आमची ताई
आमची ताई
ताई.... म्हणजे आमची लाडकी आजी.
सर्वजण ताई म्हणायचे म्हणून आमचीही ती ताईच.
एक प्रेमळ,छान आणि आमची लाडकी आजीचं.....असं व्यक्तिमत्व
ती, तिची खाट, हातात काठी, कमरेला तपकिरीची छोटीशी डबी, तिचं पेटुल (त्यावेळचं मेकअप-बॉक्स) आणि मुख्य म्हणजे तिची मांजर आणि त्या मांजरीची 3-4 गोंडस पिल्लं ...असा काहीसा लवाजमा.
एवढा पावडर लावायची कि आम्ही नातवंड तिला हाऊलो (भूत) म्हणून हसायचो, मग एक काठीचा प्रसाद मिळायचा.
पावसाच्या गडगडाटाला ताई खुप घाबरायची, धडाम-धूम वाजले की राम-राम म्हणत बसायची आणि आम्ही हळूच तिच्या मागे जाऊन जोरात आवाज करून तिला अजून घाबरवायचो. एकदा तर आम्ही प्लास्टीकचा साप आणून तिच्या पुढ्यात टाकला, नंतर काकांकडून जो काही प्रसाद मिळाला तो वेगळाच.
तिला टिव्हीवर सिनेमे बघायला खूप आवडायचे. त्यातल्या त्यात राजेश खन्ना आणि नंतर गोविंदा म्हणजे तिचे आवडते हिरो.
ताईला कोडी घालायला खूप आवडायचं. आम्हाला वेगवेगळी कोडी घालून नंतर उत्तर सांगताना खदाखदा हसायची.
जुन्या जुन्या गोष्टी सांगायलाही तिला खूप आवडायच्या.
मांजर प्रेम आणि ताई एक विलक्षण नातं होत. तिला कोणी पाहुण्यांनी आपुलकीने दिलेले पैसेही ती खर्च करे. कधीतरी आम्हाला जवळच्याच दुकानातून समोसे किंवा खट्टा-मिठ्ठा फरसाण ( तिचं आवडतं) आणायला सांगून सर्वांना समान वाटणी करायची आणि त्यात तिच्या मांजरींचाही समान वाटा असायचा. असं काहीसं वेगळं मांजर प्रेम.
तिच्या उत्तरार्धात थोडी का होईना पण तिची सेवा करण्यास मिळाली हीच माझी पुण्याई.
हा लेख आमच्या प्रिय पुज्य ताईच्या स्मरणार्थ.