vijay chavan

Others

4  

vijay chavan

Others

बाबांना पत्र

बाबांना पत्र

3 mins
1.1K


प्रिय बाबा, 

      कसे आहात ? मला ठाऊक आहे. कदाचित मला बरे वाटावे म्हणून तुमचे उत्तर 'मजेत' असेच असणार. बरं पत्र यासाठी लिहतोय की आज थोडं एकटे वाटत होते, तुमची आठवण येत होती, तशी ती नेहमीच येते. पण आज खुप जास्त येतेय. खरं तरं मला तुमच्याशी खूप बोलायचे आहे. मनात साठलेले सगळे सांगायचे आहे. तुम्ही अचानक सगळ्यांना सोडून गेला. फारसे बोलताही नाही आले आपल्याला. एवढेच काय! प्रेमाची शेवटची मिठी सुद्धा नाही मारता आली हो. तुम्ही सोडून देवाघरी गेला आणि माझी रात्रीची शतः पावली कमी झाली, कमी काय ! बंदच झाली जवळपास. असे म्हणतात वडिलांची चप्पल मुलाच्या पायात बसू लागली की, त्या दोघांमध्ये मैत्रीचे नाते तयार होते. खऱ्या अर्थाने आपले हे नाते जास्त खुलत गेले ते शत:पावलीच्या निम्मिताने ! दिवसभर घडलेल्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायची सवय त्यामुळेच लागली. मला अजूनही आठवते शाळेत असताना पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही माझ्या आणि दादा मध्ये एकच छत्री दिली होती. पण मला ते अजिबात आवडले नाही, आणि मी तुमच्याकडे दुसऱ्या छत्री साठी हट्ट करू लागलो. नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण झाल्यावरआपण फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलो. तुम्ही तीच छत्री माझ्याकडे दिली. बाहेर पाऊस सुरू होताच पण तुम्ही माझ्या सोबत छत्रीमधून न चालता पावसात भिजत चालण्याचा पर्याय निवडला. मी तुम्ही माझ्याशी बोलावे यासाठी काहीना काही बोलण्याचा प्रयत्न करत होतो. अचानक मोठा वारा आला व माझी छत्री उलटी झाली. तुम्ही माझी छत्री सरळ करण्यासाठी सुरू असलेली धडपड शांतपणे पहात होता. मला छत्री सरळ करणे कठीण जाऊ लागले. पाऊस कोसळत होता, वारा थांबायचे नाव घेत नव्हता. काय करावे मला काहीच सुचत नव्हते. न राहवुन तुम्ही जवळ येऊन माझी ती छत्री सरळ करत " आपल्या माणसांना सोबत घेऊन नाही चालले तर आपण कसे अडचणीत सापडतो ते समजले का ?" एवढे बोलून पुढे निघून गेला. त्यानंतर मला ती छत्री आयुष्यात कधीच अपुरी नाही वाटली. माझा दहावीचा निकाल लागल्या नंतर कोणते क्षेत्र निवडायचे असा यक्ष प्रश्न माझ्या समोर होता, पण तेव्हा "आयुष्यात कोणताही निर्णय चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे आपल्याला सिध्द करता आले पाहिजे" ह्या वाक्याने जो विश्वास माझ्यावर दाखवला तोच विश्वास कायम सोबत घेऊन मी तेव्हा सुरू केलेली वाटचाल अजूनही चालतो आहे. अश्या एक ना अनेक गोष्टी मधून तुम्ही मला आयुष्य जगायला शिकवले. अजूनतरी तुमच्या अनुभवातील आणि नजरेतील तेच आयुष्य मी प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करतोय. काय गंमत आहे ना बाबा ! लहानपणी मी तुम्ही कामावरून घरी येण्याची वाट पहायचो आणि नंतर तुम्ही माझी वाट पहात होता. असे सहज मी तुम्हाला बोलून गेलो , त्यावर 'परिस्थिती नेहमी सारखी रहात नाही ती बदलत असते'. हे तुम्ही दिलेले उत्तर अतिशय मार्मिक होते. त्यावेळी तुम्ही मला नेहमी जे बोलायचा की ' बाळा, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे मी पाहिले आहे आणि त्या प्रत्येक पावसात आजारी पडेपर्यंत मी भिजलो आहे ' ह्यात किती तथ्य आहे ते मी अनुभवले. माझ्यासाठी तुम्ही जणू मला पडलेल्या प्रश्नां साठी गाईडच होता. तुम्ही मुलांचे शिक्षण, पालनपोषण, त्यांचे हट्ट पुरवणे हे सगळे केले पण त्याही पलिकडे जाऊन खूप वेगळे आयुष्य दिले. जे आता आम्ही आमच्या मुलाला देण्याचे प्रयत्न करतोय. बाबा तुम्ही गेला आणि माणसे तर बदलली त्यासोबत बऱ्याच गोष्टी बदलल्या. पिल्लूच्या डोळ्यातील निरागस प्रश्न सुद्धा ! सगळ्यांचे आजोबा आहेत, माझे आजोबा कुठे आहेत, मग ते नक्की कुठे गेले, मला कधी भेटणार ? ते औषधे वेळेवर घेतात का ? जर त्यांना भूक लागली तर तिथे मैग्गी मिळते का ? असे काहीसे ! पिल्लूने देवाला यासाठी माझ्या मोबाईल वरुन व्हिडीओ कॉल सुध्दा करण्याचा प्रयत्न केला, पण नेमका कॉल कोणत्या देवाला करायचा हा संभ्रम कायम राहिल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यावेळी मला एक गोष्ट नव्याने समजली ती अशी की " जर मोबाईल आणि आपण नेटवर्क मध्ये नसू तर त्याचा उपयोग फक्त गेम खेळण्यासाठी होतो". राहून राहून एक विचार सारखा मनात येतो, बाबा ! तुम्ही अजून थोडे थांबायला हवे होते, एवढया लवकर का गेला आम्हाला सोडून. आमच्यासाठी नाही निदान आई साठी तरी थांबायला हवे होते तुम्ही, ती दाखवत नसली तरी खूप एकटी पडलीय तुमच्याशिवाय. आई साठी आणि पिल्लूला पडलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यासाठी तरी परत या ! सोशल मीडियाच्या दुनियेतही एवढे नॉट रिचेबल नका होउ बाबा! आम्ही सगळे तुमची वाट पाहतोय. Rate this content
Log in