अनामिका
अनामिका


१० जुलै २०१० ची संध्याकाळ. आकाश काळंभोर झालं होतं, गार वारा सुटला होता, तरीही पाऊस पडेल असं काही वाटत नव्हतं. अनामिकेनं एकवार घड्याळाकडे पाहिलं, ५ वाजून २८ मिनिटं झाली होती. चहाचा कप हातात घेऊन अनू अंगणातल्या पायरीवर बसली. शनिवारची सकाळची शाळा करून, दुपारची झोप काढून फ्रेश झालेली मुलं खेळायला एकत्र जमली होती. ह्या कॉलनीत सहसा मुलं अशी एकत्र खेळताना दिसत नाहीत. इथे प्रत्येकाच्या घराला सिमेंटच जाडजुड कुंपण, कुंपणाच्या आत प्रत्येकाचं जग ! तरीही ही मुलं एकत्र जमायची पण क्वचितच. तशीच ती आजही जमली होती. डावासाठी मुलांनी रिंगण केलं आणि हातावर हात टाकले. अनामिकेला आपलं बालपण आठवलं....
भर बाजारपेठेतलं छोटसं घर, घराच्या मागच्या बाजूला भरपूर मोकळी जागा, तिथेच सारी पोरं जमायची. शेजारपाजारच्या गल्लीतली पोरंही यायची खेळायला. वेगवेगळ्या जातीधर्माची ती पोरं, भाषेतही खूप तफावत असायची. पण बेळगांवच्या ह्या पिढीला सवयच झाली होती या भेळ-मिसळ भाषेची ! तरी अनामिकेच्या गटात मराठी मुलांची संख्याच जास्त. तिलाही ते रिंगण आठवलं, हातावर हात ठेवून एकसाथ उडवायचे, कुणी उपडा, कुणी सरळ ठेवायचा, मग काही जोड्या सुटायच्या, शेवटी जो कुणी एकटा उरेल त्याच्यावर डाव यायचा. पण ह्या सगळ्या प्रकाराला काय म्हणायचो तेच आठवेना.... 'चला चकुया' असाच शब्दप्रयोग वापरला जायचा. त्याचा अर्थ काय ते कधीच कळालं नाही. पण शब्दांचे अर्थ काढून त्याचा कीस काढत बसण्याइतकं ’शहाणपण’ त्यावेळी कुणालाच नव्हतं, त्याची गरजही वाटली नाही कधी. प्रत्येकालाच फक्त खेळण्यात रस असायचा. लगोरी, लंगडी, छप्पी, साखळी, जोड-साखळी, पकडापकडी, लपंडाव, आईस-वॉटर आणि हो आरमीट किडा ! ह्या आरमीट किड्याचीही भारी गंमतच होती, गाणंच होत त्याचं....
आरमीट किडा
किसका घोडा?
मै बोंलू?
बोल
मग ज्याच्यावर डाव आला त्याने एखादी लोखंड असलेली जागा सांगायची आणि प्रत्येकजण मग लोखंड शोधत, पकडत अपेक्षित जागेपर्यंत पोहचायचा. अनूचा सगळ्यात आवडता खेळ मात्र लगोरी ! लगोरीसाठी लागणारी खापर चोरायची, मग फोडायची आणि त्याचे बरोबर ९ तुकडे करायचं काम अनू अगदी चोखपणे करत असे. खरंच किती छान होता तो खेळ, दोन गट दोन्ही बाजुला आणि मधे खापराचे तुकडे एकावर एक रचलेले असायचे. डाव नसलेल्या गटाने चेंडू मारून त्या खापऱ्या पाडायच्या आणि आजुबाजूला धूम पळत सुटायचं. मग डाव आलेल्या गटानं समोरच्या गटातल्या माणसांना चेंडू मारून 'आऊट' करायचं तर पहिल्या गटानं त्या खापऱ्यांची मिनार रचायची पण चेंडू चुकवत!
खरंच किती गंमत असायची त्या खेळात, आपल्याच सवंगड्याशी पटवून घ्यायला, तडजोडी करायला शिकवायचे हे खेळ, अगदी सहजपणे ! आपल्या ध्येयाची, आयुष्याची इमारत तर घडवायचीच असते पण समोरच्या विरूध्द गटाचे चेंडूही चुकवावे लागतात. त्यासाठी जिद्द, चपळाई असावी लागते. प्रसंगी पळावं लागत तर कधी चालण्याची गती धीमी करावी लागते, तर कधी वाकावं लागतं कारण चेंडू चुकवायचे असतात ना आपल्याला ! राग, लोभ, स्वार्थ, यामुळे मिळणारी विजयी पताका मिरवता येत नाही. प्रामाणिकपणे खेळ खेळल्यामुळे स्वाभिमान जागृत व्हायचा. मग दुसरा कुणी कुजका कांदा खेळात आला की रक्त पेटून उठायचं. शेवटी खेळात राहणं महत्वाचं ! प्रत्येकाची हीच भावना असायची, मग कुणी कधी 'राजा’ व्हायचा, त्याचा आनंद गगनात मावायचा नाही. पण तोवर खेळ पुन्हा सुरू झालेला असायचा, हरलेल्यांची घाई असायची पुन्हा खेळण्यासाठी, जिंकण्यासाठी....! किती उत्साह, किती सकारात्मकता यायची या खेळांमधून. पुन्हा पुन्हा खेळूनही दमायला व्हायचं नाही. कधी पडलोच, लागलं, रक्त सांडलं तरी भान नसायचं, जिद्द म्हणतात ती हीच असते बहुतेक !
बघता बघता पावसाच्या सरी पडायला लागल्या आणि समोर खेळणाऱ्या पोरांचा गलका पांगला. अनू स्वत:शीच हसत बोलली, खेळ आयुष्याचा ! समोरच्या मेजावर तिच्या लग्नाच्या पत्रिकांचा गठ्ठा पडला होता. त्यातली एक पत्रिका तिनं हातात घेतली, पाहिली. शाळा संपली, कॉलेज सुटलं, नोकरी छान चालली होती. अनूला वाटलं खेळ संपले आता. पण नाही... आयुष्यातला ’संसार’ नावाचा खेळ तर आता सुरू होणार होता. थोडी भिती, औत्सुक्य, कुतूहल सगळंच आज तिच्या मनात दाटून आलं होत. काही दिवसांनंतर नवी माणसं, नवं घर, नवा सवंगडी, नवीनच मजेशीर खेळ सुरू होणार होता. पण हा तर पूर्वीचाच भातुकलीचा खेळ की ! बालपणीच्या खेळांनी जी सकारात्मकता अनूला दिली होती ती तिने जपून ठेवली होती. ह्या खेळाचा डाव तिच्यावर येणार होता. ह्या खेळातही प्रसंगी धावावं लागेल, पावलं मागे-पुढे करावी लागतील, पडावं लागेल ह्या सगळ्याची तिला कल्पना होती, तरी एक विश्वासही होता. ह्या खेळातही बालपणीच्या खेळाप्रमाणे काही गोष्टी असतीलच की, कुणी आईस केलं तर आपल्या गटातली माणसं वॉटर करतीलच की किंवा कधी एकटी पडलेच तर माझी माणसं धावतीलच ना जोडसाखळी करायला.....कधी दमलेच खेळ खेळून तर जीभ हाताला लावून ’टॅम्प्लीज’ (Time please) म्हणता येईल की, किंवा मग डोक्यावर हात ठेऊन ’टोमॅटो’ करता येईल. ’जिंकण’ ’हरणं’ इथवर नगण्य होऊन जातं, खेळ खेळत राहणं महत्वाचं!
काही दिवसानंतर अनू सौभाग्यवती होणार होती, नवी नाती तिला सांभाळायची होती. नव्या जबाबदाऱ्या तिला पार पाडायच्या होत्या. आयुष्याच्या प्रवाहात सगळं काही वाहवत जातं. अनूची नव्या खेळाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली. एक खोल श्वास भरून घेत, डोळ्यातलं पाणी सांभाळत अनू अंगणात आली. पावसाने आधीच तिची सोबत केली होती. मातीचा गंध धुंदावत होता. तेवढ्यात तिच्या नव्या सवंगड्यासाठी सेट केलेलं गाणं तिच्या मोबाईलवर वाजत होतं....
तुम हारके दिल अपना, मेरी जीत अमर कर दो.....