आयुष्याची योग्य दिशा
आयुष्याची योग्य दिशा
अंदाजे पहाटेचे ४. ३०, -५. ०० झाले असतील ,सूर्य महाराजांनी आपले किरणांचे दूत पृथ्वी वर पाठवले कोम्बड्यानी बांग दिली,आणि हळू हळू सगळीकडे जाग यायला सुरवात झाली,
राधी च्या झोपडी त पण दिवसाची सुरवात झाली .पटकन उठून अंथरूण पांघरूण झटकून त्याची नीट घडी करून तिने कोपऱ्यात सरकवलं ,आणि बाहेर जाऊन थंडीत कुडकुडणाऱ्या चुलीला विस्तवाची उब दिली. चुलीत सुकलेल सरपण सारून त्यावर चहाच आधण ठेवलं ,आणि चुलीतल्या राखुंडीने दात घासायला घेतले ,दात घासून खळखळून चूळ भरून तिने घरातील माणसांना उठवायला सुरवात केली ,शंकऱ्या डोळे किलकिले करून तिची लगबग पाहत होता ,त्याने न सांगताच उठून स्वतःची कामे उरकायला सुरवात केली, दमेकरी म्हाताऱ्या आजीचा रात्रभर खोकून पहाटेच जरा डोळा लागला होता, आणि राधीचा लहानगा दिपू तर अजून साखर झोपेत होता .
लगबगीने सकाळची सगळी कामे उरकून चहाच गुळमट पाणी पिऊन आणि रात्रीची उरलेली भाकरी खाऊन शंकऱ्या आता शेतावर जाण्यासाठी तयार झाला होता ,राधी ने पण घाई घाई नी सगळं उरकून दुपारचं जेवण तयार करून ती सुद्धा शेतावर जायला तयार झाली. आता शेतात काबाड कष्ट करून ते दोघे संध्याकाळीच घरी परतणार होते हाच त्यांचा रोजचा दिनक्रम होता.
राधा आणी शंकर हे गरिबीत पण समाधानात जगणारं ,दुःखात पण आनंद शोधणारं एक शांत जोडपं हॊत ,त्यांचा दिपू आता नुकताच गावातील शाळेत जायला लागला होता ,दिपू ला खूप शिकवून त्याला मोठं करण आणि त्याच्यावर चांगले संस्कार करून त्याला चांगला माणूस म्हणून घडवणं हाच त्या दोघांचा प्रामाणिक प्रयत्न असे,
आजूबाजूला असलेल्या वातावरणाचा वाईट परिणाम त्यांना त्याच्यावर होऊ द्यायचा नव्हता.
दिवसभर हे दोघे शेतावर कष्ट करून उदरनिर्वाह चालवत होते आणि दिपू च्या शिक्षणासाठी पै पै जोडत होते .लबाडीने मिळणाऱ्या द्रव्याचा त्यांना लोभ नव्हता ,कष्टाची भाकरी कोरडी असली तरी ती खाऊनच रात्रीची झोप शांत आणि समाधानाने लागते यावर त्यांचा विश्वास होता.
असेच रोजचे रहाटगाडगे चालू होते
आणि असेच एका संध्याकाळी शेतातून परत येताना दारातच दिपू त्यांच्याकडे धावत धावत आला आपली चिमुकली मूठ घट्ट पकडून त्यांच्या समोर उभा राहिला, आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता ,हाताची मूठ त्यांच्यासमोर नाचवत दिपू उत्सहात नाचत होता ,राधी ने त्याला जवळ घेऊन त्याची इवलीशी मूठ उघडून बघितली ,उघडलेल्या हातात १०० ची एक मळकी घड्या पडलेली नोट होती ,अशी नोट जी खूप दिवस जपून ठेवलेली दिसत होती ,दिपू च्या हातात १०० ची नोट बघून क्षणातच राधी आणि शंकर चा चेहरा खाडकन उतरला. तरी त्यांनी खूप शांतपणे दिपू बरोबर बोलायला सुरवात केली ,दिपू च्या सांगण्या नुसार तो आणि शेजारचा राकेश जेंव्हा शाळेतून घरी येत होते ,तेंव्हा एक आजोबा उन्हामुळे चक्कर येऊन खाली पडले ,त्यांच्या हातातील पैसे रस्त्यावर पडले आणि तेच पैसे राकेश ने उचलून दिपू सह तिकडून पळ काढला ,त्यातलेच १०० रुपये त्याने दिपू ला दिले ,दिपू अजून हे चांगले हे वाईट हे कळायच्या वयात नव्हता ,त्याच्या दृष्टीने हातात पैसे येणे हीच खूप मोठी गोष्ट होती ,
पण राकेश हा दिपूच्या शाळेत जरी असला तरी एक चुकीच्या मार्गाला गेलेला मुलगा होता त्याचे आईआणि वडील हे सतत भांडत असायचे त्याचे वडील दारू पिऊन आईला मारझोड करायचे ,लोकांना फसवणे लहान सहान चोऱ्या करणे हे त्यांचे रोजचे काम होते त्यामुळे त्याच्या कुटुंबाला सदुद्धा असे चुकीच्या मार्गाने पैसे घेणे ,यात काही गैर वाटत नसे ,तो रोज शाळेत सुद्धा जात नसे ,पण जेंव्हा कधी शाळेत जावस वाटे तेंव्हा शेजारीच राहात असल्या कारणाने कधी कधी तो दिपू च्या सोबतीने शाळेतून घरी येत असे ,आज पण असेच शाळेतून येताना तो प्रसंग घडला होता ,लहानग्या दिपूला राकेश दादाने आपल्याला एव्हढे पैसे दिले याचेच मोठे अप्रूप वाटत होते, आई बाबा घरी आल्यावर आपल्याला मिळालेले पैसे त्यांना दाखवून ते कधी एकदा आपल्याला शाबासकी देतात असे त्या निरागस जीवाला वाटत होते म्हणून तो उत्साहाने ते पैसे आई बाबाना दाखवत होता , राधा आणि शंकर मात्र ते पाहून काळजीत पडले ,कारण ज्या आजोबांचे पैसे पडले असतील त्यांना ते किती गरजेचे असतील,एवढ्या उन्हात ते म्हातारे आजोबा घरा बाहेर पडले होते म्हणजे ते नक्की च कोणत्या तरी महत्वा च्या कामाला बाहेर पडले असतील आणि ते पैसे हरवल्यामुळे त्यांचे काय झाले असेल हे आणि हेच प्रश्न त्या दोघांभोवती फेर धरून नाचत होते.
दिपू ला या गोष्टीतली चूक दाखवून देणे जितके गरजेचे होते त्याही पेक्षा जास्त गरजेचे होते त्या आजोबाना शोधून त्यांची परिस्थिती समजून त्यांची मदत करणे
लहानसे गाव असल्याने बहुतेक सगळेच एकमेकांना ओळखत होते, त्यातूनच आजोबांचा पत्ता मिळाला ,दिपू ला घेऊन शंकर आणि राधी दोघेही आजोबांकडे गेले . आजोबा घरी खूप निराश असे बसले होते ,त्यांची पत्नी खूप आजारी होती , तिचे औषध आणण्यासाठी आजोबा भर दुपारी उन्हात निघाले होते आणि दुर्दैवाने तेच चक्कर येऊन पडले भोवती गर्दी जमली त्याच गोंधळात हातातील पैसे पण हरवले होते आणि औषध न घेताच आजोबाना घरी परत यावे लागले होते ,संकट काळी उपयोगी पडतील म्हणून खूप दिवस साठवून ठेवलेले पैसे त्यांनी आता पत्नी च्या औषधासाठी साठी पेटीतून काढले होते, पण दुर्दैवाने ते पण पैसे आता हरवले होते. आता औषध कसे आणायचे? याच विचारात आजोबा बसले होते .
तेवढ्यातच राधी आणि शंकर दिपू ला घेऊन आजोबांकडे गेले .आजोबांच्या तब्येतीची चौकशी केल्या नंतर शंकर ने आजोबाना हरवलेल्या पैश्या बद्दल विचारले ,आजोबाना आश्चर्य वाटले कारण पैसे हरवले हे फक्त आजोबाना च माहित होते ,मग शंकर ने संपूर्ण गोष्ट आजोबाना सांगितली ,आजोबानी सुद्धा भरलेल्या डोळ्यांनी त्यांची सगळी परिस्थिती शंकर आणि राधी समोर कथन केली जवळच बसलेला दिपू हे सगळं ऐकत होता ,त्यातले सगळे कळत नसले तरी आपल्या कडून नकळत जे पैसे घेतले गेले त्यामुळेच आजोबाना इतके दुःख सहन करावे लागले हे त्या बालमनाला जाणवले. आणि
तो धावतच आपल्या घरी गेला आणि खाऊ साठी जमवलेल्या पैश्यांचा डबा घेऊन धावतच आजोबांकडे आला, त्याने पुढे होऊन आजोबांचे डोळे पुसले आणि त्यांना ते पैसे देऊन आजीचे औषध आणायला सांगितले ,आजोबाना आणि राधी शंकर ला त्याच्या या कृतीचे खूप नवल वाटले पण या गोष्टीचा आनंद ही झाला की , न सांगताच दिपू ला त्याची चूक कळली होती आणि त्यांच्या संस्कारांची दिशा ही योग्य होती ,दिपू ला ही गोष्ट आता आयुष्यभर लक्षात राहणार होती आता परत कधीच दिपू असे कोणाचे पैसे घेणार नव्हता ,राधी आणि शंकर ने दिपू चे पैसे परत त्याच्या डब्यात ठेऊन ,त्यांना आज मिळालेल्या मिळकतीतून आजोबाना मदत केली ,आजचे पैसे आजोबाना दिल्या ने त्यांचा आजचा दिवस खूप कष्टाचा जाणार होता पण भविष्यकाळ मात्र दिपू च्या चांगल्या वागणुकीने उजळून निघणार होता
मात्र या उलट परिस्थिती राकेश च्या घरी होती , त्याने आणलेले पैसे लबाडीचे आहेत हे माहित असून सुद्धा त्याला शाबासकी दिली जात होती ,या पैशांमुळे त्यांचा आजचा दिवस खूप छान जाणार होता पण राकेशचा भविष्यकाळ ,
राकेशचा भविष्यकाळ मात्र खूप अंधारमय होणार होता ...
