आई
आई
तीर्थरूप आईस,
आज तुझी आठवण येतेय. माझा ७५ वा वाढदिवस जवळ आलाय. गलबलून गेल्यासारखे वाटते. तुझी तीव्रतेने उणीव जाणवते. खरं म्हणजे तसं कांहीच घडले नाही. वाढदिवसाच्या दिवशी औक्षणानंतर तुझ्या पद्स्पर्षाची आणि मस्तकावरून फिरलेल्या हातातून प्रत्यक्ष आशीर्वादाची उणीव आहे, पण तू जवळ नाहीस ही एकच गोष्ट उदास वृत्ती वाढविण्यास कारणीभूत होतेय. तू या जगाचा निरोप घेतल्याचे ठावूक असून सुद्धा मन कधी कधी ते मानायला तयार होत नाही. तू कुठे असशील त्याचा ठाव ठिकाणा माहित नाही, पण देवाच्या घरी सुखात असशील या भावनेने ‘देवबाप्पा” सिनेमातल्या चंदाराणीच्या भावनेने तुला पत्र लिहावं असे वाटले. असं म्हणतात की, जगातली सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण. कारण ती विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही. किती आठवणी दाटून येतात, किती ध्यानात आहेत अन किती विसरल्या याची गणतीच केली नाही. पण अंतर्यामीच्या उर्मीमुळे जे एक एक चित्र मनःचक्षु समोर उभे राहिले ते ते शब्दबद्ध करतोय.
तुझ्या माहेरच्या घराबाबत तू भरभरून बोलत होतीस. खेडेगाव, माणसांनी भरलेले घर, तुझं लहानपण, स्वतःच्या आईची तुझ्या ११व्या वर्षी झालेली कायमची ताटातूट आणि आजीच्या हाताखाली जबाबदारीने काढलेली लग्नापूर्वीची उणीपुरी ६-७ वर्षे, आणि तशातंच तुझं झालेले लग्न. नंतरचा माझा जन्म.
’बाळाचा जन्मदिवस हा आईच्या जीवनातला असा एकमात्र दिवस असतो की ज्या दिवशी जगात येणा-या आपल्या बाळाच्या पहिल्या रडण्याचा आवाज ऐकून त्याच्या आईला अत्यानंदाचे हसू फुटत असते. त्यानंतर तो क्षण कधीही येत नाही. कारण नंतर बाळाच्या रडणा-या डोळ्यात पाणी पाहिल्यावर आईच्याही डोळ्यात पाणीच उभे राहते ’. किती छान व्याख्या केली आहे राष्ट्रपती डॉ.अबुल कलम यांनी. मला वाटतं एकेकाळी तुझ्या या पोराला तूं कसं तरी वेडंवाकडं, तेलकट, माखलेल्या चेहे-यावर, डोळ्यात काजळ घालून, दुपट्यात गुंडाळून, पाळण्यात झोपवलं असशील, मुका घेऊन माझं ‘बिच्चारं’, आणि असंच काही काही म्हणाली असशीलच ना? मला जन्म देण्याचा निर्णय आणि जन्म देताना झालेल्या वेदना, तसेच संगोपन करताना झालेले कष्ट हे तू स्वेच्छेने स्वीकारलेले. स्वतःचे बाळ अगदी मांसाचा गोळा असल्यापासून ते स्वतःच्या पायांनी दुडूदुडू धावत येईपर्यंत दिसामासी त्याला जपणे, जोजवणे, त्याची स्वच्छता, खाणे, पिणे, अंघोळ, कपडे बदलणे, त्याला रोगराई पासून जपणे, आजारात औषध पाणी करणे, ते सुद्धा बळजबरीने किंवा ओढूनताणून नाही तर अगदी आनंदाने, उत्साहाने. बाळाचे खुदकन हसणे म्हणजे सर्व श्रम परिहार. त्यामागे एकच कल्पना, अगदी गीत रामायणात ग.दि.माडगुळकर यांनी लिहिल्याप्रमाणे “ - - - उद्या होईल तरुण, मग पुरता वर्षेल, देव कृपेचा वरूण” हीच मनीषा.
काऊ चिऊच्या, ध्रुव बाळ , प्रल्हाद, रामकृष्णांच्या बाळलीला तू सांगितलेल्या आठवत नसतील, तुझ्या तोंडातून अंगाई गीते ऐकली नसतील पण म्हटली असशीलंच ना? मुलाला मोठं करताना जी ‘जपणूक’ करावी लागते त्याचे श्री समर्थ रामदासांनी ‘ वीट नाही ,कंटाळा नाही, आळस नाही, त्रास नाही ,इतुकी माया कोठे नाही.’असे यथार्थ वर्णन केले आहे. या सगळ्या बाल लीला आठवताना मला नुकतीच रवींद्रनाथ टागोर यांची एक भाषांतरीत कविता वाचलेली आठवली.
“समज, आई, मी मौज करण्याकरिता सोनचाफ्याचे फुल होऊन ,झाडाच्या फांदीवर डुलू लागलो,तर ओळखशील तू मला.? तू म्हणशील? बाळा तू कोठे आहेस?. दुपारच्या जेवणानंतर खिडकीत बसून तू महाभारत वाचशील तेव्हा नेमक्या त्याच ओळीवर माझी सावली पाडीन. माझी ही गम्मत कळेल कां ग तुला? आपल्या बाळाची सावली ओळखू येईल का ग तुला ?
पण सांज होताच दिवा घेऊन मला शोधायला येशील, तेंव्हा झाडावरून पडताना बाळ होऊनच तुझ्या पायावर पडेन. आणि जेव्हा तू विचारशील ना, “खट्याळा कुठे होतास इतका वेळ?” तर माझं गुपीत कध्धी कध्धीच सांगणार नाही तुला.” आईच्या पाठीमागे दडून बसलेला, मातीनी हात आणि तोंड बरबटलेला बाळ हळूच तिच्या पाठीवर भार टाकून एकदा डावीकडे अन एकदा उजवीकडे पहात तिच्या तोंडासमोर आपले तोंड आणतो अश्या वेळी त्याच्या मनात काय भाव असतील त्याचे ते लडिवाळपणाचे वर्णन आहे. मी तेथे असताना काही खट्याळपणा, लडिवाळपणा केला असेलच आणि तुला त्रास दिला असेल ना गं? कां पाठीला पाठ लावून जन्माला आलेल्या आम्हा भावांच्या उचापतीत तुला अशी कौतुक करण्याची संधीच मिळाली नसेल?
मी चार पाच वर्षाचा असतानाच तुझ्यापासून दुरावून गावी आलो. तुझ्या इतकीच माया मोठ्या काकूने माझ्यावर केली असणार. कारण आई म्हणजे काय नातं असतं याची कल्पनाच नव्हती. उन्हाळ्याच्या अगर दिवाळीच्या सुटीत गाठी पडल्या तरी आई आणि काकूच्या जिव्हाळ्यात काही फरक जाणवला नाही. प्राथमिक शिक्षण संपवून मी शहरी वातावरणात आलो .माणसं, जागा, वातावरण बदललं. पण माया जिव्हाळा तोच. काका काकी म्हणजे दुसरे आईवडीलच. प्रेम असं घट्ट, अगदी दुधावरच्या सायी सारखं. स्निग्ध आणि दाट. दुधाला कुठं त्याचं ओझं होते.? उलट संरक्षणच. परंतु दुखण्यात मी रुग्ण शय्येवर पडलेला असताना ‘आई” म्हणून भेटायला येताना पाहिल्यावर, कानावर पडलेला तुझा आवाज, शरीराला झालेला तुझा मातृत्वाचा स्पर्श, सारे सारे जीवनाच्या अंतापर्यंत स्मरणात राहील.
मला आठवतं आईच्या सानिद्ध्याची खरी पाखर मला जन्मापासून तरूणपणी दोन वर्षे का होईना लाभली होती. तरीही आईची माया त्यावेळी इतर लहान भावंडांत वाटली गेलेली, आता मी मोठा झालोय, सन्माननीय तंत्रज्ञ आहे. त्याच्यासाठी त्याच्या प्रेमळ आईने सोसलेल्या खस्ता आणि काढलेलं कष्ट वाया गेले नाहीत. आम्हा मुला-मुलींची लग्न झाली आणि संसारही सुरळीत सुरु झाले.
सुखाच्या पाठोपाठ दुःख वाटंच पहात होतं असं वाटतं. मोठ्या चुलत भावाच्या अकाली जाण्याने तुम्ही उभयता उदास झालात .त्याही मनस्थितीत माझ्या ५१ व्या वाढदिवसाचे मला पाठविलेले अभिष्टचिंतनाचे आतून आधार देणारे आणि वरून उपदेशपर पत्र मिळाले. ते पत्र तर मी जपून ठेवलेच आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा l, पती लक्ष्मीचा जाणतसे.ll जैसी स्थिती आहे तैशापरी राहे,l कौतुक तू पाहे संचिताचे.ll सकल जीवांचा करितो सांभाळ,l तुज मोकलिला ऐसे नाही.ll हा उपदेश सतत डोळ्यासमोर येतो.
मला आठवतं की माझ्या लग्नानंतर मी सौ. ला घेऊन आजोळी गेलो होतो. माझ्या वेळची सुईण जिवंत आहे कळल्यावर तिच्या झोपडीत तिला भेटलो. खूपच आजारी म्हातारी. अंगावर नुसती पांढरी कातडी. पापण्यांच्या फटीतून मी दिसलो की नाही कुणास ठाऊक. ”मी मोहन, अनुसयाचा” एवढं सांगायचाच अवकाश की, तिने अंदाजानेच आपले दोन्ही हात पुढे केले अन मला मिठीत घेतले. अन पटापटा मुकेही घेतले दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होतेच पण तुला सांगू, माझ्या सासूबाई पण डोळे पुसू लागल्या. असल्या निर्व्याज खेडेगावच्या प्रेमाचा आठव त्या पुण्याला परत येईपर्यंत करत होत्या. असं प्रेम सर्वाना मिळावं हीच त्यांची अपेक्षा.
वडिलांचा स्वभाव, करारीपणा, रागीटपणा, शिस्त, अलिप्तपणा, अध्यात्म, हे गृहीत धरून तुझा पत्नीधर्म चालू होता. म्हातारपणी बायको काळजी घेते अन नवरा त्याला ‘त्रास देणे’ समजतो ही एक नेहमीची व्यथा. प्रेम करणा-या माणसाचा उपद्रव वाटावा हा दैवदुर्विलास नव्हे का?. जेंव्हा जेंव्हा तू त्यांची अशी सेवा करायचीस तेंव्हा तेंव्हा एकाद्या बाईने आपल्या नवऱ्याची मनोभावे केलेली सेवा इतकाच त्याचा पारंपारिक अर्थ अभिप्रेत नसे. अशी कामे म्हणजे पतीशी मधून मधून होणारा प्रेमळ संवाद असेल. तुमच्या परस्परांच्या दीर्घायू बंधनाचे असंख्य तरंग टिपणारे ते अवीट, अविस्मरणीय क्षण असायचे. आपण सर्वानीच त्यांची व्यवस्थित सेवा केली होती. एवढे सहन करूनही आनंदाने जगण्याचा एकही क्षण तू सोडला नाहीस. मी शत प्रतिशत सद्गुणांचा पुतळा नाही. पण वास्तवाचे प्रखर दर्शन सहन करण्याची तुझी अमर्याद शक्ती पाहून विस्मय वाटायचा. त्यांचे माझ्या मांडीवरच देहावसान झाले त्याक्षणी तू मला आश्वासक आधाराच्या भावनेने पोटाशी धरलेस . “आपण रडायचं नाही बरं का?. परमेश्वराने आपल्याला आतापर्यंत हात दिला आहे. कदाचित डोळ्यातून अश्रू वाहतील पण देव सर्व साक्षी आहे..” ही ती धीर देणारी वाक्ये. शेवटपर्यंत मी माझे कर्तव्य जबाबदारीने पार पडल्याची ती पावती होती असं मला उगीचच वाटून गेलं. आधार देण्याची एक अशीच अनामिक प्रचंड शक्ती कुणीतरी आपल्याला बहाल करत होतं असं वाटलं.
रोग बरा होणं ही एक जिवंत प्रतिक्रिया आहे. ती मनाच्या अवस्थेवर अवलंबून राहते हे तुझं मत. जवळ जवळ दोन-तीन वर्षाच्या उपचारानंतर तुझा रक्तदाब आटोक्यात आला होता. काही वेळा तर आजार गंभीर रूप धारण करत होता.
बाल, शिशु, कुमार, तरुण, प्रौढ या सर्व अवस्थेतील तुझ्या घरातील लहानथोर आप्तांचे, निरनिराळ्या प्रिय व्यक्तींचे मृत्यू डोळ्यासमोर होऊन सुद्धा दिसलेच नाहीत अशा रीतीने आयुष्याची गाडी पुढे जात होती. किंवा ते त्या त्या अवस्थांचे मृत्यू होते म्हणून जाणीव झाली नाही? त्या सुहृदांचे अंत्य दर्शनही तुला घेता आले नाही, किंवा दुस-या कोणत्याही आनंदाच्या समारंभात/प्रसंगातही सहभाग घेता आला नाही. अशा सर्व बातम्या तुला अंथरुणावर बसूनच ऐकाव्या लागत होत्या. या तुझ्या अतीव दुःखी अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी आम्ही तुझा ९० वा वाढदिवस साजरा केला. त्याक्षणीसुद्धा सर्व सुहृद, मुलं, सुना, आप्तेष्ट, नातवंड, पतवंड यांच्या कोंडाळ्यात आणि गलबलाटात तुझा रमलेला चेहेरा पाहिला अन कार्यक्रमाच्या आयोजनाचे सार्थक झाले असे वाटले. नंतर असं वाटून गेलं की पुढचे ८ महिन्याचे आयुष्य जगण्याला हीच उर्जा तुला कारणीभूत झाली असेल. .
आयुष्याच्या अखेरच्या पर्वात मृत्यूचे अग्रदूत म्हणजेच वार्धक्य समोर ठाकलेले बघून मनुष्याला परमार्थाची तरी ओढ लागते किंवा भीतीने तो गारठतो तरी. पण ही व्याकुळता, अगतिकता तुझ्या जवळ फिरकल्याचे तू जाणवून दिले नाहीस. तुझी पारायणे, जपजाप्य, नामस्मरण अशी पारमार्थिक मार्गक्रमणा चालू होतीच. ‘विस्मरण’ आणि ‘संवेदन शून्यता’ या देहाच्या स्थिती ९० व्या वर्षापर्यंत सुद्धा तुझ्या जवळ देखील फिरकल्या नाहीत. ही अवस्था कधी तरी संपणार आहे हे शाश्वत तू मान्यंच केले होतेस. ‘म्हातारपण हा सुद्धां एक आजार असतो. म्हाता-या माणसाने या वयात निवृत्त मनाने जगायला शिकावं, कारण सुख हे मनाला समतोल राखण्यावर असतं, ते पैशाने विकत सुद्धा मिळत नाही, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायच नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं’ अशीच तुझी धारणा असावी. आजारपणात तुझ्यावर काही प्रसंग असे आले की, मला तर असं वाटतं की, प्रत्यक्ष मृत्युदेवाने चार पांच वेळा तरी दरवाजातून डोकावून तुला बघून सांगितलं असेल की “ जग अजून थोडा वेळ, तोवर मी उरलेली कामे संपवून येतो”.
जीवनातील मांगल्यावर असीम श्रद्धा आणि भवितव्याबाबत आशावादी असणारी तू पाषाणहृदयी पुतळ्या सारखी न वाटता विशाल हृदयी समुद्रासारखी वाटलीस. जीवनावर प्रेम करणं म्हणजे काय हे मला आताच कळलं. हे जीवन सोडून जाताना खूपच वाईट वाटेल. तुझ्या आयुष्यातील यातना याला तू दुःख समजून वागलीच नाहीस. खूप परिश्रम केल्यावर आलेली ती एक उदात्त क्लांती ( प्रेरणाशक्ती ) आहे असंच म्हणायला हवं. असं सुखाचं दुःख सर्वाना मिळून चालणार नाही. अनुभव, अनुभूती, साक्षात्कार, या तीन पायऱ्या तू कणखरपणे पादाक्रांत केल्या आहेसे वाटते. ९० व्या वाढदिवसाच्या फोटोतील हास्य यावर मात करून गेलं आहे अशी माझी खात्री.आहे. फोटोत कसाही असला तरी मी तुझ्या फोटोकडे नजर वळवली की तुझा प्रेमळ चेहेरा माझ्याकडेच पाहताना दिसतो.
‘मातृदेवो भव’ हे आपले पुराणकाळापासून आलेले संस्कार. महर्षी गौतमाचा पुत्र चित्रकारा याने इंद्राला मातेची महती सांगितली ती अशी –‘ नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गती: , नास्ति मातृसमं त्राणं , नास्ति मातृसमं प्रिया.! ( मातेसारखी छाया नाही, आश्रयस्थान नाही, रक्षण नाही आणि मातेइतकं प्रिय सुद्धा कुणी नाही.)
जुन्या सिनेमातली, काही भावगीते, कविता ऐकताना तुझी आठवण येते.कधी कधी वाटत तुझे पांग फेडण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. ‘श्यामची आई’ मधलं, ‘भरजरी हा पितांबर दिला फाडून’ किंवा कवी वा.गो. मायदेव यांची. ‘हे चिमण्या चंद्रा पाहुनी तुजला खचतो माझा धीर’ ही, ना.वा. टिळक यांची ‘केवढे हे क्रौर्य’, माधव ज्युलिअन यांची ’प्रेमस्वरूप आई’, यशवंत यांची , ‘आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी ’ ही कविता, अशातून निर्व्याज माया ममतेचे जे स्वरूप दाखवलं आहे ते मनाला स्पर्शून जातं. आणि म्हणूनच म्हणावंस वाटत कीं ’ हे जन्म तू फिरोनी, येईन मीही पोटी.’
