पोरं चुकली.त्येंनी तर ते कुठं नाकारत्यात?पण त्याहीपेक्षा आपून बी चुकलोच.त्ये कबूल का करत न्हाय? बालाजीचं सरळ हाय.मला बी पटतंय.तसं त्येचं नुकसान आपून...

न्हाय म्याच केलं .तवा त्येचा कान धरुन साळंत बसवला असता तर आज त्येची आसं बोलायची हिम्मत झाली आसती का?अजयच्या कुस्तीच्या नादात बाकी दोघांकडं 

--------------'------------------13.-------------------------------

ध्यान गेलंच न्हाय!"नाना पश्चातापाने म्हणाले.नानी सावध झाली.नानात झालेला बदल बघून त्या गोंधळून गेल्या.त्या स्थितीत त्या म्हणाल्या,"आवं,आसं का सोताला दोष देता?आन ह्ये आता का सांगता?"

"व्हय. ह्या मागंच सुचाय पहिजेल होतं.उगं डोक्यात राख कालवून,सा-यांचा राग राग करत फिरत होतो.

बालाजीनंच माझं डोळं उघडलं.मला पटलं.माझी चूक मला उमगली.तसा धावत तुमच्याकडं आलो;तर तुम्ही आसं टीपं ढाळत बसलात.काय झालं त्ये आता तरी सांगा!"नानानी नानीला विचारलं;तोच बालाजी बाहेरुन

आत आला.त्याने नानींचे पाय धरले नी तो कातावून म्हणाला,

"आई,माझं चुकलं.मला माफ कर.ह्यापुढं तुला नी आबलाबी उलटून बोलणार न्हाय.तुम्हाला कवा बी त्रास न्हाय द्यायचो!आबा,तुम्ही सांगा आईला माझं पटंना."

"आवं,बालाजी खरं बोलतोय ! त्यो उघड बोलतो पण त्येचं मन लय सोच्च हाय!आपूनच त्येला वळकाय उशीर केला! तसं त्येला आपूनच बेदखल केलतं;पण आता ती

चूक ह्यापुढ्ं न्हाय करायची!उठा नी पोराला घ्या पोटाशी!"

नानींचा त्रागा कुठल्या कुठे गायब झाला .त्यांनी बालाजीला

उठवलं नी आपल्या कुशीत घेतलं.त्याला त्या कुरवाळत असताना नानांनी आपल्या डोळ्यातून ओघळणा-या आसवांना धोतराच्या पदराने रोखले!

----'-------'--'--'---------*****---------'------------'-----------


Rate this content
Log in

More marathi story from manoj sadamate