आला श्रावण श्रावण
आला श्रावण श्रावण


"श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे"या काव्यपंक्तीप्रमाणे श्रावण महिना सणांची रेलचेल घेऊन येतो आहे. धार्मिक,आध्यात्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या श्रावण महीन्याला मोठे महत्त्व आहे. या महिन्यात सण, उत्सव, व्रतवैकल्पांचे धार्मिक पावित्र्य असते. पंचागामध्ये श्रावण महिन्याला अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. या महिन्यात भगवान शंकराची मनोभावे आराधना केली जाते. नागपंचमी, रक्षाबंधन, नारळीपोर्णिमा, गौरीपूजन, गणेशोत्सव, श्रीकृष्ण जन्माष्टमी अशा विविध सणांची रेलचेल असते.
त्याचबरोबर श्रावणात व्रतवैकल्पेही केली जातात.
मेघराजाच्या श्रावणसरीचा वर्षावही होतो.त्यामुळे श्रावणात आनंददायी, हर्षमय वातवरण असते. याच महिन्यात निळ्या आकाशात काळेकुट्ट नभ आले की अंधारुन येतं. कधी रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस पडतो. श्रावणात मृग नक्षत्राने पावसाचा आरंभ होतो. ढगाळ वातावरणात मन कसं प्रसन्न होतं. निसर्गसौंदर्य सर्वांगानी फुलून येते. मोर पिसारा फुलवून मनसोक्त नाचतो. आकाशी सप्तरंगी इंद्रधनुष्य मन मोहरुन टाकते. बागेत विविध फुले सुगंधाने परिसर दरवळून टाकतात. दऱ्या खोऱ्यातून पाणी खळाळत वाहते. हिरवं सौंदर्य चोहीकडे पसरलेलं दिसतं. धरती हिरवा शालू नेसून हिरवाईने नटते. कोकिळेचे कूजन सुरु होते. बळीराजा आनंदीत होतो.
धरतीची मशागत करुन बैलांच्या मदतीने पेरणी करतो. सारं वातावरण आल्हाददायक असतं. या साऱ्या सृष्टीसौन्दर्यानं सारा आसमंत हिरव्या रंगात रंगतो. कोकिळेच्या मुखातून, खळखळणाऱ्या मुक्त पाण्यातून, पाखरांच्या किलबिलाटातून, बैलांच्या गळ्यातील घुंगरातून बागेमध्ये फुलणाऱ्या अनेकविध फुलातून, इंद्रधनुष्य व मोराच्या सप्तरंगातून पाऊस निःशब्द होऊन गाणे गात असतो. अशा रिमझिम पावसात एका छत्रीत चिंब भिजताना प्रेयसीसोबत पाऊस गाणे गात आनंद घेणारा प्रियकर
खुषीत नाचत असतो.
मनातले भाव पावसाच्या शब्दांनी कागदावर व्यक्त होतात. कवी, कवयित्री विविधांगी मुक्या शब्दांनी पाऊस गाणी गातात.
"आला पाऊस मुक्तपणे, सारे गाती आनंदाने.
शब्दांतून बहरला पाऊस, फुलून आले पाऊसगाणे."
या कवितेच्या ओळीप्रमाणे पाऊस सर्वाना आनंदीत करतो. उल्हासित करतो. पाने-फुले, झाडे-वेली अवघी धरती हिरवा श्रुंगार करुन सुवासिन होते.