Parag Pendharkar

Others

3  

Parag Pendharkar

Others

असा ही एक मनोजकुमार

असा ही एक मनोजकुमार

6 mins
505


नेहमीप्रमाणे कामाची शिफ्ट संपल्यावर दीड एक मैलाची रपेट करून आमच्या कंपनीच्या गाडीतळावर पोचलो. माझे काम संपल्यावर बसमध्ये बसून तास-दीड तास पुस्तक वाचण्याचा माझा नेहमीचा कार्यक्रम. गाडीमध्ये मी इतरांशी ओळख वाढवायचा प्रयत्न करत नसे, कारण ओळखीचा त्रासच जास्त. माझ्या वाचायच्या छंदात उगाच व्यत्यय कशाला? थंडी सुरु झाली की संध्याकाळी उजेड पण कमी मिळायचा. रुक्षपणाची चादर पांघरली की बरेच प्रश्न आपोआप सुटतात असा माझा एक विश्वास. हे अभेद्य कवच मी बरेच दिवस टिकवले आहे. कधी अभ्यासाची पुस्तकं, तर कधी साहित्य चाळून.


बसमध्ये मागील बाकांवर टवाळक्या चालू होत्या. पुढील बाकावर केळकर मास्तर शेजाऱ्याशी वाद घालून काहीतरी पटवून द्यायचा प्रयत्न करत होते. डावीकडे बसलेल्या बायकांची बडबड चालू होतीच. उगाचच इंग्रजीचे फाटे फोडून आपल्या ‘मॉडर्न’पणाची जाहीरात करणे, मधूनच आपल्याकडे इतरांचे लक्ष आहे का याची खात्री करणे इत्यादी इत्यादी...


कांबळे आपली गाडी सर्वात पुढे कशी नेता येईल यासाठी कस लावत होते. गाडी हमरस्त्यावर आल्यावर मागील मंडळीचे अथर्वशीर्ष चालू झाले. जप चालू असताना, रस्त्यावरील ‘आकर्षक’ दृश्य, मान वळवून, दृष्टीआड जाईपर्यंत निरखून बघणे, हा अथर्वशीर्ष पठणाचा एक महत्वाचा भाग. बसच्या बाहेरील मंडळीला हा प्रकार गमतीशीर दिसत असावा.


या सर्व मंडळीत, एक नेहमीचे ‘गिऱ्हाइक’, आज माझ्या शेजारी येवून बसले होते. मी नेहमीप्रमाणे टाळण्याचा प्रयत्न करीत होतो. माझ्या मित्रमंडळींनी मला इकडून तिकडून ऐकीव माहिती दिल्यामुळे मी सावध होतो. माझे या व्यक्तीशी कुठल्याच प्रकारे जमणे शक्य नव्हते. तसा ‘मनोज’ स्वभावाने अत्यंत मोकळा. (स्वतःबद्दलची सर्व माहिती बसमधील सर्व लोकांना सांगून झालेली.) डिप्लोमा झाल्यावर तो आरेखक म्हणून आमच्या कंपनीमधील विद्युत विभागात लागला. 

कामाला कष्टाळू म्हणून प्रसिद्ध. पण इतरांचे “गिऱ्हाईक” होण्यास पात्र असलेल्या मंडळींपैकी एक. नुसती काडी लावायचा अवकाश, की “मी” पणाची जाहिरात. आज ही व्यक्ती माझ्या नशिबी. मागून, माझा एक मित्र मला “कसा सापडलास” असं म्हणून चिडवत होता. मी आपला चेहरा मख्ख ठेवण्याचा प्रयत्न करत होतो.


एका आठवड्यापूर्वीच मी कंपनीत राजीनामा दिला होता. चौदा वर्षांचे तप संपण्यास केवळ तीन आठवडे राहिले होते. नेहमीचा दीड तासाचा प्रवास संपणार होता, पण त्याबरोबर माझे वाचनही जवळपास संपुष्टात येणार होते.


शेजारचा चष्मा माझ्याकडे वळला होता. 

“मी मनोज.” मी बघितले आहे तुम्हाला इ.आर.सीत.”

“मी पराग.” (पुस्तकाकडे नजर वळवायचा प्रयत्न निष्फळ ठरला.)


“हो. मी ओळखतो.” परत आपल्यास सर्व माहित असते असा अविर्भाव.. आणि मग म्हणाले, “तुम्ही जिकडे चाललाय तिथे मी पण जाऊन आलो आहे.”


“मी एन आय बी एम जवळ राहतो.”


परत मिश्किल हास्य. फ्या फ्या फ्या 


“नाही. मी म्हणालो “त्या” कंपनीमध्ये मी पण गेलो होतो. चांगली झाली होती माझी मुलाखत. electrical क्षेत्रातील खूप कमी लोक आले होते. ते म्हणाले होते की, आम्ही नक्की कळवू. मस्त झाला होता इंटरव्यू. आश्चर्य वाटते, अजून बोलावले कसे नाही ते.” (मनात कदाचित असे असावे की या माणसाला कसे निश्चित केले हेच कळत नाही. याच्याकडे तर साधी डिग्रीदेखील नाही!)


मी निर्ढावलेला असल्यामुळे मी दुर्लक्ष करून म्हणालो, “थोडा उशीर झाला असेल कळवायला.” विषय वेगळीकडे न्यायला मी विचारले, “तुम्ही कुठे उतरणार?”


“साळुंके विहार. एसआरपीएफमध्ये माझे आजोबा होते. त्यामुळे त्या मागील सर्व टेकड्यांवर मी फिरलो आहे लहानपणापासून... तसा मी मूळ साताऱ्याचा. कराड पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण झाले.”


आता इंजिन तापले आहे आणि गाडी सुटणार आहे, याचा मला अंदाज आला होता. मागून माझा मित्र ढुश्या देऊन माझी मजा बघत होता.

“कबड्डीमध्ये उत्कृष्ट खेळाडू... होस्टेलमध्ये सर्व ठीकाणी प्रसिद्ध. काय सांगायचे तुम्हाला...मी एक कवी आहे.”


अरे बापरे... आणि मला कविता कळत नाहीत.” मी पुटपुटलो (मनात)


पण तोपर्यंत सुरुवात झाली होती... कुठ्लीशी वही काढून माझ्या वर हल्ला चालू झाला. आधीच माझं मराठी कच्चं. त्यावर कवितेबद्दल फारशी आवड नव्हती. पी. जी. वुडहाऊसच्याप्रमाणेच कवीबद्दल माझे मत.

नंतर एका मुलीला मी कसा आवडत होतो, वगैरे यावर एक छोटीशी विरही प्रेमकथा (स्वतः बद्दल) पण ऐकवली. माझ्याशी झालेल्या दीड तासाच्या पहिल्या भेटीत??? मी विचार करत होतो. कोण कोणास विटले असावे. तिला भेटलो नसलो तरी मी एकाला जवळपास पक्के केले होते.


यानंतर माझे गिरीभ्रमणाबद्दल, याविषयी विचारपूस केली आणि कळले की हे गृहस्थ काही कमी नाही." हिमालयात हिंडलो नसलो तरी साताऱ्याला राहणार, म्हणजे सर्वच गिर्यारोहक. मी दुचाकीवर लांबचा फेरफटका मारून आलेलो आहे, सातारा – रायगड." माझ्यावर अतिमारा होऊ लागला की मला काही न ऐकू येण्याची कला थोडीफार अवगत आहे आणि मी मान डोलावून उघड्या डोळ्यांनी एक डुलकी मारू शकतो. एक गोष्ट मात्र मनात बिंबवली गेली की ही व्यक्ती गरीबीतून कष्टाने वर आली आहे. 


साळुंके विहार येईपर्यंत दुःख फक्त एवढेच होते की पुस्तक वाचून संपले नाही आणि वाचनालयात जाऊन बदलता येणार नाही. पुढील आठवडा फुकट जाणार.


नव्या कंपनीमध्ये गेल्यावर जुने ओझे कमी केल्याचे समाधान झाले आणि नवीन कामावर आगेकूच चालू होती. भारताबाहेरचे काम देशात आणायला साधारण काय पेच येतात हे प्रत्यक्ष दिसत होते. जिद्दीने आम्ही सर्व मंडळी कुठे कमी पडू याबद्दल काळजी घेत होतो. तिथे गेल्यावर कळले की मनोज तेथील परीक्षेत उत्तीर्ण झाला नव्हता. आम्हाला अजून लोक तर हवे होतेच. माझ्या मॅनेजरने विचारल्यावर मी मनोजबद्दल शिफारस केली. जे काम करायचे होते त्यासाठी तो उपयुक्त आहे ही हमी दिली. मनोजबरोबर इतर २-३ नावे पण होती. अर्थात, आम्हाला परत विचारण्यात आले की या व्यक्तीला तर reject केले होते. 


परिस्थितीची गरज म्हणून कधीकधी उजवा कौल द्यावा लागतो आणि हे करायचा, माझा पहिला प्रयत्न.


काम चालू झाले आणि केवळ ८ महिन्यात आम्हाला पहिला फटका बसला. आमचे डिपार्टमेंट बंद करण्यात आले. पण आम्हाला दुसरे कामदेखील मिळाले. मनोज या गोष्टीची जाहिरात करीत शेजारी, जिथे मुलींचा कळप बसलेला असतो तिथे देवदासासारखे तोंड पाडून बसले... सांत्वन करून घ्यायला.


याचे सोंग बघून या (कवी)ची कीव करावी, की वाळीत टाकावे हे कळेना. शेवटी आपलेच दात आपलेच ओठ म्हणून दुर्लक्ष केले. गिऱ्हाईक बनण्याची स्वतःचीच तयारी असेल तर कोण की सल्ला देणार. आम्ही इतर सर्व कंबर कसून कामाला लागलो होतो. उगीउगी झाल्यावर मनोज’कुमार’ वठणीवर आले.


प्रोग्राममधील चुका काढणे हा आमचा नवीन 'उद्योग'. कोण किती चुका काढते ही उंदराची शर्यत चालू झाली आणि त्यांचा म्होरक्या मनोज होता. दुसऱ्या कोणाला पुढे जाऊ द्यायचे नाही, म्हणून इतरांपेक्षा नेहमी एक पाउल पुढे. एक डोळा नेहमी लिस्टकडे. १००० वी “चूक” शोधून काढणाऱ्यांना मनोजची अभिनंदनाची तार कारण या माणसाच्या “सहजच“ लक्षात यायचे.. अशा लोकांची या गृहस्थाने यादी बनवलेली असावी.


काही वर्षांनंतर माझा आणि मनोजचा फारसा राहिला नाही. कारण त्याचा मॅनेजर वेगळा. त्याला शाबाशी मिळाली की त्याची पुरेपूर जाहिरात. पलीकडून एकदा या व्यक्तीचा क्लोन बनवला पाहिजे, इथपर्यंत कौतुक. मध्ये कधीतरी मनोजने मेनजमेंटमध्ये शिक्षण केले. इतरांना गुंडाळायची कला बऱ्यापैकी अवगत होती. अधूनमधून मला आठवण यायची, भस्मासुराची. या माणसाचा हात कधी याच्या डोक्यावर जाईल.


कधी काळी मी ‘रेबेका’ वाचले होते. लेखिकेचे कौशल्य हे कि शेवटपर्यंत रेबेका वाईट कि चांगली हे वाचकाला शेवटपर्यंत गोंधळवून टाकेल असे रहस्य. जे काही मी मनोजच्या आस पास बघत होतो ते काहीतरी वाईट खुणावत होते. काही वर्षांपूर्वी त्याच्या आधीच्या कंपनी मधील खास मित्राने सोडून जाताना, या माणसाने असहकार्य करून त्रास दिल्याचे सांगितले. तो काम करत असलेल्या भागात कोणीच टिकत नसे. नंतर, २ मुली जॉईन होऊन वैतागून निघून गेल्या. तिसरी मुलगी अतिरेक सहन करत होती. बर्फाच्या सुरीने वार केल्यावर काय पुरावा राहील.


मनोजची अत्यंत श्रेष्ठ जागेवर नेमणूक झाली होती. साहेब पलीकडे होता. सर्रास मिटींग्स मध्ये वा कधी कधी जागेवर घोरत झोप काढायाचा. चाहूल लागली कि विचार करत असल्याचे दाखवायचा पगाराची परतफेड तर सोडाच पण बाजूच्या खुर्चीवर बसलेल्यांना काय वाटेल याचा विचार करायचीही गरज वाटत नव्हती. कमी वेळात करता येणाऱ्या कामाचा फुगवून दिलेला अंदाज आणि शेवटी खूप कमी वेळात खूप जास्त काम केल्याचे कौतुक, आता नेहमीचे झाले होते.


यावेळी लोक कमी करायचे फर्मान आले आहे. अशावेळी एक शंका मनात येते. आपण करत असलेले काम आणि त्याबद्दलचा मोबदला हा कंपनीला परवडत नसेल तर? अशावेळी बिनधास्त आणि सर्वात जास्त किरकिर करणारे लोक काहीही काळजी करत नाहीत. 


आज असे वाटत आहे की हा भस्मासूर वाचणार आणि याच्या बदल्यात एका - दोघा कामाच्या व्यक्तीचा नाहक बळी जाईल. या व्यक्तीला मीच इथे आणले हे डोक्यातून जात नाही. हे पण आठवते की हा एकावेळी चांगला कामाचा माणूस होता. 


आज ना उद्या मोहिनीच्या संमोहनाने, कधीतरी भस्मासूर तलावात उतरेल आणि केसातील पाणी दूर करण्यासाठी हात डोक्याला लावेलच.


Rate this content
Log in