अनामिका...
अनामिका...


कोण आहे अनामिका? मी एकंदर ६,००० पेक्षा जास्त चारोळ्या आणि काही कविता लिहिल्या. त्यातल्या काही शेकडा चारोळ्या अनामिकेभोवती फिरणाऱ्या आहेत...
अनामिका... एक असं व्यक्तिमत्व जिने माझ्या लिखाणाला सगळ्यात जास्त स्फुर्ती दिली. बायको, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी... ह्यांनी तर लिखाणासाठी कायम स्फुर्ती दिलीच आहे पण अनामिका हे काही वेगळंच मिश्रण आहे. जसा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तसाच मलाही पडतो की अनामिका कोण???
अनामिका... माझ्यासोबत असूनही नसलेली, मजसवे नसूनही कायम साथ देणारी, माझी मैत्रिण असणारी, कधी माझ्यावरच टीका करणारी तर कधी माझी प्रेयसी बनणारी. माझ्या स्वभावाचा प्रत्येक पैलू जाणणारी, माझ्यावर लटकं रुसणारी अन् क्षणार्धात परत माझीच होऊन जाणारी...
अनामिका... माझ्या सावलीसारखी मला साथ देणारी, माझ्या तोडक्या मोडक्या चारोळ्या / कवितांना अर्थ प्राप्त करून देणारी, लिखाण सुचणं बंद झालं की अनामिका ह्या शब्दाचा आधार देऊन माझ्याकडून लिखाण घडवणारी...
अनामिका... ती आहे म्हणून माझं लिखाण आहे, तिच्यामुळेच माझं लिखाण थोडंतरी वाचनीय आहे, परिस्थिती अनुसार माझ्या लिखाणात बदल घडवणारी, एवढं सगळं करूनही स्वतः मात्र नामानिराळी राहणारी, माझ्या चारोळी / कवितांचा आशय असणारी तरीही त्याचं श्रेय कधीच न घेणारी...
अनामिका... एकाकी असलो तर सोबत करणारी, झोपल्यावरही स्वप्न बनून मला आश्वस्त करणारी, मनात तिचा विचार यावा अन् तिने समोर यावं, वाऱ्याच्या झुळूकी प्रमाणे का होईना पण मला भेटून जावं, तिच्या नाराजीने मनात धस्स व्हावं, तिच्या एकाच हास्यानी सर्व दुःखांनी पळून जावं...
अनामिका... माझ्यावर निरतिशय प्रेम करणारी, कधीकधी मला नकोसा विरह देणारी, कधी माझ्यात हरवून जाणारी तर कधी मला तिच्यामध्ये हरवून जायला लावणारी, कधी माझ्या स्वप्नातली परी बनणारी तर कधी माझ्या हृदयाची राणी असणारी...
अनामिका... काय नातं आहे माझं आणि अनामिकेचं? मैत्रिण बनून हृदयात बसणारी की प्रेयसी बनून माझं हृदय चोरणारी? छे! कोणत्याही एका नात्याच्या बंधनात तिला अडकवणे शक्यच नाही आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे ते तिच्यावर अन्याय करणारं ठरेल. कारण तिचं माझ्या आयुष्यातील असणं हे कोणत्याही नात्याच्या पलीकडचे आहे....
अनामिका... एक अदृश्य व्यक्तिमत्व जे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझी साथ देणार आहे, माझ्याकडचा शब्दसाठा संपेपर्यंत माझ्याकडून शक्य तितकं लिखाण करवून घेणार आहे...
अनामिका... माझ्या जीवनात तिचं अनन्यसाधारण महत्व आहे किंबहुना माझ्या लिखाणाचा ती स्त्रोत असल्यामुळेच माझं आताचं जीवन आहे. अर्थात अनामिकेचं एवढं महत्व आहे ह्याचा अर्थ बाकी सगळ्यांचं महत्व कमी आहे असा होत नाही, प्रत्येक व्यक्तीचं महत्व आहेच.
अनामिका... माझ्या काही चारोळ्या मलाही आवडतात पण सगळ्यांत जास्त आवडणाऱ्या चारोळ्यांपैकी एक अर्थात अनामिकेवरच आहे...
"अनामिका आहे ती माझ्यासाठी,
काय तिचं नाव असेल.
प्रत्यक्षात नाही भेटली तरी,
स्वप्नात मात्र नक्कीच दिसेल."
अनामिका... तिच्यावर कितीही लिहिलं तरी मला नेहमीच खुप कमी वाटतं, तिच्या आठवणींचं आभाळ कायम माझ्या मनात दाटतं...