अन्नदाता संपावर
अन्नदाता संपावर


"ईडा पीडा टळो आन बळीच राज्य येवो"
अगदी मृत्यूच्या दारात असेपर्यत माझ्या आजोबांच्या ओठी असणारे शब्द आजही कानाला जाणवतात. अगदीच दारीद्रयात दिवस काढूनही शेताला प्राणाप्रमाणे जपणारे आजोबा, भरल्या डोळ्यानी आधी आभाळाकड आणि आता शासनाकड पाहणारा माझा बाप. लुगड्याला ठीगळं असतानाही बळीराजाची राणी असणारी "लंकेची पार्वती" माय. कर्जान म्हणाव का सरकारी धोरणान फासावर लटकलेला माझा काका, आणि दोन ईवल्या पाखरांना कवेत घेऊन उघड्या कपाळानं,अाध्याशासारखी समाजाकडं पाहणारी माझी काकी. सगळ कस भयावह स्वप्नासारख वाटतय पण हेच आमच्या जीवनाच वास्तव चित्र आह.
चार पुस्तक शीकून किंवा कोणत्या राजकीय नेत्याच्या शब्दात येऊन नव्हे तर मुलीच्या लग्नाला हुंडा नाही म्हणून मरणारा भाऊ पाहून, लहरी पावसानं आणि सरकारी धोरणानं स्वतःच्या शेतात अन्न पीकवूनही उपाशी राहणारी लेकरं पाहून आज आम्ही शेतकरी बांधव संपावर गेलोय. ज्याला सारं जग अन्नदाता म्हणत त्याला हा संप खरच शोभत नाही पण....
तुमच्या पोटाले हो भुखलाज संपाची
मज वाटेपण मी लटकू फासाव
तुम्हास कुठी माया दाटे?
जर वेळेवर पाऊस नाही आला तर त्या महादेवाला पाण्यात बुडवणारे आम्ही. सरकारच्या धोरणान अंतशय्येवर आलो आणि मग संविधानानं दिलेला संप आम्ही पुकारला.दूध रस्त्यावर टाकाव की गरीबाला द्याव हा या संपाचा प्रश्न नाही तर बुद्धीजीवींना आणि आंधळ्या शासनाला न दिसणारा सावकारीचा पाश, हमीभावाचा प्रश्न, कोरा सातबारा, शेतीविषयक योजना तळागाळापर्यत न येणे आणि अन्नदात्याचं अन्नाला पोरक होऊन आत्महत्या करणे हे आमचे प्रश्न आहेत. खरतर शासना सोबतच स्वतःला सुसंस्कृत समजणा-या समाजाचा आणि समाज रुढी विरोधातही हा ऊद्रेक आहे. कर्जमाफी, हमीभाव या साठीतर आम्ही लढतोय पण चार पुस्तक शीकून स्वताला हुंड्या साठी तयार करणाऱ्या समाजकंटकाना विरोधातही हा ललकार आहे. अच्छे दिनाच स्वप्न जागेपणी दाउन झोपलेल्या शासनाला आणि "कनिष्ट शेती" समजणा-या नराधमांना होय! "नराधमांनाच" वठणीवर आणन्याचा हा यलगार आहे.
"लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशींदा जगला पाहीजे" अस ज्या बळीराजासाठी म्हटल जातय त्याचाच आज बळी जातोय. सर्वसामान्यांना चार-सहा दिवस त्रास होतय तर संप तुम्हाला विषारी सापासारखा वाटतोय तर आता आपणच विचार कराव की जो त्रास तुम्हाला चार दिवस सहन होत नाही तो आम्ही पीढ्यांन पीढ्या जगतोय. होय, आमचा संप हा विषारी साप आहेच आणि त्याला तुम्ही जितका संपवायचा प्रयत्न कराल तितकाच तो फणा काढून प्रतिकार करेल पण याद राखा गड्याहो या विषारी सापाच्या चावण्यान कुणाचा जीव जाणार नाही तर लेकीच्या हुड्यासाठी, सावकारी कर्जापोटी, लेकरांच्या भुखेपोटी आत्महत्या करणाऱ्या आपल्याच अन्नदात्याच जीव वाचणार आहे. आता शेवटी त्या पांडुरंगाची ईच्छा. पण एक ध्यानात ठेवा "धरणी मातीतून सृजनाचा अन्नकण पिकवणारा अन्नदाता "शींगाड्याच्या" एका वारात जीमीनीत पुरुही शकतो."
शेवटी इतकेच.
आरे बळीचा मी राजा
माझाच बळी नका घेऊ
फारस काही नाही मागत
जाग शासनाले देऊ.