Vaishali Belsare

Others

1  

Vaishali Belsare

Others

आठवणीतील होळी

आठवणीतील होळी

4 mins
384


भाग--१

आपल्या संस्कृतीमध्ये अनेक सण साजरे केले जातात. प्रत्येक सणाचं विशेष महत्वपूर्ण स्थान असून त्यांना वैज्ञानिक दृष्टीनेही खुप महत्व आहे. तसेच होळी या सणाला सुद्धा महत्वपूर्ण स्थान आहे. भक्त प्रल्हादाचा नाश करण्याकरिता असूर पिता हिरण्यकश्यपूने बहिण होलिकेला बोलाविले, तिला अग्नीदेव प्रसन्न होते, तिला अग्नी प्रभाव जाणवत नव्हता, लाकडं रचुन त्यावर तिला प्रल्हादा समवेत बसवण्यात आले पण प्रल्हादाच्या भक्ती सामर्थ्यापुढे होलिकेची आसूरी शक्ती क्षीण होऊ लागली तिचे दहन झाले. दैवी शक्तीने आसूरी शक्तीवर, सत्याने असत्यावर मात केली , तेव्हापासून होलिकात्सव साजरा केला जातो अशी पौराणिक कथा आहे. तर दक्षिण भारतात भगवान शंकराने कामदेवाचे दहन केले म्हणून "कामदेव दहन" नावाने हा सण साजरा केला जातो. तात्पर्य हेच की, सात्त्विक प्रवृत्तींनी दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवला.

           होळी किंवा होलिकात्सव हा वेगवेगळया भागात वेगवेळया पद्धतीने साजरा केला जातो. कुठे एक गाव एक होळी तर कुठे १०-१५ घरं, १-२ काॅलोनी मिळून साजरा करतात.

          सण-वार खेड्यात आणि शहरात दोन्हीही ठिकाणी साजरे केले जातात, पण खेडयात मात्र सणांची मजाच वेगळी, मला माझ्या बालपणीची होळी अजूनही आठवते तशीच ताजीतवानी. आम्हा सर्व लहानग्यांना होळीत उत्सुकता असायची ती म्हणजे शेणाच्या शिंगोळ्या व खायला मिळणाऱ्या गोड गोड गाठ्या. आम्ही तीन भावंड. मी मोठी असल्याने मला सर्व कळायचं. होळीला मिळणारी गाठी मला नेहमी मोठीच लागायची, गावात मिळाली नाही तर वडिलांसोबत तालुक्याला जायचे घरी आल्यानंतर भाऊ-बहिण कुणी रडलं तर एक एक बत्तासा त्यांच्या वाट्याला यायचा, परत मागितला तर तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात ना, मग जास्त खाऊ नका पोट दुखेन मग रंग कसे खेळाल अस बोलुन मी त्यांना शांत करायचे, माझे आई-बाबा माझ्याकडे बघुन हसायचे, 'ते लहान आहेत म्हणून नाहीतर भांडण आवरता आवरता गेले असते' दोघेही म्हणायचे.

                                            

क्रमश : .........                        

भाग--२

मग गाठी घेऊन मैत्रिणींकडे त्यांना चिडवायला... तुमचे बाबा तर कधीच अशी गाठी आणत नाहीत एवढी मोठी, तुमच्यासाठीही आणल्यात पण थोड्याशा लहान. मैत्रिणींच्या घरून माझ्या घरी जर लहान भावंडां करीताच गाठ्या आणल्यात तर त्यांनाही देऊ देत नव्हते, हे सर्व मैत्रिणींना माहित होतं. माझ्यासाठी एवढ्या गाठ्या आल्यात त्याचचं आम्हा मैत्रिणींना अप्रुप, कोणीही काही एवढ्या गाठ्या खायचं नाही. माझ्या गावात होळीला एकमेकांच्या घरी गाठी नेऊन देण्याची प्रथा आहे, पण ती गाठी फक्त बच्चे कंपनी करिता दिलेली असते. होलीकोत्सवात गाठीलाही तेवढाच मान आहे.

                  होळीच्या आगमनाची तयारी फार आधी पासुन करावी लागत असे, होळी दहनात लाकडाचा उपयोग फारसा न करता शेणाच्या शिंगोळया व गोवऱ्या यांचाच होत असे. ते कार्य आमच्याकडे सोपविलेल असे किंबहुना आम्हालाच ते आवडे आम्ही म्हणूनच होळीची वाट बघायचो. अगोदर शेण गोळा करायचो. माझ्या घरा मागची मैत्रिण रईसा हिच्या घरी गुरढोरं . तिच्याकडचं आणि इतर २-३ घरच शेण आणायचो, तिच्या घरची एक गंमतच असायची.


भाग--३

सकाळीच गेलं की अम्मी चहा देण्यात व्यस्त असायची. आम्ही शेण थोडस गोळा करतही नाही तर अम्मी धावत येऊन माझ्यावरच नेहमी ओरडायची, "ए मुन्नी, तुले कितीक सांगतल की गोबरं न्याच नई" "रईसा, समझाया था ना, तेरेकू मैने'' साऱ्या घरात गयाठा करून ठेवता आता डबल आली की काळीनच मारते..... स्वतःशीच पुटपुटायची, आम्ही निघुन यायचो . दुपारी चोरून जाऊन शेण घेऊन यायचो. १-२ दिवस असाच क्रम चाले मग तिसऱ्या दिवशी जायचोच नाही . संध्याकाळीच रईसा घरी यायची "आल्या कवून नाई ! अम्मी ने शेण काळून ठेवलतं, उद्या या, बैल जवळ २ लहान बकेटा ठेवल्या , तेच्यातलच घेजा , अम्मी चिल्लावेन पण घीऊन येजा". हे आमच दर वर्षीच होत . आम्हाला तिला ञास देण्यात मजा वाटायची अन आम्ही गेलो नाही तर तिला करमायच नाही . तशीही ती मला जिव लावायची, ती मला मुन्नी म्हणायची म्हणून सर्वच म्हणायचे. आताही म्हणतात . खरच अम्मी खुप प्रेमळ आहे. त्यानंतर शेजारच्या आजीच्या घरतील गोवऱ्यांची चोरी करणे माझ्याकडे . तिलाही ते माहित असायच कोणी सांगितल तर तिचं ओरडायची . वर्षभर गोवऱ्या करायची, तिच्या मुलीच माझ्यावर खुप प्रेम होत... आहे. ६ महिन्याची होती तेव्हापासुन आक्काने वागवल मी तिला बहूतेकदा ताईच म्हणायचे , मला मोठी बहिण नव्हती म्हणुन. हे सर्व मिळून-मिसळून व्हायचे पण शिंगोळ्या करणे म्हणजे मोठी स्पर्धा, जो जेवढ्या करेन तेवढ्या त्याच्या. त्यामधले सूर्य, चंद्र, नारळ हे ज्याला जे चांगल जमेल त्याने ते करावं नारळ वाजल पाहिजे हे ही महत्वाचं. सर्वात जास्त ज्याचे हार व्हायचे त्याची मान उंच , एकदम काॅलर तट्ट. म्हणजे मैञिणीत चर्चा व्हायची. आणि हे सर्व करणं सोप नव्हतं , त्याकरिता आईचा ओरडा, कधी कधी मारही खावा लागे. मी मैञिणींच्या माग, माझी आई माझ्या माग. शिंगोळ्यांच्या नादाला लागल की अभ्यास , जेवण वर्ज्य असायच, पिटाई व्हायची. शिंगोळया ओवून हार झाले की , घरी आणून आईला दाखवायचे, तीही भरभरून कौतुक करायची.

            होळीच्या दिवशी होळी करिता पुरणाचा नैवद्य, वाटीमध्ये दुध, गाठी व इतर पुजेच्या सामानाने आई आरती सजवत होती, मला होळी भोवती फिरून दुध अर्पण करायला आवडायचं , आई पुजा करायची.

होळीच्या आठवणी आज मनातून डोळ्यात उभ्या राहिल्या.

तुझ्यासमवेत होळी

जगले होते जेव्हा

स्वर्गाहून स्वर्ग होते

माझे जीवन तेव्हा


Rate this content
Log in