बालपण देगा देवा
बालपण देगा देवा
प्रत्येक मनुष्याला भूतकाळ हा असतोच. जस जसे वय वाढत जाते तस तसे भूतकाळातील चांगल्या-वाईट आठवणी प्रसंगानुरुप मनातल्या मनात फेर धरतातच. माझेही अगदी तसेच आहे. माझे वडील सरकारी कर्मचारी ! त्यावेळच्या तुटपुंज्या पगाराला हातभार लावण्यासाठी आई शिवणकाम करीत असे. आम्ही तीन भावंडे, आई वडील, आजी आणि दोन आत्यांची लग्ने होईपर्यंत त्या दोघी, एवढी आठ माणसे. पण आमच्या आईने कुरकुर न करता शिवणकलेच्या कौशल्याने संसार कधीही उसवू दिला नाही.
आई जात्याच सुगरण असल्यामुळे कोंड्याचा मांडा करणे तिला सहज जमे. कणकवली तालुक्यातून म्हणजे घावणे-आंबोळ्या च्या प्रांतातून लग्न झाल्याबरोबर मुंबईसारख्या बहुआयामी प्रांतात आल्यावर तिने इडली केक यासारखे अनेक पदार्थ अगदी सहज आत्मसात केले. हे सगळे पदार्थ ती इतके अप्रतिम बनवे की जसे काही लहानपणापासूनच तिला येत असावेत. अगदी मैसूरपाकही ती उत्तम जाळीदार बनवे. त्यामुळे आम्हा भावंडांना बाहेरच्या खाऊची सवयच नव्हती. स्वयंपाक घरात डब्यांमध्ये चिवडा किंवा चुरमुरा लाडू असेच. शिवणकलाही खूप सुंदर असे तिची. आमचे फ्रॉक्स ती स्वतःच्या मनानेच सुंदर डिझाईन करून शिवे. शाळेचा युनिफॉर्म रेडीमेड मिळतो किंवा टेलर कडून शिवून घेतात हे आम्हाला माहीतच नव्हते, माझी आई आमच्या बरोबर शेजारच्या मुलांचेही युनिफॉर्म शिवून देई. त्यामुळे आमचे बालपण अगदी खाऊन-पिऊन सुखी असेच गेले. शाळेत एकच कंपास किंवा कलर बॉक्स तिन्ही भावंडात वापरायचा असतो हे जणू नैसर्गिकच होते.
तसे लहानपणी आम्ही तिघेही दंगामस्ती करून तिची तारांबळ उडवू. माझ्या बाबतीत एक आठवण आई सांगे की, मी म्हणे तीन वर्षांची असताना स्टोव्हवर भात उकळत असताना त्यात हात घातला होता आणि तिची बिचारीची भयंकर धावपळ केली होती. माझा भाऊ तर इतका धडपड्या होता की रोज काही ना काही त्याचा उद्योग चाले. बहिणीचेही तेच, तीने दोन वेळा हात फॅक्चर करून घेतला होता. आम्हाला धाक फक्त वडिलांचा वाटे ! किती फुलपंखी होते ते दिवस ! भुर्रकन उडून गेले.
त्या काळी आतासारखे ऊठसूट पर्यटन वगैरे नव्हते पण आम्ही एप्रिल मध्ये वार्षिक परीक्षा झाली की सगळे कोकणात जात असू. बाबांना एवढी रजा शक्य नसल्याने ते पोचवायला आणि आणायला येत असत. आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गावीच राहत असू. मनसोक्त आंबे, फणस इतर कोकणमेवा, डोंगर दऱ्यात फिरणे आणि मामे/मावस/चुलत भावंडं बरोबर भरपूर मौज करणे यात एवढे थ्रील असे की आता फॉरेन टूर करून आल्यावरही बालपणीचे कोकणच जास्त भावते.
एकमात्र आहे बालपणीची मैत्री आपण कधीच विसरत नाही. शाळेतील मित्र-मैत्रिणी असो किंवा शेजारचा मित्रपरिवार असो. आता त्यातल्या बहुसंख्य मित्र-मैत्रिणींचा काही ठावठिकाणा माहीत नाही तरीदेखील प्रसंगानुरूप कधीतरी आठवण येते आणि जे अजूनही संपर्कात आहेत त्यांच्याशी बोलताना वयाचे भान विसरून अखंड गप्पा आणि मौजमजा होतेच. शालेय जीवनात केलेल्या खोड्या, शिक्षकांना दिलेला त्रास, शिक्षा म्हणून बेंचवर उभे राहणे, खरेच आत्ता आठवले तरी गंमत वाटते. त्याकाळी शिक्षकांना शिक्षा करायला पूर्ण मुभा होती आता सारखे पालक जाब विचारत नसत. एवढी मजा कॉलेज जीवनात वाटत नाही. कदाचित अल्लड बालपण संपल्याची जाणीव होत असावी. कॉलेज जीवन संपले की नोकरी, नंतर संसाराची जबाबदारी या सर्व धकाधकीत आपण एक मशीन झालो आहोत हे प्रकर्षाने जाणवते पण त्यातूनही एखाद्या प्रसंगात या बालपणीची एखादी गंमत आठवली की सगळा ताण निघून जाऊन आपण अजून माणूसच आहोत ही भावना होते.
आपले बालपण हे एक संजीवनी औषध असते, निराश मनाला नवचैतन्य देणारे अमृत असते आणि हे अमृत आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत आपल्याला पुरते.
दिन जो पखेरु होते, पिंजरे में मै रख लेता, पालता उनको जतन से, मोती के दाने देता, सीने से रहता लगाये !
