आजोळ
आजोळ
तो काळ माझ्या लहानपणीचा अर्थात ऐंशीच्या दशकातील,,आम्ही सर्व लहान भावंडे,,सतत एकमेकांशी खेळत असू पण ते खेळही त्यावेळी असणारे रंजक अन काम साध्य करणारे,,आमची मोठी मावशी,, आम्हा भावंडांना काही काम सांगत असे,, त्यात मोठीच स्पर्धा असे,,घराच्या मागे मोठं खळ होतं,,हो तेच ते धान्य मळणीचं खळ,,ते झाडायचं तुरीच्या झाडांचे फाटे तोडून त्याचा ओबडधोबड एक एक खराटा प्रत्येकाच्या हातात दिला जाई,,अन सुरू होई आमची शर्यत,,खळ्या पासून ते घरामागच्या गोठ्यापर्यंत सगळं कसं लक्ख दिसायला हवं ,, त्यानंतर त्यावर पाणी मारून,,लाकडाच्या मोगरीने घाव घातले की ते खूप छान चोपले जाई मग त्यावर शेणाचा सडा घालून ते नीट केलं जाई अन ही सगळी कामं छोट्या अन मोठ्या मावशीच्या देखरेखीखाली आम्हा भावंडांकडून करवून घेतली जात असत,,तो आनंद म्हणजे इतर कुठल्याही खेळापेक्षा छान असे,,शेणामातीत माखलेली आम्ही मुलं,, सगळं आटोपलं की नदीवर जात असू तिथं ही मावशी कपडे धुवायला आलेली असे ,सोबतच आमच्या अंघोळी अन आमचे अवतार ठीक होत असत,, नदीवर आच्छादलेली जलपर्णी बाजू ला करून पाच सहा मोठमोठ्या शिळा नदीच्या प्रवाहात टाकलेल्या असत त्यावर हे कार्यक्रम पार पडत असत,,आमचं मनसोक्त पाण्यात डुंबन होईस्तोवर,,मावशीचे कपडे धुणे व ते वाळूवर वाळून होत असे,, तीच आवरलं की ती आम्हास बोलवत असे,,तोवर ओट्यात शिंपले गोळा करून आमची स्वारी घराकडे निघे,,
पाण्यात उशिरापर्यंत डुंबल्याने,, हात असे ओलसर झालेले असत की त्यांचा रंग बदलून पांढरा पडत असे,,शेतातूनच बांधावरून च्या रस्त्याने आम्ही घरी निघत असू,,उन्हाळ्यात नदीकडच्या खालच्या पट्ट्यात कलिंगड लावलेली असत,,किंवा काकडी,, दोडके अशी वेलवर्गीय शेती खालच्या पट्ट्यात असे,,मग कलिंगड, काकड्या जरा वरच्या पट्ट्यातून चवळइ (तांदुळजा) कोथिंबीर मिरच्याअशा भाज्या तोडून घेत आम्ही घरी येत असू,,कोणाच्या ही शेतात खुशाल जावं अन काही खावं असे दिवस होते ते,,घरी येईतोवर आजीने टोपलीभर भाकरी करून ठेवलेल्या असत,,शिकाळ्यावर पितळी चरवी लटकवलेली असे त्यात ताक भरून ठेवलेलं असे,, ते ताक खाली काढून एका पितळीत आम्ही दोघे दोघे जण ते ताक अन भाकरी कुस्करून खात असू,,सोबत जवसाची चटणी किंवा चुलीतल्या आरावर भाजलेल वांग तेल तिखट मीठ घालून चांगलं कुस्करून घेत त्याचं छान तोंडी लावणं होई,,घरी पोचतो न पोचतो तोच गोठ्यातली वासर हंबरु लागत असत,,त्यांना खायला पाणी देऊन आमचा सागरगोट्यांचा डाव रंगत असे,,काचा कवड्या,,चल्लस आठ,,टिपरीपाणी,,कोया,, अन कधी कधी चिंध्याचा बॉल करून लगोरी खेळत असू,,
घरामागे असणाऱ्या बाभळीच्या खोडापर्यंत सूर्य आला की कोंबड्याना खायला देण्यासाठी पुन्हा एकमेकात चुरस लागे,,त्यांचं खाऊन झालं की पुन्हा अंगणाची झाडलोट दिवसभराचे शेण वारे करून गुरांना चारापाणी करावं लागे,,मग रंगी शेळीचं एक ग्लासभर दूध काढून सगळ्यांचा चहा होई तो सुद्धा एकेका ताटलीत असे,,तोवर मोठी मावशी रानातून येऊन स्वयंपाकाच्या तयारीला लागे,, वाटेवरून जाणारं येणारं कोणी ना कोणी थोडावेळ तरी ओट्यावर टेकून जात असत,, आमची लहानग्यांची चुळबूळ सुरू असे,, मामा आला की पाटीभर भुईमुगाच्या शेंगा काढून आमच्या समोर ठेवी अन म्हणे,, खायला नाय बरका,, कालवणाला लागतंय मामीला,, तेवढं पातेलं भरलं नाय तर दोन दोन दणक टाकीन असं मुठी वळवून हसत हसत म्हणून जायचा चावडीवर बसायला,,आजोबा रानातून येताना काठी टेकत टेकत येत असत,,"आरं लका लका शेंगा खाताय हुई " म्हणत लहानग्याला उचलून त्याचा गाल चावत अन पुन्हा खाली सोडत असत,,ओट्यावर बसत बसत विव्हळत अन मोठं मोठ्याने ओरडत असत,,
त्यांचं नेमकं काय दुखत असे ते समजत नसे,,मग आम्हापैकी कोणालाही एकाला त्यांची काठी आधाराला घेऊन त्यांचे पाय तुडवायला सांगत असत,,तर दुसऱ्या कोणाला तरी पाठ तुडवायला लावत,,तरी सुद्धा आजी त्यावेळी कुठं तरी लाईट असे नसे ,,पण गावातल्या वायरमन कडून आणलेलं डीपी मधलं तेल तेही काचेच्या औषधांच्या बाटलीत असलेलं आणून देत असे,,मग आजोबांचे दोन पाय दोघांनी पकडून पायाचे गोळे खाली ओढायचा साग्रसंगीत कार्यक्रम पार पडे,,तोवर पोटातले कावळे काव काव करू लागत असत,,काहीही पातळ कालवण अन मोठमोठ्या भाकरी,,सोबत लसूण मिरचीचा खर्डा असं चांगलं गावरान जेवण होई,,आपापलं ताट रांजणा वर जाऊन धुवून पालथं घालून ठेवायचं,,अन शेणाने सारवलेल्या ओट्यावर मोठं तळवट अंथरून त्यावर मोठमोठ्या गोधड्या अंथरायच्या,,एकेका गोधडीत चार चार मुलं मावत असू एवढ्या गोधड्या मोठ्या असत,,तोवर मामा येई त्याच जेवण होई अन मामाही आम्हा भाचरांजवळ लवंडत असे,,मग चांदण्या मोजत आम्ही सगळे झोपी जात असू,,सकाळी पुन्हा तशीच नवी सुरुवात,,
गावची यात्रा असे त्यावेळी मात्र सगळ्या गावात एक अनोखा उत्साह दिसत असे,,प्रत्येक घरात लेकी सुनांच्या सासर माहेरचे लोक पै पाहुणे आलेले असत,, पायली -पायली च्या पुरणपोळ्या होत असत,,अन चार चार कोंबडी मारली जात असत,,गोड तिखट दोन्ही प्रकारच्या जेवणाच्या पंगती उठत ,,सगळ्या मुलांना मामा ,मावश्या, काका ,आजोबा कमीत कमी दोन -दोन रुपये तरी देत असत,,असे नाही म्हटलं तरी वीस एक रुपये जमा होत असत,,मग जत्रेत जाऊन काही बाही खरेदी करून,,लाल पिवळ्या आईस कँडी खाऊन जिभेचे बदललेले रंग एकमेकांना दाखवत सगळे जण 10 वाजता तमाशाला जात असू,,,,तमाशा दुपारी दोन वाजेपर्यंत संपत असे,, मग घरातलं मोठं कोणीतरी तोवर हॉटेल मधून किलो दोन किलो जिलेबी रेवड्या भेळ असे खायला घेऊन येत,,ते खाऊन बांधावरच्या चिंचेच्या झाडाखाली सगळे खेळायला जात असू,,छोटी मावशी तोवर मोठ्या परातीतून देवाला नैवेद्य दाखवायला मंदीराकडे निघाली की हाक मारे,,मग सगळे तिच्या मागे दुडके दौडत ते नैवेद्य खाण्यासाठी जात असू,,छोटीशी देवळं एकामागून एक करत कमीत कमी दहा देवळात नैवेद्य दाखवला जाई अन लगेचच तो पोटातही जाई,,वरून बोनस खोबऱ्याचा तुकडा पण मिळत असे,,पण त्यासाठी नारळाची पिशवी तेलाची बाटली, नाहीतर पाण्याची कळशी सांभाळावी लागे,,सगळं उरकून घरी परत येण्यास अंधार होई,,रात्री देवीचा छबिना असे त्यासाठी देवळात सगळे जमत असत,,आजीच्या अंगात देव येत असे,,आजी खूप जोरजोरात उड्या मारून नाचत असे,,हातात वेताची छडी असे,,
मग कोणीतरी तिचा पदर खोचून तिचे केस मोकळे सोडी,,मान द्या देवीला म्हटलं की ढोल वाजवणं झांज ताशा सगळं वाजण बंद होई ,,कोणीतरी कुंकवाने आजीचा अन अशा अंगात आलेल्या गावातल्या आणखी काही बायकांचा मळवट भरत असत,,काही प्रश्नउत्तरे होऊन मग ते वारं जात असे,,अशी छबिण्याची रात्र संपली की दुसऱ्या दिवशी आखाडा असे,,तिथं मात्र मुलं जात असत,,मुलींना परवानगी नसे,,संध्याकाळी मात्र आवराआवर करावी लागे,, कारण दुसऱ्या दिवशी सगळे जण आप आपल्या गावाला जायला निघत असत,,आजी ,,मावशी पाहुण्या बायकांच्या ओट्या भरायच्या काही वाणवळा देण्याच्या त्यांच्या तयाऱ्या सुरू व्हायच्या,,सकाळच्या एसटी ने बहुतेक पाहुणे जायचे,,उशीर झाला तर कमांडरच्या जीप गाड्या असत,,आम्हीही या जत्रेच्या यात्रेच्या अनेक आठवणी सोबत घेऊन आजोळ सोडत असू,,पण ती आजोळा ची ओढ काही कमी झाली नाही,,मनात अजून ते आजोळ जीवन्त आहे,,आज या काळात शंभरी पार केलेली माझी इंदुमती आजी गेली,,अन आजोळ मला पारखं झालं ,,ते कायमचं!
