अनंताचं ऑपरेशन
अनंताचं ऑपरेशन


"चला, काका, बंद करा तोंड आणि उठा."
मान हलवत डाॅक्टर अच्युत बर्वेंनी अनंताकडे पाठ फिरवली, चार पावलं चालले, एक गिरकी घेतली आणि टेबलामागच्या त्यांच्या खुर्चीत जाऊन बसले. एक रायटिंग पॅड समोर ओढलं आणि लिहू लागले. अनंतापण पेशंटच्या उंच खुर्चीतून सरपटत बाहेर आला, दोन पावलं चालला आणि डाॅक्टर अच्युत बर्वेंच्या समोरच्या खुर्चीत अलगद जाऊन बसला.
डाॅक्टर अच्युत बर्वे, डेंटीस्ट, म्हणजे एकेकाळचा अनंताच्या शेजारचा "रडका अच्युता". पण डेंटल काॅलेजला जाऊन मेडल मागून मेडल मिळवायला लागल्यावर "रडका " हे बीरूद आपोआपच गळून पडलं आणि सगळेच शेजारी पाजारी "डाॅक्टर, डाॅक्टर " करायला लागले, आणि, हा रडका अच्युता आता अनंताचा आणि काॅलनीतल्या सर्वच गरजूंचा "फॅमिली डेन्टिस्ट" होऊन बसला होता.
"काय आहे काका, त्या वरच्या दोन उजवीकडच्या दाढा पूर्ण गेलेल्या आहेत. तुम्ही फार उशिरा आणलंत त्याना माझ्याकडे. नाऊ आय कान्ट हेल्प यू. त्या काढूनच टाकायला पाहिजेत. एक्सट्रॅक्शन. काय ?" अगदी निर्वाणीच्या सुरात, "एक्सट्रॅक्शन" च्या प्रत्येक जोडाक्षरावर जोर देत अच्युतानं सांगुन टाकलं.
हे ऐकल्यावरचे अनंताच्या चेहऱ्यावरचे निराशेचे, दु:खाचे भाव बहुतेक अच्युताने अचुक टिपले असावेत.
"पण तुम्ही काही काळजी करू नका, काका. आपण नंतर एक ब्रिज टाकुन देऊ तिथे." पूल आणि पाटबंधारे खात्याच्या मंत्र्यांच्या स्टाइलवर अच्युतानं एक आश्वासन ठोकुन दिलं.
"आता काढायलाच पाहिजेत म्हणतोस,तर ठीक आहे, काढुन टाक". अनंताने उपरं अवसान आणलं.
"अहो काका, एवढं सोपं नाही हे काम. दोन्ही दाढांची मुळं, रूट्स, भक्कम आहेत आणि वाकडी गेलेली आहेत. हा एक्स रे पहा". असं म्हणत एक छोटी एक्स रे प्लेट आच्युतने अनंताच्या तोंडासमोर धरली. अनंताने तिच्यावर नजर फिरवली आणि त्याच्या अनभिज्ञ नजरेलाही ईश्वराने केलेली घोडचुक लक्षात आली.
"तेंव्हा काका, असं बघा, इथे माझ्या क्लिनिक मधे करण्यापेक्षा हे काम आपण हाॅस्पिटल मधे करु या. मला जरा व्यवस्थीत बॅक अप मिळेल आणि तुमचंही काम आरामाशीर होऊन जाईल. काय ?"
अच्युतचं रेडीमेड सोल्यूशन.
"इथल्या सेवासदन हाॅस्पिटलला माझे तीन दिवस असतात आठवड्यामधे, मंगळवार, गुरुवार, शनिवार. तर पुढच्या मंगळवार साठी तुमचं बुकिंग करतो. या तिथे सकाळी आठ पर्यंत, दुसऱ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर च्या बाहेर. पहिलं तुमचंच प्लॅन करु. ठीक आहे? बारा तास आधी काही खाऊ नका मात्र."
एका दमात अच्युताने स्वत:च्या आणि अनंताच्याही वतीनं निर्णय घेउन टाकले आणि अनंताला नुसती मान हलवण्याशिवाय काही पर्यायच उरला नाही.
"खर्चाचा काही अंदाज?" अनंताने प्रश्न विचारला.
"स्टॅन्डर्ड चार्जेस, काका." अच्युताने भराभरा सांगितलं. "ऑपरेशन थिएटर चार्ज, अॅनेस्थेटिस्ट चार्ज, आणि काही औषधं, इंजेक्शनं वापरली जातील त्यांचं बिल आणि हो माझा ऑपरेशन चार्ज लावलेला असतो, पण काका, तुमच्याकडून तो नाही घेणार."
काहीतरी गुळमूळीत बोलून अनंताने पाठ वळवली.
"आणि हो, या सगळ्या ब्लड टेस्ट करून घ्या आणि रिपोर्ट द्या मला". जाता जाता कागद हातात देत अच्युता म्हणाला.
अनंता घरी आला आणि गीताला घडलेली सगळी हकीकत सांगितली.
"काय ? तो रडका तुमचं ऑपरेशन करणार आहे, संभाळा म्हणजे झालं". गीताची उत्स्फूर्त रिअॅक्शन.
"देवाने पर्यायच नाही ठेवला दुसरा". अनंताचा अत्यंत निरुत्साही शेरा.
"ऑपरेशन" या शब्दाने दात काढण्याच्या प्राॅजेक्टवर एक वेगळंच सावट आणलं. अनंताचं किंवा गीताचं याआधी कसलंही आॅपरेशन झालं नव्हतं, त्यामुळे अॅनेस्थेटिस्ट, ऑपरेशन थिएटर, वगैरेंशी दोघांचाही प्रत्यक्ष संबंध अगदी कमी प्रमाणात आलेला होता आणि दोघंही त्यामुळे जरा अस्वस्थच झाले. मग पुढचे चार दिवस दोघांनीही त्या त्या दिवसानुरुप वेगवेगळ्या देवळात जाऊन त्या त्या माउलींना मनोभावे साकडं घालण्यात घालवले.
डाॅक्टर अच्युतने दिलेल्या सुचनेबरहुकूम सोमवारी रात्री लवकर जेऊन दोघंही झोपले. रात्रीच्या अस्वस्थ झोपेत आॅ-प-रे-श-न ही पाच अक्षरं हातात हात धरुन अनंताच्या डोक्यात फेर घालत होती. मंगळवारी सकाळी पावणे आठ पर्यंत ब्रेकफास्ट वगैरे काही न घेता सेवासदन हाॅस्पिटलमधे अनंता आणि गीता पोहोचले आणि सरळ दुसऱ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर पाशी जाऊन थडकले. तिथे काॅरिडाॅर मधे बरीच मंडळी बसलेली दिसली. एक दोन जण स्ट्रेचर वर पहुडले होते, एक दोघं व्हील चेअरवर होते आणि बाकी नातेवाईक वगैरे धट्टेकट्टे निरोगी लोक खुर्च्यांवर बसले होते.
गीताने दोन रिकाम्या खुर्च्या ओढल्या आणि त्यांच्यावर दोघांनीही बुडं टेकली.
शेजारच्या खुर्चीवरची बाई बघत होती. गीताला ती विचारती झाली, "कोणाचं ऑपरेशन आहे? "
गीताने मानेनेच अनंताकडे खुण केली. मग ती बाई सहानुभूती पूर्वक नजरेने अनंताकडे पाहू लागली.
ते सहन न होऊन दुष्ट बुद्धीने गीताने तिला विचारलं, "तुमचं पण ऑपरेशन आहे का?".
"नाही हो," बाई अनंतावरील आपली नजर हलवत आणि जवळच्या स्ट्रेचर वर अवघडुन झोपलेल्या माणसाकडे हात दाखवत म्हणाली,
"यांचं आहे, हर्निया. "
ही माहिती दोघं पचवत होते, तेवढ्यात त्या बाईने पलिकडे व्हील चेअर वर बसलेल्या माणसाकडे हात दाखवला आणि आणखी मौलिक बातमी दिली. "आणि त्यांचं नं, घशाचं आहे, स्वरयंत्राचं. "
अनंता आणि गीता माना डोलावत होतो, तेवढ्यात त्या बाईने चौकशी केली, "यांचं कसलं ऑपरेशन आहे ?"
"यांचे दात काढायचे आहेत " असं सांगणं गीताला जरा मुळमुळीत वाटलं असावं. म्हणून तिने मोघमच सांगितलं, "तोंडाचं आहे", आणि मग बरोबर आणलेल्या बॅगेत उगीचच काहीतरी शोधण्याचं नाटक तिने सुरू केलं आणि संभाषणातुन अंग काढून घेतलं.
सव्वा आठ वाजतायत तोच एक वाॅर्ड बाॅय अनंताला शोधत आला.
"अनंत देशपांडे तुम्हीच का ? चला साहेब, तुमची केस पहिली आहे. चला थिएटर कडे".
मोठ्याने केलेली अनाउन्समेंट ऐकून सगळेच जण अनंता आणि गीता कडे पहायला लागले. दोघंही उठले. गीताला त्याने तिथेच थांबायला सांगितलं आणि अनंताचा खांदा पकडून सावकाश चालवत त्याला ऑपरेशन थिएटर कडे नेलं. ऑपरेशन थिएटर च्या प्रवेशाजवळच असलेल्या एका खोलीत अनंताला बसवून वाॅर्डबाॅय निघुन गेला.
पाच एक मिनिटांनी एक थिएटर असिस्टंट आला.
"देशपांडे तुम्हीच नं"? त्यानं विचारलं आणि अनंताने मान हलवल्यावर पुढे म्हणाला, "चला, चेंज करा. तुमचं दातांचं काम आहे नं, मग फक्त शर्ट काढा आणि हे घाला". असं म्हणून कपाटातुन काढुन एक हिरव्या रंगाचा घडी केलेला कपडा त्याने अनंताच्या हातात कोंबला आणि तो निघून गेला. अनंताने आपला शर्ट काढला आणि दिलेल्या कपड्याची घडी उलगडली. पण काही केल्या तो अंगात कसा चढवायचा, डोकं कुठुन घालायचं, हात कुठुन घालायचे, ते अनंताला समजेचना. पाच एक मिनिटांनी दुसरा एक थिएटर असिस्टंट अनंताला न्यायला आला. त्याला अगदी काकुळतीने अनंताने विचारलं, "अहो, प्लीज जरा हे कसं घालायचं सांगता काय ? "
गृहस्थाने कपडा हातात घेऊन त्यावर नजर टाकली. "अहो, हे मशिनचं कव्हर आहे. ते कसलं घालताय?" असे म्हणत त्याने तो कपडा बाजुला टाकला आणि कपाटातून काढून दुसरा घडी केलेला हिरवा कपडा अनंताच्या हातात दिला. "हां, हे घाला चट चट", असं म्हणून, अनंताकडे "कुठले एकेक लोक येतात कोण जाणे" अशा काहीशा अर्थाची नजर टाकून तो निघून गेला .
नवा अंगरखा चढवण्यात काही प्राॅब्लेम आला नाही आणि दोन मिनिटांत अनंता तयार होऊन बसला. तेवढ्यात तोच थिएटर असिस्टंट परत आला, अनंताला हाताला धरून आत घेऊन गेला आणि थोडा आधार देऊन ऑपरेशन टेबलावर बसवलं.
तोंडावर हिरवा मास्क लावलेल्या चार लोकांपैकी एकजण पुढे आला. "काका, कसे आहात, बरं वाटतंय नं, तोंड उघडा बरं जरा, मोठ्ठा आ करा". अशी वाक्यांची सरबत्ती तोंडावरच्या मास्कच्या मागून ऐकायला आली. व्यक्ती कोण आहे याबद्दल अनंताला शंकाच नव्हती. त्याने आपलं तोंड उघडलं.
इन्सपेक्शन झालं.
"ठीक आहे , झोपा आता, इकडे डोकं करा". आज्ञा मिळाली आणि त्याप्रमाणे अनंता आडवा झाला.
तेवढ्यात हिरवा मास्कवाली आणखी एक व्यक्ती जवळ आली आणि मंजुळ शब्द ऐकू आले," काका मला ओळखलं का ? मी श्रुती प्रधान, तुमच्या मितालीची मेडिकलची क्लासमेट. एकत्र अभ्यास करायच्या आम्ही. आठवतं का ? इथे अॅनेस्थेटिस्ट आहे मी."
अनंता म्हणाला "असं का", आणि पुढे "हं, हं" केलं. अनंताची मुलगी मिताली मेडिकलला असताना हाॅस्टेलमधे रहायची. त्यामुळे तिच्या मैत्रिणी वगैरे फारशा अनंताला तरी माहिती नव्हत्या. हां, दुसऱ्या वर्षाच्या एका सेमिस्टरला मात्र ती घरुन काॅलेजला जायची !
आणि मग अनंताला झटक्याने आठवलं.
त्या सेमिस्टरला शनिवार रविवार आणि सुटीच्या दिवशी तीन चार मैत्रिणी जमून अभ्यास करायच्या खऱ्या, देशपांड्यांच्या घरात. ही मुलगी पण त्यात होती. नंतर एकदा तिच्या तोंडून निरागसपणे रिमार्क निघाला, "मितू, तुझ्या बाबांना निळा शर्ट अगदी छान दिसतो, नाही का गं ?"
मिताली आणि तिची आई, दोघीही चमकल्या होत्या. किचनमधे थोडा गडगडाट, थोडी कुजबुज झाली होती. "अभ्यासापेक्षा यांच्यावरच जास्त लक्ष हिचे", असे काहींचे शब्द अनंताला ऐकू आले आणि मग त्या दिवसापासून श्रुती प्रधान देशपांड्यांच्या घरातून जी हद्दपार केली गेली ती परत काही अनंताला त्याच्या घराच्या पंचक्रोशीत दिसली नाही.
"ही आत्ता इथे कुठे उपटली !" अनंताने हताश होऊन डोळे घट्ट मिटून घेतले.
श्रुती प्रधान बोलत होती. "काका, मी तुमचे व्हायटल पॅरामीटर माॅनिटर करणार आहे हं, अगदी घाबरू नका.
बोलता बोलता तिने अनंताच्या बोटाला एक क्लिप लावली, मनगटावर एक कडं चढवलं आणि छातीवर दोन बुच्चं चिपकवली.
आत्ता हिला गीतानं बघितलं तर काय होईल, या धास्तीनेच अनंताने डोळे गप्पकन् मिटुन घेतले होते.
"काका तोंड उघडा, मोठ्ठा आ करा". अच्युत ची ऑर्डर आली आणि अनंताच्या तोंडाचा डावा भाग बधीर करून अनंतावरचं ऑपरेशन सुरू झालं. पुढची पंधरा वीस मिनीटं बरंच काही काम झालं. अच्युत पुढे येत होता, मागे जात होता, दात पकडून जोर लावत होता. अनंताला दुखत नव्हतं, पण जाणवत होतं.
श्रुती प्रधान आणि अच्युत, दोघंही "काका, घाबरु नका. शांत रहा, झालंच आता", अशी आश्वासनं देत होते. अनंताला तरी शांत पडुन रहाण्या शिवाय काय पर्याय होता म्हणा ! आणि मग अच्युतने एकदाचं डिक्लेअर केलं , "चला, संपलं", आणि तो हात धुवायला गेला.
श्रुतीनेही आपली यंत्रणा आवरती घेतली आणि "बाय, काका" म्हणत तीही चालती झाली.
दोन मजबूत शरीराचे वाॅर्डबाॅइज तिथे बाजुला वाट पहात उभेच होते. अनंताला टेबलवरून त्यानी स्ट्रेचर वर शीफ्ट केलं आणी शेजारच्या रिकव्हरी रूम मधे नेऊन ठेवलं.
ऑपरेशन संपल्याची सुवार्ता गीतेला कळली असावी. पाचंच मिनिटात, "अहो असे पांढरे फटक काय पडलायत" ? असं म्हणत गीता तिथेच आली. "कसं झालं, बरं झालं नं" ? तिने विचारपुस केली.
अनंताने मान डोलावली.
थोड्या वेळाने आधार देऊन गीतानं स्ट्रेचर वरुन अनंताला उठवलं आणि हळूहळू चालत दोघंही काॅरिडाॅर मधल्या खुर्च्यांवर जाऊन टेकले.
एका वाॅर्डबाॅयने आईस पॅक आणून दिला. तो अनंताने बाहेरून गालाला लावला. गीताला कोणी काॅफी आणून दिली.
तिलाही काॅफी घेतल्यावर तरतरी आली.
जरा वेळाने दोघंही उठले. एका हाताने गालावर आईस पॅक धरुन आणि दुसऱ्या हाताने गीताचा आधार घेत अनंता गाडीत बसला. गाडीने घरचा रस्ता धरला. काही संभाषणाचा प्रश्नच नव्हता. घर आलं. गाडीतून उतरून अनंताने सरळ बेडरूम गाठली आणि पलंगावर अंग झोकून दिलं. गीतानं अनंताच्या अंगावर पांघरूण टाकलं आणि ती आपल्या कामाला लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी अनंताला खूपच बरं वाटत होतं. नेहमी प्रमाणे सातच्या सुमारास दोघं बरोबर चहा घ्यायला बसले. गप्पा चालू होत्या. गीता विचारत होती, "कितपत दुखतंय ?"
अनंताने सांगितलं, "ठीक आहे".
पुढे गीतानं सहज स्वरात विचारलं, "अहो आपली मिताली मेडिकलच्या दुसऱ्या वर्षांला असताना श्रुती प्रधान नावाची मुलगी यायची तिच्याबरोबर अभ्यास करायला. तुम्हाला नसेल कदाचित आठवत. त्या श्रुती प्रधानला काल मी आॅपरेशन थिएटर मधुन बाहेर येताना पाहिली. तीही तिथे आतच होती का तुमच्याबरोबर, तुमच्या आॅपरेशनच्या वेळी ?"
अनंताच्या डोळ्यासमोर लाल बत्ती फ्लॅश व्हायला लागली. कानात सायरन वाजायला लागले. बिस्कीटांच्या बशीकडे लक्षपूर्वक पहात अनंता म्हणाला, "काय माहित, मी तर बेशुद्ध होतो. मास्क लावलेले चार पाच लोक आत होते खरे." आणि मग चहा बिस्कीटांवर पूर्ण लक्ष अनंताने केंद्रित केलं.
सुदैवाने तो विषय तिथेच संपला आणि अनंताने निश्वास सोडला.
असं झालं अनंताचं पहिलं ऑपरेशन.
नंतर वय वाढत गेलं, वयोमानानुसार होणारी इतरही ऑपरेशन झाली. काही सोपी, काही अवघड.
"एपिड्युरल", "एन्डोस्कोपिक" वगैरे अवघड शब्द अनंता न अडखळता उच्चारू लागला. अवघड आजारांबद्दल चार चौघात चर्चा करु लागला.
पण रडक्या अच्युताने केलेल्या त्या पहिल्या ऑपरेशनची आठवण अनंताला चिरस्मरणीय राहिली.
----x----