#आठवणीतील क्षण
#आठवणीतील क्षण
इयत्ता पहिली मध्ये मी असतानाची ही गोष्ट माझे पूर्ण कुटुंब सप्तशृंगगडावर राहायचे... सप्तशृंगी गड देवीचे तीर्थक्षेत्र असल्याने छोटे-मोठे तलाव म्हणजे छोटीशी कुंड आहेत... ती विविध नावाने प्रसिद्ध आहे सूर्यकुंड ,तांबुलतीर्थ ,काजल तीर्थ.
असेच एक छोटेसे कुंड गडाच्या एकदम कोपऱ्याला कड्याच्या बाजूला आहे. चौकोनी आकारात बांधलेले ते कुंड आहे. तोंडाच्या एका बाजूला पायऱ्यांसारखा कठडा आहे.. दर आठवड्याला रविवारी आम्ही सर्व कुटुंब त्या तलावात कपडे धुण्यासाठी जायचो. आठवड्याभराचे शिळ्या पोळ्या ,खाऊ माकडां साठी घेऊन जायचो, तिथे खूप माकडे होती... अशाच एका रविवारी आई तिथे कपडे धुवत होती. वडील माकडांना खाऊ देत होते. मी व माझी मोठी बहीण तलावाभोवती गोल गोल फिरत पकडापकडी खेळत होतो. खेळता खेळता माझा तोल गेला व मी पाण्यात पडले. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे मी घाबरले पण त्या क्षणी माझ्या आईवडिलांनी पाण्यात उडी मारली. सुदैवाने दोघांनाही पोहता येत होतं त्यांनी लगेच मला बाहेर काढले.मी पूर्ण भिजले होते. काठावरती असलेल्या झाडावर बसलेले माकड जणू मला हसते आहे, असे मला वाटले. हा प्रसंग अजूनही मी विसरले नाही....
